गिरीश कुबेर

विज्ञानाचे मोठेपण असे की त्यात ‘अंतिम सत्य’ असे काहीही नसते. या धारणेमुळेच ते प्रयोगास घाबरत नाही आणि निष्कर्षांच्या कसोटीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज काहीही मान्य करीत नाही. तसेच यापुढचा महत्त्वाचा भाग असा की एखादी व्यक्ती केवळ उच्चपदस्थ आहे म्हणून तिचे विधानही विज्ञानात शास्त्रकसोटीच्या निकषावर पारखल्याखेरीज मान्य केले जात नाही.

आणि म्हणूनच निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनास वाहिलेल्या ‘लॅन्सेट’ साप्ताहिकाकडून जगातील एकमेव महासत्तेचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरील प्रयोग आणि निष्कर्ष दखलपात्र ठरतो. ट्रम्प यांच्याही आधी काही जण ही विधाने करीतच होते. त्यामुळे या प्रयोगाची व्यापकता लक्षात येते. ही विधाने होती हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन वा नुसत्या क्लारोक्वीन या औषधाच्या करोनावरील उपायांबाबत. आपल्या नेहमीच्या ‘ठोकुनी देतो ऐसा जे’ या बाण्यानुसार ट्रम्प यांनी करोनावर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे अद्भुत औषध असल्याचे सांगून टाकले आणि आपणही हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून ‘काही आठवडे’ घेत असल्याचे सांगत या औषधाच्या उपयुक्ततेची द्वाही फिरवली. अर्थातच विज्ञानवादी ‘लॅन्सेट’ने अमेरिकी अध्यक्षांच्या या दाव्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वत:च्या प्रयोगावर लक्ष केंद्रित केले. (जाता जाता : विज्ञानाशी दैनंदिन संबंध नसलेल्यांसाठी लॅन्सेटविषयी थोडे. हे ब्रिटिश साप्ताहिक. जन्म १८२३. म्हणजे दुसऱ्या बाजीरावाचा भीमा-कोरेगावच्या लढाईत पराभव होऊन पुण्यात शनिवारवाडय़ावर युनियन जॅक फडकू लागल्यानंतर अवघ्या पाचव्या वर्षी. तेव्हापासून सलग १९७ वर्षे हे विज्ञानव्रत सुरू आहे आणि वर्गणीअभावी वगैरे बंद पडलेले नाही. असो).

प्रयोगासाठी अधिकाधिक नमुने.. म्हणजे सॅम्पल साइझ.. हवे हे चांगल्या प्रयोगात अनुस्यूत असते. जितके हे नमुने अधिक तितकी निष्कर्षांची अचूकता अधिक. त्यामुळे लॅन्सेटने या प्रयोगासाठी तब्बल ९६ हजारांहून अधिक करोना रुग्ण निवडले. परत त्यात व्यापकता असावी म्हणून ते विविध प्रदेशांतील असतील याची खातरजमा केली. सहा खंडांतील रुग्ण त्यात घेतले गेले. या निष्कर्षांच्या संकलकाचे नाव वाचून अनेकांची छाती अभिमानाने भरून वगैरे येईल. ते आहेत डॉ. मनदीप मेहरा. हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील ते प्राध्यापक. या प्रयोगासाठी त्यांनी डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२० या काळात जगभरातील ६७१ रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांची निवड केली. यातील बहुतांश रुग्ण हे पन्नाशीपुढचे होते आणि त्यातील ५३ टक्के पुरुष होते. रेमडेसीवीरसारखे औषध (?) ज्यांना दिले जात आहे त्यांना या प्रयोगातून वगळले गेले. यातील १५ हजार रुग्णांना करोनाचे निदान झाल्या-झाल्या लगेच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन वा क्लोरोक्वीन दिले गेले. यानंतर सर्वमान्य अशा पद्धतीने या रुग्णांच्या नोंदी ठेवल्या गेल्या. त्याचा अहवाल ‘लॅन्सेट’च्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

त्यातून दिसते ते असे, की हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन वा क्लोरोक्वीन दिल्या गेलेल्यांतील ३४ टक्के रुग्ण मरणाचे दार ठोठावू लागले, शिवाय हृदयक्रियेत गंभीर बिघाड होण्याचे प्रमाण तब्बल १३७ टक्क्यांनी वाढले. ट्रम्प बाबांनी काही प्रतिजैविके आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन वा क्लोरोक्वीन यांचे मिश्रण करोनामृत असल्याचे सांगितले होते. लॅन्सेटने हे करोनामृत दिलेल्यांतील ४५ टक्के अत्यवस्थ झाले आणि रुग्णांची हृदयक्रिया बंद पडते की काय अशी आणीबाणी निर्माण होण्याच्या प्रमाणात तर ४११ टक्के वाढ झालेली आढळली. नुसत्या क्लोरोक्वीन दिलेल्यांतील ३७ टक्क्यांची प्रकृती अधिकच ढासळली. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या तुलनेत नुसत्या क्लोरोक्वीनमुळे हृदयावर परिणाम झालेल्यांचे प्रमाण २५६ टक्क्यांनी वाढल्याचे नोंदवले गेले.

या सर्वात मोठय़ा प्रयोगाने अर्थातच वैद्यकविश्व ढवळून निघाले. त्या जगात ‘अध्यक्ष वाक्यं प्रमाणम’ अशी काही उच्च परंपरा नसल्याने अनेकांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या दाव्याच्या शब्दश: चिंधडय़ा केल्या. ट्रम्प यांच्या विज्ञानद्वेषी विचारधारेविषयी नव्याने सांगावे असे काही नाही. पण तरीही या विज्ञानद्वेषी विचारांच्या पुनर्दर्शनाने अनेक जण संतापले. कारण यात प्रश्न अनेकांच्या जिवाचा आहे. ट्रम्प यांच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीनबाबत विधानानंतर जगभरात ही औषधे मिळवण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली. या सर्वाना लॅन्सेटच्या ताज्या पाहणीमुळे विराम मिळू शकेल. ‘‘हा अहवाल म्हणजे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन यांच्या करोना उपचार मागणीच्या थडग्यावर ठोकला गेलेला शेवटचा खिळा असेल,’’ असे त्याचे वर्णन अमेरिकी एफडीएचे माजी वरिष्ठाधिकारी आणि अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य सेवेतील अधिकारी व्यक्ती अशा पीटर ल्युरी यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’शी बोलताना केले.

लॅन्सेटने केलेला हा १३वा प्रयोग. म्हणजे अन्य १२ प्रयोग यावर आधी झाले आहेत आणि सर्वाचे म्हणणे तेच आहे. तरीही लॅन्सेटचे महत्त्व अशासाठी की त्यांचा प्रयोगाकार सर्वात मोठा होता. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक हे की अजूनही असे प्रयोग अन्य पद्धतीने व्हायला हवेत, असे वैज्ञानिकच म्हणताना दिसतात.

तात्पर्य : केवळ विषाचीच नव्हे तर अमृत म्हणवून घेणाऱ्याची वा ज्याविषयी तसा दावा केला जातो त्याचीही परीक्षा व्हायलाच हवी.

@girishkuber