21 October 2020

News Flash

रामदास विनवी :  ऐसी विचाराची कामे

वरील परिच्छेदात सदर स्तंभाच्या संदर्भात ‘रामदासांचे वाङ्मय’ असा उल्लेख आहे. ती चूक नाही.

उत्कृष्ट वाङ्मयास देवत्वाच्या महिरपीत बसवले गेल्याने भारतीय म्हणून आपले मोठे सामाजिक नुकसान झाले आहे.

या सदराची मांडणी रामदासांच्या संतपणावर बेतलेली नाही. त्यांनी जे काही लिहिले, सांगितले, त्यातील सामाजिक आशय, त्याची प्रचलित काळातही असलेली विलक्षण उपयुक्तता समजावून सांगणे आणि जाता जाता जमेल तितके ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ हा या पाक्षिक सदराचा उद्देश असेल..
सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ संपादकांचे आभार. समर्थ रामदासांच्या वाङ्मयाविषयी आजच्या वातावरणात सदर छापणे हे तसे धाष्टर्य़ाचेच. त्यांनी हे धाडस दाखवले याबद्दल समस्त वाङ्मयप्रेमींच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून आभार.
वरील परिच्छेदात सदर स्तंभाच्या संदर्भात ‘रामदासांचे वाङ्मय’ असा उल्लेख आहे. ती चूक नाही. याचे कारण रामायण असेल वा महाभारत वा अन्य काही- त्यांच्याकडे उत्तम वाङ्मय या दृष्टिकोनातून पाहणे ही काळाची गरज आहे असे सदरहू लेखकास वाटते. जगातील या उत्कृष्ट वाङ्मयास देवत्वाच्या महिरपीत बसवले गेल्याने भारतीय म्हणून आपले मोठे सामाजिक नुकसान झाले आहे. या देवत्वाच्या महिरपीने काही विशिष्ट वर्ग, त्या विशिष्ट वर्गातील काही विशिष्ट वर्णीय यांनीच त्याची दखल घेतली. अन्य मोठा वर्ग या वाङ्मयापासून लांब राहिला. अलीकडच्या काळात या आणि अशा वाङ्मयाभोवती जातीयवाद्यांनी कडेच निर्माण केले. त्यामुळे या सर्वाचा आनंद घेणे अनेकांना जमले नाही.
समर्थ रामदासांविषयीदेखील असेच घडत आले आहे. त्यांना काही विशिष्ट जातीपातींच्या चौकटीत खिळे ठोकून घट्ट बसवून ठेवण्यात आल्यामुळे त्यांच्या वाङ्मयाचा आस्वाद घेणे मोठय़ा वर्गासाठी दुरापास्त होऊन बसले. हा प्रश्न नुसत्या काव्यशास्त्रविनोदाचा असता तर त्याची इतकी तमा बाळगावी असे काही नाही. परंतु या वाङ्मयाच्या परिशीलनाने जे काही शहाणपण येऊ शकते, किंवा जो काही बोध घेता आला असता, त्यास हा मोठा समाज मुकला. हे आपले नुकसान आहेच; परंतु महाराष्ट्रातील विद्यमान जातीय चष्म्यातून पाहण्याच्या या सवयीमुळे ज्यांनी या वाङ्मयाकडे पाठ फिरवली, त्यांचेही हे मोठे नुकसान आहे. उदाहरणार्थ, ‘साहेब कामासी नाही गेला, साहेब कोण म्हणेल त्याला’ हा रामदासांचा प्रश्न हा प्रचलित अर्थाने सेक्युलरच ठरत नाही काय? किंवा ‘असोनिया व्यथा। पथ्य न करी सर्वथा’ हे त्यांचे म्हणणे आणि पथ्य न करणाऱ्यास मूर्ख ठरवणे, हे काही केवळ ब्राह्मणांनाच लागू होते असे मानावयाचे काय? तेव्हा आजची नवीन पिढी जुन्यांच्या या संकुचितपणाचा त्याग करून रामदासांच्या वाङ्मयाचा आस्वाद घेऊ शकेल असे प्रस्तुत लेखकास वाटते. त्यामुळे या सदराची मांडणी रामदासांच्या संतपणावर बेतलेली नाही. त्यांनी जे काही लिहिले, सांगितले, त्यातील सामाजिक आशय, त्याची प्रचलित काळातही असलेली विलक्षण उपयुक्तता समजावून सांगणे आणि जाता जाता जमेल तितके ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ हा या सदराचा उद्देश असेल.
रामदासच का?
प्रारंभीच्या लेखात प्रथम ‘रामदासच का?’ या प्रश्नाचा ऊहापोह करावा लागेल. तो करण्यासाठी त्यावेळचा महाराष्ट्र कसा होता याचा आढावा घेणे आवश्यक ठरते. एका वाक्यात सांगावयाचे तर त्यावेळचा महाराष्ट्र हा निश्र्च्ोष्ट होऊन मृतवत बनलेला एक थंड गोळा होता. त्यामागील कारण- त्यावेळची परिस्थिती आणि ती घडवणारा इतिहास. महाराष्ट्र हा ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकापासून अनुक्रमे सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकुट या राजवटींचा भाग होता. काही काळ मौर्यानीही महाराष्ट्रास घडवले. गौतमीपुत्र सतकर्णी याची राजवट त्याकाळी विशेष उल्लेखनीय ठरली. सहाव्या आणि आठव्या शतकात पुढे चालुक्यांची सत्ताही महत्त्वाची ठरली. पुढील दोन शतके- म्हणजे दहाव्या शतकापर्यंत राष्ट्रकुटांनी महाराष्ट्रास आकार दिला. अरब प्रवासी सुलेमान याने त्यावेळी राष्ट्रकुट राजवटीचे वर्णन जगातील चार महत्त्वाच्या आणि बलाढय़ राजवटींतील एक असे केले होते. यावरून त्या राजवटीचे श्रेष्ठत्व वाचकांना लक्षात येईल. नंतर अकरावे आणि बारावे शतक महाराष्ट्रावर चालुक्य आणि चोला यांची सत्ता गाजवून गेले. दख्खनच्या पठारासाठी त्या काळात या दोन राजवटींत अनेक युद्धे लढली गेली.
पुढे गाजली ती यादव राजवट. तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत विशाल टापूस कवेत घेणारी. आजचे उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा काही भाग असा त्यांच्या अंमलाखालील टापू होता. त्यांची राजधानी होती देवगिरी.. म्हणजेच आजचे दौलताबाद. या राजवटीचा अस्त झाला आणि महाराष्ट्र इस्लामी राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेला. संत ज्ञानेश्वरांची समाधी १२९६ सालातील. त्याआधी दोन वर्षे तुर्की सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरी काबीज केले. पुढे १३०३ साली खिलजी याने चितोड या विद्यमान राजस्थानातील संस्थानावर हल्ला केला. चवदाव्या शतकाच्या सुरुवातीस देवगिरीचा अंमल संपुष्टात आलादेखील. हे संदर्भ देण्याचा उद्देश या काळात दक्षिण भारत कसकसा परकीय राजवटींच्या जोखडाखाली येऊ लागला, हा आहे. त्यामुळे समाजतेज हळूहळू लोप पावत गेले आणि संपूर्ण परिसर जीवनरसाअभावी शुष्क होऊ लागला.
यास अपवाद काय तो भागवत धर्म म्हणतात त्याचा. या भागवत धर्माच्या संत-महंतांमुळे महाराष्ट्रात धर्मरक्षण झाले. अन्यथा हिंदू वाचलेच नसते. तुर्की, मोगल आदींच्या झुंडीच्या झुंडी महाराष्ट्रावर चालून येत असताना मान खाली घालून का असेना, जनता तगून राहिली ती या संतपरंपरेमुळे. महाराष्ट्र संपूर्णपणे यवनी अमलाखाली येत असताना संत नामदेव यांचे १३५० साली वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले. त्या सुमारास मुक्ताबाई, सेना न्हावी, चोखामेळा, एकनाथ, भानुदास अशी एक उज्ज्वल संतपरंपरा त्या काळाने पाहिली. वारकरी संप्रदाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्य परंपरेचे हे सर्व अध्वर्यु. या सर्वानी प्रजेच्या जगण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या. परकीय आक्रमणाचा वरवंटा फिरत असताना या संतमंडळींच्या वाङ्मयाने परिसरास बांधून ठेवले. परंतु एका अर्थाने या सर्वाची शिकवण ही बहुश: पारमार्थिक होती.
चांगले वागावे, पुण्यसंचय करावा आणि अखेर ईश्वरचरणी विलीन होऊन देहाचे सोने करावे आणि असे केल्याने स्वर्गप्राप्ती होते.. अशा प्रकारे आयुष्य कारणी लावावे, असे हे संत सांगत होते. हे सर्व टिकून राहण्यासाठी उत्तम होते. परंतु टिकल्यानंतर ताठ मानेने जगावयास सुरुवात करावयाची असेल तर शिकवणीचा सूर बदलण्याची गरज होती. ती समर्थ रामदास आणि संत तुकाराम या जोडगोळीने पूर्ण केली. ‘ठकासी व्हावे ठक’ असे सांगणारे रामदास आणि ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे म्हणणारे संत तुकाराम म्हणूनच वेगळे ठरतात. अत्यंत व्यवहारवादी, शरीर आणि शारीर बलसंगोपन, भौतिक सुख, कुटुंबव्यवस्था, संपत्तीनिर्मिती, व्यवस्थापन, राजकारण, बुद्धी आणि भावना यांतील द्वंद्व आदी आधुनिक काळातही महत्त्वाच्या वाटाव्यात अशा अनेक मुद्दय़ांवर समर्थ रामदासांनी सुरेख मार्गदर्शन करून ठेवले आहे. पुढील काळात या स्तंभातून त्याचा ऊहापोह केला जाईल. वाचकांना ते सर्व आजही ‘कन्टेम्पररी’ वाटेल यात शंका नाही.

lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2016 1:01 am

Web Title: article on samartha ramdas
Just Now!
X