06 March 2021

News Flash

‘त्यांची’ भारतविद्या : काढुनी चष्मा डोळ्यांवरचा..

कुतूहल, जिद्द असणारे आणि चौकस मेहनत करणारे अनेक परदेशी भारतात आले, गेले, काही तर इथेच विसावले

सर अलेक्झांडर कनिंगहॅम

 

प्रदीप आपटे

कुतूहल, जिद्द असणारे आणि चौकस मेहनत करणारे अनेक परदेशी भारतात आले, गेले, काही तर इथेच विसावले. त्यांच्या कष्टपूर्ण विद्वत्तेमुळे भारताविषयीच्या अधिक उच्चतर ज्ञानगोष्टी उपजल्या. त्यातून निराळी ज्ञानदालने उघडली. ही ‘त्यांची’ आपल्याला लाभलेली ‘भारतविद्या’! तिचा वेध घेणारे हे साप्ताहिक सदर..

सत्यजित राय यांचा ‘शतरंज के खिलाडी’ नावाचा सर्वागसुंदर सिनेमा आहे. तो प्रेमचंदांच्या एका आठ-दहा पानांच्या छोटेखानी कथेवर आधारलेला आहे. अवध संस्थान खालसा करण्याचा ब्रिटिश राज्याचा खटाटोप चालू आहे. अवधचा राजा वाजिद अली शाहला त्यांना कसे आवरायचे हे कळत नाहीये, पण ती बेचैनी त्याच्या नवाबी सरदारांपर्यंत कशी पोहोचणार? इतर कुणाचीच कटकट नको म्हणून ते सारे शहराबाहेर गोमती नदीकाठच्या एका पडक्या हवेलीत येऊन बसले आहेत. पण लखनौ काबीज झाले आहे. इंग्रज सेनेने पूर्ण कब्जा करून वाजिद अलीला जेरबंद करून नेले आहे, याची त्यांना फिकीर नाही! आपली सारी बुद्धी पणाला लावून ‘शतरंज’ म्हणजे बुद्धिबळ खेळण्यात ते मग्न! आपसांत त्यावरून भांडून ते मरतात..

अशी ही छोटीशी गोष्ट! पण त्यावर पटकथा लिहिताना सत्यजित राय यांनी अनेक प्रसंग तयार केले!

एका प्रसंगामध्ये या सरदारांकडे त्यांचे ‘मुन्शीजी’ येतात आणि मांडलेल्या डावांकडे बघत हा खेळ इंग्रज कसा खेळतात, वजिराला राणी म्हणतात वगैरे फरक समजावतात. त्याबद्दल शतरंजमय सरदार त्याची थट्टा करत पूर्वजथोरवी सांगत ‘मनात आणले तर आम्ही कसे  इंग्रजांना पाणी पाजू’ वगैरे बढाई मारतात.

दुसऱ्या प्रसंगात इंग्रज अधिकारी जनरल ऑट्राम वाजिद अलीची भेट घेऊन आला आहे. दरबारातल्या आपल्या दुभाषी प्रतिनिधीला अनेक प्रश्न विचारत माहिती घेतो आहे. ‘‘हा राजा कवी आहे? कविता करतो म्हणे? मला सांग बरे, नमुना त्याच्या कवितेचा!.. त्यांनी माझ्या हाताला गडद वास येणारा द्रव लावला! त्याला काय म्हणतात?’’ इत्यादी इत्यादी.

एकीकडे निराळे लष्करी संघटन, निराळे शस्त्र तंत्रज्ञान असणारे परक्या गोष्टींची औत्सुक्याने माहिती-ज्ञान गोळा करणारे, तर दुसरीकडे त्या सगळ्याचा अभाव असणारे! ‘मराठे आणि इंग्रज’ या न. चिं. केळकरांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना वासुदेवशास्त्री खरेंनी लिहिले आहे : ‘पाण्याच्या प्रवाहात दोन भांडी वाहात आहेत, एक मातीचे आणि दुसरे लोखंडाचे. दोघे एकमेकांवर आपटले तर कोणते फुटणार हे ठरलेलेच आहे.’

फक्त भारतापुरतेच असे घडले आहे असेही नाही. जगभर असे वेगवेगळ्या समाजांना परस्परांसमोर उभे ठाकण्याची वेळ आली. त्यात जो लष्करीदृष्टय़ा बलवान ठरला तो जेता समूह आणि शरणार्थी समूह यांनी एकमेकांकडून काय शिकून घेतले? इस्लाम प्रचारक  ‘रानटी’ अरबांसमोर इराणी, तुर्की संस्कृतीने मान टाकली. अरबी भाषेचा आणि लिपींचा वरवंटा त्यांच्यावर जुलमाने फिरला. पण त्यातले काही भारतात व्यापारासाठी, मुलुखावर कब्जा करण्यासाठी पोहोचले. त्यांनी फक्त मुलूखच नाही, तर ग्रंथ काबीज केले, भाषांतरित केले. त्यातले काही युरोपीय व्यापारी आणि मिशनऱ्यांना लाभले. जेते असोत वा शरणार्थी, परस्परांकडून परस्परांबद्दल कुणी किती काय घेतले, वाढविले हा इतिहासातला सहजी ध्यानात न येणारा सुप्त प्रवाह फार महत्त्वाचा असतो.

परक्या, अपरिचित गोष्टी समोर आल्या की एकीकडे धास्ती आणि भयाचे सावट येते, पण दुसरीकडे कुतूहल आणि आश्चर्यजन्य ओढ! जवळपास सगळ्याच प्राणिमात्रांत असे दुहेरी प्रतिसाद सहजभावाने उपजतात. ज्यांचे कुतूहल मोठे, समजून घेण्याची जिद्द मोठी, ते इतिहासाची निराळी, सहजी दृष्टीला न पडणारी आणि जाणवणारी पाने लिहीत असतात.

भारताच्या इतिहासात परकीय गोष्टींचा संपर्क अनेकदा आला. समुद्रकिनाऱ्याने चालणारा व्यापार हा त्यामधला सर्वात मोठा! त्याचबरोबरीने छोटय़ामोठय़ा दुष्काळ-पुरांनी होणारी स्थलांतरे, ‘परकी’ मुलुखातून होणाऱ्या स्वाऱ्या, धाडी, आक्रमणे आणि धर्मप्रसारार्थ फिरणारे ‘साधक’, परिव्राजक प्रवासी.. अशा विविध वाटांनी संपर्क होतच असे.

आपल्याला आजमितीला उपलब्ध असणाऱ्या ऐतिहासिक पुराव्यांमध्ये त्यांनी पाहिलेले- शोधलेले- नोंदवून ठेवलेले प्रसंग, वर्णने, नावेगावे, त्यांना लक्षवेधक वाटलेल्या बाबी यांचे मोलाचे स्थान आहे. पण अशा परकीयांच्या कुतूहलामधून अधिक उच्चतर ज्ञानगोष्टीही उपजल्या. त्यातून निराळी ज्ञानदालने उघडली. काही काही तर अगदी नव्यानेच उपजली. त्यांच्या या ज्ञानलालसेने अनाहूत असा लाभ झाला. परक्यांच्या नजरेत निराळा भाव असतो. आपल्याला जे स्वाभाविक वाटते ते त्यांना अस्वाभाविक वाटू शकते. ‘रोज मरे त्याला..’ या न्यायाने आपली नजर मेल्यागत होते, म्हणून काही गोष्टींकडे ध्यानच जात नाही. कधी त्यांच्याकडे निराळी हत्यारे असतात. आपल्याला जगावेगळ्या वाटणाऱ्या ‘खोडी’ असतात. म्हणून त्यात एक निराळा ‘साक्षात्कारी’ ताजेपणा आणि अनपेक्षितपणा संभवतो.

अशा अभावित आणि अनिप्सित परिणाम व लाभांना समाजघडणीत फार मोठे मोल असते. वानगीदाखल मुद्दाम ब्रिटिश राजवटीचे उदाहरण घेऊ. राजकीय सत्ता आणि आर्थिक लाभलूट हे त्या साम्राज्याचे उद्दिष्ट होते. पण त्यात अभावितपणे अनेक बाबी निष्पन्न झाल्या. नकाशे बनविण्याला लष्करी आणि प्रशासकीय मोल होते. पण त्यातून जी पद्धत विकसित झाली ती साम्राज्य लयाला गेले तरी उपयुक्तपणे नांदते आहे. सगळे इंग्रज साम्राज्य लालसेने भारले होते असेही नाही. त्यांची ज्ञानलालसा साम्राज्याच्या उद्देशांपल्याड दान देऊन गेली. कनिंगहॅमसारखा लष्करासाठी पूल बांधा किंवा पाडा, पायवाटा खोदा अशी कामे सांधणारा अभियंता. पण ही कामे करताना त्याला जमिनीच्या वरपांगी थराखाली गाडल्या गेलेल्या वास्तूंचे, वस्तूंचे अवशेष मिळाले. त्याचे औत्सुक्य चाळविले गेले. नजर शोधक झाली. असा त्यांचा पिच्छा पुरविता पुरविता खूप काही हाती लागले. इतिहासक्रम उलगडण्यास ते मोलाचे तपशील ठरू लागले. इतके की, तो निवृत्त होईपर्यंत गव्हर्नर जनरलने त्याला पुरातत्त्व संशोधन विभाग थाटायला सांगितला. या एका कनिंगहॅम साहेबाचे २१ खंडी अहवाल आहेत. पुढचे अनेक पुरातत्त्वीय संशोधन करणारे पठ्ठेही त्याच्या तालमीत तयार झाले. तसेच काहींच्या चौकस शोधबुद्धीने अनेक दुर्लक्षित लेणी उजेडात आली.

ही काही उदाहरणे झाली. अशा किती तरी वल्ली झाल्या! त्यांच्या झपाटलेल्या नेटामुळे नवीन गोष्टी उजेडात आल्या. त्यांच्यामुळे आपलेच ग्रंथ छापील, संशोधित रूपात आले. ते छापण्याच्या दगडी मुद्रा तयार झाल्या. किट्टेलसारख्यांनी मध्ययुगीन भाषांची व्याकरणे उजेडात आणली. अनेकांनी भाषांचे शब्दकोश उभे केले. प्राचीन ग्रंथांचे पुनरुज्जीवन, संपादन केले.

अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या गरजेपोटी बारीकसारीक नोंदी ठेवण्याचा शिरस्ता पाडला. गॅझेटिअरमध्ये प्रकाशित केला. ‘ग्राह्य़म् बालादपि सुभाषितम्’ असे आपण म्हणतो ते सगळ्यांकडून घेता येईल ते चांगले घ्यावे, शिकावे असे ठसविण्यासाठी. सगळे परकीय साम्राज्याचे हस्तकच होते असे नाही. काही उघड राज्यकर्ते होते, पण त्यांच्या हातून घडलेल्या अभावित ज्ञानलाभाला अव्हेरावे असेही नाही. सगळ्या माणसांत काही राग- लोभ- आकस- हट्ट असतात. ते समर्थनीय किंवा स्पृहणीय असतात असेही मानण्याची गरज नाही. ही काळ्या-पांढऱ्यांची सरमिसळ जेवढी देशी ज्ञानवंतांमध्ये असते, तशीच परकीयांत असायचीच.

इतिहासाकडे बघताना पराकोटीचा स्वाभिमान आणि टोकाचे हिणविणारे पूर्वग्रह हे दोन ‘राहू-केतू’ संशोधनाला ग्रासतात. ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावीकाळ’ ते ‘सांगे पूर्वजांची थोरवी तो येक मूर्ख’ असे दोन टोकांचे लंबक संशोधनाला टेंगळे आणतात. ते टाळणे जरुरी असते. ‘आपले ते चांगले’ अशा हट्टापेक्षा ‘चांगले ते आपले’ ही समबुद्धी इतिहास समजून घेतानाही बाळगावी.

असे अनेक परदेशी कुतूहल, जिद्द असणारे आणि चौकस मेहनत करणारे आले, गेले, काही तर इथेच विसावले. त्यांच्या कष्टपूर्ण विद्वत्तेमुळे आपल्याला ‘अम्हांस आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा!’ अशी संधी घडवून दिली. अशी ही ‘त्यांची’ आपल्याला लाभलेली भारतविद्या!

ही लेखमाला अशा परक्यांनी घडविलेल्या भारतविद्येच्या कर्त्यांबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 12:03 am

Web Title: bharatvidya article by pradeep apte abn 97
Next Stories
1 मानीव अभिहस्तांतरातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न
2 भाषा हिताची; कृती विरोधाची..
3 द्राक्ष उत्पादकांची कंपनी
Just Now!
X