मानवी वर्तन-व्यवहाराची सखोल चिकित्सा तसेच त्यातील सकारात्मक बदलांबद्दल चर्चा करणारं मानसशास्त्रज्ञाचं साप्ताहिक सदर..
प्रथम व्यक्ती म्हणून आपल्या स्वत:कडून व इतरांकडून काय स्वरूपाच्या अपेक्षा आहेत, हे ओळखू या. त्यानंतर त्यातील मूलभूत गरजा कोणत्या आणि अवास्तव कोणत्या, यांची विभागणी करू या. हे करताना मूलभूत गरजांची पूर्तता होण्याकडे विशेष लक्ष द्यावं. तसेच नातेसंबंधांतील आपल्या आग्रही भूमिकांचा आढावा घ्यावा. आपल्या अपेक्षापूर्तीतून कोणती ना कोणती तरी पोकळी भरून निघावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण हे प्रत्यक्षात कितपत शक्य आहे, हे लक्षात घेत आपण इतरांवर अपेक्षांचं ओझं लादतो आहोत का, हे कळण्याकरता इतरांच्या वागण्या-बोलण्याकडे नि:पक्षपणे, निरीक्षणात्मक दृष्टीनं पाहिल्यास हे कळणं कठीण नाही.

भारतीय संघाने प्रत्येक डावात छान खेळलं पाहिजे.. आणि याचं मोजमाप म्हणजे तो डाव किंवा ती चॅम्पियनशिप आपण जिंकलो म्हणजेच चांगले खेळलो- हे स्वाभाविक समीकरण आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांना नवीन नाही. आणि त्या क्रीडासंघाला तर ते अजिबातच नवे नाही. मैदानात उतरलं की जिंकायचंच. आणि त्याजोडीला प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या नजरा- आशा-आकांक्षा, आग्रह व सर्वात प्रामुख्याने अपेक्षांनी ओतप्रोत भरलेल्या- आपल्यावर टिकून असणार. आणि त्यातच आपण टिकाव धरणं, लढत राहणं- यांचं दडपण येतं, हे कोणताही performer (सादरकर्ता) सांगेल. मग तो एखादा खेळाडू असो वा कला सादर करणारा कलाकार. अशा दैनंदिन ‘चॅम्पियनशिप’ (नातेसंबंधांच्या मदानावर) आपणही लढवत असतो, त्यात सहभागी होत असतो, केव्हातरी त्यात ओढलेही जात असतो. अपेक्षांचं ओझं आपल्याला कोणालाच नवीन नाही. किंबहुना, ते इतकं सवयीचं, की एखादी कृती करायला किंवा न करायलाही हेच ओझं कारणीभूत ठरतं. अपेक्षा.. इतरांच्या आपल्याकडून, आणि स्वत:च्याही स्वत:कडून! आपण साकारत असलेल्या निरनिराळ्या भूमिकांचा विचार केला तर सहज लक्षात येईल की प्रत्येक भूमिकेबरोबर काही ठोस कल्पना, संकल्पना, वर्तन-कक्षा आणि भूमिकेबद्दलच्या एकंदर दृश्य स्वरूपाची विशिष्ट प्रकारची बांधणी आखलेली आढळते. यावरच मग एखाद्याने अमुक भूमिका बजावताना काय व कसं बोलावं, वागावं, असावं, नसावं- हे स्वाभाविकपणे ठरतं.. ठरवलं जातं. आपली या प्रत्येक बाबीला मान्यता असेल वा नसेल; परंतु आपल्या अपेक्षांच्या पोतडीत अशीच साधनसामग्री सापडते, हे विशेष!
इतरांप्रति आपल्या अपेक्षांच्या फूटपट्टय़ा आपण सतत बाळगून असतो. एखादी व्यक्ती व तिचं आपल्या आयुष्यात असणारं स्थान व बजावली जाणारी भूमिका यावर फूटपट्टीचं माप ठरत असतं. निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या मापाच्या फूटपट्टय़ा. त्या मापात त्या- त्या लोकांनी स्वत:ला बसवलं तर ‘आत’, नाहीतर ‘बाद’-अशी तारेवरची कसरत! याउलट, काही लोक एकाच फूटपट्टीने ओळखीच्या वा अनोळखी लोकांचं मोजमाप करतात, ती गोष्ट वेगळी! या लोकांना ‘one size fit all’- सर्वानी एकाच प्रकारे.. उत्तम व बिनचूक वागलंच पाहिजे व आपल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अपेक्षापूर्ती केलीच पाहिजे, ही त्यांची अतिव्याप्त धारणा! ही धारणा या विचारांतून तयार झालेली आढळते की, मी विचारपूर्वक, वस्तुस्थितीनिष्ठ मापदंड लावून, ग्रंथाचं वाचन व अभ्यास करून, मनुष्याने ‘किमान’ व ‘कमाल’ या दोन्ही पठडीत अमुक प्रकारे वागावं व तमुक प्रकारे न वागावं, हे ठोकताळे तयार केलेले आहेत. तेव्हा मनुष्य म्हणून इतकंएखादी व्यक्ती करूच शकते. किंबहुना, इतकंकेलं तरच मनुष्यत्वाचं बिरुद ती व्यक्ती स्वत:ला जोडून घेऊ शकते, असाही या दिग्गज व्यक्तींचा विश्वास असतो.
स्वतंत्र फूटपट्टय़ा जरा जवळून पाहू या. एखाद्या मुलाने आई-वडिलांसाठी अमुक करावंच, एखाद्या नवऱ्याने बायकोसाठी तमुक करावं, आईने मुलांसाठी अमुक करावं, एखाद्या गृहिणीने असं वागावं.. या भूमिकांव्यतिरिक्त एखाद्या स्त्रीने असं वागावं; तसं वागू नये, एखाद्या व्यावसायिकाने हे करावं; ते करू नये, शासनाने अमुक काम आधी करावं; तमुक नंतर करावं.. आपलं गाव/ शहर असं असावं, रस्ते तरी निदान बरे असावेत, वातावरण पोषक असावं, ट्रेन वेळेवर यावी, गर्दी कमी असावी, आज जरा तब्येत बरी राहावी, आज जेवणाला चव असावी.. दैनंदिन प्रश्नांपासून ते शासनाच्या वागणुकीपर्यंत आणि स्वत:च्या आयुष्यबांधणीपासून ते संबंधितांच्या वर्तनापर्यंत- आपल्या अपेक्षांचं गणित बसलेलं आहे. तेही इतकं सवयीचं.. आणि त्यामुळेच स्वाभाविक वाटणारं! हे गणित आपल्याला व इतरांना नेहमी यशस्वीपणे सोडवता येईलच असं नाही. गणिताच्या नेमक्या कोणत्या एका पायरीवर घोळ झाला आणि उरलेले ठोकताळे कोलमडले, हे सापडलं तर गणित नव्यानं सोडवता येऊ शकेल.. योग्य उत्तर शोधण्याच्या ध्येयानं!
या अपेक्षांचा स्रोत, स्वरूप व प्रक्रिया अभ्यासून पाहू या.
आपल्या अपेक्षांचं स्वरूप आपली जडणघडण, बालपणाच्या निरीक्षणांशी, कौटुंबिक आचारविचार, आíथक, सामाजिक आणि भौगोलिक स्थितीशी, व्यक्तिमत्त्वाच्या भावनिक, बौद्धिक व इतर पलूंशी, आपल्याला येणाऱ्या अनुभवांशी निगडित असतं. तेव्हा अपेक्षेचा उगम निश्चित काय व कोणता, हे शोधणं रंजक व माहितीपर ठरेल. परंतु तिचा उगम झाल्यानंतर वर्षांनुर्वष आपण ते चक्र चलत् स्वरूपातच ठेवतो- ते कशामुळे, हे शोधणंही तितकंच फायद्याचं ठरेल.
मूल म्हणून घरात वावरताना कळत-नकळत अनेक अनुभव आपण आपल्या व्यक्तिमत्त्वावर कोरत असतो. आपल्या आई-वडिलांचं आपसातलं वागणं, नातेवाईक व इतरांशी संबंधांचं स्वरूप, त्यांच्या लग्न, कुटुंब, समाज, भांडणतंटे, व्यावहारिक जीवन व इतर जीवनविषयक संकल्पना व धारणांची ओळख त्यांच्या दृश्य-अदृश्य वागण्यातून होत असते. त्यामुळे बालपणीचे अनुभव हे मोठेपणीच्या अपेक्षांचा एक मुख्य स्रोत म्हणावा लागेल. नाटक-सिनेमांतून लेखक व दिग्दर्शकाच्या दृष्टीतून साकार होणारं नातेसंबंधांचं स्वरूपही आपल्या संकल्पनांवर प्रभाव पाडतं. काही संकल्पना व आयुष्याच्या पलूंप्रति अपेक्षा वृद्धिंगत होतात, तर काही जुन्या अपेक्षा बाजूला सरून नव्या जन्म घेतात. आपण ज्या समाजव्यवस्थेचा भाग असतो त्यातील चालीरीती व अपेक्षा या आपल्याही बनतात आणि आपण त्या आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत असतो. अपेक्षांचा स्रोत यांपकी काहीही असल्यास त्यांचं अस्तित्व हे आपल्याला सतत जाणवत असतं. तर अपेक्षाभंग हेच बहुतांश लोकांच्या नराश्याचं कारण आढळतं. आपण एखादी अपेक्षा करतो व गोष्टी त्याप्रमाणे न घडल्यास आपल्याला वाईट वाटतं, राग येतो आणि नातेसंबंधांवर त्याचा परिणाम होतो. तरीही आपण अपेक्षा करणं काही सहजासहजी सोडत नाही. याचं कारण म्हणजे बऱ्याचदा आपण अपेक्षांचं  tool kit अनवधानाने सतत बाळगत असतो. आपण हे सवयीने गृहीत धरतो, की एखादी गोष्ट अशी घडायला हवी म्हणजे हवीच. नाही घडली, तर फार मोठा घोळ झाला. आपल्याला यादरम्यान वस्तुस्थितीचा, त्यातील व्यक्तींचा विसर पडण्याची दाट शक्यता असते. या अपेक्षा आपल्या जीवनशैलीचा इतका अविभाज्य घटक बनतात, की एखाद्याचं त्यानुसार वागणं म्हणजेच नॉर्मल वागणं, त्याखेरीज दुसरं काही नाही- असं समीकरण आपण बांधतो. अपेक्षांच्या या स्वाभाविक स्वरूपामुळे आपण कधी रास्त अपेक्षांची पायरी ओलांडून अवाजवी व टोकाच्या अपेक्षांच्या दालनात दाखल होतो, ते सांगता येत नाही. या दोन प्रक्रिया उदाहरणातून पाहू.
सर्व कुटुंबीयांनी रात्रीच्या जेवणाचा आस्वाद एकत्र बसून घ्यावा- ही रास्त अपेक्षा. परंतु एखादा आठवडा कुटुंबातील एखाद्याला कामामुळे किंवा इतर काही कारणांमुळे न जमल्यास लगेच कुटुंबाच्या परंपरेला धक्का लागला असं समजून ग्रह करून घेणं अवाजवी ठरेल. बदलत्या परिस्थितीचं भान न ठेवता सतत चालत आलेल्या रीतीचा आग्रह धरणं, हे याचंच उदाहरण.
आपण आपल्या मुलांसाठी उपसलेल्या कष्टांचा मुलांनी सतत पाठपुरावा करावा, नेहमी त्याची आदरपूर्वक उजळणी करत वेळप्रसंगी आपल्या दडपणाखाली राहावं व या कष्टांची जाण ठेवून त्याची परतफेड म्हणून आई-वडलांचा प्रत्येक शब्द (प्रेमानं) झेलावा, ही पालकांची अपेक्षा. मात्र, ही अपेक्षा तीव्र आग्रहात बदलल्यास मुलं ‘आई-वडलांचं कर्तव्य त्यांनी बजावलं.. ते त्यांनी बजावायला हवंच!’ या भूमिकेतून त्याकडे पाहतात. बऱ्याचदा अशा आग्रही भूमिकेमुळे नाती दुरावतात. त्यामुळे मुलांकडून फक्त ‘कर्तव्यपूर्ती’ तेवढी केली जाते; त्यामागील प्रेम व आदर नाहीसा होतो.
दैनंदिन जीवनातील अपेक्षा हा केंद्रिबदू असणारी अशी अनेक उदाहरणं देता येतील. अशा प्रकारे आपण अनेक ‘इच्छा’ बाळगतो व त्या इच्छांचं रूपांतर पुढे ‘अपेक्षां’मध्ये होताना दिसतं.
अपेक्षांच्या स्वरूपाबरोबरच आपण त्या इतरांपर्यंत कशा तऱ्हेनं पोहोचवतो, मुळात पोहोचवतो तरी का, हा प्रश्न मजेदार आहे. बऱ्याचदा अंगवळणी पडलेल्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीने आपण न सांगताच आपलं मन वाचून समजून घ्याव्यात व तसं वागावं, ही अपेक्षा आपण बाळगतो. किंबहुना, आपण हेही गृहीत धरतो की, अपेक्षा बोलून दाखविण्याची गरज नाही. कारण इतर लोकही आपल्यासारखाच हुबेहूब विचार करतात. त्यामुळे कळत-नकळतपणे आपण इतरांना सतत मायक्रोस्कोपखाली ठेवलेलं असतं. समोरची व्यक्ती आपल्या सुप्त अपेक्षेप्रमाणे वागत नसल्यास बऱ्याचदा आपण संवाद साधण्याचे आडमार्ग निवडतो. त्यात मग टोमणे, चिडचीड, अबोला, उपहास, तुलनात्मक उदाहरणं देणं, सतत जुने संदर्भ देणं, सद्य:स्थितीवर व वागणुकीवर नाखुशी व्यक्त करणं, आणि या सर्व प्रकारांत स्वत:ला व स्वत:च्या वागण्याला सूट देऊन इतरांवर तोफ डागणं- या सगळ्या मार्गाचा वापर आपण करतो. आपल्या शब्दांतून, चेहऱ्यावरच्या हावभावांवरून व देहबोलीतून समोरच्या व्यक्तीला कदाचित आपला मुद्दा कळेलही; परंतु त्याचबरोबर तुमच्यात भावनिक दुरावा निर्माण होण्याची शक्यताही निर्माण होईल. नातेसंबंधांत तेढ निर्माण होऊन वातावरण गढूळ बनू शकेल. अपेक्षांचं ओझं लादणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहण्याची इच्छा निर्माण होईल. त्या व्यक्तीप्रति तिरस्कार वाढेल. आपलं मत, गरजा आणि आनंद सतत मागे सारल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ शकेल व शोषितपणाची ही जाणीव दीर्घकाळ राहिल्यास मानसिक संतुलन बिघडवायला ती पुरेशी ठरू शकेल. याउलट, नात्यात मोकळीक देणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात आपण मोकळेपण अनुभवतो, स्वच्छंद वागणुकीची मुभा मिळते, स्वत्व जपता येते आणि त्यातून आपणहून समोरच्या व्यक्तीची मानसिकता जपण्याकडे आपला कल वाढतो. म्हणूनच ‘इच्छा’ धरावी, ‘आग्रह’ नको, हे धोरण याकरता योग्य ठरतं. माणसं व त्यांची मनं सक्तीनं नव्हे, तर स्वाभाविकरीत्या आंतरिक ओढीनं जोडलेली राहतात. आपल्या आसपास अशा दोन्ही प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळतात. या दोन्हींशी वागताना आपला आपल्यालाच फरक जाणवतो. तटस्थपणे व बारकाईने याचा विचार केला तर हा फरक सहज लक्षात येईल. दोन्ही व्यक्तींकडून योग्य तो बोध घेऊन आपण आपल्या वागण्यात व आपल्या भूमिकेत यथायोग्य बदल करावा.
प्रथम व्यक्ती म्हणून आपल्या स्वत:कडून व इतरांकडून काय स्वरूपाच्या अपेक्षा आहेत, हे ओळखू या. त्यानंतर त्यातील मूलभूत गरजा कोणत्या आणि निव्वळ अपेक्षा कोणत्या, यांची विभागणी करू या. हे करताना मूलभूत गरजांची (शारीरिक, भावनिक, आíथक, सामाजिक) पूर्तता होण्याकडे विशेष लक्ष द्यावं. याशिवाय नातेसंबंधांतील आपल्या आग्रही भूमिकांचा आढावा घ्यावा. त्यात रास्त आणि अवाजवी अपेक्षांची विभागणी करावी. आपल्या आयुष्यातील अपेक्षापूर्तीतून कोणती ना कोणती पोकळी भरून निघावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. पण हे प्रत्यक्षात कितपत शक्य आहे, हे सांगणं कठीण. हे लक्षात ठेवून आपण इतरांवर अपेक्षांचं ओझं लादत आहोत का, याबद्दल इतरांच्या बदलत्या वागण्या-बोलण्याकडे लक्षपूर्वक, नि:पक्षपणे, निरीक्षणात्मक दृष्टीनं पाहिल्यास हे कळणं कठीण नाही. हे करताना आपला हेतू दुसऱ्याच्या चुका किंवा कमतरता दर्शविण्याचा नसून, स्वत:च्या अपेक्षांच्या चौकटीत सुधारणा करण्याचा असावा. स्वत:कडे बिचारेपण घेणं किंवा स्वसमर्थन करणं टाळावं. वेळप्रसंगी योग्य संवादशैलीत याबद्दल इतरांशी चर्चा करायला काहीच हरकत नाही. या स्तरावर रास्त व बंधनकारक वाटणाऱ्या अपेक्षा नेमक्या कोणत्या, यासंदर्भात मतभेद होऊ शकतात. दोन्ही व्यक्तींनी नातं वृद्धिंगत करणाऱ्या अपेक्षा कोणत्या व व्यक्ती म्हणून प्रत्येकाला उपयुक्त अपेक्षा कोणत्या, यांत योग्य तो समन्वय साधला तर उचित निर्णय घेता येईल. प्रसंगी दोन पावलं मागे जाण्याची तयारी असली की मीपणा बाजूला सारून नातं निखळ करण्याकडे आपला कल झुकेल. सुरुवातीला इतर लोक आपल्या हेतूबद्दल साशंकता दर्शवतील, अविश्वास दाखवतील; परंतु आपल्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निश्चय दृढ असल्यास आपण या तात्पुरत्या अडथळ्यावर सहजपणे मात करूशकतो. बदल आत्मसात करण्याची ही प्रक्रिया मोठय़ा धर्याची व संयमाची आहे. आपली मानसिकता, विचार व भावनांचा कल्लोळ, त्यातून काढलेले यशस्वी व अयशस्वी मार्ग, स्वत:वर व इतरांवर झालेले त्याचे परिणाम, त्याने कुटुंबस्वास्थ्यात झालेले बदल या सगळ्याची नियमितपणे लेखी स्वरूपात नोंद ठेवली तर आपल्याला या सर्व प्रक्रियेच्या यशस्वीतेचा आढावा घेणं अधिक सोपं जाईल. त्यामुळे कोणतं धोरण राबवायचं व कोणतं बाद करायचं, हे लक्षात येईल.
सूचना/ नियम
१. या सगळ्याच्या जोडीला काही नियम व स्वसूचनांचा समावेश केल्यास ही प्रक्रिया अधिक सशक्त होऊ शकेल. नातं आणि त्यातील प्रेम व सौख्य हे व्यक्तीच्या अहंभावापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे वर्तमानात वावरताना मी जुने व बुरसटलेले ठोकताळे व कटू आठवणींची उजळणी करणार नाही. हे ठरवूनसुद्धा मी जुन्या अवाजवी अपेक्षांच्या आहारी जात राहिल्यास दिलगिरी व्यक्त करीन व सकारात्मक बदलाकडे पुन्हा वाटचाल करीन.
२. मी एका नात्याचे ठोकताळे दुसऱ्या नात्यावर लादणार नाही. प्रत्येक नात्याचं महत्त्व, स्वरूप आणि मर्यादा ओळखून वागण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करीन. स्वत:कडूनही विचारपूर्वक, नियमबद्ध, ध्येयनिष्ठ आणि सहेतुक प्रक्रिया घडल्यास त्यातून मिळणाऱ्या यशाची गोडी काही वेगळीच असेल. सजग व्यक्ती म्हणून आपला स्वत:बद्दलचा आदरभाव वाढेल व आपल्या स्वत:प्रतिच्या अपेक्षांसंदर्भातही आपण ही प्रक्रिया राबविण्यासाठी सज्ज होऊन तिचा लाभ अनुभवू शकू.
ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
is it wrong to expect rich husband
‘श्रीमंत नवरा पाहिजे’, अशी अपेक्षा महिलांनी जोडीदाराकडून ठेवणे चुकीचे आहे का?
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!