डॉ. केतकी गद्रे

सध्या जगाला छळणाऱ्या करोना विषाणूच्या साथीसंदर्भात बातम्या, माहिती, आकडेवारी, चर्चा, मतमतांतरे, अफवा यांचा जणू पूरच सर्वत्र आलेला दिसतो. त्यांना प्रतिसाद देताना, करोना साथीशी चाललेल्या जीवांच्या युद्धातील मननीती आखणे गरजेचे झाले आहे..

‘चिंता’ या संकल्पनेचा उगम ‘भय’ आणि ‘भीती’ यातून होतो, असे मानसशास्त्रीय संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांवर आधारित मत आहे. भयाला मानवी उत्क्रांतीत महत्त्वाचे स्थान आहे. भयाला ‘सव्‍‌र्हायव्हल मेकॅनिझम’ म्हणजेच किमान जगणे शक्य करण्यासाठी अस्तित्वात असलेली भावनिक यंत्रणा, असे संबोधले जाते. ही भावना पूर्णत: ‘मानवी’ आहे.  म्हणजेच घाबरणे, भीती वाटणे आणि त्यामुळे चिंता करणे हा भावनिक आचार मानवी अस्तित्वाचा अविभाज्य घटक आहे. अस्तित्व टिकवण्याचे साधनही आहे. करोना- कोविड १९चे आपल्यावरील सावट पाहता, त्याचा विस्तार, संभाव्य प्रादुर्भाव, सततच्या बातम्या, त्यातून निर्माण होणाऱ्या चर्चा, एकंदर निर्माण झालेली घरादारांतील परिस्थिती हे सर्व ‘अस्तित्वास धोका’सदृश संकेत मानवी मेंदूला देताना दिसतात आणि वर म्हटल्याप्रमाणे ‘भय’ हजेरी लावते- या धोक्यातून अस्तित्वाचा टिकाव लावण्यासाठी!

आताचा करोना विषाणू नवीन स्वरूपाचा आहे, असे मानले जात आहे. ‘नवीन’ असल्यामुळे त्याबद्दलची माहिती टप्प्याटप्प्यांत आपल्यापर्यंत पोहोचत आहे. विषाणूमुळे एका विशिष्ट देशात अनेक मृत्यू झाले, ही पहिली बातमी आपल्यापर्यंत पोहोचल्यामुळे आपला मेंदू त्या आज्ञावलीत शिरला.. आणि भयाला त्वरित प्रवेश मिळाला.     भयाने आपले बस्तान बसवले. त्यामुळे नंतर येणाऱ्या माहितीसदृश संकेतांकडेही आपण साशंकतेनेच पाहात राहिलो, पाहात आहोत. म्हणूनच शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या विषाणूबद्दलची शक्य तितकी संशोधनपर माहिती देऊनसुद्धा आणि संसर्ग टाळण्यासाठी काय आपल्या नियंत्रणात आहे याबद्दल स्पष्टपणे सांगूनही भयाने आपली जागा काही सोडलेली नाही.

त्यामुळे आपली भीती आधीच्या तुलनेत साधारणत: तितकीच आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही. मानसशास्त्रात ‘अँकिरग बायस’ ही एक संकल्पना आहे; विचार, निर्णय क्षमतेला शह देणारा पूर्वग्रह असा तिचा अर्थ आहे. याचा तात्त्विक अर्थ असा की, बऱ्याचदा आपण सर्वप्रथम अवगत झालेल्या माहितीवर आपला वैचारिक ‘अँकर’ स्थिर करतो आणि तो इतका घट्ट रोवला जातो की, त्यानंतर येणाऱ्या माहितीचा संदर्भ आणि अर्थ आपण याच अँकरनुसार आणि अँकरवरून लावतो. अँकरचा मूळ अर्थ म्हणजे जहाज पुढे न जाऊ देण्यासाठी, स्थिरतेसाठी जहाजातून पाण्यात सोडलेला धातूचा एक अवजड तुकडा. याच पद्धतीचे काहीसे कोविड १९च्या बाबतीतही होताना जाणवते आहे. आपला हा वैचारिक अँकर आता आपल्यापर्यंत येणाऱ्या नवीन माहितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवतो आहे, त्यावर विचार करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकतो आहे.  आता आपण अजाणतेपणाने या माहितीला साजेशा, तिचे खरेपण सिद्ध करणाऱ्या माहितीलाच दुजोरा देणाऱ्या माहितीवर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसत आहोत. मानसशास्त्रात या प्रवृत्तीला ‘कन्फर्मेशन बायस’ असे म्हटले जाते.

कोविड  १९ या वैश्विक आव्हानाचा आपल्या मेंदू-शरीरावर, विचार प्रक्रियांवर, भावस्थितींवर, जीवनशैलीवर, परस्परांतील संबंधावर, आर्थिक-सामाजिक जीवनावर परिणाम दिसून येत आहे. या आव्हानाने धोक्याचे बिगूल वाजवले आहे हे जरी खरे असले, तरी या आव्हानाला कसे सामोरे जावे यावरही विचार सुरू आहे. या धोक्याच्या परिस्थितीमुळे मानवी मेंदूमधील ‘भयाचे स्थान’ सतर्क झालेले दिसते. भयाची सतर्कता आणि तीव्रता आपण वास्तविक असणाऱ्या धोक्याच्या पातळीशी साजेशी ठेवण्यात असमर्थ ठरलो, तर आधी म्हटल्याप्रमाणे हे भय अवास्तविक विचार-आचारांना मेंदू-मनात सहज शिरकाव देईल. भय स्वत:चे पुष्टीकरण करण्यासाठी आपले लक्ष त्याच गोष्टींकडे वेधेल, ज्याने आपली भीती आणि चिंता कायम राहील. ते येणाऱ्या माहितीचे पूर्वग्रहदूषित संदर्भ लावेल व उपयुक्त, उत्पादक, आवश्यक, आशावाद निर्माण करणाऱ्या माहितीला परतवून लावेल. भय पूर्णत: नाहीसे होणे शक्य नाही, कारण ते ‘सव्‍‌र्हायव्हल मेकॅनिझम’ आहे आणि त्यामुळे गरजेचेही. परंतु त्याच्या पातळीवर व प्रादुर्भावावर आपला काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो, हेही तितकेच खरे आहे. स्वाभाविकच या भयाचा परिणाम आपल्या विचारप्रक्रियेवर कसा व कितपत करून द्यावा, हेही काही अंशी आपल्या नियंत्रणात आहे, हेही ध्यानात असू द्यावे.

आपली विचारप्रणाली आणि विचारशृंखला वस्तुस्थितीला साजेशी असावी, ही रास्त अपेक्षा आहे. परंतु ही अपेक्षा आपण नेहमी पूर्ण करतोच असे नाही. कधी आपल्या स्वत:च्या पूर्वग्रहांमुळे  किंवा ती कशी साध्य करावी याबाबतच्या अज्ञानामुळे वा या प्रक्रियेवरील अविश्वासामुळे, या प्रक्रियेचे प्रयोजन आणि प्रभाव न समजल्यामुळे,    निव्वळ आळसामुळे, अवास्तविक विचारप्रक्रियेचा वर्षांनुवर्षे जडलेल्या सवयीमुळे, तर कधी बाह्य़ परिस्थितीमुळे आणि त्यातील असामान्य (येथे उपहास अपेक्षित!) आचार-विचारांमुळे ही अपेक्षापूर्ती होत नसावी.

कोविड १९च्या आव्हानाकडे पाहणाऱ्या भिन्न व्यक्तींचे भन्नाट दृष्टिकोन पाहिले, ऐकले, अनुभवले की याची जाणीव होते. काही लोक ‘जरा अतिच चाललंय’ या भूमिकेतून या आव्हानाकडे पाहताहेत, तर काही सुतावरून स्वर्ग गाठताहेत. ‘खुद्द शासनाने निर्देश देण्यापर्यंतची पाळी आली म्हणजे आता अतिभयंकर परिस्थिती ओढवली आहे/ उद्भवणार आहे.. सगळं संपलं आता.. आयुष्याला आता काही अर्थ उरला नाही..’ असा ग्रह करून घेताना काही जण दिसतात. शासन प्रतिबंधात्मक दृष्टीने निर्देश देत आहे, हा सामना सामूहिकरीत्या आणि विवेकीपणाने व्हावा यासाठी निर्देश देत आहे. मात्र, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून- ‘ते सांगताहेत म्हणजे काही तरी भीषण सत्य लपवताहेत आणि काही तरी भयंकर होणार आहे,’ असा दृढ ग्रह करून, असहायतेला निमंत्रित करून, घरातील स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता याकडेही दुर्लक्ष करणारी मंडळी आहेत. प्रसारमाध्यमांनी आपल्यापर्यंत इत्थंभूत माहिती पोहोचवण्याची कामगिरी बजावली/बजावत आहेत. परंतु काही माध्यमे वस्तुनिष्ठ ‘बातमी’ पोहोचवताना / पोहोचवल्यानंतर व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन बाळगताहेत, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. म्हणजे जे आवश्यक, गरजेचे, संदर्भाला धरून आहे, त्याचा प्रसार करणे योग्यच; परंतु माध्यमांच्या शब्द, भूमिका यांना ‘अति’ हा शब्द जोडला गेला की, त्यामागील उद्देशाचे गांभीर्य हरवून जाते. त्यामुळे पाहिलेल्या, ऐकलेल्या बातमी/माहितीचा अर्थ लावताना आपण विवेकबुद्धी आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन कायम ठेवावा.

माहिती आणि तिला जोडल्या गेलेल्या भावनेमुळे विचारांची घडी प्रभावित होते, असे मानसशास्त्रीय संशोधन सांगते. परंतु माहितीचा आपल्या स्मृतीत शिरकाव होईपर्यंतचा प्रवास सजगतेने, दक्षतेने आखणे शक्य आहे, हेही आढळले आहे. अचूक, भेसळ  नसलेले आणि सुयोग्य माहितीचे स्रोत कोणते, हे प्रथम समजून घेऊन तेथूनच माहिती मिळवायला हवी. आताच्या परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटना आणि राज्य व केंद्र सरकारकडून देण्यात येणारी अधिकृत माहिती आणि आकडेवारी यावर लक्ष केंद्रित करणे, आपला वैचारिक अँकर तेथे स्थिर करणे योग्य ठरेल.

अनिश्चितता हाताळणे हे जोखमीचे काम असते. दैनंदिन अनिश्चिततेपेक्षा करोना आव्हानाने निर्माण झालेली अनिश्चितता काही प्रमाणात भिन्न आणि  तीव्रही आहे. त्यामुळे आपली उपाययोजनाही त्या तोलामोलाची असणे गरजेचे आहे हे खरे असले; तरी याचा अर्थ आता दैनंदिन व्यवहारात भयंकर व अतितीव्र स्वरूपाचे बदल करणे अनिवार्य आहे, असे समीकरण बांधणे  टाळावे.

मूलभूत स्वच्छतेचा नित्यक्रम, पौष्टिक, घरी शिजवलेल्या जेवणाचा आग्रह, पुरेशी झोप, व्यायाम, कुटुंबातील नात्यांचे, संबंधांचे संवर्धन, आत्मविकासाच्या दिशेने वाटचाल, त्यासाठी एखादे कलाकौशल्य अवगत करून घेणे, छंद जोपासणे, घरातील कामांचा नित्यनेम ठेवणे आणि या कामांचा भार घरातील एका व्यक्तीवर (सहसा स्त्रियांवर) न पडू देता प्रत्येकाने हातभार लावणे, गरज असल्याखेरीज घरातून बाहेर न पडणे.. या व इतर अनेक गोष्टी आपण करू शकतो. हा ‘टाळेबंदी’चा काळ आत्मपरीक्षणासाठी उत्तम काळ समजावा; परंतु हे करत असताना वेळप्रसंगी बाह्य़ परिस्थितीमुळे खचून गेल्यासारखे, भयाने ग्रासल्यासारखे, कोंडल्यासारखे वाटेल, असहाय वाटेल, नैराश्य आल्यासारखे वाटेल, राग येईल. या भावस्थितींचा स्वीकार करावा, कारण या सर्व मानवी भावना आहेत. त्यांची अनुभूती सर्वानाच येते. स्वत:प्रतिच नव्हे, तर घरातील प्रत्येक व्यक्तीप्रति करुणेची भावना ठेवावी, कारण सगळ्यांच्या संयमाची ही परीक्षा आहे. एखाद्वेळी कुटुंबातील एखाद्याचा संयम सुटताना दिसला, तर समजून घ्यावे आणि त्या व्यक्तीनेही लवकरात लवकर स्थिरावण्याचा सक्रिय प्रयत्न  करावा. आत्मिक क्षमतेची स्वत:ला आठवण  करून द्यावी. वेळप्रसंगी मानसोपचारतज्ज्ञांची (यातील अनेकांनी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे) मदत घ्यावी.

घरात लहान मुले असल्यास आपली जबाबदारी अधिक वाढते. सतत भडीमार होणाऱ्या तीव्र घटनाक्रमाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या वयाचा  आणि आकलनशक्तीचा-क्षमतेचा आढावा घेऊन त्यांना माहिती द्यावी. या विषयावर मौन न बाळगता त्यांना कळेल अशी व इतपतच माहिती जरूर द्यावी. त्यांच्या प्रश्नांना बगल देणे टाळावे. कारण आपल्या आचरणातून सहज जाणवणाऱ्या भीतीला, अस्वस्थतेला मुले अचूक ओळखतात. त्यामुळे संभ्रम आणि भीती निर्माण न होऊ देता, त्यांच्या वय आणि आकलनानुसार त्यांना माहिती द्यावी आणि त्यांनाही घरातील नित्यक्रमात सामील करून घ्यावे. आव्हानांशी संयमाने, धीराने, विवेकीपणाने झुंज देणारे कुटुंबीय या पद्धतीने  मुलांसाठी मार्गदर्शक ठरतील.

या आव्हानाशी झुंज देण्यासाठी आपल्या शारीरिक रोगप्रतिकारशक्तीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहेच, तसेच आपली भावनिक प्रतिकारशक्तीही सुदृढ होईल असे प्रयत्न करावेत, त्या दिशेने पावले उचलावीत. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य एकमेकांशी संलग्न आहे, एकमेकांवर अवलंबून आहे. करोनाचे आव्हान आपल्या वैयक्तिकच नव्हे, तर वैश्विक स्तरावरची कसोटी आहे.  परंतु या आव्हानाचे संधीत रूपांतर करता येते का, ते पाहावे. भयाने ग्रासून जाऊन निष्क्रिय, असहाय होण्यापेक्षा, जमेल तितके आपल्या वैचारिक प्रक्रियांचा आढावा घ्यावा. वैचारिक चुका टाळाव्या. म्हणजेच सुतावरून स्वर्ग गाठणे टाळावे. थोडक्या माहितीवरून अतक्र्य निष्कर्ष काढणे टाळावे. माहिती घेताना व देताना सुयोग शब्द, सुयोग्य आवाजपट्टीत वापरले, ऐकवले जावेत. मथितार्थ  लक्षात घेण्याकडे अधिक कल असावा. बाह्य़ परिस्थिती लवकरात लवकर सुसह्य़ व्हावी, सुरळीत व्हावी, सर्वाना उत्तम आरोग्य लाभावे, हे सावट दूर व्हावे ही प्रार्थना मनात असावीच. परंतु याबद्दलची माहिती व उद्गार आपल्या जाणीव आणि मन:पटलावर येऊन आदळताना विचार, विवेक, तर्कशुद्ध दृष्टिकोन जागृत ठेवून वास्तवाशी घट्ट  संबंधाचा आग्रह धरून काळजी घ्यावी. आताची परिस्थिती आणि त्यातील आपली वर्तणूक व भूमिका भविष्य प्रभावित करणारी ठरणार आहे, हे ध्यानात घ्यावे.

लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत. ईमेल : ketki.gadre@yahoo.com