पक्षी सप्ताह विशेष

निनाद परुळेकर

पक्ष्यांचे मूल्यमापन म्हणजे जंगल किंवा रान, शहर नव्हे; अर्थात कावळा, चिमणी, साळुंक्या, कोंबडय़ा, कबुतरे यांची गोष्ट सोडा. हे पक्षी मानवी अधिवास असतो तेथेच राहणे पसंत करतात; पण बाकी सारे पक्षिगण झाडांवर, झुडुपांत, माळरानांत, डोंगरदऱ्यांत आणि नदी, तलाव अथवा समुद्राच्या सहवासात असतात. म्हणजेच असे की, त्यांनी जेथे राहणे निसर्गनियमानुसार अपेक्षित आहे तेथेच ते राहतात; पण त्याच वेळी (अथवा कदाचित) त्यांना शिकारी पक्ष्यांचा धोका असतो. सर्प, अजगर तसेच ज्या वन्यप्राण्यांना झाडावर चढता येते अशांचाही पक्ष्यांना आणि त्यांच्या पिल्लांना, त्यांच्या अंडय़ांना धोका असतो. एवढेच नव्हे, तर क्वचित काळी त्या त्या पक्ष्यांचा जंगलातील खाद्यसाठा कमी झाला तर त्यांना अन्य ठिकाणी मोर्चा वळवावा लागतो.

आणि ही ‘अन्य ठिकाणे’ म्हणजेच मानवी वस्तीच्या जवळचा परिसर. वर मांडलेली कारणे तसेच पर्यावरणाचा ऱ्हास, यांचा थेट परिणाम जंगलातील पक्ष्यांवर होतो आणि हे वन्यपक्षी आपली जीवनशैली बदलून मानवी, किंबहुना शहरी, वस्तीच्या आसपास आपला अधिवास मांडतात.

पक्षी तथा प्राण्यांचा मानव हा शत्रू ‘नंबर वन’ आहे आणि हे सत्य पूर्वापारपासून चालत आलेले आहे. असे असूनही आजचे वन्यपक्षी काही प्रमाणात मानवी वस्तीच्या, झोपडपट्टय़ा, चाळी, घरे, बंगले किंवा निवासी संकुले यांच्या आसपास राहणे पसंत का करतात?

अन्य शिकारी पक्षी, अजगरादी सरपटणारे प्राणी, शिकारी वन्यप्राणी यांचा धोका मानवी वस्तीत नसतो. मानवी वस्तीत असलेल्या थोडय़ाफार हिरवाईत त्यांना हवे असलेले खाद्य मिळाले तर ठीक, अन्यथा तेवढय़ापुरते जंगलात जाऊन परत मानवी वस्तीच्या आसपास असलेल्या झाडांवर येऊन राहायचे. रात्री सुरक्षितपणे निद्रा घ्यावयाची आणि सकाळ झाल्यावर नित्यक्रमास जायचे.

अनुभवांवरून या निवासी संकुलांच्या किंवा एकूणच मानवी वस्तीच्या आसपास किंवा मनुष्यप्राण्यांकडून आपल्याला धोका नाही, हे आजच्या वन्यपक्ष्यांच्या निदर्शनास आलेले आहे, असे विधान आज आपण नक्की करू शकतो. कारण आपणच आपल्या दिनचर्येत एवढे व्यग्र असतो की, या वन्यपक्ष्यांकडे बघायला आपल्याला वेळसुद्धा नसतो. इतर गोष्टी तर दूरच. उदाहरणादाखल आमचीच पवित्र सोसायटी, जी दहिसर पूर्वेला मुंबईत आहे. ती सात सोसायटींची मिळून एक संकुल आहे. तिचे उदाहरण घेऊ.

या पवित्र सोसायटीत तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही प्रवेश केलात तर तुम्हाला काही वन्यपक्ष्यांचे नक्की दर्शन होते. प्रवेश केल्या केल्या पाच-सात फुटांवर तुम्हाला नाचरा किंवा ‘फॅनटेल’ या पक्ष्यांचे दर्शन होईल. चॉकलेटी करडय़ा रंगाचा हा पक्षी दिसायला जरी ‘सोऽऽसो’ असला तरी त्याने फुलविलेला आपल्या शेपटीचा पसारा इतका छान दिसतो की बघतच राहावे. बरं, हा कमालीचा चंचल. एक क्षणसुद्धा एका जागेवर स्थिर बसणार नाही. बरं, तुम्हा-आम्हाला घाबरून पळून जातो का? तर तेही नाही. तो त्याच्याच ‘मूड’मध्ये! आपल्यासारख्यांकडे चक्क दुर्लक्ष करतो. याला हवेतले उडणारे कीटक, डास, माश्या हे जीव भक्ष्य म्हणून लागते. मात्र याचा आवाज अगदी स्वरबद्ध असून मंजूळ अशी गाणारी शिटीपण हा वाजवतो.

आजच्या संकुलात ‘नाचरा’व्यतिरिक्त रॉबिन ऊर्फ दयाळपक्षी, बुलबुल, तांबट, वटवटय़ा (Indian Wren-Warbler), शिंपी (Tailor Bird) यांची हजेरीच नाही, तर ते सोसायटीच्या कंपाऊंडला लावलेल्या वृक्षावरती, छोटय़ा झुडपांमध्येसुद्धा वस्ती करून राहत आहेत. बुलबुल जरा लाजरे आहेत, कारण मी त्यांची छायाचित्रे काढायला गेलो तेव्हा त्यांनी चक्क मान वळविली. बहुधा ती नरमादी जोडी असावी. त्यामानाने रॉबिन म्हणजे दयाळपक्षी बरेच धीट आहेत. ते कुठेही बसतात. त्यांना स्कूटरचा आरसाही वज्र्य नाही किंवा कारचे बोनेटही चालू शकते घडीभर बसायला! राहता राहिले शिंपी अन् वटवटय़ा. हे सोसायटीच्या सभोवताली असलेल्या काहीशा दाट झुडपांत किंवा झाडांवर उडय़ा मारत फुलांतला मध, पुष्पकळय़ा, कीटक आदींचे सेवन करताना दिसतात.

मात्र या सर्वाचे जीवन वाटते तेवढे सुखी नाही. भले यांना जंगलातील सर्प-अजगर, शिकारी पक्षी यांच्या अनुपस्थितीचा फायदा मिळत असला तरीही मानवाच्या वस्तीत राहणाऱ्या कावळे अन् मांजरे यंच्यापासून खूपच धोका असतो.

रॉबिन, नर्तक (‘नाचरा’ आणि बुलबुल यांची अंडी तसेच पिल्ले यांच्यावर कावळय़ाची सतत नजर असते. नव्हे तर, ते दादागिरी करून, आडदांडपणा करून या पक्ष्यांच्या पिल्लांना चक्क घरटय़ातून पळवितात आणि खातात.

 

इथली मांजरेही या पक्ष्यांच्या ‘वाईटावर’ टपलेलीच असतात. जरा कुठे ढिलाई या पक्ष्यांकडून झालीच तर ती मांजरांची भक्ष्य बनतात. बिचारे हे रानपक्षी विश्वासाने आम्हा मानवाच्या आश्रयाला आलेले असतात; पण मानवाच्याच आश्रयाने राहणाऱ्या कावळय़ा, मांजरांचे हे भक्ष्य बनतात, याचे मात्र फार वाईट वाटते.

Email : pneenad@gmail.com