दिल्लीवाला

जोर आमचाच!

दिल्लीत भाजपच्या निवडणूक प्रचाराला गती आली असली तरी ‘आप’ला टक्कर देण्यासाठी आणखी जोर लावला लागणार आहे. भाजपसाठी मुख्य प्रचारक मोदी हेच असल्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याची आशा निर्माण झाली आहे. भाजपचे नेतेही त्यांना मानसिक उभारी देताना दिसतात. सत्ताधाऱ्यांवर आपण शिरजोर झाल्याचं जाहीरपणे सांगायचं; खासगीतदेखील यापेक्षा वेगळं काही बोलायचं नाही, असं कार्यकर्त्यांना बजावून सांगितलेलं आहे. भाजप नेत्यांचा घोळ संपत नसल्यानं कार्यकर्त्यांनी स्वत:हून वातावरणनिर्मिती हाती घेतली असावी असं दिसतंय. खरं तर नागरिकत्वाच्या मुद्दय़ावरून जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून भाजपनं प्रचाराला आक्रमक सुरुवात केली होती. पण काश्मीरच्या मुद्दय़ावर प्रचारमोहीम जशी रंगली, तसं अजून तरी दिसत नाही. काश्मीरच्या जनजागृती मोहिमेसाठी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागरिकत्वाची मोहीम सुरू झाली तेवढय़ात जेएनयूचं प्रकरण गाजलं. त्यामुळंही कदाचित दिल्लीत भाजपचं लक्ष विचलित झालं असावं. त्यात पुन्हा जेएनयू हल्ल्यात अभाविपचं नाव गोवल्यामुळं भाजप थोडा का होईना, अडचणीत आला. हे प्रकरण शांत होण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नागरिकत्व जनजागृती मोहीम जोरदार चालवली जाऊ शकेल.

जोश..

जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराला आठ दिवस होतील. मुखवटाधारी लोकांच्या मारहाणीनंतर दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या आवारात शांतता होती. अचानक एखादी भयानक गोष्ट घडून गेली की ती झाल्याचं समजत असतं, पण मानसिकदृष्टय़ा स्वीकारणं जड जातं. तसं काहीसं झालं असावं. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थी-शिक्षक मोठय़ा संख्येनं जमलेले होते. विद्यापीठाच्या बाहेरूनही लोक पाठिंबा द्यायला आलेले दिसत होते. प्रवेशद्वारावर विद्यापीठाच्या आतमध्ये साखळी आंदोलन, घोषणाबाजीही झाली. पोलिसांच्या विरोधात निदर्शनं सुरू असताना प्रवेशद्वाराच्या बाहेर काही अंतरावर संध्याकाळी ५ च्या सुमारास जेएनयूच्या विरोधात नारेबाजी सुरू झाली. इथंही मोठा जमाव होता. एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन आंदोलनं केली जात होती. तणाव वाढण्याची शक्यता दिसत होती; पण वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे जिकडंतिकडं असल्यानं पोलिसांनी दोन्ही आंदोलनं नियंत्रणात ठेवली. काही वेळानं बाहेर सुरू असलेल्या आंदोलनातील लोक कंटाळले. मग त्यातील काहींनी काढता पाय घेतला. हा सगळा गदारोळ सुरू असताना कुलगुरू विद्यापीठात फिरकले नाहीत. काही विद्यार्थी सांगत होते की, आम्ही कित्येक दिवसांमध्ये कुलगुरूंना पाहिलेलं नाही. जेएनयूची धाटणी डाव्या विचारांची असल्यानं या विचारांशी जोडलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा कुलगुरूंवर भलताच राग आहे. डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यानंतर कुलगुरूंनी त्याच विद्यार्थ्यांवर आगपाखड केल्यामुळं त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीला आणखी बळ मिळालं. दीपिका पदुकोन येऊन गेल्यानं आंदोलनात उत्साह भरला गेला. त्याच दिवशी कन्हैया कुमारही जेएनयूमध्ये होता. तो खूप टोमणे मारत, फिरकी घेत बोलतो. त्याचं बोलणं आक्रमक असल्यानंही तो लोकप्रिय बनला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयावर काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यावर कन्हैयाच्या भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारलेला होता. कन्हैयाच्या रूपाने डाव्या चळवळीला नवा वक्ता मिळाला, हे मात्र खरं!

इथंच राहणार!

टॅक्सीवाला मुस्लीम होता, बडबडय़ा होता. ‘भाजपचं राजकारण’ या विषयात जणू त्यानं पीएच.डी. केली असावी असं तो बोलत होता.. ‘‘मोदी-शहांना हिंदुराष्ट्र बनवायचं आहे. कसं शक्य आहे? सगळे हिंदू आहेत का? मग हिंदुराष्ट्र कसं होईल? हिंदू लोकच हिंदुराष्ट्र बनू देणार नाहीत. हिंदूंमध्येही शहाणी माणसं आहेत ना..’’ असं त्याचं सगळं संभाषण किमान दीड तास, तेही एकतर्फी सुरू होतं.. ‘‘या देशातून आम्हाला कोणी बाहेर काढू शकत नाही..’’ आम्हाला म्हणजे मुस्लिमांना. हा टॅक्सीवाला सौदी अरेबियात राहून आला होता. त्याला अरबी भाषा चांगली येत होती. तिथल्या मुस्लिमांबद्दल त्याच्या मनात फारशी चांगली भावना नसावी. ‘‘सगळ्यांसमोर बॉसला सुनावून भारतात परत आलो. त्याला उर्दू कुठं येत होतं, मग मी त्याला उर्दूत शिव्या दिल्या. भारतात ये मग दाखवतो तुला, अशी धमकी देऊन आलो..’’ टॅक्सीवाला सांगत होता. ‘‘आम्ही इथंच राहणार. मला कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण मी भारत सोडून जाणार नाही..’’ टॅक्सीवाला त्वेषाने सांगत होता. भाजपचं राजकारण त्याला पसंत नव्हतं. त्याचं म्हणणं होतं, ‘‘मोदी-शहा काहीही म्हणत असले, तरी वेळ आली तर दोन समाज रस्त्यावर नक्कीच उतरतील. मुस्लीम आणि शीख. शीख जबरदस्त लढवय्ये आहेत आमच्यासारखे. कसे मुकाबला करतील तुम्ही बघाच..’’ मुस्लिमांना एनआरसीबद्दल काय वाटतं, हेही तो सांगत होता. अखेरीस विषय दिल्ली निवडणुकीवर आला. ‘‘सलमान खानचा मी जबरदस्त फॅन आहे, पण तो जरी केजरीवाल यांच्या विरोधात उभा राहिला तरी माझं मत ‘आप’लाच..’’ टॅक्सीवाल्याचं मत पक्कं होतं. हाच नव्हे, एकही टॅक्सीवाला केजरीवाल यांच्या विरोधात बोलताना बघितला नाही.

कोंडी..

उत्तर प्रदेशात योगी सरकारनं आंदोलनं मोडून काढण्याचा विडा उचलला असताना समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचे प्रमुख मिठाची गुळणी केल्यासारखं तोंड बंद करून बसले आहेत. दलित-मुस्लीम मतदार भरडले जात असताना अखिलेश वा मायावती यांपैकी कोणीही भाजपला अडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. अखिलेश यादव रस्त्यावर कमी आणि ट्विटरवर जास्त दिसतात. त्यावर मुस्लिमांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जातंय. ‘‘तुम्ही ट्विटरवरच राहा’’ असा उपरोधिक सल्लाही कोणी तरी त्यांना दिला होता. भाजपनं दोन्ही पक्षांची कोंडी केली असं दिसतंय. मुस्लिमांची बाजू घेऊन उघडपणे भाजपच्या विरोधात आंदोलन करावं, तर आपणच हिंदू मतदारांना दूर केलं असं होईल. त्यापेक्षा शांत राहावं. आंदोलन ओसरेल. मुस्लीम आपल्यालाच मतं देतील. त्यांची चिंता नाही.. असं बहुधा सप-बसपने गणित मांडलं असावं. या दोन्ही पक्षांनी बाजूला राहणं अधिक पसंत केल्यामुळं काँग्रेसला आपोआप संधी मिळालेली आहे. आंदोलन सुरू असताना प्रियंका गांधी-वढेरा सातत्याने उत्तर प्रदेशचा दौरा करताना दिसतात. पोलिसांनी अडवल्यावर स्कूटरवर बसून नाटय़ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रियंका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. अख्खा उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंकाकडे देऊन टाकला आहे. प्रियंकाचा वावरही वाढलेला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाराणसीचा दौरा करून आंदोलनातील जखमींची चौकशी केली. काँग्रेसपासून लांब गेलेला मुस्लीम हळूहळू पुन्हा पक्षाकडं वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसू लागली आहे. मुस्लीम-दलित मतदार काँग्रेसकडं आला की उत्तर प्रदेशातील ब्राह्मणही येतील, असा काँग्रेसचा होरा आहे. पण या सगळ्या जर-तरच्या गोष्टी झाल्या. तरीही सप-बसपसाठी ही चिंतेची बाब!