08 December 2019

News Flash

..मी सत्य हे सांगितलंच पाहिजे!

माझं अभियांत्रिकीचं शिक्षण बंगळूरुमध्ये झाल्यानं कानडी भाषेची तोंडओळख मला आहे.

व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेवरील व्यंगचित्राला बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टूनिस्ट्स’ या संस्थेने माया कामत स्मृती पुरस्कारांतर्गत प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरस्कार वितरण समारंभात प्रशांत कुलकर्णी यांनी केलेल्या इंग्रजी भाषणाचा हा स्वैर मराठी अनुवाद..

माझं अभियांत्रिकीचं शिक्षण बंगळूरुमध्ये झाल्यानं कानडी भाषेची तोंडओळख मला आहे. त्या वेळच्या ‘बंगलोर’ शहरात मी प्रथम प्रवेश केला, तेव्हा माझी पंचेंद्रिये अचानक जागृत झाल्यासारखी वाटली. इथल्या गार आणि सुखद हवेचा स्पर्श, मोगऱ्याच्या फुलांचा वास, कानावर पडणारी गोड रुणझुण कानडी भाषा, किंचित कडवट चव असणारी कॉफी यांनी मी मोहरून गेलोच; पण त्याबरोबरीनेच ‘डेक्कन हेराल्ड’ या वृत्तपत्रातील राममूर्ती यांच्या व्यंगचित्रांनी माझं ‘दृष्टी’ हे महत्त्वाचं इंद्रिय जागृत झालं. अभियांत्रिकीच्या अभ्यासात आम्ही मिनी ड्राफ्टरच्या साहाय्याने सरळ रेषा मारून अवघड गणितं सोडवण्याचा प्रयत्न करीत असू. मात्र, व्यंगचित्रकार राममूर्ती हे वेडय़ावाकडय़ा रेषांतून राजकीय गणितं उलगडून दाखवायचे! याचा दुहेरी फायदा असा झाला की, मी अभियंता आणि व्यंगचित्रकार दोन्ही एकाच वेळी झालो. कारण महाविद्यालयाच्या आणि वसतिगृहाच्या मासिकात माझी व्यंगचित्रं प्रकाशित झाली होती! या दोन्ही क्षेत्रांचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम झाला आणि त्यासाठी मी या शहराचा ऋणी आहे.

माया कामत पुरस्काराबद्दल मी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टूनिस्ट्स’ या संस्थेचा, निवड समितीतील सर्व सदस्यांचा (गिरीश कार्नाड यांची मला खूप उणीव भासतेय.) आणि माया कामत यांच्या कुटुंबीयांचा अत्यंत आभारी आहे. माया कामत यांना मी व्यक्तिश: ओळखत होतो. त्यांची राजकीय व्यंगचित्रं मला अतिशय आवडत असत. हा पुरस्कार मी जगभरातील सर्व राजकीय व्यंगचित्रकारांना आणि या अद्भुत कलेला समर्पित करतो. या पुरस्काराच्या निमित्तानं मी माझे काही अनुभव मांडणार आहे. व्यंगचित्रकारानं नेहमी शब्द कमी वापरावेत असं म्हणतात; पण आज मात्र मी काही वाक्यं बोलणार आहे. कारण जगभरातील राजकीय व्यंगचित्रकारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे. राजकीय नेत्यांमध्ये आणि काही वेळा समाजातील काही घटकांमध्ये आज व्यंगचित्र या कलेबद्दल एक प्रकारची असहिष्णुता पसरत चालली आहे. म्हणूनच आज अमेरिकेत राजकीय व्यंगचित्रकारांची हकालपट्टी केली जाते, फ्रान्समध्ये त्यांना ठार मारलं जातं, तर भारतात त्यांना अटक करून खटले भरले जातात!

सर्वोच्च न्यायालयानं व्यंगचित्रकारांच्या कलास्वातंत्र्याबद्दल समाधानकारक भूमिका घेतली असली, तरी कदाचित उद्या योगी किंवा ममता हे सर्वोच्च न्यायालयाला स्वातंत्र्य आहे का, अशी विचारणा करू शकतील! लोकप्रतिनिधी हे रस्त्यावरच्या खड्डय़ांपेक्षा वृत्तपत्रामधल्या वा समाजमाध्यमांवरील व्यंगचित्रकारांबद्दल फारच जागरूक आणि हळवे झाले आहेत, असा अनुभव वारंवार येत आहे. अलीकडे तर वृत्तपत्रांच्या मालकांवर, संपादकांवर आणि काही वेळेस खुद्द व्यंगचित्रकारांवरही ‘वरून’ दबाव येतो, असं या क्षेत्रातील माझे काही मित्र मला सांगत असतात. प्रत्यक्षात काय आहे, याची मला कल्पना नाही. सुदैवानं सदर पुरस्कारप्राप्त व्यंगचित्र ज्या वृत्तपत्रात प्रकाशित झालं, त्या ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रात मी गेली अनेक र्वष काम करतोय आणि इथं मला शंभर टक्के स्वातंत्र्य आहे, हे मी अभिमानानं सांगू शकतो. असो.

एकूणच व्यंगचित्रांबाबत गेल्या काही दिवसांत मला आलेले अनुभव मी सांगणार आहे. गेल्या आठवडय़ात मी लंडनला गेलो होतो. आता यात विशेष प्रौढी मारण्यासारखं काहीही नाही. हल्ली कुणीही लंडनला जातं. अगदी विजय मल्यादेखील जातात; पण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक इतकाच, की मी परत आलो!

तर, लंडनमध्ये व्यंगचित्रकलेच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या गोष्टी मला पाहायला मिळाल्या. प्रथमच राजघराण्यानं (म्हणजे अर्थातच राणीनं) त्यांच्या खासगी संग्रहातील लिओनार्दो-दा-विंची यांची जवळपास दीडशे मूळ रेखाटनं लोकांसाठी खुली केली. लिओनादरेनं जवळपास पाचशे वर्षांपूर्वी एका स्थूल माणसाचं काढलेलं अर्कचित्रही त्यात आहे. सर्वकालीन श्रेष्ठ असलेल्या या चित्रकारानं व्यंगचित्रकलेलाही स्पर्श करावा, हे पाहणं फारच रोमांचकारी होतं. इंग्लंडच्या संसदेत शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली व्यंगचित्रं पाहायला मिळतात. यातील बहुतेक व्यंगचित्रं अर्थातच राजकारणी मंडळींवर टीका करणारी वा त्यांची खिल्ली उडवणारी आहेत.

दुसऱ्या महायुद्धात विन्स्टन चर्चिल यांनी लंडनमधील ज्या खंदकात बसून युद्धासंदर्भात मोहिमा आखल्या, त्या खंदकाचं आता संग्रहालयात रूपांतर केलेलं आहे. त्यास भेट देणं हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे, इतकी या संग्रहालयाची आखणी आणि रचना कलात्मक आहे. या संग्रहालयात त्या काळातील अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रं आठ-दहा फूट उंचीची ब्लो-अप करून लावली आहेत. विशेष म्हणजे, काही व्यंगचित्रं ही त्या काळात जर्मन व्यंगचित्रकारांचा दृष्टिकोन दाखवणारी- अर्थातच चर्चिल यांची खिल्ली उडवणारी होती. हे मला प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण वाटलं! याच संग्रहालयात डेव्हिड लो यांनी काढलेली काही मूळ चित्रंही- जी अत्यंत सुरक्षित ठेवली आहेत- पाहावयास मिळतात. व्यंगचित्रकाराची मूळ चित्रं, त्यातल्या पेन्सिलनं केलेल्या खाणाखुणांसह पाहायला मिळणं खूपच आनंद देणारं ठरतं.

अखेरीस मला डेव्हिड लो यांचा एक किस्सा सांगायचा आहे- जो केवळ व्यंगचित्रकारांसाठीच नव्हे, तर पत्रकारांसाठीही उद्बोधक ठरावा! व्यंगचित्रं केवळ मनोरंजन करत नाहीत, तर ती सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात अन् तेही अत्यंत जलदपणे. त्यासाठी ती विनोदाचा वापर करतात, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. तर.. झालं असं की, दुसऱ्या महायुद्धाच्या आधी- साधारण १९३७ च्या सुमारास- डेव्हिड लो हे ‘इव्हिनिंग स्टॅण्डर्ड’ या नियतकालिकासाठी काम करत होते. त्यात त्यांची जवळपास र्अध पान भरेल अशी मोठी व्यंगचित्रं नियमितपणे यायची.

याच सुमारास इंग्लंडचे जर्मनीबरोबर युद्ध टाळण्याचे निकराचे प्रयत्न सुरू होते. खरं तर इंग्लंड जर्मनीशी फारच लाडीगोडीने वागत खुशामत करत होते. याची जबाबदारी इंग्लंडचे परराष्ट्र सचिव लॉर्ड हॅलिफॅक्स यांच्यावर सोपवलेली होती; परंतु त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश येत नव्हतं. जर्मनीचे प्रचारमंत्री गोबेल्स यांच्याशी आणखी एक अयशस्वी बोलणी करून हॅलिफॅक्स हे मायदेशी परतले आणि थेट ‘इव्हिनिंग स्टॅण्डर्ड’च्या व्यवसाय-व्यवस्थापकाला भेटले. हॅलिफॅक्स व्यवस्थापकाला म्हणाले, ‘‘आम्ही वातावरण सुधारण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय; पण तुमच्या वृत्तपत्रातील व्यंगचित्रांचा एक मोठा अडसर आहे. शनिवारी तुमचा अंक बर्लिनला पोहोचतो. त्यावर लगेचच उडय़ा पडतात.. अर्थातच, व्यंगचित्र पाहण्यासाठी. त्यात नेहमीच नाझी आणि त्यांच्या नेत्यावर (म्हणजे हिटलरवर) खिल्ली उडवणारी टीका असते. ती चित्रं पाहून जर्मन वाचक संतापतात. सरकारकडे विविध मार्गानी निषेध व्यक्त करतात. मग, वातावरण शांत होईस्तो चार-पाच दिवस जातात. तोवर पुढचा अंक येतो आणि पुन्हा गदारोळ होतो!’’ यावर त्या व्यवस्थापकानं सांगितलं की, ‘‘मलाही त्यांची व्यंगचित्रं आवडत नाहीत; पण त्यांचा आमच्याशी करार झाला आहे. त्यानुसार धर्मनिंदा, अश्लील किंवा वृत्तपत्राच्या हितसंबंधांना बाधा येईल अशी व्यंगचित्रं काढली तरच आम्ही त्यांची व्यंगचित्रं बंद करू शकतो.’’

पुढे काही दिवसांनी त्या सचिव महाशयांनी खुद्द डेव्हिड लो यांनाच एका रेस्टॉरंटमध्ये भोजनाचं आमंत्रण दिलं. अर्थातच, शांततेसाठी इंग्लंडच्या चाललेल्या प्रयत्नांचा पाढा वाचत, त्यात लो यांच्या व्यंगचित्रांमुळे होणारी अडचण त्यांनी सांगितली. मात्र, लो यांनी शांतपणे सांगितलं, ‘‘माफ करा! दुसऱ्या महायुद्धासाठी मी कारणीभूत ठरावं असं मला वाटत नाही; पण एक पत्रकार म्हणून घडणाऱ्या घटना नि:स्पृहपणे मांडाव्यात हे माझं कर्तव्य आहे आणि मी त्या माझ्या माध्यमातून मांडतोय.. मी सत्य हे सांगितलंच पाहिजे!’’

डेव्हिड लो यांचा हा किस्सा अत्यंत तेजस्वी आहे. तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ असं म्हणतात आणि असंही म्हणतात की, एक व्यंगचित्र म्हणजे दहा हजार शब्द वगैरे. याचा अर्थ, लेखणी- म्हणजे संपादकीय वर्ग आणि ब्रश- म्हणजे व्यंगचित्रकार हे एकत्र आले, तर अशा अनेक दृश्य-अदृश्य तलवारींना आपण सहज नामोहरम करू शकू आणि लोकशाहीत हेच तर अभिप्रेत आहे!

prashantcartoonist@gmail.com

First Published on July 13, 2019 11:37 pm

Web Title: cartoonist prashant kulkarni rbi indian institute of cartoonists mpg 94
Just Now!
X