|| लोकेश शेवडे

देशभरात काही ठरावीक दिवसांना वेगवेगळे महत्त्व आहे. १ मे हा मराठी लोकांसाठी ‘महाराष्ट्र दिन’ आहे, तर हाच दिवस बहुतांश जगात ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. तथापि, याच दिवशी १९४५ साली जर्मनीचा सर्वेसर्वा अ‍ॅडॉल्फ हिटलरने आदल्या रात्री आत्महत्या केल्याचे जाहीर झाले आणि एका अर्थी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीचा प्रारंभ झाला. २७ फेब्रुवारी हा मराठी माणसाचा सर्वात जिव्हाळ्याचा दिवस. हा दिवस जागतिक मराठी दिन आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून मराठी जनता साजरी करते. तर हाच २७ फेब्रुवारीचा दिवस जर्मन जनतेला ज्ञात आहे, ‘राईशटॅग फायर  डे’ या नावाने!  त्या विषयी..

‘अ‍ॅब्सर्डिटी’, तर्कविसंगती किंवा असंबद्धता हा मानवी जीवनाचा बोधस्वर आहे असं अनेक जण मानतात. हा बोधस्वर योगायोगांमुळे, विशेषत: दिनविशेषांमुळे सिद्ध होतो असंही ते मानतात. कारण काही घटनांचं, दिवसांचं वैशिष्टय़ असं असतं की ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असतात. उदाहरणार्थ ९ ऑगस्ट हा भारतीयांसाठी स्फूर्तिदायी ‘क्रांतिदिन’ आहे. कारण १९४२ साली याच दिवशी म. गांधींनी इंग्रजांविरुद्ध ‘छोडो भारत’ आंदोलन सुरू केलं. तर सिंगापूरसाठी हाच दिवस भावनांच्या विचित्र मिश्रणाचा दिवस आहे, कारण याच दिवशी १९६५ साली सिंगापूर हे सिंगापूरवासीयांच्या इच्छेविरुद्ध ‘मलेशिया संघराज्यातून’ बाहेर फेकलं गेलं आणि अनिच्छेने स्वतंत्र होणारं जगातील एकमेव राष्ट्र ठरलं. हाच दिवस जपानसाठी मात्र अत्यंत वेदनादायी दिवस आहे, कारण याच दिवशी १९४५ साली नागासाकीवर अणुबॉम्ब पडून लाखो लोक जगातूनच मुक्त होऊन परलोकात गेले. अशा प्रकारचे मराठी माणसांशी निगडित असे दोन दिवस आहेत. १ मे हा मराठी लोकांसाठी ‘महाराष्ट्र दिन’ आहे, तर हाच दिवस बहुतांश जगात ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. तथापि, याच दिवशी १९४५ साली जर्मनीचा सर्वेसर्वा अ‍ॅडॉल्फ हिटलरने आदल्या रात्री आत्महत्या केल्याचे जाहीर झाले आणि एका अर्थी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीचा प्रारंभ झाला. दुसरा दिवस आहे २७ फेब्रुवारी. २७ फेब्रुवारी हा मराठी माणसाचा सर्वात जिव्हाळ्याचा दिवस. हा दिवस जागतिक मराठी दिन आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून मराठी जनता साजरी करते. तर हाच २७ फेब्रुवारीचा दिवस जर्मन जनतेला ज्ञात आहे, ‘राईशटॅग फायर डे’ या नावाने! महाराष्ट्रासाठी सोयऱ्याचा असलेला हा दिवस जर्मनीसाठी मात्र सुतकाचा मानला जातो. राईशटॅग म्हणजे जर्मनीची संसद. ८६ वर्षांपूर्वी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे असलेल्या राईशटॅग, म्हणजे संसद भवनाला अचानक आग लागली. या आगडोंबानंतर जर्मनीचा आणि पर्यायानं जगाचा इतिहास, नकाशा पार बदलून गेला. या आगीच्या धुरानं जगाची पुढची बारा र्वष झाकोळली गेली.

१९३२ सालच्या नोव्हेंबरमधल्या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला ६०८ पैकी १९६ जागा मिळून तो संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सोशल डेमोक्रॅट्स, कम्युनिस्ट आणि सीएनपी या पक्षांना अनुक्रमे १२१, १०० व ५२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्याच्या मतांची टक्केवारी ३२ टक्क्यांपेक्षा कमी होती. म्हणजे ६८ टक्के मतदान हिटलरविरोधी असूनही त्याचा नाझी पक्ष हा सर्वात प्रबळ पक्ष ठरला होता. पुढच्या दोन महिन्यांत स्वपक्षीयातल्या प्रतिस्पध्र्याचा काटा काढून, अन्य पक्षीयांत तोडफोड करून त्यांच्यातल्या काही गटांचा आणि अध्यक्ष हिंडेनबुर्ग याचा पाठिंबा मिळवून हिटलर चॅन्सेलरपदी (प्रधानमंत्रिपद) विराजमान झाला होता. स्वत: चॅन्सेलरपदी आल्याबरोबर त्यानं गृहमंत्रिपदी आणि संसदेच्या अध्यक्षपदी (सभापती) आपला अत्यंत विश्वासू साथीदार गोअरिंग याची नेमणूक करून लगेच पुन्हा निवडणुका घेण्यासाठी अध्यक्षांमार्फत संसद बरखास्त करून घेतली. अर्थात संसद बरखास्त झाली तरी सत्ता हिटलरच्याच हाती होती. पुढच्या महिनाभरात गृहमंत्री गोअरिंगने पोलिसांमधल्या ८० टक्के जागा नाझींनी भरून टाकल्या. यानंतर कम्युनिस्ट आणि नाझी यांच्यात जागोजागी हाणामाऱ्या घडवून, हिंसाचाराचे कारण पुढे करत कम्युनिस्ट पक्षावर बंदी आणली. निवडणुकांची तारीख घोषित झाली ५ मार्च १९३३.

२० फेब्रुवारीला हिटलरने गोअरिंगच्या अध्यक्षीय निवासस्थानी काही उद्योगपतींची आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यांना सांगितलं, ‘‘ही निवडणूक शेवटची व्हावी. यानंतर पुन्हा निवडणूक घेण्याची गरज पडायला नको अशी माझी इच्छा आहे.’’ यानंतर एकाच आठवडय़ात, २७ फेब्रुवारी रोजी, म्हणजे निवडणुकीला एक आठवडा उरला असताना अचानक राईशटॅगला प्रचंड मोठी आग लागली. राईशटॅगला आग लागल्याची बातमी ऐकून हिटलर, त्याचा विश्वासू सहकारी गोबेल्स आणि गोअरिंग थोडय़ाच अवधीत तिथे पोहोचले. आग पाहून गोअरिंग म्हणाला, ‘हे कम्युनिस्टांचेच कृत्य असणार.’ गोअरिंगचे हे वाक्य संपतानाच पोलिसांनी लुबी नावाच्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्यांला संसद भवनातून पकडून बाहेर आणले. हिटलरने त्वरित ४००० नाझींविरोधी व कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबले आणि रेडियोवरून भाषणे करून ‘राईशटॅग फायर’चे खापर नाझीविरोधी राजकारण्यांवर फोडायला सुरुवात केली. गोअरिंग आणि हिटलर रेडिओवरून गर्जू लागले, ‘संसद भवन जाळणाऱ्या देशद्रोह्य़ांना धडा शिकवल्याखेरीज आम्ही थांबणार नाही. राष्ट्रशक्ती आणि पोलिसांची शक्ती वापरून या देशद्रोह्य़ांचा नायनाट केला जाईल.’ हिटलरच्या अगोदरचा पंतप्रधान (चॅन्सेलर) हेन्रीच ब्रुएनिंग अध्यक्षांपासून जनतेपर्यंत सर्वाना आवाहन करत होता, ‘अध्यक्षांना विनंती आहे की जुलमाच्या या थैमानाला आवर घाला. राईशटॅगच्या आगीची सखोल चौकशी करा. संविधानाचे पावित्र्य राखून सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचा आमचा निर्धार आहे.’ पण जनतेला राष्ट्रवादाचा आणि निवडणुकीचा ज्वर इतका चढला होता की या माजी प्रधानमंत्र्यांच्या विनंतीला कोणीही भीक घालायला तयार नव्हते. जर्मनीच्या संपूर्ण मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्गाच्या राष्ट्रवादाला ‘राईशटॅग फायर’मुळे उधाण आलं होतं. राईशटॅगवरचा हल्ला जनतेला जर्मन सार्वभौमत्वावरचा, लोकशाहीवरचा हल्ला वाटत होता. नाझीविरोध म्हणजेच राष्ट्रद्रोह याची मध्यमवर्गाला खात्रीच पटली होती. ५ मार्चला निवडणूक झाली आणि नाझी पक्षाला २८८ जागा मिळाल्या. १९६ वरून २८८ जागांची झेप नाझी पक्षानं केवळ ‘राईशटॅग फायर’मुळे घेतली.

या साऱ्या निवडणुकीच्या धामधुमीत एकटा लुबी इतक्या प्रचंड मोठय़ा इमारतीला आग कशी लावू शकला, हा साधा प्रश्न राष्ट्रवादाने भडकलेल्या जनतेपैकी एकालाही पडला नाही. वास्तविक ‘राईशटॅग’ला इमारतीत जाण्याचा एकच अंतर्मार्ग होता, जो राईशच्या अध्यक्षांच्या निवासाच्या तळघरातून जात होता. राईशचा अध्यक्ष होता दस्तुरखुद्द गोअरिंग! म्हणजे ‘राईशटॅग फायर’साठी लागणारं इंधन, स्फोटकं वगैरे सामग्री गोअरिंगच्याच योजनेनुसार त्याच्याच देखरेखीखाली नाझींनी संसद भवनात पोहोचवली असणार. पण असा तर्क करण्यासाठी जर्मन जनता भानावर होती कुठे? जनता सूडभावनेनं पेटली होती. जनतेनं ‘राईशटॅग फायर’चा प्रतिशोध घेण्यासाठी हिटलरहाती सत्ता दिली. हिटलर सत्ताधीश झाल्यावर लुबीवर खटला भरला गेला. ‘राईशटॅग’मध्ये स्फोटकं, इंधन केव्हा, कसं आणलं गेलं याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करून सगळेच पुरावे नष्ट करण्यात आले होते. या प्रकरणात एकही नाझी सापडला नाही. धरपकड केलेल्या नाझीविरोधी चार ते पाच हजार लोकांचं काय झालं तेही कोणाला नेमकं माहीत नाही. लुबीचा शिरच्छेद केला गेला.. हिटलर असेपर्यंत नंतर निवडणुका झाल्याच नाहीत.. युद्धंच होत राहिली. १९३३ सालच्या २७ फेब्रुवारीला जर्मन लोकांना ‘राईशटॅग फायर’हा लोकशाहीवरचा आघात वाटत होता. आजही तो लोकशाहीवरचाच आघात वाटतो, पण पूर्णपणे विरोधी अर्थाने. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी जनतेला मात्र आनंदाचा आहे आणि कायम आनंदाचाच राहील.. साजरा केला जात राहील. मराठी आणि जर्मन जनतेच्या भावना जरी परस्परविरोधी असल्या, तरी त्या विरोधाभासातही साम्य मात्र आहेच. दोघांसाठी २७ फेब्रुवारी अविस्मरणीय आहे.. अ‍ॅब्सर्डिटी म्हणतात ती हीच तर नव्हे?