गिरीश कुबेर

हा प्रश्न स्वीडनसंदर्भात जी काही चर्चा सुरू आहे ती पाहिल्यावर पडला. खरे तर स्वीडन हा करोनाकाळातील जागतिक कुतूहलाचा विषय. या देशाची करोना हाताळणी प्रचलित आणि अन्यांच्या मार्गापेक्षा वेगळी. एक दिवसही टाळेबंदी नाही, शाळा सुरू, इतर देशांप्रमाणे नागरिकांना करकचून आवळणे नाही आणि तरीही तुलनेने करोनाबळींची संख्या कमी. या देशाच्या करोना प्रयोगांवर याआधी १२ मेच्या कोविडोस्कोपमध्ये (अधिक निर्बंध.. अधिक बळी) लिहिलं होतं. अगदी शेजारच्या युरोपीय देशांपेक्षाही स्वीडनची करोना हाताळणी किती वेगळी आहे आणि तरीही ती यशस्वी ठरली आहे, हा त्या लेखाचा गाभा. यामुळे नाही म्हटले तरी अन्य देशांच्या मनांत स्वीडनविषयी नक्कीच असूया आली असणार.

साहजिकच तसे होणे. ‘‘आम्ही इतके हाल सहन केले आणि हे स्वीडिश बरे टिकोजीराव कौतुक खाऊन जातात,’’ असेच त्या देशाविषयी अनेकांना वाटले. या अशा भावनेमागे समूह मानसशास्त्र आहे. एकाच बिकट अवस्थेतून सर्व जात असताना त्यातील काहींचे वेगळ्या उपायांमुळे उर्वरितांपेक्षा जरा बरे झाले तर अन्य सर्व ‘ते बरे कसे नाही’, हे दाखवण्याचा एकजुटीने प्रयत्न करतात. वैयक्तिक आयुष्यात अनेकांना हा अनुभव आला असेल. अगदी शालेय स्तरापासूनच त्याची सुरुवात होते. गणितात नापास झालेले एकत्र येऊन पास झालेल्याचे यश किती खोटे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.

स्वीडनबाबत सध्या नेमके हेच होताना दिसते.

त्याची सुरुवात होण्याचे कारण, स्वीडनची परिस्थिती हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे साथरोगतज्ज्ञ अ‍ॅण्डर्स टेग्नेल यांनी स्वीडिश रेडिओला दिलेली आणि नंतर काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी चालवलेली मुलाखत. ‘‘आम्ही जे काही केले ते अधिक चांगलेपणाने करता आले असते,’’ असे त्या मुलाखतीत टेग्नेल म्हणाले. या त्यांच्या

विधानाचा रोख हा स्वीडनमधील वृद्धाश्रम, अनाथालयातील वृद्ध यांच्या मोठय़ा मृत्युसंख्येकडे होता. टेग्नेल एका अर्थी कबुली देत होते की करोनामुळे जरा अपेक्षेपेक्षा अधिकांचे प्राण गेले.

ताज्या आकडेवारीनुसार स्वीडनमध्ये एकंदर ३३८४३ जणांना करोनाची बाधा झालेली आहे. त्यातील ४०२९ दगावले. यातील अत्यंत महत्त्वाची बाब अशी की मृतांमधले ९० टक्के हे वयाने सत्तरी पार आहेत. म्हणून वृद्धांची आम्ही अधिक काळजी घ्यायला हवी, असे टेग्नेल म्हणाले आणि त्यावर स्वीडनचे कसे चुकले याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात वाटते तितकी परिस्थिती स्वीडनमध्ये गंभीर आहे का?

याच देशाचे विख्यात वैद्यक जोहान गिसेक (Johan Giesecke) यांच्यावरही कोविडोस्कोपमध्ये लिहिल्याचे (पुराव्यानिशी सिद्ध होईल, १७ मे) अनेकांना आठवत असेल. या डॉ. गिसेक यांनीही अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या आणि स्वीडनच्या आगळ्या करोना हाताळणीचे समर्थन केले. त्यांचेही हेच म्हणणे होते की धोका आहे अशांच्या सुरक्षिततेसाठी अन्य सर्वावर सरसकट टाळेबंदी लादू नका. वृद्ध, रक्तदाब/मधुमेह आणि मूत्रपिंडाचे आजारबाधितांना करोनाचा अधिक धोका आहे, असेच डॉ. गिसेक म्हणतात आणि टेग्नेल यांचेही म्हणणे तेच. दोहोंतला फरक असलाच तर इतकाच की टेग्नेल वृद्धांच्या मरणाचे प्रमाण जरा कमी हवे होते, असे म्हणतात. पण दोहोंतील साम्य हे की तसे म्हणतानाही स्वीडनने अंगीकारलेल्या धोरणाविषयी त्यांच्या मनात संदेह नाही. हे इतके वृद्ध मरायला नको होते, इतकेच त्यांचे म्हणणे.

स्वीडनचा हा करोनाबळींचा दर प्रति दशलक्ष नागरिकांमागे ३९९ इतका आहे. शेजारच्या डेन्मार्क (९७) आणि फिनलंड (५५) वा नॉर्वे (४३) यांच्यापेक्षा तो नक्कीच किती तरी अधिक आहे. पण तरी टाळेबंदीच्या मार्गाने जाणाऱ्या फ्रान्स (४३५), ब्रिटन (५४२), इटली (५४२) आणि स्पेन (६१५) यांच्यापेक्षा नक्कीच कमी आहे आणि या देशांच्या तुलनेत स्वीडनची अर्थव्यवस्थाही तुलनेने जास्त धडधाकट आहे.

तेव्हा फक्त मृतांच्या संख्येवरून ‘स्वीडनचे कसे चुकले’ असा आनंद साजरा करू इच्छिणाऱ्यांसाठी टेग्नेल स्पष्ट करतात की, ‘‘करोनाचे निदान झाल्यानंतर एक महिन्यात प्राण गेलेल्या प्रत्येकाची नोंद आम्ही करोनामृत्यू अशी केली. बाकीची कोणतीही कारणे तपासली नाहीत. अन्य देशांनी मात्र मृत्युनोंदीचे वेगळे निकष वापरले.’’ त्यांचा मुद्दा असा की वृद्धाश्रमांनी/ वृद्धांच्या उपचार केंद्रांनी अधिक काळजी घेतली असती तर इतके मृत्युमुखी पडले नसते. यंदा जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत अशा केंद्रांतून सर्व कारणांमुळे मिळून ११ हजार वृद्ध मरण पावले. गेल्या वर्षी याच काळासाठी ही संख्या १० हजार इतकी होती.

पण स्वीडनच्या या ‘कबुली’(?)बद्दल आनंद व्यक्त करताना जे दिसतात त्यांना नक्की आनंद कसला झालाय? स्वीडनचीही आपल्यासारखीच बोंब झाली (जी तशी नाही) याचा की त्या सरकारवर अशी कबुली (?) द्यायची वेळ आली याचा. या दोन्हींपेक्षा खरा आनंद वाटावा अशी बाब वेगळीच आहे.

आपली कथित चूक मान्य करण्याचा मोठेपणा दाखवणारे सरकार त्यांच्याकडे आहे.. हा तो आनंद.

@girishkuber