हरिहर कुंभोजकर

चांगल्या संस्था सार्वजनिक नीतिमत्तेशिवाय भरभराटीला येऊ शकत नाहीत. त्या टिकण्यासाठी मानवी चेहरा नसलेल्या तत्त्वांवर निष्ठा असावी लागते. सामाजिक नीतिमत्ता नसेल तर ते शक्य होत नाही. लोकशाहीबाबतही हे सत्यच!

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?

सरत्या आठवड्यातलीच ही बातमी आहे. बिहारमधील वैशाली या गावी एका सरकारी कार्यक्रमाचे उद्घाटन तिथल्या पशुपालन आणि मत्स्यपालन या खात्याच्या मंत्र्यांच्या हस्ते होणार होते. काही कारणांमुळे मंत्रिमहोदयांना उद्घाटन समारंभाला जाणे शक्य न झाल्याने त्यांनी आपल्याऐवजी आपल्या बंधूंना उद्घाटनासाठी पाठवले. अनेकांना ही गोष्ट किरकोळ वाटली असेल. पण प्रस्तुत प्रसंग आपल्या देशातील एका खोलवर रुजलेल्या दुखण्याचे एक लक्षण आहे. सुमारे ३७ वर्षांपूर्वी आपल्या तत्कालीन पंतप्रधानांची दु:खद हत्या झाली होती. तत्कालीन राष्ट्रपती दिवंगत पंतप्रधानांचे एकनिष्ठ अनुयायी होते. त्यांनी पंतप्रधानांच्या पुत्रासच दिल्लीत बोलावले आणि पंतप्रधानपद सांभाळण्यास सांगितले. नवनियुक्त पंतप्रधानांचा पूर्वी राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता. बिहारमधल्या मंत्रिमहोदयांना आपल्याशी एकनिष्ठ व्यक्तीची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी सरकारी कामावर आपल्या बंधूंना पाठवले. दिवंगत पंतप्रधानांनीही आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीला राष्ट्रपतिपदी बसवले होते आणि राष्ट्रपतींनीही ती निष्ठा जपली होती. असे का होऊ शकते? मध्ययुगात सातारच्या छत्रपतींनी बाळाजी विश्वनाथ याची पेशवेपदावर नेमणूक केली. पेशवेपद वंशपरंपरागत नव्हते. पण बाळाजीनंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव पुढचा पेशवा झाला. क्रमाने चार पेशवे कर्तबगार निघाले. मराठ्यांचे झेंडे अटकेपार गेले. त्यानंतरचा पेशवा नादान निघाला आणि ज्या वेगाने मराठा साम्राज्य वाढले, त्या वेगाने ते कोसळले. मराठा साम्राज्याचे पतन आणि आजच्या प्रमुख विरोधी पक्षाची स्वातंत्र्योत्तर काळातील अवनती यात कमालीचे साम्य आढळते. पण हा योगायोग नाही. देशाच्या सुदैवाने हे साम्य इथेच संपते. त्या वेळी पेशवाई आणि देश दोन्ही रसातळाला गेले. आज देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पक्षाची वाताहत झाली तरी देश समर्थपणे उभा आहे. हाही योगायोग नाही. आपली लोकशाही संस्था, कितीही सदोष असली तरी, अस्तित्वात असल्यामुळे हे शक्य झाले आहे. वासुदेवशास्त्री खरे या इतिहासकाराने इंग्रज का जिंकले आणि मराठे का हरले, याची कारणमीमांसा करताना म्हटले आहे की, इंग्रजांकडे संस्था काम करते; आमच्याकडे व्यक्ती काम करते. व्यक्ती कर्तबगार किंवा नादान असू शकते, पण तिला नियमांचे बंधन नसते. संस्था नियमांनी बांधलेली असते. त्यामुळे किमान पात्रता असल्याखेरीज व्यक्ती संस्थेच्या प्रमुखपदावर पोहोचू शकत नाही. यदाकदाचित पोहोचलीच तरी, तिच्या मूर्खपणाला नियमांची बंधने पडतात. ब्रिटिशांमुळे आपल्याकडे संस्था निर्माण झाल्या. पण त्यांची जी जोपासना करायला हवी होती, ती करण्याची काळजी आम्ही घेतली नाही. आज जे देशापुढे प्रश्न दिसतात, त्यांतील बरेच प्रश्न संस्थांची काळजीपूर्वक जोपासना न झाल्याने निर्माण झाले आहेत.

अनेक विचारवंतांच्या मते, जागतिक परिस्थिती बदलल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य काहीसे अगोदर मिळाले. त्या वेळचे नेते वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असल्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य लोकशाही स्वीकारली. पाश्चात्त्य देशांत औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती झाल्यानंतर तेथील जनतेने झगडून लोकशाही अधिकार मिळवले. आपल्याला ते न झगडता मिळाले. आपल्या समाजव्यवस्थेत व्यक्तीचे समाजातील स्थान जन्माने, जातीने, घराण्याने ठरायचे. आपण सरंजामशाहीतून एकदम लोकशाहीत उडी घेतली. एका अर्थाने आपली लोकशाही मुदतीपूर्वीच जन्माला आलेल्या बालकासारखी होती. मुदतपूर्व जन्माला आलेल्या मुलाचे संगोपन जास्त काळजीपूर्वक करायला हवे असते. ते आपण केले नाही.

सर्वात जुनी संवैधानिक लोकशाही अमेरिकेची. जॉर्ज वॉशिंग्टन हा ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याचा सरसेनापती होता. त्याने राजा व्हावे अशी सामान्यजनांची इच्छा होती. पण त्यानेच राजेशाहीला विरोध केला. नवीन राज्यघटना कशी असावी यासाठी नेत्यांची बैठक भरली होती. बाहेर लोकांनी गर्दी केली होती. जेव्हा बैठकीच्या दालनातून बेंजामिन फ्रँकलिन बाहेर आला तेव्हा गर्दीतील एका स्त्रीने त्याला विचारले की, ‘‘आम्हाला काय मिळाले? लोकशाही की राजेशाही?’’ फ्रँकलिन म्हणाला, ‘‘लोकशाही. पण तुम्ही ती टिकवली तर!’’ ती टिकावी म्हणून त्यांच्या नेत्यांनी किती सूक्ष्मात जाऊन विचार केला होता याचे एक उदाहरण देतो. अमेरिकेने अध्यक्षीय राज्यपद्धती स्वीकारल्यावर अध्यक्षांना कसे संबोधावे याची चर्चा झाली. ‘द प्रोटेक्टर’, ‘हिज एक्सलन्सी’, ‘हिज मायटीनेस’ आदी अनेक पर्याय सुचवले गेले. पण राज्यघटनेप्रमाणे सर्व व्यक्ती समान आहेत, यासाठी ‘मिस्टर प्रेसिडेंट’ असे म्हणावे असे निश्चित झाले. आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान सोडाच, गल्लीबोळातल्या किरकोळ लोकप्रतिनिधींचा उल्लेख करायचा झाला तरी श्रीयुत अमुक अमुक म्हणून हाक मारायचे धाडस करत नाही. वाहतूक पोलिसाने जर एखाद्या समाजकार्याचा आव आणणाऱ्याला हटकले तर त्याला राग येतो आणि ‘जानते नहीं मैं कौन हूं?’ असा प्रश्न विचारत तो पोलिसाच्या अंगावर धावून जातो. लोकशाही ही एक जीवनपद्धती आहे. एक विचारपद्धती आहे. हे आपण केव्हाच लक्षात घेतल्याचे दिसत नाही. जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, अब्राहम लिंकन हे बाळ गंगाधर टिळक, मोहनदास करमचंद गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षा कमी कर्तृत्ववान नव्हते. पण त्यांना लोकमान्य, महात्मा, नेताजी अशी बिरुदे लावून मखरात बसवले गेले नाही. लोकशाही बारीकसारीक गोष्टींत त्यांनी जपली.

लोकशाही ही सामाजिक संस्था आहे. सामाजिक संस्था व्यवस्थित चालण्यासाठी सामाजिक नीतिमत्तेची गरज असते. दुर्दैवाने आपल्या संस्कृतीत केवळ वैयक्तिक नीतिमत्तेचा विचार झाला. सामाजिक नीतिमत्तेचा झाला नाही. सर्व भारतीय धर्म वैयक्तिक नीतिमत्तेची शिकवण देतात. सामाजिक नीतिमत्तेची नाही. आपल्या नीतिमत्तेचे मापदंड व्यक्तीला घटक मानून निश्चित होतात. समाजाला घटक मानून नाहीत. त्यामुळे सामाजिक नीतिमत्तेचे निकष आपल्याकडे निर्माण झाले नाहीत.

सामाजिक आणि वैयक्तिक नीतिमत्ता यांतील फरक स्पष्ट करण्यासाठी बरीच उदाहरणे देता येतील. विस्तारभयास्तव दोनच देतो. एक आपले. दुसरे पाश्चात्त्यांचे.

दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला पहिला परकीय राजा महम्मद घोरी. पहिल्या युद्धात घोरीला पृथ्वीराजाने पराभूत केले. जेव्हा त्याला बेड्या घालून पृथ्वीराजासमोर आणले तेव्हा घोरीने दयेची याचना केली. शरणागताला अभय देणे हे शूराचे भूषण आहे. पृथ्वीराज शूर होता. त्याने वैयक्तिक नीतिमत्ता जपली. घोरीला सोडून दिले. पण हा केवळ पृथ्वीराजाचा वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न होता काय? ज्या सैनिकांनी युद्धात प्राण गमावले त्यांच्या बलिदानाचे काय? ज्या प्रजेला युद्धाच्या खाईत लोटले त्या प्रजेच्या त्यागाचे काय? किमान घोरी पुन्हा डोके वर काढणार नाही हे पाहणे त्याचे सामाजिक कर्तव्य नव्हते काय? ही गोष्ट मध्ययुगीन भारतापुरती मर्यादित नाही.

राजा जयचंद राठोडची मुलगी आणि पृथ्वीराज एकमेकांवर अनुरक्त होते. तिच्या स्वयंवरप्रसंगी पृथ्वीराज तिला पळवून घेऊन गेला. दोघांनी लग्न केले. जयचंदला हे मान्य नव्हते, कारण जयचंदच्या दृष्टीने पृथ्वीराज ‘निचले जाती’चा होता. जयचंदने पृथ्वीराजाचा सूड घेण्यासाठी घोरीला पुन्हा बोलावले. कारण घराण्याची इज्जत त्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यापेक्षा मोठी होती. आज आपण वेगळे वागतो काय?

घोरीने जो व्यूह रचला तो विचार करण्यासारखा आहे. पृथ्वीराजाची सेना जिंकण्याच्या स्थितीत असताना घोरीने निवडक घोडदळ पाठवून पृथ्वीराज ज्या हत्तीवर बसला होता त्याला घेरले आणि त्याला पकडून आणले. आता राजाच पकडला गेल्यावर सैनिकांनी कुणासाठी लढायचे? सैनिकांनी हत्यारे टाकली. कारण त्यांची निष्ठा स्वामीशी होती, राज्याशी नव्हती. विजयाचे रूपांतर पराभवात झाले. पृथ्वीराजानेही दयेची याचना करून घोरीला परतफेड करण्यास सांगितले. पण घोरीने दया न दाखवता पृथ्वीराजाचा शिरच्छेद केला. कारण घोरी काही केवळ स्वत:साठी लढत नव्हता. त्यामागे काहीएक सामाजिक तत्त्वज्ञान होते.

काही वर्षांपूर्वी एक प्रकरण जगभर गाजले. एका प्रमुख पाश्चात्त्य देशाच्या राष्ट्रप्रमुखाचे त्याच्या सेक्रेटरीबरोबर विवाहबाह््य संबंध होते. चौकशीत ते त्याने दडवून ठेवले होते. नंतर तो राष्ट्रप्रमुख खोटे बोलल्याचे उघड झाले. त्याच्यावर महाभियोग बसला. आरोप काय? अनैतिक संबध नव्हे, तर खोटे बोलून त्याने न्यायिक प्रक्रियेत अडथळे आणले होते, हा! सेक्रेटरीबरोबरचे संबंध हा त्या दोघांच्या वैयक्तिक नीतिमत्तेचा प्रश्न होता. न्यायिक प्रक्रियेत अडथळे आणणे हा सार्वजनिक नीतिमत्तेचा प्रश्न होता.

सार्वजनिक नीतिमत्ता महत्त्वाची मानल्याने, पाश्चात्त्य देशांत भ्रष्टाचारात अडकलेला मनुष्य सार्वजनिक जीवनातून उठतो. आपल्याकडे तसे होत नाही. आजही राजकीय नेत्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या उनाड मुलाला सरकारी कंत्राट मिळवून दिले तर तो आपले पितृकर्तव्य पार पाडत असतो. आपल्याकडे सार्वजनिक संस्था निर्माण होतात; पण त्या संस्थापकांबरोबरच नष्ट होतात. कारण आपल्याकडे निष्ठा संस्थाचालकाशी असते, संस्थेशी नसते. चांगल्या संस्था सार्वजनिक नीतिमत्तेशिवाय भरभराटीला येऊ शकत नाहीत. त्या टिकण्यासाठी मानवी चेहरा नसलेल्या तत्त्वांवर निष्ठा असावी लागते. सामाजिक नीतिमत्ता नसेल तर ते शक्य होत नाही. आपण लोकशाही स्वीकारली. पण जे पक्ष ही लोकशाही राबवणार त्यांच्यातच अंतर्गत लोकशाही नाही. कारण निष्ठा पक्षावर नसते, पक्षप्रमुखावर असते. आज काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक राजकीय पक्ष एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे चालतात. ते तसे चालू शकतात, कारण अनुयायी आपली निष्ठा पक्षप्रमुखाला वाहतात, पक्षाला नाही. अशा पक्षांची लोकशाही निष्ठाही दिखाऊच राहते. मग लोकशाही रुजणार कशी? अनेक पाश्चात्त्य देशांत गौतम बुद्ध, महावीर या महामानवांच्या जवळपास पोहोचतील असे कोणी जन्मले नाही, तरीही ते एक कार्यक्षम समाजव्यवस्था निर्माण करतात. कारण त्यांचा समाज त्या व्यवस्थेशी एकनिष्ठ राहतो, व्यक्तीशी नाही.

hvk_maths@yahoo.co.in