* अमोल पालेकर : समांतर रंगभूमी पर्वातील मोठमोठे कलाकार अस्तंगत होत आहेत. खऱ्या अर्थाने दिग्गज असलेली लालन ही या पर्वातील अखेरची शिलेदार होती. दादर स्टेशनजवळील वनमाळी हॉलमध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये मी लालनला पहिल्यांदा पाहिले होते. तिचे व्यक्तिमत्त्व आणि रंगमंचावरचं अस्तित्व हा एक वेगळाच अनुभव होता. सत्यदेव दुबे यांच्या ‘स्टील फ्रेम’ नाटकात लालन अमरीश पुरी यांच्या समवेत होती. लालनचा अभिनय पहिल्या अंकानंतर संपत असे, पण दुसऱ्या अंकात लालन रंगमंचावर नसणं ही जशी नाटकाची गरज होती तशी अभिनेत्री म्हणून तिच्या कौशल्याला दाद होती. रंगमंचावरचा तिचा अभाव सतत जाणवत राहायचा. ‘बाईंडर’नंतरची लालन सर्वानाच ठाऊक आहे. पण, तिचा आधीचा प्रवास मला तरुण रंगकर्मी म्हणून जवळून पाहता आला.

* दिलीप प्रभावळकर : विजय तेंडुलकर यांच्या लेखनात होता तसाच बंडखोरपणा लालन सारंग यांच्या अभिनयामध्येही होता. परंपरेपेक्षा वेगळय़ा धर्तीच्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या, ‘बाईंडरचे दिवस’ आणि ‘जगले जशी’ या पुस्तकांतून त्यांनी लढवय्येपणा शब्दबद्ध केला आहे. नाटय़संमेलनाध्यक्षा लालन सारंग यांच्या हस्ते मला विष्णुदास भावे पदक प्रदान करण्यात आले होते. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केलेल्या मराठीतील पहिल्या प्रायोजित मालिकेमध्ये वयाने माझ्यापेक्षा मोठय़ा असलेल्या लालन सारंग माझ्या नायिका होत्या.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

* सतीश आळेकर : विजय तेंडुलकर यांची ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’ ही दोन नाटके त्या काळात वादग्रस्त ठरली होती. सखाराम बाईंडर नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकार म्हणून नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ठाम भूमिका घेऊन उभे राहणाऱ्या म्हणून लालन सारंग यांचे काम मोठे आहे. रंगभूमीकडे पाहण्याचा लालन सारंग यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन होता. टक्केटोणपे आणि अश्लील टिप्पणी सहन करून बाईंडरसारख्या नाटकाचे आठशे प्रयोग करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मोठे धैर्य लागते. त्या काळी वादग्रस्त ठरलेले बाईंडर आता अभिजात नाटक झाले आहे याचे श्रेय लालन सारंग यांना द्यावे लागेल.

* विक्रम गोखले : वयोमानानुसार लालन सारंग यांचे जाणे स्वीकारले पाहिजे. लालन सारंग आणि कमलाकर सारंग हे दोघेही माझे चांगले मित्र होते. त्यांनी मराठी रंगभूमीला निराळे वळण दिले. मराठी रंगभूमीचा इतिहास त्यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. मी दोघांच्याही खूप जवळ होतो. ‘कमला’ नाटकात मी लालनबरोबर काम केले होते. विजय तेंडुलकरांची नाटके रंगभूमीवर गाजली यात तेंडुलकरांइतकेच लालनचेही श्रेय आहे. तिने धाडसीपणे ती नाटके सादर केली. ‘सखाराम बाइंडर’ नाटकानंतर अभिनेत्री लालनमध्ये खूप बदल घडून आला. मला ‘अभिनय’ न करणारे कलाकार आवडतात. तसा तिचा ‘अभिनय’ न करण्याकडे प्रवास सुरू झाला. बघा, मी आता तुम्हाला माझा अभिनय दाखवतो, हा भाव तिच्यात नंतर दिसला नाही. तिच्यात अभिनेत्री म्हणून ‘सखाराम बाइंडर’मधील चंपा भूमिकेने बराच बदल घडून आला. ती माझी चांगली मैत्रीण होती.

* कमलाकर नाडकर्णी : मराठी रंगभूमीवरचे बिंदास व्यक्तिमत्त्व हरपले. कोणी करायला धजावणार नाही अशा भूमिका लालनने साकारल्या. नाटककाराने दिलेली भूमिका प्रामाणिकपणे तिने शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवली. आपल्या रंगकर्तृत्वाने तिने प्रत्येक भूमिका सिद्ध केली. ‘सखाराम बाइंडर’ नाटकाच्या वादात एकांडय़ा कमलाकर सारंगांना म्हणजेच आपल्या पतीला जी साथ केली त्याला तोड नाही. केवळ मराठी रंगभूमीवरच नाही तर हिंदी आणि गुजराती रंगभूमीवरही आपला अभिनय ठसा उमटवला. ‘कशी जगले मी’ हे तिचे पुस्तक म्हणजे एका अभिनेत्रीचा ज्वलंत जीवनसंघर्ष आहे.

* विजय केंकरे : लालन सारंग हे रंगभूमीवरील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या; पण सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांनी कमलाकर सारंग यांच्याबरोबर ‘सखाराम बाइंडर’ नाटकाच्या वेळी उद्भवलेल्या वादाविरोधात लढा दिला. हा लढा देणे अतिशय अवघड होते. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्कासाठी त्यांनी तो लढा दिला. उत्तम कलावंत त्याचबरोबर सामाजिक भान जपणारी ती अभिनेत्री होती. त्यांनी कमलाकर सारंगांबरोबर नवीन रंगकर्मीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रंगभूमीचे कुठलेही काम असो, त्यांनी नेहमीच सहकार्य केले. एक अभिनेत्री म्हणून त्यांची सक्षम कारकीर्द होती. त्यांच्याकडे पटलेली गोष्ट तडीस नेण्याची हिंमत होती. रंगभूमीवर वेगळे विषय मांडण्याचे धाडस त्यांच्यापाशी होते. त्यांचे जाणे ही दु:खद घटना आहे. लहानपणापासून त्यांच्या घरी जाणे-येणे असल्यामुळे एक गोष्ट अशी सांगाविशी वाटते की, त्या उत्तम स्वयंपाक करायच्या. त्या अन्नपूर्णा होत्या. रात्री-अपरात्री आमच्यासाठी त्यांनी स्वयंपाक करून वाढला आहे. रंगभूमीसाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.

* शफाअत खान : मी ‘पोलिसनामा’ हे नाटक लेखक ‘दारीओ फो’च्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल डेथ ऑफ अ‍ॅन अनार्किस्ट’ या नाटकावरून रूपांतरित केले. त्या नाटकाचे मी कमलाकर सारंग आणि लालन सारंग यांच्यासमोर वाचन केले. त्या दोघांनाही ते नाटक अतिशय आवडले. ते दोघेही व्यावसायिक नाटय़निर्माते, परंतु त्यांनी या प्रायोगिक रंगभूमीच्या विषयाला व्यावसायिक रंगभूमीवर सादर करायचे ठरवले. त्यात लालन सारंग यांनी वार्ताहराची (रिपोर्टर) छोटीशी भूमिका असूनही करण्याचे ठरवले. हे कौतुकास्पद होते. ‘पोलिसनामा’ नाटकाच्या तालमी त्यांच्या घरीच व्हायच्या. त्यांनी ते व्यावसायिक रंगभूमीवर कलारंग संस्थेतर्फे उत्तमरीत्या सादर केले. लालनताई छबिलदासमध्येही प्रायोगिक नाटकाच्या तालमी बघायला यायच्या, कलाकारांचे कौतुक करायच्या, आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या. त्या एक जाणकार व्यक्ती होत्या. तसेच नाटकांची त्यांना उत्तम जाण होती. मी त्यांची काही नाटके पाहिली होती. त्यांनी ‘सखाराम बाइंडर’मधील चंपाची भूमिका उत्तम वठवली होती. आपण फार मोठय़ा अभिनेत्री आहोत असा आविर्भाव त्यांच्यात कधीच दिसला नाही. नाटकांच्या तालमीला आम्ही पाककृतींविषयीसुद्धा बोलायचो. त्यांच्याकडे सतत वेगळे काही करण्याची वृत्ती होती.