News Flash

अंतस्थाचे रंग… : वास्तवाचं भान कवितेत आणताना…

आज केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर जगभरातील लोक एका अस्वस्थ काळात जगताहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देताहेत.

 

‘दिसते न दिसतेसे, सारे संदिग्ध धूसर, काही अंतस्थाचा रंग, चढे वस्तुजातावर…’ असे म्हणत जीवनार्थ उमगलेली तरल कविता लिहिणाऱ्या कवयित्री शान्ता शेळके यांची जन्मशताब्दी यंदा सुरू होईल. यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘लोकसत्ता’ने दिलेल्या ‘कविता मनोमनी’ या काव्यसादेस भरघोस प्रतिसाद महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरूनही मिळाला. त्यातील या काही निवडक कविता, परीक्षकांच्या साक्षेपी टिपणासह…!

वास्तवाचं भान  कवितेत आणताना…

कवयित्री शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं ‘लोकसत्ता’नं मराठी माणसाच्या मनात रुजलेल्या आणि उमलून आलेल्या शब्दांना ‘कविता मनोमनी’ या उपक्रमातून साद घातली आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळपास अडीच हजार कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आल्या. आजच्या हिंसक होत चाललेल्या काळातही सर्जनाचे स्रोत शोधून माणसाच्या मनातली ओल जपून ठेवण्याच्या ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचं आम्ही मनापासून कौतुक करतो.

आज केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर जगभरातील लोक एका अस्वस्थ काळात जगताहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देताहेत. पण अशाच काळात मनातली खळबळ आणि जगण्याची उमेद शब्दांतून व्यक्त होत राहते. आमच्याकडे आलेल्या या कवितांतून ती आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली आहे. यांतील अनेक कवितांना कविता म्हणायचे की नाही, हा प्रश्न असला तरी माणसं शब्दांशी खेळताहेत, त्यांना आपलंसं करताहेत आणि मुख्य म्हणजे, ते स्वत:ला व्यक्त करू पाहताहेत ही गोष्ट आम्हाला महत्त्वाची वाटते. त्यामुळे लिहिणाऱ्या प्रत्येक हाताचं मनापासून अभिनंदन.

अर्थात, कौतुक करतानाच या लिहित्या हातांना कवितेचं वळण लागावं म्हणून काही गोष्टी मुद्दाम सांगाव्याशा वाटताहेत. यातले अनेक कवी आजही पानं, फुलं, रंगात रमलेले आहेत. रमायला काहीच हरकत नाही. कारण निसर्गाशी आपलं नातं आहेच, पण ते व्यक्त करताना आपण वेगळं काय देतो आहोत याचाही विचार करावा लागेल. बोरकर, महानोर, ग्रेस यांच्यापुढे जाणं सगळ्यांनाच शक्य होणार नाही. पण त्यांच्यासारखी ताकदीची कविता लिहिणं जमत नसेल, तर कमीत कमी कविता लिहिताना नेमकं काय करावं लागेल याचा विचार करावा लागेलच.

आजच्या वास्तवाचं भान- मग ते सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा वर्षानुवर्षं चाललेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाचं असेल, ते सगळ्यांना आहेच. त्याबद्दल मुळीच शंका नाही. पण ते कवितेच्या रूपबंधात कसं आणायचं याचाही विचार करावा लागेल. अनेकांनी जुन्या वळणाच्या कविता लिहिल्या आहेत. काही मुक्तछंदात व्यक्त झाले आहेत. छंदोबद्ध लिहिताना ज्याप्रमाणे आशयाबरोबरच लय, ताल आणि छंदाचा अभ्यास असणं गरजेचं आहे, त्याप्रमाणेच मुक्तछंदात लिहिताना मुक्तछंदाची लय आणि बंदिस्तपणाही जपला पाहिजे. कविता म्हणजे केवळ शब्दांची जंत्री नव्हे किंवा ओळी तोडून एकाखाली एक मांडलेले गद्य नव्हे. शिवाय केवळ एखादा महत्त्वाचा वाटलेला विचार किंवा एखादी चमकदार कल्पना अथवा सुंदर शब्दांनी सजवलेली एखादी भावना व्यक्त करणे म्हणजेही कविता नव्हे, हे कोणाही नव्या-जुन्या कविताप्रेमींना ध्यानात घ्यावंच लागेल.

सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर म्हणायचे, ‘‘कविता हा सगळ्यात कठीण साहित्यप्रकार आहे, कारण त्यात तुम्हाला नेमकेपणानं व्यक्त व्हावं लागतं. एक एक शब्द तोलूनमापून वापरावा लागतो.’’ यशवंत मनोहर जेव्हा म्हणतात- ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही…,’ तेव्हा ते दलितांच्या शोषणाचा इतिहास उभा करतात.

एका शब्दात किंवा एका ओळीत ठासून भरलेला बार (अर्थ) म्हणजे कविता असते. कविता काय असते ते जाणून घेण्यासाठी मराठीतीलच नव्हे तर इतर भाषांतीलही महत्त्वाची कविता आपल्याला वाचावी लागेल. आपल्याला इंदिरा संत, बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर, अरुण कोलटकर, सुरेश भट, ग्रेस, नामदेव ढसाळ अशा दिग्गज कवींना ओलांडून जाणं तसं अवघडच. पण तसा प्रयत्न आज लिहिणारे अनेक कवी करताहेत. त्याचं कारण त्यांच्या पूर्वसुरींनी काय लिहिलंय हे ते वाचताहेत आणि या पलीकडे जाऊन आपल्याला नवं काय सांगता येईल याचा विचार ते करताहेत.

या उपक्रमात सहभागी झालेल्या किती जणांनी ज्ञानेश्वर-तुकारामांपासून ते आज लिहिणाऱ्या वसंत आबाजी डहाके यांच्यापर्यंतच्या किती कवींची कविता वाचली आहे? शान्ताबाई शेळके यांच्या गाण्यांपलीकडे असलेली त्यांची स्वत:चा शोध घेणारी आतली कविता वाचली आहे का? नसेल तर हे आणि आजघडीचे महत्त्वाचे सारे कवी-कवयित्री नक्की वाचा. तुमच्या मनात असलेल्या कवितेची आणि त्या कवितेची भेट घडवून आणली, तर आपली कविता नेमकी कुठे आहे आणि तिला समृद्ध व सशक्त करून मराठी साहित्याचा अविभाज्य भाग करण्यासाठी काय करावं लागेल, हे आपल्या लक्षात येईल.

‘कविता मनोमनी’ या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व संवेदनशील आणि सर्जनशील कवींचं मनापासून अभिनंदन! आपल्या मनातली कविता अशीच बहरत राहो आणि त्याचा डेरेदार वृक्ष होऊन मराठी साहित्याचा आधार होवो, हीच सदिच्छा! –      डॉ. अरुणा ढेरे  नीरजा

माझ्या मुली

वाहत्या वाऱ्याला

धरूनी हाताशी

उडती आकाशी

माझ्या मुली

 

नदीच्या पाण्याची

वळवीती दिशा

माळातली आशा

माझ्या मुली

 

कोरड्या मातीत

फुलवीती स्वप्ने

चैतन्याचे गाणे

माझ्या मुली

 

सूर्याच्या साक्षीने

उजेड होऊनी

तमाला भेदीती

माझ्या मुली

 

– डॉ. कैलास रायभान दौंड  (अहमदनगर)

असे कसे यंत्रयुग…

तुडुंबल्या विहिरीत

पोरं थकती पोहून,

निळ्या पाण्यावर नाचे

सूर्य आभाळ घेऊन

 

बांधांवर उभी चिंच

भल्या थोरल्या अंगाची,

नऊवारी नक्षीदार

साडी हिरव्या रंगाची

 

उभी थाप तटबंदी

पोटरीतला जोंधळा,

पाट घुसता पिकात

होई दिवस आंधळा

 

कशा आटल्या विहिरी

कुठे गेला मोटनाडा,

कशा बुडल्या चकारी

हरवला बैलगाडा

 

टायरची गाडी गेली

कुठे गेले गारिगार,

भोकपड्या पैशाचाही

वाटे केवढा आधार

 

असे कसे यंत्रयुग

हरवल्या चुल्ही, जाती,

उसवले गणगोत

विस्कटली नातीगोती

 

– साहेबराव ठाणगे (नवी मुंबई)

निशिगंध

 

असाच होता चंद्र आणि ही

अशीच होती रात्र उधाणी

निशिगंधाचा दरवळ तेव्हा

सांगत होता एक कहाणी…

 

शुभ्र पांढऱ्या माझ्या देठी

गंधांच्या भरल्या ओठी

धसमुसळा हा वारा भरतो

लसलसणारी गंधमिठी

 

रात्र-रात्रभर जगणे माझे

दिवसचि दिसता संपून जाणे

उष:कालचे कोणा अप्रूप

माझे असते रात जिणे

 

कुणी सूर्याची करतो पूजा

कुणी चंद्राशी संमीलन

माझा दरवळ देऊन जातो

काळोखाला आलिंगन

 

अथांग सागर घनगंभीरता

सृष्टीचा जणू ओंकार

सुगंध माझा अत्तर शिंपण

काळोखाचा हुंकार…

   – अमृता देशपांडे (गोवा)

स्तनधर्म!

हे तुझ्या देहावर उमलून आलेले

उत्फुल्ल उंचवटे

बियांतून फुटावे कोंब

तसे उगवून आलेले

आजपर्यंतच्या उन्हाळा-पावसाळ्याला

पेलत, रिचवत

भरून पावलेले…

 

सृष्टीचा आडदांड रानटीपणा

जगण्याची हिणकस चढाओढ

स्वार्थाची गटारगंगा

स्मशानाच्या व्यापाराची चलती

असणाऱ्या काळात

तुझे स्तन अथांग सुंदर आहेत!

 

भिजलेल्या काळ्या मातीची मृदुता

रोपट्याच्या मुळाशी उतरणाऱ्या

पाण्याचं नितळपण

जपणारे तुझे स्तन

जगाच्या शुद्धतेचं

एकमेव आशास्थान…

 

मी चाखलंय

आई नावाच्या मादीला

जीवनरस शोषण्यासाठी

ती चव, तो गंध

अजूनही मेंदूतून सरला नाही

 

मला खात्रीय

ती चव, तो गंध तुझ्यातही मुरला असेल

आपण एक काम करू या

आपण स्तनांचा धर्म स्थापू या…

स्तनधर्म!

स्तनांसारखाच मृदू, ऋजू

जो सगळ्यांना धारण करेल!

– कौस्तुभ पटाईत (मुंबई)

क्वारंटाइन

 

क्वारंटाइन शब्द तसा पूर्वीचाच

फक्त आता हायलाइट झालाय इतकंच

 

तीसुद्धा पिढ्यान्पिढ्या क्वारंटाइन

चार भिंतींच्या आत तिच्या साऱ्या क्षमतांना थोपवत

 

आपण सुटू पाहतोय त्रिसूत्रीतून

सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या

ती मात्र अडकली आहे

कायमचीच

रांधा-वाढा-उष्टी काढा या पेचात

ती युगानुयुगे पॉझिटिव्ह आहे

कपाळावर ठाण मांडून बसलेल्या

कुंकवाबद्दल,

त्याआडून समष्टीने लादलेल्या

अहोरात्रीच्या जबाबदाऱ्यांबद्दल

 

घरात सगळेच तसे निगेटिव्ह

ती मात्र पॉझिटिव्ह

प्रपंच नावाच्या विषाणूमुळे;

तो तिला विळख्यातून सुटूच देत नाही

 

आता आलेली लाट ओसरेलही,

पण शतकानुशतके समाजाच्या

नसानसांत भिनलेल्या,

तिचं अवकाश क्षीण करणाऱ्या

लाटेचं काय करायचं ?

 

– प्रा. कीर्ती शशिकांत जाधव (पुणे)

भय

विझतो नभात तारा

झुरतो उगाच पक्षी

माती मनात विणते

ओले आभाळ नक्षी

 

घरट्याविना पोरके

उभे उदास झाड

बेभान पंखाखाली

चोची कशा उजाड

 

हरेक प्रकाशपक्षी

अंधार पीत आहे

म्हणून सूर्य आता

जन्मास भीत आहे

 

– दिनकर जोशी

माया बापातली माय…

बाप मनता येई

डोळा रांगडी सावली

परी त्याच्यामंदी नांदे

एक वात्सल्य मावली

 

संसार, फाटकी वाकय

दोघे बी शिवते

सुई बोटात बापाच्या

माय धागा वोयते

माया बापाचा कामधंदा

बाईवून सोवळा

जवा सखीला शिवतो

सामाजिक कावळा

 

हाती पोतीरा बी घेतो

घालतो बाळाला बी न्हान

ओढे पाळण्याची दोरी

तोंडी गुणगुने गाणं

 

नाही फुटत कधी बांध

पानी पापनीच्या आड

आत हुंदका मिळतो

लेक वरती जवा माळ

 

असा हसत खेळत

किती झेलतो वांदी

साऱ्या वेदनेचा भार

घेतो आपल्याच खांदी

 

मायेची माया दिसून पडते

माया बापातली माय एकली रडते

 

– गजानन दिनकर पवार (पुणे)

ओली कातळवाट

 

माळ निसरडा झाला,

पाणी आंगूळ आंगूळ

जुना वडचीचा पार,

भिजे थिजलं वारूळ।।

 

उभी कनात झाडांची

दूर वावरे पिकांची

उंच माथ्याला ढगांच्या

जड मोटली पाण्याची

लाल पायवाट ओली

उभे टोकाला देऊळ।।

 

रुंद पाणंद काटेरी

जरी खड्या चढणीची

रानकेळं पोसावली

पानं लांब चवईची

नव्या नवरीच्या परी

चिंच पोपटी गाभूळ।।

 

देवराई जागी होते

जल घटाघट पिते

गुहा व्याघराची खोल

ब्रह्मदेवाच्या झाडीते

पाय ठरेना पाण्यात

झाले नाठाळ शेवाळ।।

 

टम्म भरली विहीर

ओढा घुसळतो नीर

उतू गेल्या तळ्यावर

चाले पोरांचा जागर

सळसळत्या माडांना

घाली चवऱ्या झाऊळ।।

थेंब वाटुनिया झाले

आता आभाळ फकीर

धनधान्यातून लुटे

सारा खजिना कुबेर

कातळाला कुट्ट काळ्या

आले हिरवे बहर।।

 

– मृणाल राजीव केळकर (डोंबिवली)

 

एक दु:ख

एक दु:ख…

मनात लपलेलं,

दूर पुरण्यास खांदा न मिळालेलं

 

एक दु:ख…

मनात रुतलेलं,

कुरूप होऊन सतत ठसठसलेलं

 

एक दु:ख…

मनात दडलेलं,

वेताळ होऊन मागे लागलेलं

 

एक दु:ख…

सतत रुसलेलं,

हसवावया कोणी नसलेलं

 

एक दु:ख…

उरात रमलेलं,

व्यक्त होण्यास उगाच भ्यायलेलं

 

एक दु:ख…

खूप तापलेलं,

अजब कसं राखेनं माखलेलं

 

एक दु:ख…

सुरेख काजळ लावलेलं,

घुप्प अंधारात कुणा न कळलेलं

 

दु:ख तुझं- दु:ख माझं

कमी कधी होणार नाही

विझल्या जरी मेणबत्त्या तरी उरतील काही…

चल, दु:खाचीच बनवू या ऊर्जा

बेभान होऊन खेळत झपूर्झा…

 

– दीपाली जोगदंड (पुणे)

पाड्यावऱ्हे…

 

साळामा फुकट भेटेल पुस्तक मना अंडोर पढे,

अश्शा कश्शा कविता म्हने, कश्ये हाई धडे?

 

पोरासोरासन्या गान्यामंदी टीवी आनि फिरीज?

म्हने, माडे, हितं पाड्यावर कंदी ईन गं इज?

बलुफ कसा चेटे ते त्याले ठावं नयी,

टेलिफोननी घंटी, बठ्ठ्या पाड्याले मालूम नयी

 

रॉकेटनी कविता त्याले समजाले भारी पडस

धा कोसवऱ्हे साळामा त्याले पायीच जानं पडस

तठे बी म्हैना म्हैना मास्तर येवाऊच नयी

उना तं उना, तवाच त्याले जावानी रहास घायी

 

रॉकेट, टीवी, फिरीज… शेहरी पोरास्नीच ठिवा,

पन मन्या अंडोरले समजी अश्या कविता तरी लिवा!

 

(पाड्यावऱ्हे : पाड्यावर, अंडोर : मुलगा, बलुफ : बल्ब, बठ्ठ्या : सगळ्या, कोसवºहे : कोसावर)

 

–  प्रा. अनिल सोनार (धुळे)

मिटलेल्या डोळ्यांत…

 

मिटलेल्या डोळ्यांत

दरवेळी स्वप्नच असतात

असं कुणी सांगितलं तुला?

बऱ्याचवेळा त्यात साठवलेले असतात

चाफ्याचे गंध,

आकाशाचे अनंत रंग,

उगवतीचे मावळतीचे ढंग

भूतकाळाच्या भुताचे

विचित्र सोंग,

तर कधी काळोखाचे गूढ

नि:संगाचा शुभ्र संग आठवतो

एखाद्या क्षणी तेव्हा

पांढरे कमळ उमलत जाते

मिटलेल्या डोळ्यांत

नि घेऊन जाते आपल्याला

आपल्याच हृदयाच्याही पार…

मिटलेल्या डोळ्यांना

काय काय दिसते त्याला

ना अंत ना पार

– दीपाली मुकुंद दातार (पुणे)

अस्तित्वखुणा

सुखदु:खाच्या खेळामधले

हसणे, रडणे, उगाच रुसणे

आयुष्याच्या डावामधले

कधी हारणे, कधी जिंकणे

 

नकोनकोशी कधी पानगळ

कधी हवेसे वसंत लेणे

कधी शिशिरातून थिजणे आणिक

कधी राखेतून पुन्हा उमलणे

 

आठवणींच्या गावी जाऊन

उगाच रमणे, कधी मोहरणे

कधी एकांती तृप्त किनारी

गतकाळाचे मुग्ध चांदणे

 

कातर कातर संध्यासमयी

तृप्त तृप्तशी जाणीव असणे

हसण्या-रुसण्यापल्याड जाऊन

आयुष्यातील जगणे जपणे

 

पार्थिव ओझे टाकून आता

क्षितिजामध्ये मिसळून जाणे

चिरंतनाच्या वाटेवरती

अस्तित्वाच्या खुणा सांडणे

– अनुराधा सोहोनी (पुणे)

परतीची वाट…

दूर दूर कुठेतरी

क्षितिजावर सांज निळी

अधरांच्या स्पर्शाची

खुललेली सोनकळी…

अंधाऱ्या एकांती घुमणारा वारा

चंद्राच्या कोरीवर कललेला तारा

 

विरलेल्या वस्त्रांना

रानभूल स्पर्शाची

ऊब कशी त्यास मिळे

ओलेत्या केसांची…

नवे भास नव्या मनी कसली चाहूल

वाटांना डसलेली अंधारी भूल

लुकलुकती दूर दिवे

गाव दूर थिजलेले

बगळ्यांचे शुभ्र थवे

झाडांशी बसलेले…

सुटलेला हात पुन्हा धरणारी बोटे

वाऱ्याने हलणारी वेळूंची बेटे

 

घरट्याच्या हाकांना

साद पुन्हा देते ती

वळणावर त्याच पुन्हा

अनोळखी करते ती…

डोळ्यांच्या आत कसा येतो हा पूर

परतीची वाट जसा ओलेता धूर…

 

– जितेंद्र पेंढरकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:46 am

Web Title: bringing a sense of reality into poetry akp 94
Next Stories
1 अन्नसुरक्षेसाठी ‘नीती’ सर्वसमावेशक हवी!
2 तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा
3 ‘निवड चुकण्या’चे भोग!
Just Now!
X