2019 दृ ष्टि क्षे पा त . . .

भवतालात घडत असणाऱ्या घटनांची नोंद आपल्या जाणिवा-नेणिवांमध्ये सतत होत असते. दु:खद आणि सुखद घटनांनी परिपूर्ण बनलेल्या २०१९ सालाच्या एका टप्प्यात देशभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या या काही भल्या आणि बुऱ्या घटनांचा कोलाज. नैसर्गिक आपत्तीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत आणि पर्यावरणहानीच्या भयाने एकवटलेल्या जनमतापासून मनोरंजन क्षेत्रातील प्रवाहापर्यंत सर्वच क्षेत्रांवर दृष्टिक्षेप टाकणारा..

* निश्चलनीकरण, स्थावर संपदा कायदा, तसेच वस्तू व सेवा करातून हळूहळू सावरत असलेल्या विकासकांना अतिरिक्त चटईक्षेत्रफळापोटी भरावयाच्या शुल्कात ४० टक्के कपात ही या वर्षांतील सर्वात दिलासा देणारी बाब ठरली.

* आधीच मंदीत असलेल्या बांधकाम उद्योगाचे या भरमसाट शुल्कामुळे कंबरडे मोडले होते. भाजप सरकारने त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवत निवडणुकीला सहा महिने असताना या शुल्कात कपात केली. त्यानंतर लगेचच म्हाडा तसेच पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागात पुन्हा लगबग सुरू झाली. ठप्प झालेला बांधकाम उद्योग आता बाळसे धरू लागला आहे.

* म्हाडा वसाहतींसाठीही याच वर्षांत सविस्तर धोरण आणले गेले. त्यामुळे रखडलेल्या म्हाडा पुनर्विकासात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासालाही याच वर्षांत सुरुवात झाली.

* झोपडपट्टी पुनर्विकासात अडचणीच्या ठरलेल्या अनेक मुद्दय़ांवर सुस्पष्टता होत नव्हती. त्याबाबतही याच वर्षांत निर्णय घेण्यात आला. त्यामुळेही प्रस्ताव मंजुरीला वेग आला आहे. साडेतीनशेच्या आसपास प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

* जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सुधारित नियमावलीही मंजूर झाली. या सर्व बाबींमुळे ठप्प झालेला म्हाडा तसेच जुन्या इमारतींचा/ वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. विकास आराखडा-२०३४ मंजूर झाल्यामुळे खासगी इमारतींचा पुनर्विकासही दृष्टिपथात येऊ लागला आहे.

* नव्या आराखडय़ात विकासकांसाठी अनेक सवलती आहेत. त्याचा आता प्रत्यक्षात वापर सुरू झाला आहे. अनेक प्रकल्प विकास आराखडय़ातील नव्या तरतुदींमुळे व्यवहार्य ठरू लागले आहेत. अनेक विकासकांनी प्रामुख्याने छोटी घरे बांधण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ५५ ते ८६ लाखांत किमान ३५० ते ४५० चौरस फुटांचे घर सामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.