News Flash

करोना पथ्यावर?

गेले पूर्ण वर्षभर जगास व्यापून टाकणारा करोना विषाणू त्याच्याच सूक्ष्म भाऊबंदांवर काय परिणाम करून गेला आहे?

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. प्रतिमा पंडित वाघ

गेले पूर्ण वर्षभर जगास व्यापून टाकणारा करोना विषाणू त्याच्याच सूक्ष्म भाऊबंदांवर काय परिणाम करून गेला आहे, हे हळूहळू जगभरातून संकलित होत असलेल्या माहितीच्या आधारे, विविध संशोधनात्मक सर्वेक्षणांतून समोर येत आहे. अर्थातच, या सर्वांचा मानवजातीवर झालेला आणि होऊ घातलेला परिणाम अभ्यासणे हेही ओघाने आलेच!

मुखपट्टी आणि विलगीकरण तथा अंतरमर्यादा पाळण्याने काही विषाणू-जिवाणूंना चांगलाच फटका बसला. यात प्रामुख्याने श्वसनाचे विकार पसरवणारे जंतू त्यांचा इतर वेळी सहजतेने चालणारा प्रवास करू शकले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार हाँगकाँगसारख्या ठिकाणी २०१९-२० सालच्या तुलनेत इनफ्लूएन्झासारख्या विषाणूमुळे पसरणाऱ्या फ्लूमध्ये ६३ टक्के घट झालेली दिसून आली. शाळकरी विद्यार्थीवर्गास पिडणाऱ्या कांजण्या आणि रुबेलासारखे आजार निर्माण करणारे विषाणू शाळाच बंद असल्याने अगदीच एकाकी पडले. मात्र श्वसनमार्गामार्फत पसरणाऱ्या गोवरसारख्या आजारांवर नियंत्रण येईल असे वाटत असतानाच काँगोसारख्या ठिकाणी पाच वर्षांखालील मुलांमध्ये गोवरमुळेच दगावण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले.

न्यूमोनियास कारणीभूत असणाऱ्या अनेक जिवाणू आणि विषाणूंसाठी करोना आपत्ती ठरला. अनेक ठिकाणी स्वच्छतेकडे बऱ्यापैकी लक्ष पुरवण्यात आल्याने पोटाच्या आजारांमध्येही घट झाल्याचे दिसून आले. एड्ससारखे रोग पसरवणारे सूक्ष्म जीव अगदीच दुर्लक्षित झाले (दखल घेतली गेली नाही, किंवा आकडेवारी न नोंदली गेल्याचाही हा परिणाम असावा असाही एक कयास!). येथे एक परस्परविरोधी चित्र उभे राहू शकते, ते म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनुसार एड्सची औषधे न मिळाल्याने ७३ देशांना आणि औषधे कमी मात्रेत मिळाल्यानेही इतर २४ देशांना, यापुढे त्याचे परिणाम भोगावे लागतील. सबसहारन आफ्रिकेच्या एका अहवालानुसार एड्स मृत्युदर दुप्पट होईल. येथे साधारण दीड लाख मुले एचआयव्हीबाधित असून त्यातील साधारण निम्म्यांना अँटिरेट्रोव्हायरल औषधे मिळत आहेत.

काही सूक्ष्म आप्तांसाठी मात्र करोना इष्टापत्ती ठरला. उदाहरणार्थ, श्रीलंकेमध्ये डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची उत्पत्तिस्थाने शोधून त्यांचा नायनाट करणारी यंत्रणा करोनासंबंधित कामास जुंपण्यात आली, आणि शब्दश: डेंग्यूचा अर्बोव्हायरस आणि त्यांचा वाहक डास ‘एडीस इजिप्ती’ यांना मोकळे रान मिळाले. श्रीलंकेमध्ये करोनाकाळ डेंग्यूकाळही झाला. अमेरिका, भारत, बांगलादेश, ब्राझील, इंडोनेशिया तसेच सिंगापुरात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. थायलंडमध्ये तर कोविड-१९ आणि डेंग्यू सोबतीने हानी करताना दिसले. तर पनामा, हैती आणि कोस्टारिकामध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ दिसली, कारण आजाराच्या सुरुवातीच्या काळात मलेरियाच्या प्लास्मोडियमच्या अस्तित्वाच्या तपासण्या झाल्या नाहीत, तर त्यावर नियंत्रण आणणेही अवघड होते.

‘ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन’नुसार, याच सुमारास विमानप्रवास बंद झाल्याने तसेच देशांतर्गत सीमाबंदीमुळे २१ आफ्रिकी देशांना पोलिओ, गोवर तसेच ह््युमन पॅपीलोमा व्हायरसवरची लस मिळू शकली नाही आणि लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले. एका अहवालानुसार, जगभरातील १४ विविध लसीकरणाच्या मोहिमा पुढे ढकलाव्या लागल्याने संभाव्य हानिकारक जंतूंना फायदा होणार हे नक्की! यामध्ये पोलिओ, कॉलरा, मेंदूज्वर आणि गोवर पसरवणारे सूक्ष्म जीव अग्रस्थानी आहेत. आज पोलिओ जगातून हद्दपार होण्याच्या सीमेवर असताना लसीकरणातला अडथळा धोकादायक आहे. आजही पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये त्याचे पुन्हा आगमन होऊ शकते. घाना, काँगो, अंगोलामध्ये तर त्याने पुन्हा डोके वर काढले आहेच. क्षयासारख्या आजारात, जेथे बराच काळ औषधे घ्यावी लागतात, ती वेळच्या वेळी न मिळाल्याने क्षयाच्या मायकोबॅक्टेरियमचे चांगलेच फावले. मिळेल त्या किंवा आहे त्या शरीरांमध्ये तग धरून, जमेल तसा प्रसार या जंतूने केल्याने, त्याने होणारी हानी येत्या पाच वर्षांत सर्वाधिक असेल, असेही एक अहवाल सांगतो.

करोनाने मनुष्य-प्राणिमात्रांवर यापूर्वी कधीही आली नव्हती अशी वेळ आणली. लाखोंना चांगला आहार न मिळाल्याने, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने या जंतूंच्या आक्रमणास तोंड द्यावे लागणार ते वेगळेच! करोनाच्या विळख्यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात अनेक देशांना तेथे अस्तित्वात असणाऱ्या अनेक आजारांच्या निर्मूलनाकडे पाठ फिरवावी लागली. प्रत्येक ठिकाणी करोनाच्या ओझ्याखाली दबलेल्या आरोग्ययंत्रणांना त्यांची नेहमीची कामे न करता आल्याने इतर रोगांमुळे हानी अपरिहार्य बनली. औषधपुरवठा करणाऱ्या साखळ्या विस्कळीत झाल्यानेही आरोग्ययंत्रणा हतबल झाली. करोना काबूत ठेवण्यासाठी झगडणाऱ्या यंत्रणांची अपरिहार्यता मलेरिया, एड्ससारख्या आजार पसरवणाऱ्या सूक्ष्मांच्या किती पथ्यावर पडली, हे येणारा काळच सांगेल.

(लेखिका सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

pratima.p.wagh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:09 am

Web Title: article on what effect has the corona virus had on its own microbes abn 97
Next Stories
1 सामाजिक नीतिमत्तेशिवायची लोकशाही…
2 महापालिकेची सर्वशक्तिनिशी झुंज
3 पालिका पास की नापास?
Just Now!
X