– गिरीश कुबेर

मध्यंतरी बातमी होती. या करोना काळातल्या टाळेबंदीमुळे किती लग्नाळूंच्या मधुचंद्री स्वप्नांचा भंग झाला याचा तपशील देणारी. उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंच्या मध्ये आपल्याकडे हा महत्त्वाचा ‘ऋतू हिरवा’ असतो. हुताशनी पोर्णिमेनंतर पंधरवडय़ात चैत्रपालवी फुटू लागली की अनेकांची पावलं मंगलकार्यालयांकडे वळायला लागतात. कोकिळेच्या मधुर स्वरांच्या मागून भसाडय़ा आवाजात ‘गंगा सिंधु सरस्वती च यमुना..’ हेदेखील सरावल्या कानांना ऐकायला यायला लागतं. पण यंदा सगळीकडे ‘वांदा सौख्यभरे’ ही अवस्था !

या करोनानिमित्तानं अमेरिकेतली विवाहांची आकडेवारी प्रकाशित झालीये. याच आठवडय़ात आलेल्या या पाहणीचा निष्कर्ष असा की, दिवसेंदिवस अमेरिकी तरुण लग्नाचा कंटाळा करायला लागलेत. गेल्या काही वर्षांत अशांचं प्रमाण तसंही वाढलेलंच होतं. पण यंदा त्याला या विषाणूनं जरा जास्तच गती दिलीये. वातावरणातली अस्थिरता आणि आर्थिक विवंचना हे कमी म्हणून की काय ते किमान अंतर ठेवणं! लग्न हा प्रकारच मुळी अंतर कमी करण्याचा.. पण करोना नेमका या मार्गाच्या तोंडावरच येऊन बसला. सगळेच मार्ग बंद.

‘नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स’च्या ताज्या आकडेवारीनुसार, गेली दोन वर्ष अमेरिकेत विवाहांचं प्रमाण तब्बल ६ टक्क्यांनी घसरून ६.५वर आलंय. म्हणजे दर हजारांत फक्त ६.५ इतकेच ‘आय डु’ म्हणतात. आणखी एका सर्वेक्षणात ते ६.९ टक्के असं दाखवतं. यातला धक्कादायक भाग असा की, १८६७ साली ही संस्था अस्तित्वात आल्यापासून विवाहांची इतकी नीचांकी नोंद आतापर्यंत कधी झाली नव्हती. खरं तर यंदा मिलेनियल्स नावानं ओळखली जाणाऱ्यांची पिढी विवाहांच्या फुरफुरणाऱ्या वयाची झालीये. म्हणजे २००० साली जन्माला आलेले विशीत आहेत आणि १९९० पासून २००० पर्यंत जन्मलेले तिशीच्या आत आहेत. पण तरी हे तरुण लग्नाचं नाव काढताना दिसत नाहीत.

या सत्याला कफल्लकतेच्या वेदनेची एक किनार आहे.

ती अशी की पहिल्या महायुद्धानंतर दशकभरानं घडलेल्या ‘ग्रेट डिप्रेशन’च्या काळात विवाहांचा दर असाच घसरला होता. साहजिकच म्हणता येईल ते. आपलं आपल्याला झालंय थोडं असं म्हणावं लागतं त्या काळात दोनाचे चार करून आणखी एका तोंडाची जबाबदारी कशाला घ्या, असा विचार केला जात असेल तर ते योग्यच. हृदयीच्या प्रेमावर मेंदूतला व्यवहार मात करत असेल तर त्याचं केव्हाही स्वागतच. तर १९३० साली मंद झालेला विवाहांचा वेग १९४५ नंतर, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर, मात्र चांगलाच वाढला. घाट चढावर फुरफुरणारी मोटार उतार सुरू झाल्यावर बिनबोभाट धावावी तसं त्या वेळी लग्नांचं झालं. विवाहांचा वेग तब्बल १६.४ टक्क्यांपर्यंत गेला. त्यानंतर अमेरिकेत अधिकृतपणे १९८२ पर्यंत एका स्थिर गतीनं जोडीदार निवडले जात होते. ही गती २००८ पर्यंत कायम राहिली. २००८च्या आधी आणि त्या नंतर मात्र विवाहांचं प्रमाण पुन्हा कमी झालं. कारण साहजिकच. २००८ साली अमेरिका आणि नंतर त्यामुळे जग, एका मोठय़ाच आर्थिक संकटात सापडलं होतं.

तर तेव्हाच्या मंदीच्या फेऱ्यात मंदावलेला लग्नांचा आलेख २०१४च्या आसपास पुन्हा जरा धुगधुगीच्या खुणा दाखवू लागला होता. त्या देशातल्या कुटुंबवत्सलांच्या चेहेऱ्यांवरची एक सुरकुती त्यामुळे कमी झाली होती. ‘मुलं संसाराला लागली..’, हे समाधान होतं. पण गेली दोन वर्ष त्याला जरा ओढ लागलेली दिसली. आणि आता तर या करोनानं सगळंच उद्ध्वस्त केलं म्हणायचं.

म्हणजे पुरुष-स्त्री यांच्यात काही बिनसलंय वगैरे असं काही नाही. ‘ते’ तसं सगळं यथास्थित सुरू आहे. फक्त मधला ‘अंतरपाट’ तेवढा दूर झालाय. लग्नाशिवाय राहणाऱ्यांचं प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढलंय असा एक त्याचा अर्थ. लग्नाचं प्रमाण ६.५ टक्क्यांवर आलंय आणि त्याच वेळी लग्नाशिवाय ‘तसंच’ राहणाऱ्यांचं प्रमाण मात्र ७ टक्क्यांवर गेलंय. शिव शिव! काय होत असेल तिथल्या संस्कृतीरक्षकांचं!! पण हे वाचून इथल्यांना आणखी एक घोर लागेल. आपली पोरंपोरी लाखांनी नाही तरी हजारोंनी अमेरिकेकडे धावतायत. त्यांनाही त्यांचा वाण नाही पण गुण लागणार की काय.. या चिंतेनं घराघरात अनेकांच्या अंगावरून वाहणाऱ्या घामाच्या धारांचा धबधबा होत असेल. असो.

यापुढचा गहन प्रश्न असा की, या करोनानं यंदा लग्नाळूंच्या उत्साही ज्वालामुखींवर इतकं पाणी ओतल्यानंतर आपल्याकडेही अमेरिकेसारखी ‘तसंच’ राहायची लाट येणार का? तसंही आपण पाश्चात्त्यांचं अनुकरण करतोच. विषाणूला सामोरं जायची यंत्रणा/विधी नसेल आपल्याकडे, पण टाळेबंदी मात्र त्यांच्यासारखीच हवी. तसंच हेही! तसं झालं तर संस्कृतीरक्षकांचंही ‘वांदा सौख्यभरे’!!

@girishkuber