गेल्या काही दिवसांत साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञ तसेच अर्थशास्त्रज्ञ व स्वत: रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर देशातील वातावरणाच्या विरोधात आपला सूर मिळवू लागले आहेत. त्याने या देशात आता असहिष्णुतेचे मुर्दाड व रानटी वातावरण तयार होत आहे, ही भावना अधिकच अधोरेखित झाली आहे. गुळगुळीत बनत चाललेला, दुष्ट, क्रूरता हा स्वभावधर्म बनू पाहणाऱ्या व एखाद्या रोगाच्या साथीप्रमाणे समाजात पसरत चाललेल्या या राजकीय संकटाची चिंता हे विचारवंतांनी पुकारलेल्या अहिंसक आंदोलनाचे कारण आहे..

गेले काही दिवस साहित्यिक, कलावंतांच्या पुरस्कारवापसीने साऱ्या समाजात खळबळ माजली आहे. त्यावर जवळपास सर्वच नियतकालिके, टीव्ही चॅनेल्स व अन्य सार्वजनिक व्यासपीठांवरून जोरजोरात चर्चा सुरू आहेत. मी स्वत: या विषयावर अन्य ठिकाणी दोन स्वतंत्र लेख लिहिले असल्यामुळे पुन्हा लिहावे, असे माझ्या मनात नव्हते. परंतु गेल्या दोन-पाच दिवसांत साहित्यिक, कलावंतांच्या, फिल्म आणि दृश्य माध्यमांतील विचारवंतांच्या जोडीने समाजातील शास्त्रज्ञ वर्ग, विज्ञान व संशोधन अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ असे व तसेच अर्थशास्त्रज्ञ, आर्थिक संशोधन संस्था व स्वत: रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर आदी विविध क्षेत्रांतील अग्रणी देशातील वातावरणाच्या विरोधात आपला सूर मिळवू लागल्याने या देशात आता असहिष्णुतेचे मुर्दाड व रानटी वातावरण तयार होत आहे, ही भावना अधिकच अधोरेखित झाली आहे. ज्या गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स आदी वृत्तपत्रांत आपल्या बाजूने आलेल्या कोपऱ्यातील चतकोर बातमीचा फुगा उडवून तिचा वाटोळा चंद्र करणाऱ्यांना त्याच वृत्तपत्रात आपल्या असहिष्णू वृत्तीवर चाबकाचे फटके व तेही संपादकीय लेखनातून, ‘लीडर’ मजकुरातून येऊ लागल्याने धास्ती वाटू लागली आहे. अशा वेळी आत्मपरीक्षण तर सोडाच, परंतु धास्तीचे रूपांतर धमक्यांमध्ये- प्रत्येक विरोधी शब्दाला देशद्रोही ठरवण्याचे, विरोधाच्या उद्देशाबाबतच शंका घेण्याचे, आपण स्वत:च अशा असहिष्णुतेचे कसे बळी आहोत याचा कांगावा करण्याचे, नाटकी अभिनिवेशात विरोधकांना ‘पाकिस्तानी’ म्हणून अशा असहिष्णू वातावरणात नवा विखार ओतण्याचे व आज जाहीर होत असलेल्या बिहार निवडणुकीच्या निकालात अशा विखाराने कसा आपल्याला विजय मिळाला, हे दाखवून आपल्या वर्तनाला मिळालेला जणू हा सदाचाराचा दाखलाच आहे, हे मिरवण्याचे ज्या वेळी प्रयत्न होतात, तेव्हा अशा वर्तनाची परीक्षा करणे आपोआपच आवश्यक ठरते.
अमजद अली खाँपासून गुलजार, शाहरुख खानपर्यंत आणि शेकडो प्रतिभावंत साहित्यिक- कलावंतांपासून अन्य विचारवंतांपर्यंत जो जो प्रश्न विचारतो, विरोध करतो त्याच्या प्रामाणिकपणावर, चारित्र्यावर व हेतूबद्दल ज्या थिल्लरपणे आज विकासाच्या व खासगी विकासाच्या, मुक्त अर्थव्यवस्थेचे लाभ मिळालेल्या मध्यमवर्गाच्या, नवश्रीमंतांच्या, व्हॉट्सअ‍ॅप संदेशातून व सोशल मीडियाच्या पोस्टवरून जे विनोद(!) व टवाळकी सुरू आहे, ती पाहता, तसेच शासनाच्या पाठिंब्याने व पुढाकाराने विरोधकांचे खच्चीकरण करण्याचे बेशरम प्रयत्न पाहता, तसेच ‘गाईच्या हत्येसाठी देहदंडच योग्य’ अशी येणारी संघ, दल, सेना या सत्ताधारी पक्षाच्या पाकळ्यांची सनातनी विधाने पाहता साठीच्या दशकात सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ हाना आन्ट (ऌंल्लल्लंँ अ१ील्ल३ि) हिने लिहिलेल्या ‘आईश्मन इन जेरुसलेम’ या प्रसिद्ध पुस्तकाची मला आठवण होते. या पुस्तकात तिने ‘बनात इव्हिल’- दुष्टतेच्या एका गुळगुळीत (आणि बटबटीत) स्वरूपाविषयी आपले चिंतन मांडले आहे.
हिटलरच्या नाझी कारकीर्दीत सर्वसामान्य माणूस, खालच्या स्तरावर काम करणारा अधिकारी, शिक्षक किंवा अशीच साधीसुधी कामे करणारी माणसे- स्त्रिया व पुरुष इतके हिंसक, जात्यंध व अत्याचारी कसे बनले, हा प्रश्न तिच्या चिंतनाच्या गाभ्याशी आहे. निरपराध ज्यू स्त्री, पुरुष, मुले, मुली यांना यातना देत, छळछावणीत पाठवून त्यांचे हाल हाल करून, त्यांना बाजूला काढून, वेचून वेचून सर्वसामान्य जर्मन माणसाने कसे ठेचून काढले, कसे सहजच कालपर्यंत शेजारी म्हणून पिढय़ान्पिढय़ा राहणाऱ्या आपल्या शेजाऱ्याचे कुटुंब देशद्रोहाचा शिक्का मारून उद्ध्वस्त केले, त्यांची मालमत्ता कशी लुटली, त्यांना एकटे पाडून, एकटे गाठून कसे ठार केले, विद्वेष कसा पसरवला- व हे सारे सर्वसामान्य माणसांनी, कुटुंबवत्सल अधिकाऱ्यांनी, तळच्या माणसांनी, वरच्यांच्या हातात हात घालून कसे केले? तेही कित्येकदा तसा कोणताही सरकारी वा पक्षाचा लेखी आदेश नसताना! अशा क्रूरतेचा पश्चात्ताप तर सोडाच परंतु त्यात कर्तव्य पार पाडल्याचा, देश(व वर्ण)भक्ती केल्याचा, पुण्य काम केल्याचा आनंद बेधुंदपणे साजरा करण्याचे, मनोबल या सामान्यांना कुठून मिळाले? हे व असे अनेक प्रश्न हानाच्या चिंतनाचे विषय आहेत. सामान्यांच्या, अधिकाऱ्यांच्या व साऱ्या अवस्थेच्या सदसद्विवेकबुद्धी गहाण टाकून केलेल्या हिंसाचाराच्या क्रूरतेला परिमाण देताना तिने ही पूर्णत: नवी संकल्पना ‘बनालिटी ऑफ द इव्हिल’ मांडली आहे.
सर्वसामान्य पापभिरू माणसाला सहज खून करण्याची, जमावाने एकटय़ाला गाठून मारण्याची, छळछावणीची लावणी लिहिण्याची, देशाभिमानाच्या पोकळ वल्गना करीत ऊठसूट कोणा लेखक- पत्रकाराला गोळी घालण्याची वा डांबर फासण्याची ताकद येते कुठून, या प्रश्नापेक्षा अशा वर्तनाचे जाहीर समर्थन करण्याची, विचारवंतांच्या कृतीची जाहीर टवाळकी करण्याची वृत्ती, असा निर्लज्जपणा येतो कुठून, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. हानाची ‘दुष्टतेचा गुळगुळीतपणा’ ही संकल्पना अशा वेळी एक नवे भिंग आपल्याला पुरवते. आपले (क्रूर) कृत्य हे चुकीचे नसून आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे/ होता, अशी भावना युद्धानंतर झालेल्या नाझी अधिकाऱ्यांच्या खटल्यात दिसून आली.
ती म्हणते, जणू सारे काही एका नैसर्गिक नियमानेच घडत (घडविले) जात होते. या नियमाप्रमाणे ‘शुद्ध’ समाज घडवायचा होता. या (वर्ण)शुद्धीसाठी जे जे अशुद्ध ते ते नष्ट करायचे होते. हा नियम वा कायदा कोठे लिहिलेला नव्हता. फ्युरर- नेत्याची इच्छा (व आकांक्षा) म्हणजेच या नियमाची सिद्धता, अशी आकांक्षाच मग बनते सर्वसामान्य माणसाच्या अबोधाची महत्त्वाकांक्षा- अलिखित कायदा व त्याची पूर्तता म्हणजे आपल्या नेत्याची इच्छा असा साधा नियम सामान्यांनी सहज अंगीकारला होता. हिटलरच्या देशातील कायदा नकळत सामान्य माणसाचा विवेकाचा आवाज म्हणून, तुला त्याला मारायचे आहे, संपवायचे आहे, असेच मनावर बिंबवत गेला. अशा वेळी माणसाची विचार करण्याची, सारासार बुद्धी आपोआपच गळून पडत गेली. अविचार हाच धर्म झाला होता. ती पुढे म्हणते- अविचार ज्या वेळी व्यवस्था बनतो, अविचार हाच कृतीचा गाभा बनतो, किंवा जेव्हा कोणताही विचार, नैतिक प्रश्न बाजूला ठेवून हिंसा प्रकटते तेव्हा अशी गुळगुळीत- सहज केली जाणारी दुष्टता समाजात संहाराचे वादळ निर्माण करू शकते.
गुळगुळीत आणि बुळबुळीत, बटबटीत आणि सुळसुळीत दुष्टता विनाशाचा सर्वात प्रचंड आगडोंब बनू शकतो. अतिरेकी मुस्लीम धर्मवाद्यांची, आयसिससारख्या दहशतवादी संघटनांची क्रूरता ही अशी आहे आणि तिचेच दुसरे रूप आपल्याकडे जन्माला आले आहे काय, या प्रश्नाने पुरस्कार परत करणाऱ्या वा त्यांना समर्थन देणाऱ्या साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञ, विचारवंतांना चिंता वाटत आहे. याचा गंभीरपणा आपण समजून घ्यायला हवा.
बहुसंख्याकांचे ध्रुवीकरण करून- त्यांचे मत हेच बहुमत व म्हणून लोकमत आहे असे एक खुनशी राजकारण आज समाजात मान्यता पावत आहे. बिहार निवडणुकांच्या निमित्ताने गाईचे भूत उभे करून, पाकिस्तानची भाषा करून जे राजकारण करण्यात आले ते अशा ध्रुवीकरणाचा- मुसलमान समाजाला एकटे व वेगळे पाडण्याच्या राजकारणाचाच भाग होता. अशा राजकारणाच्या तोंडाशी हाना आन्ट म्हणते तसा बनाल दुष्टतेचा राक्षस बनलेला असतो. तर या राजकारणाच्या मुळाशी एका आत्मरत, आत्मप्रीतिग्रस्त, नार्सिसिस्ट समाजाची बीजे वाढत असतात. हॉनकिस व त्याच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या ‘व्हाय इट इज ऑल्वेज अबाऊट यू’ या पुस्तकात अशा आत्मरत माणसाच्या लक्षणाची एक जंत्रीच दिली आहे. अशी माणसे स्वत:ला ‘उच्च’ व ‘परिपूर्ण’ समजतात. स्वत:चा कमीपणा झाकणे हेच त्यांच्या स्वत:ला ‘प्रोजेक्ट’ करण्याचे कारण असते, उद्धटपणा हा या माणसांचा वा त्यांच्या गटाचा, पक्षाचा स्थायिभाव असतो, द्वेष व ईष्र्या हे त्यांच्या (राष्ट्र) प्रेमाचे गृहीतक असते. अशा माणसांची स्वत:ला विशेष समजण्याच्या वृत्तीमुळे इतरांकडून आपल्याला हवे तसे व तितके मिळवण्याची अपेक्षा असते, ही अपेक्षा जे पूर्ण करीत नाहीत ते त्यांच्या लेखी ‘अवघड’, ‘विचित्र’ किंवा ‘अप्रासंगिक’ व म्हणून गुन्हेगार ठरतात. आपल्याला हवे तेच लिहिले, बोलले जावे, तसे केले नाही तर त्याला हद्दपार करा (पाकिस्तानात पाठवा) वा वाळीत टाका अशी त्यांची वृत्ती असते. दुसऱ्याच्या मनाला, विचाराला वा भावनेला त्यांच्या लेखी किंमत शून्य असते. म्हणून पिळणे व सर्व पातळीवर पिळून काढणे हेच त्यांचे राजकारण असते. अशा आत्ममग्न समाजाला सीमारेषा माहिती नसते. आक्रमक व दुसऱ्याच्या अवकाशावर स्वामित्व मिळवण्याची त्यांची धडपड असते, त्यांना स्वत:च्या सामर्थ्यांचा अतिशयोक्तीपूर्ण फुगा उडवायला आवडतो..
‘एफटीआयआय’च्या संचालक मंडळावर नेमलेल्या माणसांची कुवत व मर्यादा माहिती असूनही त्यांना विरोध झाल्यावर आपले निर्णय रेटण्याची दांडगाई कुठून येते, याविरुद्ध बोलणाऱ्या तरुणाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे ठरवले जाते, अमजद अली खाँसारख्या माणसाला सरोद गुदमरल्याचा भास का होतो, दलित मुस्लिमांना मुक्त लिहिण्यास विरोध का होतो, कोण कोणाला पोकळ राष्ट्राभिमानाच्या थिल्लर गर्जना करून डांबर फासते, गाई-म्हशींची वाहतूक करणाऱ्या, गोमांस खाल्ल्याची शंका आल्यामुळे कोण कोणाचा गळा आवळते, छातीत सुरा भोसकते आणि अशा उडवलेल्या कत्तलीचा आनंद घेण्याची, त्याचे समर्थन करण्याची विकृती या समाजात कशी तयार होते? यांसारख्या शेकडो घटनांची पाळेमुळे एका भयंकर, आत्मप्रीतिग्रस्त, निर्लज्ज व रोगट विचाराने भारलेल्या संघटना व त्यांचे कार्यक्रम यांच्या मातीतूनच वाढली नाहीत काय?
डाव्या विचारांचे प्रख्यात मानसतत्त्वज्ञ जॅक्स लांका यांच्या अतिरिक्त व्यक्तिवादाच्या कल्पनेत एक रोगट व अमानुष आत्मप्रीतिवाद अभिप्रेत आहे. असा आत्मरत समाज ही प्रबळांच्या हिताचे संवर्धन करणाऱ्या अतिमुक्त भांडवलशाहीची आवश्यकता आहे. रस्र््र’ ८४१२ी’ऋ किंवा ढंेस्र्ी१ ८४१२ी’ऋ – स्वत:ला बिघडवा, स्वत:च स्वत:चे लाड करा, हे या व्यवस्थेच्या विक्री विभागाचे घोषवाक्य आहे. हे घोषवाक्य समाजाच्या तळागाळापर्यंत असे काही भिनले आहे की, जणू ती आपली जीवनपद्धतीच बनली आहे. आत्मरततेचे, स्वत:चे लाड पुरविण्याचे, चोचले आणि इच्छांचे अतिरिक्त कल्पनाविश्व उभे करण्याचे काम हीच जणू आता आपली तात्त्विक गरज बनली आहे. लाड हेच तत्त्वज्ञान, चोचले ही जीवनशैली आणि स्खलन हा समाजधर्म अशी या मुक्त अर्थव्यवस्थेच्या मुरलेल्या मद्याची परिणती आहे. झिंगलेला समाज- झिंगालाला- झिंगा डाला समाज ही या भांडवली अर्थव्यवस्थेने आत्ममग्न, आत्मप्रीतीत डुंबलेल्या संस्कृतीला दिलेली संगीत परवाना पावती आहे.
स्वत:च्या प्रतिमेची नशा चढलेला, आत्मप्रौढी मिरवणारा नार्सिसिस्ट समाज वा व्यक्ती त्याला हवे ते मिळवण्यास गुन्हेगार तर बनतोच, परंतु विकृत व हिंसक बनतो. अशा हिंसेचे समर्थन करू लागतो. हुकूमशाही व्यवस्थेचा दलाल बनतो. त्याची ही दलाली म्हणजेच हाना आन्टची बनालिटी ऑफ द इव्हिल.
गुळगुळीत बनत चाललेल्या व दुष्ट क्रूरता हा स्वभावधर्म बनू पाहणाऱ्या व एखाद्या रोगाच्या साथीप्रमाणे समाजात पसरत चाललेल्या या राजकीय संकटाची चिंता हे विचारवंतांनी पुकारलेल्या अहिंसक- गांधीमार्गी आंदोलनाचे कारण आहे. हा मार्ग नैतिक निवडीसाठी, विचार करण्यासाठी, बंद केलेली दारे उघडण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. एखाद्या घटनेचा वा घटनांचा विरोध एवढाच त्याचा मर्यादित हेतू नाही, तर इतिहासाच्या मागोव्यातून आलेल्या जाणिवेतून पुढे येऊ पाहत असलेल्या दुष्ट स्वप्नाच्या काळजीतून, सर्जनशील मनाच्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. बटबटीतपणा हा कलावंताचा मोठा शत्रू असतो. गुळगुळीतपणा हा निबरपणाकडे नेणारा मार्ग असतो. वाढलेला उथळ बटबटीतपणा आणि नकळत आलेली गुळगुळीत दुष्टता याची सतत वाढणारी भीती व तिची उंच सावली याचे प्रतिबिंब या विचारी व सर्जनशील मनांना वाढणाऱ्या अहिष्णुतेत जाणवले, ते त्यांनी व्यक्त केले, लोकशाही मार्गाने मांडले, तर त्यांच्याच अंगावर धावून जाण्याचा सरकारी उद्दामपणा कोणत्या न्यायाचा?

लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि
नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल:
sanjeev.khandekar@gmail.com