|| सुहास शेलार

मध्य प्रदेशात गतवर्षी देशव्यापी टाळेबंदी लागू होण्याआधी सत्तांतर झाले. काँग्रेसला धक्का देत समर्थक आमदारांसह बाहेर पडलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या टेकूमुळे भाजपचे सरकार सत्तेत आले. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीतील यशामुळे भाजप सरकार स्थिर झाले असले, तरी मध्य प्रदेश मात्र राजकारणात ‘रंग’ले आहे…

 

धार्मिक भावनांना साद घातली की विकासाचे प्रश्न आपोआप दुर्लक्षित होतात, ही भारतीय राजकारणाची सद्य: वृत्ती. मध्य प्रदेशही अशा राजकीय वृत्तीस अपवाद नाही. गेल्या काही दिवसांपासून तेथे सातत्याने चर्चेत असलेल्या ‘लव्ह जिहाद’, ‘गोवंशहत्या बंदी’, ‘गोडसे ग्यानशाला’, काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकवण्यात आलेला भगवा झेंडा… अशा मुद्द्यांवरून त्याचा प्रत्यय येतो. काँग्रेससारखा राज्यातला तुल्यबळ विरोधी पक्ष त्याविरोधात आवाज उठवेल अशी अपेक्षा उदारमतवाद्यांना होती. परंतु पक्षांतर्गत लढाई आणि वर्चस्ववादापुढे काँग्रेसलाही सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे दिसते. दुसरीकडे, पोटनिवडणुकीतील विजयामुळे स्थिरस्थावर झालेल्या भाजपकडे काँग्रेसमधून आयारामांचा ओघ वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राहुल गांधी यांचे विश्वासू शिलेदार अशी ख्याती असणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी ऐन करोनाकाळात राजकीय भूकंप घडवत कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार उलथून टाकले आणि भाजपच्या नौकेत स्वार होण्याचा निर्णय घेतला. बहुमताच्या दोलायमान तराजूत २२ आमदारांचे पडणारे वजन, राजघराण्याचे वारसदार असलेले ज्योतिरादित्य यांची लोकप्रियता, मध्य प्रदेशच्या राजकारणातील त्यांचा दबदबा या साऱ्या जमेच्या बाबी विचारात घेऊन भाजपने ज्योतिरादित्य यांना पक्षात प्रवेश दिला. पोटनिवडणुकीत तब्बल १९ जागांवर विजय मिळवून ज्योतिरादित्य यांनीही आपली उपयुक्तता सिद्ध केली. आता आपल्या निष्ठावंतांची महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावून, तसेच काँग्रेसमधील आमदारांना आयात करून प्रदेश भाजपवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपच्या जुन्या कार्यकत्र्यांमध्ये त्यांच्याविषयी सावध भावना दिसून येते. परंतु थेट केंद्रीय नेतृत्वाचा वरदहस्त असलेल्या ज्योतिरादित्य यांच्याविरोधात उघड नाराजी प्रकट केल्यास आपले पक्षातील स्थान डळमळीत होण्याच्या भीतीने अनेकांनी सध्या तरी मौन बाळगणे पसंत केले आहे.

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशानंतर आक्रमक झालेल्या कमलनाथ यांनी पोटनिवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली. परंतु २८ पैकी केवळ नऊ जागा त्यांना जिंकता आल्या. हा पराभव जिव्हारी लागल्याने काही दिवस ते राजकारणापासून अलिप्तही राहिले. परंतु नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मैदानात उतरत त्यांनी पुन्हा भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. १५ जानेवारीपासून मध्य प्रदेशात काँग्रेसने कृषी कायद्यांविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे स्वत: ट्रॅक्टर चालवून या आंदोलनात भाग घेतला. मात्र, आंदोलनादरम्यान त्यांच्या टीकेचा रोख कृषी कायद्यांपेक्षा ज्योतिरादित्य आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्याकडेच अधिक राहिल्याचे दिसून आले.

दुसरीकडे, विधानसभेतील १२६ सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर भाजपने धर्मांतरविरोधी कायदा संमत करून घेतला. त्यानुसार महिला, अल्पवयीन मुली आणि मागासवर्गीय समाजघटकांना धर्मांतराची सक्ती केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूदही यात करण्यात आली आहे. मात्र, स्वधर्मात पुन्हा येणाऱ्यास (घरवापसी) कोणतीही शिक्षा केली जाणार नसल्याचे या कायद्यात म्हटले आहे. त्यामुळे भाजप आपला ‘घरवापसी’चा अजेण्डा पुढे रेटत असल्याचे म्हणत विरोधकांनी या कायद्यावर आक्षेप नोंदवला.

मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षे करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आग्रही आहेत. अनेक जाहीर सभा आणि पत्रकार परिषदांमध्ये याविषयी त्यांनी तशी भूमिका मांडली आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेला विरोध करताना एका काँग्रेस नेत्याने विवादात्मक टिप्पणी केल्याने बरीच टीका झाली. ‘मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात, त्यामुळे त्यांच्या लग्नाचे वय १८ वर्षेच असायला हवे,’ असे मत काँग्रेसचे आमदार सज्जनसिंह वर्मा यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना काँग्रेस प्रवक्ते आणि नेत्यांच्या नाकीनऊ आले.

अखिल भारतीय हिंदू महासभेने ग्वाल्हेरमध्ये ‘गोडसे ग्यानशाला’ नावाने सुरू केलेल्या वाचनालयामुळेही बराच वाद निर्माण झाला. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावाने वाचनालय सुरू करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवाल विचारत देशभरातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली. त्यामुळे १० जानेवारी रोजी सुरू केलेले हे वाचनालय अवघ्या दोन दिवसांत बंद करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला.

एकीकडे हे, तर दुसरीकडे एका हिंदुत्ववादी संघटनेने मुस्लीमबहुल लोकवस्तीतून काढलेल्या मोर्चादरम्यान नुकतीच तणावाची स्थिती निर्माण झाली. मोर्चेकरी आणि स्थानिक नागरिक आमनेसामने आले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. उज्जैन, इंदूर आणि मंदसौर जिल्ह्यांतही असे प्रकार घडले. त्यातून सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दगडफेक करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना करावी लागली.

अलीकडेच भोपाळ येथील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर भगवा झेंडा फडकावण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला. धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने असे प्रकार करण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले. तर झेंड्यामधला भगवा रंग हा हिंदुत्वाचे प्रतीक आहे. काँग्रेस हिंदू धर्माचा द्वेष करीत असल्यामुळेच त्यांची ही अवस्था झाली आहे, असा पलटवार भाजपने केला. काँग्रेसला ध्वजावर भगवा रंग मान्य नसल्यास त्यांनी तसे जाहीर करावे, असेही म्हटले गेले. त्यावर- आमच्या पक्षाच्या झेंड्यातही भगवा रंग समाविष्ट असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले. एकुणात, मध्य प्रदेश राजकारणात ‘रंग’ले आहे.

ज्योतिरादित्य समर्थकांना संधी

नुकत्याच झालेल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या दोन निष्ठावंतांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तुलसीराम सिलावत आणि गोविंदसिंह राजपूत अशी या नवनिर्वाचित मंत्र्यांची नावे आहेत. गतवर्षी मार्चमध्ये ज्योतिरादित्य यांच्यासमवेत ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्यात आली होती. परंतु करोनामुळे पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात आली. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधिमंडळ सदस्य होणे बंधनकारक असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह सरकारमध्ये सध्या असलेल्या ३० मंत्र्यांपैकी ११ जण हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत.

याबरोबरच भाजपकडे आयारामांचा ओघ सुरूच असल्याचे चित्र आहे. बुंदेलखंडमधील काँग्रेस आमदार राहुलसिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तत्कालीन सरकारमधील अर्थमंत्री जयंतकुमार मलैया यांचा पराभव केला होता. भाजपकडून महामंडळाच्या अध्यक्षपदाचे आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, आणखी पाच काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याचा दावा ज्योतिरादित्य समर्थकांनी केला आहे.

 

suhas.shelar@ expressindia.com