News Flash

स्वरावकाश : शब्दांना स्वरांचे पंख!

भावगीताच्या कितीतरी आधी म्हणजे ख्याल गायकी संस्थापित होण्याच्याही आधी मराठी मातीत भक्तिसंगीताने सामान्यांना जगण्याचे बळ दिले.

भावगीत हा ललित संगीतातील अतिशय लोकप्रिय आविष्कार ठरला.

|| मुकुंद संगोराम

महाराष्ट्रातील ‘भावगीत’निर्मितीला नाट्यसंगीताची पार्श्वभूमी होतीच, पण भक्तिसंगीताची प्रदीर्घ परंपराही त्यामागे होती. सहज कळणारे शब्द, त्यातील तरल भावना यांमुळे भावगीताने मराठीजनांना वेड लावले…

शब्द आणि स्वर हा एक अप्रतिम असा शुभसंकर भारतात घडला. तो संगीताला वेगळे वळण घेण्यास भाग पाडणारा होता. तसे काय आपण पाढेही स्वरात म्हणतो, पण म्हणून पाढे म्हणजे भावगीत नव्हे. स्वर आणि शब्द यांचे एकत्र येणे ही घटना संगीत आणि साहित्य या कलेच्या दोन्ही प्रांतांसाठी फार महत्त्वाची होती. अभिजात संगीतातून आपली वेगळी वाट काढत संगीत नाटकांमधील पदांनी स्वत:ची वेगळी वाट चोखाळत त्याचा प्रशस्त महामार्ग निर्माण केला. नाटकाचे कथानक पुढे जाण्यासाठी या पदांचा उपयोग होता. तो स्वतंत्रपणे संगीताचा आविष्कारही होता. त्यात शब्दांप्रमाणेच संगीताचेही महत्त्व होते. मात्र ते केवळ शब्दांनाच चिकटणारे संगीत नव्हते. संगीताला त्यामध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्त्वही होते. त्यामुळे एखादे नाट्यगीत संगीताच्या अंगाने कितीही वेळ फुलवणे शक्य होते. अभिजात संगीतातील सगळ्या ‘अलंकारां’ना त्यात स्थान होते. रागस्वरूप व्यक्त करणारी आलापी, आवाजातील फिरत, लयकारी, खटके, मुरक्या, तानांचे पलटे अशा सगळ्यांना त्यात वाव होता. त्यामुळे संगीत नाटकात भूमिका मिळण्यासाठी ‘गाता येणे’ ही पूर्वअट होती. संगीत नाटकाचा अस्तकाळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात जन्माला आलेल्या ‘भावगीत’ या संगीत प्रकाराने स्वर-शब्दांचा एक अनोखा खेळ मांडला. तो येथील रसिकांसाठी अतिशय तरल आणि उत्कट ठरला आणि त्याने लोकप्रियतेच्या सगळ्या पातळ्या ओलांडण्यास सुरुवात केली.

विसाव्या शतकाच्या आरंभापासूनच तंत्रज्ञानाने जगण्याच्या सगळ्याच पातळ्यांवर परिणाम करण्यास आरंभ केला होता. कलांच्या प्रांगणातही त्याने अनेक प्रकारचे बदल घडवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्राथमिक अवस्थेतील ध्वनिमुद्रणाचे तंत्र अवतरले, पाठोपाठ नभोवाणी, चित्रपट यांसारखी कलांना नवसंजीवनी देणारी व्यासपीठे निर्माण झाली. ही व्यासपीठे संपूर्णत: नवी होती. त्यामुळे त्यांची जडणघडणही चाचपडतच होत होती. मात्र संगीतावर आणि त्याच्या निर्मितीवर थेट परिणाम घडून आला, तो तंत्रज्ञानामुळे. विशिष्ट कालमर्यादेतच गायन-वादन केले पाहिजे, अशी कोणतीही अट नसलेल्या अभिजात संगीताचा परिणाम संगीत नाटकांवरही होणे स्वाभाविक होते. रात्री नऊ वाजता सुरू झालेले नाटक पहाटेपर्यंत चालूच राही. रसिकांच्या आग्रहाखातर ‘वन्स मोअर’ घेत तीन-चार तासांचे नाटक सहा-आठ तासही सुरूच असे. तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या मराठीतील भावगीत या आकृतिबंधाला ही अशी पार्श्वभूमी होती. हा असा पहिला सांगीतिक प्रकार, की ज्यामध्ये वेळेचे बंधन फारच कसोशीने पाळणे आवश्यक ठरले. त्या कालमर्यादेत राहूनच कलाकृती परिपूर्ण करण्याचे ते आव्हान होते. कव्वाली, ग़्ाजल, ठुमरी होरी, कजरी, टप्पा, तराणा यांसारख्या अभिजात संगीतातील ललित प्रकारातही वेळेचे काटेकोर बंधन नसतेच. भावगीताचा जन्म तंत्रज्ञानाच्या आगमनानंतरचा. खरेतर त्यामुळेच हा संपूर्ण नवीन असा कलाप्रकार निर्माण झाला. ज्यांच्या मनात ही भावगीताची कल्पना आली, ते गोविंद नारायण ऊर्फ जी. एन. जोशी हे ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ या त्या काळातील ध्वनिमुद्रिका प्रकाशित करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीतील ज्येष्ठ अधिकारी. संगीतकार, संकल्पक, लेखक, गायक अशा सगळ्या रूपातील जी. एन. जोशी हे काळाच्या पुढचे काही पाहणारे गृहस्थ. त्यांनी मराठीत ‘ग़्ाजल’ आणली. त्यांनी लहान मुलांसाठी अंगाई गीते, नीजगोष्टी सांगणाऱ्या ध्वनिमुद्रिकांची व्यावसायिक पद्धतीने निर्मिती केली. १९३५ मध्ये त्यांनी गायलेल्या पहिल्याच भावगीताच्या ध्वनिमुद्रिकेने अक्षरश: धमाल उडवून दिली. प्रेमभावनेच्या तरल आविष्कारात शब्द आणि संगीत यांची चपखल गुंफण करणारी ही रचना; शब्दांना स्वरांचे पंख लावून उडता यावे जणू!

भावगीत हा ललित संगीतातील अतिशय लोकप्रिय आविष्कार ठरला. भारतीय संगीताच्या विशाल अवकाशात या संगीत प्रकाराने मोलाची भरही घातली. सहज कळणारे शब्द, त्यातील तरल भावना आणि कुणालाही सहज गुणगुणता येणारी स्वररचना. तीन मिनिटांचाच अवधी. परंतु त्यात सगळे काही अतिशय आखीव, रेखीव आणि न बदलता येणारे. नाट्यगीतातील स्वररचना ही गायनाची मूळ चौकट. ती आतून किती विस्तारता येते, हे ती गाणाऱ्याच्या सांगीतिक क्षमतेवर अवलंबून. भावगीतात नेमके उलटे. जी रचना आहे, ती तशीच गाणे आणि त्यातून स्वर-शब्दांच्या संगमाचा आविष्कार घडवणे, हे त्याचे मूलभूत गुणधर्म. पण हे सगळे कोणत्या रसिकांसाठी होते? अभिजात संगीत संकटसमयातून चालले होते, तेव्हा संगीत नाटकाचे आगमन झाले आणि तंत्रज्ञान आल्याबरोबर मध्यमवर्गीय जाणिवांना गोंजारणाऱ्या भावगीताची स्थापना झाली. त्यानंतर अगदी आजपर्यंत या भावगीत प्रकाराने मराठी मध्यमवर्गाच्या रसिकतेची मशागत केली. त्यामध्ये येथील मातीतून जन्मलेल्या संगीताच्या आविष्काराला नवे रूपडे मिळाले. ध्वनिमुद्रिका विकत घेण्याची क्षमता असणाऱ्या उच्च मध्यमवर्गासाठी या ललित संगीताने मोहिनी घातली. त्याला त्या वेळच्या नभोवाणीने साथ दिली आणि ‘रानारानात गेली बाई शीळ, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ हे भावगीत घराघरात पोहोचले. तिथून ते मनात रुंजी घालू लागले आणि सहजरीत्या ओठावरही आले. शब्दांचे अर्थ शब्दकोशात शोधावे लागता कामा नयेत, हा भावगीताचा पहिला दंडक. साधी सोपी शब्दांची मांडणी. त्याला साजेशी वाटेल अशी चाल. त्यामुळे कविता या प्रांताकडे सहजी न वळणारा माणूस या स्वरांनी भारलेल्या कवितेच्या अक्षरश: प्रेमात पडला. संगीताला मातीचा वास कसा असतो, ते मराठी भावगीतांनी सिद्ध केले.

भावगीताच्या कितीतरी आधी म्हणजे ख्याल गायकी संस्थापित होण्याच्याही आधी मराठी मातीत भक्तिसंगीताने सामान्यांना जगण्याचे बळ दिले. संतांच्या रचना अतिशय सोप्या, सुबोध चालीत म्हणताना, ती ऐकणाऱ्याला त्यातील शब्दांमागे लपलेला भक्तिभाव आणि जीवनाचे खोल तत्त्वज्ञान स्वरांच्या संगतीने सहजपणे पोहोचवणाऱ्या या संगीताने मराठी मातीत आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेलीच होती. ती शेकडो वर्षांची परंपरा आजही सुरूच राहिली, याचे कारण त्यातील शब्दांच्या रचनेतील सौंदर्याने आणि त्याला मिळालेल्या तेवढ्याच सुरेल आवरणाने. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,‘लावुनि मृदुंग श्रुति टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने’. ते असेही म्हणतात, ‘गात जा गा गात जा गा, प्रेम मागा विठ्ठला’… शब्दांना आणि त्यातील भावाला अनुसरून निर्माण झालेल्या या भक्तिसंगीतात समूहालाही स्थान आहे. भजनकऱ्यांचाही त्यात सहभाग आहे. जिथे समूहगान असते, तेथे लयीचे स्थान वरचढ. म्हणून तेथे वाद्यांचे अवडंबरही नाही. एकतारी, मृदुंग आणि टाळ एवढेच पुरेसे. कारण जे पोहोचवायचे आहे, त्यासाठी एवढी सामग्री पुरेशी. अभंगांचे गाऊन भजन होते आणि तेथे शब्दस्वरांचे सहजसुंदर मीलन होते. भक्तिसंगीताने समाजातल्या सगळ्या स्तरांतील लोकांना आपलेसे केले. त्यांच्या रोजच्या जगण्यात स्वरांचे स्थानही पक्के केले. या संगीतातील भावार्थाला भक्तीची बैठक आहे. ते त्यापासून जराही ढळत नाही. त्यामुळे समूहाला सहज सहभागी होता येणारे आणि तरीही स्वतंत्रपणे गाता येऊ शकणारे असे हे संगीत ही महाराष्ट्राची शतकानुशतकाची ओळख. लोकसंगीताच्या प्रेरणा घेऊन, एक पाऊल पुढे नेणारे हे संगीत आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गायले जाते. त्यातही काळानुरूप बदल होत गेले. परंपरेने ज्या संगीताला सतत नवचैतन्य दिले, ते काळाबरोबर क्षीण होत चालले आहे, असे वाटत असले, तरीही त्यामध्ये जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न होतच आहेत. लोकसंगीतातील सोपेपणाला भजनाने स्वर-तालामध्ये लपेटून घेतले आणि त्यामुळे संगीतही पुढे गेले. त्याने वेगवेगळ्या वाटा निर्माण केल्या. सर्जनाच्या नाना परी शोधल्या, परंतु भक्तिसंगीताने आपली वाट कधीच मळू दिली नाही. त्यातील शांत-शीतलता आणि भक्तीचा ओलावा त्या संगीताचा कायमच प्राण राहिला. गळा गाता असला पाहिजे. तो सुरेलही असला पाहिजे, मात्र त्याने संगीतासाठीची स्वतंत्र मेहनत करायलाच हवी असे मात्र नाही. दिवसभराच्या रामरगाड्यानंतर चित्तवृत्ती उल्हसित करणाऱ्या आणि विचारांनाही वाट दाखवणाऱ्या या प्रकाराने मराठी माणसाला संगीताच्या अधिक जवळ आणले, हे विसरून चालणार नाही. भावगीताच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीला जशी नाट्यसंगीताची मखमली झूल होती, तशीच संगीताची प्रदीर्घ परंपराही शांतपणे तेवत होती…

mukund.sangoram@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:19 am

Web Title: bhavgeet production of natya sangita words and vowels drama akp 94
Next Stories
1 ‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा चित्रशोधाची दिंडी
2 बेबंद निर्बंध नकोत!
3 सोलापूरची केळी आता परदेशात!
Just Now!
X