|| मुकुंद संगोराम

वाजिदअली शाहची सिंधुभैरवीतली बंदिश ‘सैगलने गायली’ म्हणून गाजवणारे सिनेसंगीत १९५०च्या दशकात आणखीच बहरले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापेक्षा निराळे होऊ लागले. या स्वातंत्र्योत्तर संधिकाळातही अभिरुची टिकवण्याचे आव्हान कलावंतांनी समर्थपणे पेलले. परंपरा टिकलीच, पण नवनिर्मितीही झाली…

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘बरसात में हमसे मिले तुम’ किंवा ‘हवा में उडता जाए, मोरा लाल दुपट्टा मलमल का’ या राज कपूरच्या ‘बरसात’ या चित्रपटातील गीतांनी १९५०चे दशक दणाणून सोडले होते. स्वातंत्र्यानंतर दोनच वर्षांनी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गीतांनी आधीच्या सगळ्या लोकप्रियतेचे उच्चांक मोडीत काढले. हा चमत्कार स्वररचनेचा म्हणजे चालीचा होताच, परंतु त्याबरोबरच्या वाद्यमेळाचाही होता. संगीताच्या क्षेत्रात नव्याने आलेल्या या रचनांनी कलावंत आणि श्रोते या दोघांसमोरही नवे आव्हान उभे के ले होते! खरे तर नभोवाणी हे माध्यम तेव्हा रुजू लागले होते, दरबारांतील राजगायक हे पद लुप्त झाले तरी धनिकांच्या घरी संगीताच्या मैफली झडू लागल्या होत्या. देशभरात संगीत परिषदा म्हणजेच महोत्सवांचेही आयोजन होऊ  लागले होते. संगीताच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाला भरभरून प्रतिसाद मिळू लागला होता. स्वातंत्र्याच्या पहाटे स्वरांच्या जगात जी उलथापालथ होत होती, ती वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचे पर्याय असल्यामुळे निर्माण झालेल्या नव्या अभिरुचीच्या नांदीची. आकाशवाणीवरून ऐकता येणारे, चित्रपटातून पोहोचणारे, छोटेखानी मैफलीत उमटणारे, मोठ्या महोत्सवातून व्यक्त होणारे, अशा संगीताच्याही नाना तऱ्हा उपलब्ध होत्या. आपापल्या मगदुराप्रमाणे ज्याचे त्याचे संगीत सहजपणे ऐकण्याची ही सोय कलावंतांसाठी मात्र आव्हानात्मकच होती. हे आव्हान तेव्हाच्या बहुतेक कलावंतांनी अतिशय समर्थपणे पेलले, म्हणून तर आजही संगीताची ही पालखी दिवसेंदिवस अधिक समृद्ध होताना दिसते आहे. अभिजात संगीताला ललितसुंदर साज चढवून तो नाट्यसंगीतात आणणाऱ्यांनी, रसिकांसाठी जी क्रांती केली तीच अधिक व्यापक पातळीवर स्वातंत्र्यामुळे होणे आवश्यक होते. हवे ते आणि आवडेल ते संगीत श्रोत्यांना ऐकण्याची सुविधा हे या संगीत मुक्तीच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. आजच्या युवकांना याची कल्पनाही करता येणार नाही की, एके  काळी संगीत ही काही मूठभरांचीच ‘मालमत्ता’ होती आणि ती आजच्यासारख्या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या अनेक मंचांवर कु णाच्याही आवाक्यातील कला नव्हती. या नव्या तंत्रावस्थेतील संगीताची आव्हानेही निराळी आणि त्याचे निकषही निराळे.

‘आलम आरा’ या स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजे १९३१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या बोलपटापाठोपाठ मराठीत पुढच्याच वर्षी ‘प्रभात’च्या ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटाने संगीताला मिळालेल्या नव्या रंगांत पुढील दोन दशकांत अनेक इंद्रधनुषी रंग मिसळू लागले. या दोन्ही चित्रपटांत गीतांची संख्या भरपूर म्हणावी एवढी होती. ती गीते अभिजात संगीतावरच आधारलेली होती. ‘अयोध्येचा राजा’चे नायक होते प्रसिद्ध हार्मोनिअमवादक गोविंदराव टेंबे. या काळापासूनच संगीत अनेक प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊ लागले होते. त्याचा परिणाम संगीताच्या आवडीनिवडीवरही होणे ही स्वाभाविक घटना होती. हे बदल समजावून घेणे, ही खरे तर कलावंतांची गरज होती. त्या स्थितीत परंपरागत असलेल्या घराण्यांचा अतिरेकी डामडौल डळमळीत होत होता, कारण मोठ्या प्रमाणात आयोजित होऊ  लागलेल्या संगीत महोत्सवात सगळ्याच घराण्याच्या कलावंतांना संधी मिळत असे. त्यामुळे एकमेकांचे संगीत ऐकण्याची संधीही उपलब्ध होऊ  लागली होती. श्रोत्यांसाठी हा घराण्यांच्या परंपरांचा ‘कोलाज’ होता. त्यांच्यापुढे अनेक शैलींचे पर्याय उभे होते. स्वातंत्र्याची पहाट होता होता, संगीताने पुन्हा एकदा चहूबाजूंनी उभारी धरली आणि अनेक नवनवोन्मेषी प्रयोगांना उधाण येत गेले.

भारतीय आसमंतात संगीताला बरे दिवस येतील किंवा नाही, या काळजीने जे कलावंत फाळणीनंतर पाकिस्तानात गेले, त्यापैकी काहींची तेथे घुसमट होऊ  लागली. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद बड़े गुलाम अली खाँ हे त्यापैकी एक. त्यांच्या पाकिस्तानातील कै सर या मूळ गावी ते गेले खरे, परंतु दहाच वर्षांत त्यांनी कायमचे भारतात येण्याचे ठरवले. कलेच्या क्षेत्रात फक्त स्वरांचा धर्म असतो. हिंदूंच्या देवळात रममाण झालेले हिंदुस्तानी अभिजात संगीत राजवाड्यांतून मैफलीत आणि तिथून थेट मोठ्या संगीत परिषदांमध्ये अवतरले. याच काळात झालेल्या राजकीय आक्रमणामुळे त्यात होत गेलेले बदल हिंदू आणि मुस्लीम कलावंतांनी स्वीकारले आणि संगीताचा अवकाश समृद्ध होत गेला. स्वातंत्र्य मिळता मिळता, संगीतालाही कात टाकून नव्या उभारीने टवटवीत होण्याची आवश्यकता भासू लागली. कलात्मकता आणि सर्जनाचे भान असलेल्या अनेक दिग्गज कलावंतांनी प्रचंड काबाडकष्ट करून ही टवटवी टिकवली, हे महत्त्वाचे.

बदलती अभिरुची हे तेव्हाच्या सगळ्याच संगीतकारांपुढे उभे ठाकलेले सर्वात मोठे आव्हान! त्या काळाच्या मानाने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या संगीत महोत्सवामुळे कलावंतांना रसिकांच्या आवडीकडे लक्ष देणे भाग पडू लागले. दरबारातील इन्यागिन्या रसिकांना, त्यातही मुख्यत: राजांना खूश करणे वेगळे आणि एकाच वेळी मोठ्या संख्येने समोर असलेल्या श्रोतृसमुदायाला आपल्या कलेने पकडून ठेवणे वेगळे. त्यासाठी, रसिकतेचा लघुतम साधारण विभाज्य शोधणे ही त्यांची गरज होती, परंतु त्या कलावंतांना परंपरेतून आलेल्या कलात्मकतेचे भानही होते. टाळ्या मिळतात, म्हणून वाटेल ते करण्यास ते तयार नव्हते, याचे कारण अभिजाततेची पातळी खालावू देण्याची त्यांची तयारी नव्हती. घराण्यांचा सार्थ अभिमान बाळगूनही अन्य कलावंतांना कोणत्या कारणामुळे दाद मिळते, याचा अभ्यास त्या काळातील सगळ्याच कलावंतांना करणे भाग होते. अभिजाततेशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता जास्तीत जास्त रसिकांना आपली कला आवडली पाहिजे, यासाठी सगळेच कलावंत प्रयत्नशील होते. त्यासाठी परंपरेतून आलेल्या साचेबंदपणाला मुरड घालतानाही कलात्मकतेचे भान सुटू न देणे ही मोठी सर्क सच होती. केवळ आलापी, तान क्रिया, लयीशी खेळ, तालाशी गुद्दागुद्दी यांसारख्या कसरतीच्या खेळापलीकडे जाण्यासाठी सगळे जण बौद्धिक मसलत करीत होते. त्यामुळे संगीताला अनेक दिशांनी धुमारे फु टत असतानाही भारतीय अभिजात संगीताने आपले वेगळेपण टिकवून ठेवले. याचे मुख्य कारण कलावंतांकडे असलेली प्रज्ञा, नवे प्रयोग करण्याची हिंमत आणि त्यासाठी वाटेल ते कलात्मक कष्ट घेण्याची तयारी. प्रबंध गायकीपासून ख्याल गायकीपर्यंतच्या संगीताच्या अव्याहत प्रवाहात जे बदल घडत गेले, त्यामागे काळानुरूप बदलत जाणारी रुची हे अत्यंत महत्त्वाचे कारण.  ख्याल गायकी लोकप्रिय होत असतानाच्या काळात सदारंग आणि अदारंग या ध्रुपदियांनी रचलेल्या अनेक बंदिशी आज इतक्या शतकांनंतरही टिकून राहिल्या, याचे कारण त्यातील अभिजात स्वरलालित्य. शब्दांच्या पलीकडे जाऊ न स्वररचनेचे सौष्ठव वाढवणाऱ्या या बंदिशी कु णाही कलावंतासाठी सतत सर्जनाचे आव्हान देणाऱ्या ठरल्या आहेत. गाऊन गाऊन गुळगुळीत होण्याऐवजी त्या अधिकाधिक रसपूर्ण होत गेल्या. प्रत्येक कलावंताला त्यामध्ये स्वत:ची भर घालण्याची सर्जक शक्यता त्या बंदिशींच्या स्वररचनेत आणि बांधणीतच असल्याने हे घडू शकले. त्यामुळे ख्याल संगीत अधिक आवडीने ऐकले जाऊ  लागले. तरीही काळानुरूप ख्याल संगीतातही हळूहळू बदल होत राहिले, जे अजूनही होत आहेत. पन्नासच्या दशकातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भवतालात जी प्रचंड उलथापालथ घडत होती, ती बदलू लागलेल्या अभिरुचीसाठी कारणीभूत होती.

राष्ट्र म्हणून संपूर्णपणे नव्याने घडी बसवताना परंपरांचे भान ठेवणे, त्यांच्या विकासाला वाव मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करणे, त्या व्यवस्थांना स्थैर्य लाभेल यासाठी योजना करणे, हे सारे अपेक्षित होते. परंतु स्वातंत्र्यानंतर देश म्हणून या सगळ्या गोष्टींकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास कुणालाच सवड मिळाली नाही. परिणामी अभिजात संगीताने आपली स्वत:ची वाट स्वत:च शोधण्यास प्रारंभ केला. एक अखंड, प्रदीर्घ, संपन्न आणि अभिजात अशा कला प्रकाराला आपल्या अस्तित्वाचा नव्याने शोध सुरू करण्याचाच तो काळ होता. प्रत्येकच जण आपल्या स्वप्रतिभेने या बदलत्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी करत होता. इतकी वर्षे ज्या चित्रपट संगीताला भारतीय अभिजात संगीताचा मोठा आधार होता, तोही हळूहळू सुटू लागला होता आणि संगीतात नवनवे प्रयोग करू इच्छिणाऱ्या चित्रपट संगीतकारांची एक नवी फळी उदयाला येऊ  लागली होती. तरीही अभिजात संगीताला अधिक सुंदर करून त्याचे नक्षीकाम करणारे संगीतकारही आपली सर्जनक्षमता टिकवून ठेवतच होते. परंपरेचा हात सुटत असला तरीही त्याची ओढ संपलेली नव्हती. त्यामुळे जगण्याच्या अन्य सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच संगीतालाही हळूहळू कात टाकणे भाग पडत होते. हा संधिकाल पुढील काळातल्या नव्या संवेदना जागवणारा होता.

mukund.sangoram@expressindia.com