‘बालभारती’च्या इयत्ता दुसरीच्या पाठय़पुस्तकातील दोन अंकी संख्यांच्या वाचनाची नवी पद्धत वादाच्या भोवऱ्यात अडकली. या बदलाने ‘आता भाषा बिघडणार’ असे म्हणत अनेकांनी या पद्धतीवर टीकेची राळ उडवली. अगदी विधानसभेतही याचे पडसाद उमटले. भाषिक अंगाने त्याबद्दल बरीच भवति न भवति झाली. मात्र, या भाषिक मुद्दय़ाची चर्चा करत त्यातील शिक्षणविचारही नजरेस आणून देत ही नवी पद्धत का आवश्यक आहे, हे सांगत आहेत ‘बालभारती’च्या गणित विषय समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर!

भाषातज्ज्ञ आणि गणित शिक्षक हे दोघेही मराठीचे अभिमानी आहेत, हे आपण पहिले गृहीतक घेऊ. दोघेही कुणाच्या शिक्षणाचा विचार करत आहेत, हे पाहू या. मराठी भाषा पुढच्या पिढीत कोण टिकवणार आणि वाढवणार आहे? तर, आज मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुले. या मुलांच्या शिक्षणाबद्दल आपण बोलत आहोत. हा वाद घालायला बसलेल्या बहुतेक व्यक्तींच्या घरातील मुले किंवा आता नातवंडे इंग्रजीतून शिकतात आणि मराठीच्या जबाबदारीतून मुक्त आहेत.

पहिली-दुसरीच्या वर्गात गणित शिकवताना शिक्षकांना अनेक वेळा अनुभव येतो, की दोन अंकी संख्यांचे लेखन व वाचन करताना मुलांचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ, ‘पंचवीस’ (२५) ही संख्या बोलताना त्यातील पाच आधी तर वीस नंतर येतात; लिहिताना मात्र विसाचे दोन आधी आणि पाच नंतर लिहायचे! ‘एकतीस’ (३१) ही संख्या लिहायला सांगितल्यावर सहा-सात वर्षांच्या मुलीने १३ लिहिले म्हणून तिला शिक्षा झाली होती आणि याची गोष्ट प्रसिद्ध झाली होती. अशा चुका झाल्या, की मुलांचा आत्मविश्वास जातो. गणित कठीण आहे, आपल्याला जमत नाही अशी त्यांची धारणा होऊ  लागते. इंग्रजीतून शिकणाऱ्या मुलांना ही अडचण येत नाही. कारण ‘ट्वेंटी फाइव’मध्ये बोलणे व लिहिणे यात अंकांचा क्रम एकच आहे.

हे मराठीप्रमाणे गुजराती, हिंदी या संस्कृतजन्य भाषांतून गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनादेखील अनुभवायला मिळते. यातून वाट काढून रमणलाल सोनी नावाच्या एका गुजराती शिक्षकाने दाक्षिणात्य व इंग्रजी भाषेतील संख्यावाचन पाहून आपल्या विद्यार्थ्यांना तसे संख्याज्ञान देणे चालू केले. प्रथम अनेक मुले चुका करत होती; मात्र नव्या सुसंगत पद्धतीने शिकवल्यावर जवळपास सर्वाच्या चुका थांबल्या. या बाबीवर काम करून त्याने एन.सी.ई.आर.टी. आणि कॉमनवेल्थ असोसिएशन यांची बक्षिसे मिळवली. (हे पुस्तक पाहा : ‘टीचर्स अ‍ॅज ट्रान्सफॉर्मर्स’, लेखक- विजया शेरी चांद/ शैलेश आर. शुक्ला)

पुण्यातील ज्येष्ठ गणित अध्यापक प्रा. मनोहर राईलकर यांचे या विषयावरील काम जुने आणि प्रसिद्ध आहे. याविषयी ५० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला त्यांचा लेख अत्यंत वाचनीय आहे; परंतु दुर्दैवाने त्यांचे म्हणणे अजूनही ‘बालभारती’ला प्राथमिक शाळेतील पुस्तकात अमलात आणता आलेले नाही. कारण भाषातज्ज्ञांचा विरोध आणि लेखकांची अनास्था किंवा भीती! इंग्रजी किंवा दाक्षिणात्य भाषांप्रमाणे दोन अंकी संख्यांचे वाचन करावे आणि मुलांचे संख्याज्ञान सुलभ करावे, त्यांच्यावर अनावश्यक भार टाकू नये, ही त्यांचीही सूचना होती व आहे.

अशिक्षित आणि कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांकडून समजले, की मुलांची भाषा मराठी असूनही त्यांना इंग्रजीतून गणित शिकणे सोपे वाटते. याचेही कारण हेच आहे : संख्या वाचणे किंवा बोलणे आणि लिहिणे यांतील विसंगती! मराठीच्या कैवारी लोकांना मराठीतील या त्रुटीला दूर करावेसे वाटत नाही, हे दुर्दैव. खरे तर हा त्रास सधन आणि सुशिक्षित पालकांच्या मुलांनाही होतो; पण पालकांचे मार्गदर्शन, शिकवणी/ कोचिंग क्लास आणि भरपूर सराव यांवर ती तरून जातात. पुढे मोठेपणी, संख्याज्ञान पक्के झाल्यावर हा त्रास विसरतातही; पण लहान बालकांच्या मराठीतून गणित शिकण्याच्या मार्गातील टोचणारे हे दगड काढता येणार नाहीत का?

‘बालभारती’च्या गणिताची पुस्तके लिहिण्याच्या समितीत श्रीमती हर्डीकर यांच्या आमंत्रणामुळे प्रथम मी सभासद झाले. नंतर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा इयत्ता पाचवीच्या पुस्तकाचे काम चालू झाले. पाचवी ते दहावीची पुस्तके लिहून झाली. पुन्हा पहिली, दुसरीची पुस्तके लिहायचे ठरले. मराठीतून गणित शिकणे इंग्रजीतून किंवा दाक्षिणात्य भाषांतून गणित शिकण्यापेक्षा कठीण आहे आणि बालकांच्या शिक्षणमार्गात हे टोचणारे दगड आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करू, असे ठरवले. समितीच्या लेखकांशी चर्चा केली. एकदोघांचा प्रथम विरोध होता. हे सगळे विविध इयत्तांचे शिक्षक आहेत. आपण दोन्ही प्रकारचे (जुन्या व नव्या पद्धतीचे) वाचन देऊ, विद्यार्थ्यांना आवडेल ते स्वीकारण्याची मुभा देऊ, असे म्हटल्यावर बहुतेकांना ते पटले. २०१८ मध्ये पहिलीच्या पुस्तकात दोन्ही प्रकारचे वाचन दिले. खरे म्हणजे, ‘पन्नास आणि तीनो त्रेपन्न’ हा ‘त्रेपन्न’ या शब्दाचा अर्थ द्यावा लागतोच; त्यामुळे ‘पन्नास तीन’ या नव्या वाचनाचा अर्थ द्यावा लागत नाही. शिकण्याच्या प्रक्रियेत पाठांतर कमी करून विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागास वाव द्यावा, या नव्या शिक्षण पद्धतीत सक्ती न करता विद्यार्थ्यांना निवड करण्यास देणे चांगले बसते.

२०१८ साली पहिलीचे पुस्तक तयार झाले, वापरले गेले. आता २०१९ मध्ये दुसरीचे पुस्तकही तयार झाले. एक सूचना आली होती, की नवे वाचन देऊ  नये, भाषातज्ज्ञ विरोध करतील; पण दोन्ही वाचने देत आहोत, विद्यार्थ्यांना निवडीचे स्वातंत्र्य आहे, असे मी पटवून दिले आणि पुस्तक पुढे गेले; पण माझा अंदाज चुकला. मराठी भाषेचे कैवारी फारच तयारीने आले. कडक भाषेत, असंबद्ध मुद्दे चर्चेला घेत टीकेचा धुरळा उडवू लागले. विरोध करणाऱ्यांपैकी एकानेही पहिली-दुसरीच्या वर्गाला गणित शिकवले नव्हते. नवी पुस्तके वाचली नव्हती. नव्या सोप्या वाचन पद्धतीत जोडाक्षरे असलेले अनेक शब्द लिहावे लागत नाहीत, हाही नव्या पद्धतीचा गुण आहे; त्याच मुद्दय़ावरून- ‘आता भाषा बदलणार व बिघडणार, भाषेतील सगळी जोडाक्षरे काढून टाकणार का?’ असे बोलू लागले. मुख्य कारणाकडे मात्र दुर्लक्ष. कारण यांनी कधी पहिली-दुसरीच्या मुलांना गणित शिकवले नाही. माझ्याजवळ आहे फक्त सत्य आणि गणित व ते शिकणारी मुले यांच्याबद्दल आस्था.

यास राजकीय रंगही दिसतो आहे. विधानसभा दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात एवढा रस घेते, हे मला नवीन आहे. आशा आहे की, यावर बोलणाऱ्या लोकांनी ७६ पानांचे हे पुस्तक वाचले असेल. चुकीची भाषा दिसली, तर जरूर दाखवावी.

दुहेरी वाचन वरच्या वर्गात कसे नेणार, असा एक मुद्दा आला होता. त्याचे व्यवस्थित समाधान करता येते. तिसरी-चौथीत शाब्दिक लेखन दोन्ही प्रकारांनी द्यावे. पाचवीपासून संख्या अंकातच लिहिल्या जातात. त्यांचे वाचन विद्यार्थ्यांने कोणत्याही पद्धतीने करावे. गणिती क्रियेत कोणताही फरक पडत नाही. गणित सोप्या पद्धतीने रोचक वाटेल असे शिकवणे, एवढाच आमचा हेतू आहे. वास्तविक फक्त ७० संख्यांसाठी जास्तीची अशी सोपी वाचन पद्धत देण्यापलीकडे कोणताही फरक भाषेत सुचवलेला नाही. कोणताही शब्द बाद न करता नवे शब्द आणले, तर भाषा बिघडते की समृद्ध होते? पूर्वीच्या पाढय़ांतील ‘सव्वीसासे’, ‘दाहीन्दोन’ या संख्या आज वापरल्या जात नाहीत म्हणून भाषा बिघडली का? ‘सत्त्याण्णव’, ‘अठ्ठय़ाऐंशी’, ‘त्रेसष्ट’ असे सुंदर शब्द टिकवण्याची जबाबदारी ज्या मुलांवर आहे, त्यांना सोपे वाचन नाकारायचे?

आता चर्चा करणाऱ्यांच्या घरातील सध्या किती मुले मराठी माध्यमाच्या शाळेत जातात? या लोकांना ज्या मुलांच्या खांद्यावर मराठी भाषा जतन करण्याची जबाबदारी टाकायची आहे, त्या मुलांच्या शिक्षणाबद्दल, भविष्याबद्दल खरेच आस्था आहे का? त्यांच्यासाठी मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, गणित सोप्या मार्गाने, चुकांचे बोचणारे खडे टाळून शिकवावे असे वाटत नाही का? ही आता बहुसंख्येने, तुलनेने कमी उत्पन्न गटातील मुले आहेत, हे लक्षात आणून द्यायला हवे का? यांच्यात सर्वच जाती-धर्माची मुले आहेत. त्यांच्यासाठी शिक्षण अधिक आनंददायी करायला हवे असे वाटत नाही का?

दोन अंकी संख्यांचे वाचन इंग्रजी पद्धतीने करण्यात ब्रिटिश गुलामगिरीची खूण वाटत असेल, तर ते तमिळ भाषेचे अनुकरण माना. लसीकरण, आधुनिक वैद्यकीय ज्ञान, फार काय सध्याची शिक्षण पद्धती या ब्रिटिश गुलामगिरीच्या खुणा आहेत का? शिक्षण क्षेत्रात पदवी घेणारे पाश्चात्त्य शिक्षणतज्ज्ञांचे काम उद्धृत करतात, याला गुलामगिरी म्हणायचे का? अर्थात, मराठी भाषेचे कैवारी म्हणवणारे हे लोक या प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. दुसऱ्या देशाच्या उपयुक्त व चांगल्या गोष्टी आभारपूर्वक घेण्यात प्रामाणिकपणा आहे. तो यांच्याकडे आहे का? आपली दशमान पद्धती पाश्चात्त्य लोकांनी घेतली, आणि पुढे केवढे डोंगर गणित आणि विज्ञानात बांधले!

आता याहून मूलभूत मुद्दय़ाकडे पाहू. कोणत्याही भाषेचे प्राथमिक आणि मुख्य काम काय? बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्याच्या मनातील भाव आणि अर्थ यांच्या प्रतिमा ऐकणाऱ्या किंवा वाचणाऱ्याच्या मनात सुलभतेने आणि जास्तीत जास्त हुबेहूब उमटाव्यात. मधुर आवाज, सुंदर हस्ताक्षर, भाषेचा डौल, शब्दांचे सौंदर्य हे सगळे भाषेचे अलंकार आहेत; पण हुबेहूब अर्थ आणि भाव उमटले, तरच भाषेचे आरोग्य चांगले असेल.

गणित किंवा विज्ञानात भाषेचे हे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. दोन अंकी संख्यांचे नवे वाचन सुलभतेने चटकन समजते, चुका टाळून बालकाचा आत्मविश्वास वाढवते म्हणून ते हवे आहे. भाषेच्या या कैवारी लोकांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात मराठी भाषा ज्ञानभाषा होणे आणि मराठीतून गणित शिकण्याच्या मार्गातील टोचणारे खडे दूर होणे कठीण दिसते.

mjnarlikar@gmail.com