14 August 2020

News Flash

आठवडय़ाची शाळा : ठेंगण्या शाळेला उंच ताठ कणा मिळतो तेव्हा..

गावातील विद्यार्थी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर शहरी स्पर्धा आणि संस्कारात टिकला पाहिजे,

कल्याण तालुक्यातील भोपर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचे म्हणजे छताचा पत्रा किंवा वाशाचे लाकूड यापैकी एकाने तरी डोक्याला दुखापत ठरलेली, इतकी ही ठेंगणी शाळा. डोंबिवलीपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वसलेली. शाळेला संरक्षक भिंत नव्हती. बंद वर्ग आणि मोकळा व्हरांडा. या व्हरांडय़ात रात्रीच्या वेळेत काही समाजकंटक येऊन मद्यपान करीत असतं. पण, शाळेत विजय डेरे या शिक्षकाने ‘डेरा’ जमवला आणि संपूर्ण चित्रच बदलले.

सरस्वतीच्या मंदिरात आणि दारात सुरू असलेले गैरप्रकार थांबविण्याकरिता विजय डेरे यांनी सर्वप्रथम ग्रामस्थांना विश्वासात घेतले. लोकसहभागातून त्यांनी पहिल्यांदा शाळेची डागडुजी करून घेतली. ठेंगण्या शाळेला उंची मिळाली. शाळेच्या व्हरांडय़ाला जाळ्या बसवून घेतल्या. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला शाळा हे आपले घर वाटले पाहिजे म्हणून या भावनेतून शाळेचे रंगरूप बदलण्यास सुरुवात केली.

भोपर शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत फक्त १५ ते २० विद्यार्थी असायचे. हा पट आता ५०च्या पुढे गेला आहे. शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. ‘चुका आणि शिका’ हे ब्रीदवाक्य असलेली ही शाळा आज दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून पंचक्रोशीत ओळखली जात आहे.

गावातील विद्यार्थी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर शहरी स्पर्धा आणि संस्कारात टिकला पाहिजे, अशा पद्धतीने भोपर शाळेतील विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे, असे डेरे गुरुजींनी सुरुवातीलाच मनाशी पक्के ठरविले होते. पहिल्यांदा त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटून दिले. त्यासाठी आधी स्वत: हातात झाडू घेऊन शाळा स्वच्छ करण्यास त्यांनी सुरुवात केली. आता गुरुजी शाळेत येण्यापूर्वी स्वच्छता, वर्गातील खुच्र्या, टेबल योग्य रीतीने लावून ठेवलेले दिसतात. आतापर्यंत उनाडक्या करणारी मुले घरी जाऊन शिस्तीत अभ्यास करू लागली. हा बदल पालकांना दिसू लागला. त्यांनीही शाळेच्या विकासासाठी हातभार लावण्यास सुरुवात केली.

नवे रूप

पहिल्यांदा शाळेविषयी आस्था नसल्याने बहुतांश ग्रामस्थ आपली मुले आजूबाजूच्या इंग्रजी शाळांमध्ये टाकत होते. गरजू, गरीब घरांमधील मुले जिल्हा परिषद शाळेत येत होती. त्यामुळे शाळेचा पट १५च्या वर जात नव्हता. डेरे गुरुजींनी भोपर गावात घरोघरी जाऊन गावातील शाळेचे महत्त्व, तेथील अध्ययन पद्धतीत केलेला आमूलाग्र बदल, येत्या काळात शाळेचे रंगरूप बदलण्यासाठी करीत असलेले प्रयत्न याची माहिती ग्रामस्थांना देण्यास सुरुवात केली. गुरुजींच्या या प्रयत्नांना फळ येत गावकऱ्यांनीही लोकवर्गणी काढून शाळेला सढळ हस्ते मदत करण्यास सुरुवात केली. शाळेचे जुनाट रंगरूप बदलण्यात आले आहे. वर्गामध्ये लाद्या, भिंतींना वर्षांनुवर्षे रंग नव्हता. तो लावून घेण्यात आला. मध्यान्ह भोजनासाठी खोली, स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली.

भोपर शाळेत विद्यार्थी संख्या ५४. गुरुजी एक. त्यामुळे गुरुजींची पाच वर्ग सांभाळताना कसरत होते. शाळा सोडून गुरुजींना अन्य शाळेत, परिसरात जावयाचे असेल तर फक्त विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर न येण्याची सूचना केली जाते. कोणीही शाळेत आल्यास निरोप घेण्याची, त्यांचा नाव पत्ता लिहून ठेवण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुजी शालेय कामासाठी बाहेर असले तरी विद्यार्थी योग्य रीतीने शाळा चालवतात.

शालेय साहित्याची निर्मिती

अभ्यासक्रमातील संकल्पना वस्तू, गोष्टी, चित्ररूपाने विद्यार्थ्यांना सहज समजतात. म्हणून ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा अवलंब करून शाळेत शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले आहे. गणित, विज्ञान, भाषा यांच्यासाठी प्लास्टिक पुठ्ठय़ाच्या माध्यमातून शाळेत कायमस्वरूपी टिकेल अशी शालेय साहित्य तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांनुसार त्यांचे पाच ते सहा असे गट तयार केले जातात. त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल अशा पद्धतीने गट समूहाने विद्यार्थ्यांना शिकवले जाते. वर्गात दोन वेळा शिकवूनही ज्या विद्यार्थ्यांना एखादा विषय समजत नाही त्याला चित्र, वस्तू रूपाने दाखविलेल्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून तो विषय समजून घेण्यास मदत होते.  प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता, त्याची आकलनशक्ती, कल्पकता वाढावी यादृष्टीने शाळा प्रयत्नशील आहे. शैक्षणिक उपक्रमात सहभागी झालेला कोणी विद्यार्थी चुकला तर त्याला सतत चूक दुरुस्त करून पुढे काय करायचे हे शिकवले जाते. मुले चुका करत करत शिकतात.

हायटेक शाळा

शाळेत इंटरनेट, वायफाय सुविधा, स्मार्ट दूरचित्रवाणी संच आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्ररूपाने पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम, झाड लावण्याचे महत्त्व, पशुपक्ष्यांचे संवर्धन याची माहिती दिली जाते. अभ्यासाबरोबरच विद्यार्थी गायन, वक्तृत्व, चित्रकला, क्रीडा स्पर्धामध्ये यश मिळवू लागले आहेत. पर्जन्य जल संवर्धनाचा उपक्रम शाळेने यशस्वी केला आहे. हरित ऊर्जेचा वापर करणारी भोपर ही पहिली शाळा आहे. उत्कृष्ट लोकसहभागासाठी शाळेला शिक्षण विभागाचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळण्यातही शाळेचा मोलाचा वाटा आहे. शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी बोधप्रद ठरतील असे तक्ते लावायचे काम प्रस्तावित आहे. ठेंगणे छत आणि भिंतींच्या या शाळेला गेल्या वर्षांत असा शैक्षणिक गुणवत्तेचा ताठ कणा मिळाला आहे. शाळेने दाखविलेल्या प्रगतीमुळे बहुतांश गावकरी आपल्या मुलांना भोपरच्या शाळेत दाखल करीत आहेत. त्यामुळे शाळेची उंची दिवसेंदिवस वाढतेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2016 2:11 am

Web Title: hi tech bhopar school of kalyan district council
Next Stories
1 औषधांची उपलब्धता आणि आपण
2 ‘अभेद्य दगडी भिंती’चा प्रयत्न थांबवावा
3 ‘शिक्षण-तोड’ रोखण्यासाठी..
Just Now!
X