सहजपणे झटपट श्रीमंत होण्याच्या मानसिकतेमुळे मागील पाच वर्षांत वेगवेगळ्या १५ हून अधिक योजनांमध्ये गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपये गडप होऊनही आजतागायत ही प्रक्रिया थांबलेली नाही. उलट, गतवर्षी राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या केबीसी घोटाळ्यातील परदेशात पळालेला मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणने तर गुंतवणूकदारांना पैसे हवे असल्यास आधी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी खटपट चालविल्याचे उघड झाले. एकटय़ा नाशिकचा विचार केल्यास मागील पाच वर्षांत या स्वरूपाच्या योजनांमध्ये फसवणुकीचे १५ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. इमू पालन योजना, गोल्ड सुख योजना, विकल्प, रॅबिट, स्टार कन्सल्टन्टी सव्‍‌र्हिसेस आदी योजनांमध्ये सुमारे ५० कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. याच काळात केबीसी कंपनीने केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आपले हातपाय पसरले. विविध आमिषे दाखवत हजारो गुंतवणूकदारांना गंडा घातला. फसव्या योजनांमुळे अनेक जण अक्षरश: रस्त्यावर आले. काही वयोवृद्धांवर संपूर्ण पुंजी गमाविल्याने अक्षरश: भीक मागण्याची वेळ आली. कमी कालावधीत घसघशीत नफा मिळवून देण्याचे आमिष काहींच्या जिवावर बेतले. केबीसी घोटाळ्यानंतरही फसवणुकीचे सत्र थांबलेले नाही.