अजित नरदे

तणनाशक म्हणून शेतीत वापरल्या जाणाऱ्या ‘ग्लायफॉसेट’च्या दुष्परिणामांची चर्चा गेला सुमारे महिनाभर सुरू राहिली आणि भारतात तर, या तणनाशकावर बंदीची प्रक्रियाही सुरू झाली. ही संभाव्य बंदी अनाठायी आहे आणि उपलब्ध रासायनिक तणनाशकांपैकी ग्लायफॉसेट हेच अधिक पर्यावरणस्नेही आहे, अशी बाजू मांडणारे टिपण..

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

अमेरिकेत ग्लायफॉसेट तणनाशकांमुळे कॅन्सर झाल्याच्या संशयाने एका शाळेच्या बागकाम-कर्मचाऱ्याला मोठी नुकसानभरपाई देण्याचा निकाल एका कनिष्ठ न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी दिला. यामुळे जगभर खळबळ झाली. जीएम आणि ग्लायफॉसेट विरोधकांनी जगभर ग्लायफॉसेट बंदीची मागणी सुरू केली. याचे प्रतिसाद महाराष्ट्रातही उमटले. जीएम तंत्रज्ञानासंबंधी आकस असलेल्या सरकारने ताबडतोब ग्लायफॉसेट बंदीसाठी पावले उचलली. बंदीची प्रक्रिया सुरू झाली. ‘बंदी का घालू नये, कारणे सांगा,’ अशा नोटिसा ग्लायफॉसेट उत्पादक कंपन्यांना गेल्या. ताबडतोब सुनावणी झाली. आता केव्हाही बंदीसंबंधी निर्णय होणे अपेक्षित आहे. बंदीचा आदेश अभेद्य चिरेबंदी असावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणून सावधतेने निर्णय घेतले जात आहेत. अशा वेळी पर्यावरणस्नेही तणनाशक ग्लायफॉसेटचे स्वरूप घेणे उचित ठरेल.

मुळात तणनाशकांची आवश्यकता आहे का, हे पाहू. पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओल झाली की गावात सर्वत्र एकाच वेळी पेरणी होते. पिकांची, तणांची उगवण एकाच वेळी होते. पिकातील तण काढण्याच्या दोन पद्धती आहेत. एक- फणकुळव पिकाच्या ओळीत अंतर मशागत करणे. तरीही पिकाजवळील तण शिल्लक राहते. ते हातानेच काढावे लागते. दुसरा मार्ग- खुरपणी करून तण काढणे; पण परिसरात एकाच वेळी तण काढायचे काम येत असल्याने पुरेसे मजूर मिळत नाहीत. तसेच आता स्त्रिया घराबाहेर कामावर जात नाहीत. यामुळे वेळेत तण काढले जात नाहीत. तण वाढतात. त्यांच्या बिया रानात पडतात. त्यामुळे पुन्हा तण वाढतात. तण पिकाचे पाणी आणि अन्न घेतात. पिकांची उपासमार होते. तणांमध्ये कीड वाढते. ती पिकावर येते. त्यामुळे पिकाचे नुकसान होते. त्यासाठी कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढतो.

एकूण तणनाशक वापरले नाही तर मानवी श्रमाने खुरपणीचा खर्च खूप वाढतो. बहुतेक शेतकऱ्यांना मजुरांअभावी वेळेत तण काढता न आल्याने खूप नुकसान होते. म्हणून आता तणनाशक वापरणे अपरिहार्य झाले आहे. ग्लायफॉसेटवर बंदी आलीच तर शेतकऱ्यांना इतर तणनाशकांचा वापर करावा लागेल. मात्र इतर सर्व तणनाशके ग्लायफॉसेटच्या तुलनेने पर्यावरण, आरोग्य, माती आणि पाणी यांच्या दृष्टीने जादा अपायकारक आहेत. हे खरे असेल तर ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याची घाई का? ग्लायफॉसेट बंदीचा निर्णय पर्यावरणासाठी उपयुक्त आहे काय?

शेतामध्ये उगवणीपूर्व आणि उगवणीनंतर वेगवेगळी तणनाशके वापरली जातात. प्रत्येक तणनाशकाची वनस्पती मारण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही निवडक वनस्पतींसाठी तणनाशक असतात, पण इतर वनस्पतींना मारत नाहीत, तर काही तणनाशक सरसकट सर्व वनस्पतींना मारतात; पण यामध्ये ग्लायफॉसेटइतके प्रभावी आणि कमी विषारी दुसरे तणनाशक नाही. पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने विविध पद्धतींचा वापर करून, तणनियंत्रण करण्याचे सर्व मार्ग शेतकऱ्यांना उपलब्ध असणे आवश्यक आहे. तरीही यापैकी सर्वात सुरक्षित, प्रभावी आणि स्वस्त तणनाशकावर बंदी घालून शेतकरी आणि पर्यावरणाचे नुकसान होणार आहे.

ग्लायफॉसेटवर बंदी घातल्यानंतर जी तणनाशके वापरली जातील, ती किती विषारी आहेत ते पाहा. ज्या प्रमाणात प्राण्यांना तणनाशकांचे डोस दिल्यानंतर कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत त्या प्रमाणाला नोइल (NOEL- No Observable Effect Level, that is the close at which exposure in an animal study had no effect) असे म्हणतात.

तणनाशकांचे नाव आणि नोइल (मिलिग्रॅम/ किलो/ दिवस) पुढीलप्रमाणे-

(१) फ्लुथीयासेट मिथेल (Fluthiacent -methyl) – ०.१

(२) पॅराक्वेट (Paraquat) – १.२५

(३) डायक्वेट (Diquat) – ०.२२

(४) ग्लुफॉसीनेट (Glufosinate) – २.०

(५) अ‍ॅलट्राझीन (Atrazine) – १.८

उंदीर, कुत्रे, मांजर आणि ससे यांच्यावर ग्लायफॉसेटच्या परिणामांचा दोन वर्षांचा अभ्यास झाला आहे. अपवाद वगळता कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. उदा. उंदरांना ४०० मिलिग्रॅम/ किलो/ दिवस एवढा ग्लायफॉसेटचा डोस दिला, तरीही कोणतेही वाईट परिणाम दिसले नाही. तसेच कुत्र्यांसाठी ५०० मिलिग्रॅम/ किलो/ दिवस असा डोस दिला, तरीही कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. फ्लुथियासेट मिथेलइतका विषारी परिणाम प्राप्त करण्यासाठी ग्लायफॉसेटचा डोस ४००० पटीने जादा द्यावा लागेल, तर अ‍ॅलट्राझिनइतका विषारी परिणाम येण्यासाठी ग्लायफॉसेटचा डोस २२२ पटीने जादा द्यावा लागेल. यावरून अन्य तणनाशकांच्या तुलनेने ग्लायफॉसेट हे खूप कमी विषारी आहे हे स्पष्ट होते. ग्लायफॉसेटवर बंदी आल्यास इतर अधिक विषारी तणनाशकांचा वापर करावा लागेल.

‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखातील अ‍ॅण्ड्रय़ू निस (Andrew Knis : Nature Communications volume 8, Article number: 14865 (2017)) यांचे निरीक्षण असे होते की, २०१४-१५ सालातील अभ्यासात मिळालेल्या माहितीनुसार, ग्लायफॉसेटचा वापर मक्यात २६ टक्के, सोयाबीनमध्ये ४३ टक्के, कपाशीत ४५ टक्के इतका होतो. तथापि ग्लायफॉसेट कमी विषारी असल्याने या पिकातील विषारीपणात त्याचा वाटा अनुक्रमे ०.१, ०.३ आणि ३.५ टक्के इतकाच होतो.

मक्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तणनाशकात ग्लायफॉसेटचे वजन एकचतुर्थाश असले तरीही तणनाशकांमुळे येणाऱ्या विषारीपणात त्याचा वाटा एक टक्क्याच्या एक दशांश इतका कमी आहे. हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, वजनाने तीनचतुर्थाश असलेल्या इतर तणनाशकांमुळे ९९.९ टक्के इतका वाटा तणनियंत्रणामुळे येणाऱ्या विषारीपणात येतो. ही सर्व तणनाशके तुलनेने सुरक्षितच आहेत. त्यातदेखील ग्लायफॉसेट हे सर्वाधिक सुरक्षित आहे. जर ग्लायफॉसेटवर बंदी आणली तर अन्य अधिक विषारी तणनाशकांचा वापर करावा लागेल. त्यामुळे तणनाशकांमुळे येणाऱ्या विषारीपणात मक्यात २६ टक्के, सोयाबीनमध्ये ४३ टक्के आणि कपाशीत ४५ टक्के इतकी वाढ होईल.

वरील सर्व तणनाशके योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापरली तर सुरक्षितच आहेत; परंतु त्यातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या तणनाशकावर बंदी आणण्यासाठी तथाकथित पर्यावरणवादी इतके आतुर का? ग्लायफॉसेटच्या तुलनेने पॅराक्वेटचा आरोग्याला जास्त अपाय होऊ शकतो; पण ते पॅराक्वेटच्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगत नाहीत. पण ग्लायफॉसेटच्या आरोग्यावर होणाऱ्या तथाकथित अनिष्ट परिणामांबद्दल आकांडतांडव करतात. वास्तविक पर्यावरणवाद्यांनी सर्वाधिक विषारी तणनाशकांविरुद्ध मोहीम सुरू करणे उचित होते; पण त्याऐवजी सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित तणनाशकाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. याचे कारण काय? पर्यावरणवाद्यांचा खरा हेतू काय आहे?

त्यांचा खरा विरोध जीएम तंत्रज्ञानाला आहे. जीएम तंत्रज्ञानाच्या विरोधात खूप मोठी विषारी मोहीम चालवूनही मोठय़ा प्रमाणात त्याचा प्रसार होतो आहे. जीएम तंत्रज्ञानात ग्लायफॉसेट सहन करणाऱ्या जनुकांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो आहे. जीएम अन्नाच्या विरोधातील त्यांच्या प्रचारातील खोटेपणा उघडकीस आला आहे. सध्या जीएम बियाणामध्ये ६० टक्के बियाणे तणनाशक सहनशील जनुकाचे आहे. जर ग्लायफॉसेटला बंदी घातली तर त्याचा परिणाम ६० टक्के जीएम बियाणावर होतो. म्हणून त्याचा प्रयत्न ग्लायफॉसेट बंदीसाठीच आहे.

जीएम बियाणामुळे कपाशीत प्रतिक्विंटल कापूस उत्पादनामागे ८० टक्के कीटकनाशकांचा खप कमी झाला. तणनाशक सहनशील बियाणामुळे तणनाशकांचा वापर कमी झाला. ग्लायफॉसेट पेटंटची मुदत संपलेले, जेनेरिक, सर्वात स्वस्त, पर्यावरणस्नेही, जमीन आणि पाणी यांचे प्रदूषण कमीत कमी करणारे आहे. पर्यावरणवाद्यांच्या या प्रयत्नामुळे, कीटकनाशक उत्पादक आणि अन्य जादा विषारी तणनाशक उत्पादकांचा फायदा होणार हे निश्चित आहे. शेतकरी आणि ग्राहक यांचे नुकसानसुद्धा निश्चित आहे. इथे असे दिसते की, पर्यावरणवाद्यांच्या मागणीमुळेच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

लेखक जनुकीय शेती-तंत्रज्ञानाचे अभ्यासक व समर्थक आहेत. narde.ajit@gmail.com