बलराज मधोक यांनी जनसंघाची ताकद निर्वविादपणे वाढविली होती, पण जनसंघाच्या कामात संघाचा हस्तक्षेप नको, असा सूर त्यांनी लावताच त्यांना पद्धतशीरपणे बाजूला केले गेले. मधोक यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्यांची ‘उंची’ सर्वानाच मान्य होती, पण ते पक्षापेक्षा किंवा मातृसंस्थेपेक्षा ‘मोठे’ नव्हते, हेही वास्तव मान्य करणे प्रत्येकालाच भाग पडले आहे..
अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नावाने एक गोष्ट सांगितली जाते. एकदा हिटलर आपल्या कार्यालयाच्या ग्रंथालयात काही पुस्तकं चाळत होता. एका उंच कपाटाच्या वरच्या कप्प्यातील एका पुस्तकानं त्याचं लक्ष वेधलं आणि ते काढण्यासाठी त्यानं टाचा वर केल्या, पण त्याचा हात पुस्तकापर्यंत पोहोचतच नव्हता. त्याचे प्रयत्न सुरूच होते. त्याच्यासोबतचा एक अधिकारी ते पाहून नम्रपणे म्हणाला, ‘‘थांबा सर, मी काढून देतो ते पुस्तक. मी तुमच्यापेक्षा मोठा आहे!’’ हिटलरने ते शब्द ऐकले. त्याच्या चेहऱ्यावर तुच्छतेची एक रेषा गडद झाली. डोळ्यांत काहीसा संताप उतरला आणि तो रागाने त्या अधिकाऱ्याला म्हणाला, ‘‘उंच म्हण, मोठा नव्हे!’’
असे खरेच घडले होते किंवा नाही, माहीत नाही; पण हिटलरच्या तोंडी घातल्यामुळे या गोष्टीचा योग्य तो संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यास ही गोष्ट पुरेशी सक्षम ठरली आहे. काही गोष्टी सहजपणे समाजात घडून जात असल्या, तरी त्यातून योग्य तो संदेश पसरत नाही. तीच गोष्ट एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी संबंधित असली, की त्यातून पुढे समाजाला किंवा संबंधितांना कायमचा धडा मिळून जातो. सध्याच्या भारतीय जनता पक्षात प्रत्येक वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या आसनामागे एक फलक असतो. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि त्यानंतर व्यक्ती’! अशा आशयाच्या त्या फलकामागेदेखील अशाच अनुभवातून मिळालेला धडा असावा. कुणी पक्षापेक्षा मोठा होऊ पाहात असेल, तर संघटनेला ते मारकच मानले पाहिजे, हा धडा भाजपने घेतला आणि बहुधा तेव्हापासूनच हा विचार पक्षाने आदेश, संदेश किंवा इशारा म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पक्षात व्यक्तीचे स्तोम प्रमाणाबाहेर माजू द्यायचे नाही, हा भाजपच्या मातृसंस्थेचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाणा होता. जनसंघ-भाजपच्या जन्मानंतरच्या काही घटनांनी तो अधोरेखित केला. बलराज मधोक यांच्यासारख्या मातब्बर नेत्यालादेखील त्याची फळे भोगावी लागली. पक्षाहून किंवा मातृसंस्थेहून मोठे असण्याची भावना व्यक्त होऊ लागताच, संघाने पक्षाकरवी मधोक यांचे पंख पुरते कापले. भारतीय जनसंघाला मोठेपण देणाऱ्या या नेत्याची उंची मोठी होती हे सत्य स्वीकारूनदेखील, ‘उंची’ आणि ‘मोठेपणा’ यातील फरक दाखवून देण्यासाठी संघ-जनसंघातून मधोक यांना वगळले गेले आणि आपण ज्याला ‘मोठेपण’ समजत होतो, ती केवळ आपली ‘उंची’ होती, हे वास्तव मधोक यांना आणि त्यांच्या समर्थकांनाही स्वीकारावे लागले.
स्वातंत्र्यानंतर लगेचच, काँग्रेसला भक्कम राजकीय पर्याय निर्माण करण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भासू लागल्याने, १९५२ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली संघातील काही मातब्बर नेत्यांनी ‘जनसंघ’ नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यामध्ये बलराज मधोक यांचेही नाव पहिल्या फळीत होते. उत्तर भारतात संघाचे काम तोवर काहीसे स्थिरावले असल्याने जनसंघाची पाळेमुळे उत्तरेकडे रोवणे काहीसे सोपे असले, तरी काँग्रेसला पर्याय ठरणारा पक्ष देशव्यापी असला पाहिजे, म्हणून दक्षिण भारतातही संघटनात्मक कामावर भर देण्यात आला आणि जनसंघाची पणती देशभर पोहोचविण्यासाठी आखणीबद्ध प्रयत्न सुरू झाले. संसदीय राजकारणात संख्यात्मकदृष्टय़ा त्याचे यश दिसत नसले, तरी पहिल्या दशकातच जनसंघाचे नाव देशभर पोहोचले होते. संघाने कृष्णाची भूमिका स्वीकारली होती. म्हणजे, जनसंघाच्या राजकीय बाबीत संघ थेट हस्तक्षेप करणार नाही, पण संकटाच्या वेळी संघ सल्लागाराची भूमिका बजावेल, असे धोरण ठरले होते. आजही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तोंडून ही भूमिका ऐकावयास मिळत असली तरी संघ हा भाजपचा, जनसंघकाळापासूनचा रिमोट कंट्रोल आहे आणि तो कायम राहणे संघ-भाजपसाठी अपरिहार्यच आहे, हे संघाच्या या राजकीय संघटनेच्या इतिहासातूनच स्पष्ट झाले आहे.
एखादी व्यक्ती ‘गरज’ म्हणून स्वीकारणे आणि एखाद्या व्यक्तीला ‘अपरिहार्यता’ म्हणून स्वीकारावे लागणे यातील फरक राजकारणात सर्वानाच नेहमीच करावा लागतो. भाजप वा त्याआधीच्या जनसंघाकरिता संघानेही हेच तत्त्व वेळोवेळी वापरले. बलराज मधोक आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिगत वैर उघड झाले, तेव्हा मधोक यांनी जनसंघाची ताकद निर्वविादपणे वाढविली होती. स्थापनेनंतरच्या पुढच्या १५ वर्षांतच जनसंघाचे ३५ सदस्य संसदेत पोहोचले होते, हे मधोक यांच्या शैलीचेच फलित होते; पण जनसंघाच्या कामात संघाचा हस्तक्षेप नको असा सूर मधोक यांनी लावला, तेव्हा मात्र मधोक यांना त्यांची ‘उंची’ दाखविण्याचे काम संघाला करावे लागले. वाजपेयी यांचे नेतृत्व निर्वविादपणे पुढे आणण्याच्या मार्गात मधोक यांचा मोठा अडसर होता, कारण मधोक यांनी वाजपेयी यांच्यावर वैचारिक पातळीपलीकडे जाऊन व्यक्तिगत चिखलफेकही केली होती. अशा परिस्थितीत, पक्षाचे नेतृत्व करण्याचे मधोक यांचे मोठेपण खुजे ठरले आणि वाजपेयी यांच्या प्रतिमेला बाधा येईल असा एकही घटक पक्षात राहू नये, यासाठी मधोक यांना पक्षातून बाहेर काढण्याचा निर्णय लालकृष्ण अडवाणी यांच्यामार्फत संघश्रेष्ठींना घ्यावा लागला. तत्कालीन सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांनी मधोक यांना नानाजी देशमुख यांच्यामार्फत तो निरोप दिला, तेव्हा ‘आपण एका कटाचे बळी ठरलो’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मधोक यांनी संघाला दूषणे दिली.
त्या वेळी त्यावर प्रतिवाद किंवा स्पष्टीकरणे करण्याचा प्रयत्न झाल्याचे फारसे दिसले नाही. आज भाजपच्या वर्तमानाकडे पाहताना, संघाने किंवा तत्कालीन जनसंघाने मधोक यांना बाजूला केले नसते, तर आजचा भाजप कसा असता, याचे चित्र नजरेसमोर आणणे शक्य आहे. पक्षावर संघटनेचे वर्चस्व असू नये यासाठी जनसंघातील संघाचा हस्तक्षेप थांबला पाहिजे, असे मधोक यांनी ठामपणे मांडले, तोच विचार त्यांना राजकीयदृष्टय़ा एकाकी पाडण्याचे कारण ठरला होता. तेव्हा मधोक यांच्या राजकीय कर्तृत्वापुढे भारावून संघाने राजकीय पक्षापासून फारकत घेतली असती, तर कदाचित भाजप नावाचा पक्ष आणीबाणीनंतरच्या राजकीय परिस्थितीत उदयास आलाच नसता आणि संघालाही सातत्याने प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत आपले अस्तित्व टिकविण्याची कसरत करीत राहावे लागले असते. संघ आणि भाजप यांच्यातील नाते हे महाभारतातील कृष्ण आणि अर्जुनासारखे आहे, असे म्हटले जाते. जेव्हा जेव्हा पक्ष संकटात येतो, तेव्हा संघ स्वत: सक्रिय सहभागी न होताही पक्षाच्या मदतीकरिता धावून जातो, हे वारंवार स्पष्ट झालेले उघड गुपित आहे. स्वत: सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ते अनेकवार बोलून दाखविले आहे. शिवाय, संघव्यवस्थेतील अनेक नेत्यांना भाजपच्या निर्णयक्षम फळीत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. मधोक यांच्या उंचीच्या प्रभावाने भारावून संघाने जर तेव्हा जनसंघापासून फारकत घेतली असती, तर आजचे राजकीय यश परिवाराच्या छायेखालील या पक्षाला पाहता आले असते का, हा प्रश्नच आहे. संघाचे वर्चस्व मान्य नसेल तर पक्ष संघटनेत स्थान नाही, हा स्पष्ट संकेत मधोक याना दूर करताना संघाने तेव्हाच दिला होता.
भाजपमध्ये त्या संकेताचे पालन आजही अपरिहार्य आहे, कारण जनसंघ किंवा भाजप, दोघांचीही वाढ संघाच्या सावलीतूनच झालेली आहे. १९४८ मध्ये संघावर बंदी आल्यानंतर राजकीय मंचावर संघाचे समर्थन करणारी शक्ती उभी करण्याची गरज अधोरेखित झाली होती. संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकातून अनेक संघ समर्थकांनी त्या काळात ती मागणीच जोरदारपणे रेटण्यास सुरुवात केली होती, कारण राजकारणामुळे फटका बसला तर पुढील प्रत्येक पावलावर त्या फटक्याची किंमत मोजावी लागेल, असे समर्थकांचे म्हणणे होते. याला अनुसरूनच जर संघाच्या पुढाकाराने जनसंघ-भाजप अशी राजकीय वाटचाल सुरू झाली असेल, तर संघ ही या राजकीय वाटचालीची अभंग बाजू असणार, हे स्पष्टच होते. बलराज मधोक यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला. मधोक यांची ‘उंची’ सर्वानाच मान्य होती, पण ते पक्षापेक्षा किंवा मातृसंस्थेपेक्षा ‘मोठे’ नव्हते, हेही वास्तव मान्य करणे प्रत्येकालाच भाग पडले आहे.
बलराज मधोक हे भाजपसारख्या संघप्रणीत राजकीय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसमोरील उदाहरण आहे. तो इतिहास नाही. वर्तमानातही ते लागू पडते आणि भविष्यातदेखील ते तितकेच प्रभावी राहील. तसे राहावे यासाठी संघ परिवारही पुरेपूर काळजी घेत राहील. त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर ‘मधोक’ होऊन एकाकी पडण्याची वेळ येते, हे वर्तमानानेही दाखवून दिले आहे. व्यक्तिनिष्ठेचे अवास्तव स्तोम माजू लागले, की त्या व्यक्तीला त्याची उंची दाखवून दिली जाते आणि ‘पक्ष मोठा आहे’, हेही स्पष्टपणे बजावले जाते. मधोक यांच्यामार्फत परिवाराने हे शाश्वतपणे अधोरेखित करून ठेवले आहे.

वाजपेयी यांचे नेतृत्व पुढे आणण्याच्या मार्गात मधोक यांचा मोठा अडसर होता, कारण त्यांनी वाजपेयी यांच्यावर व्यक्तिगत चिखलफेकही केली होती. म्हणून वाजपेयी यांच्या प्रतिमेला बाधा येईल असा एकही घटक पक्षात राहू नये, यासाठी त्यांना पक्षातून बाहेर काढण्याचा निर्णय संघश्रेष्ठींना घ्यावा लागला. तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर यांनी नानाजी देशमुख यांच्यामार्फत तो निरोप मधोक यांना दिला..

Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Rajasthan Royals Big Announcement
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सची मोठी घोषणा! प्रसिध कृष्णाच्या जागी लखनऊ फ्रँचायझीच्या ‘या’खेळाडूला केले करारबद्ध

दिनेश गुणे
dinesh.gune@expressindia.com