पराग श्याम परीट

खाद्य पुष्पांच्या बाजारपेठेला जगात मोठा वाव आहे, त्यातून शेतकरी मोठया प्रमाणात अर्थार्जन करू शकतात. वेगवेगळ्या फुलांचा वापर आपण आहारात व इतर कारणांसाठी करू शकतो.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

काचेच्या बाटलीत वर्षांनुवर्षे साठवून ठेवलेल्या सोनचाफ्याची फुले आपणाला अधूनमधून पाहायला मिळतात. गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद करतात आणि ते आरोग्यदायी असते हेही आपणाला माहिती आहेच. पण खाद्यपुष्पांचं एक वेगळं, आकर्षक, सुगंधाने भारलेलं जग पैसा मिळवून देणारं एक मोठं क्षेत्र आहे यावर आता आपणाला विश्वास ठेवावा लागेल. देशी गुलाबाच्या कांडय़ा शेतातील मोकळ्या जागेत लावून त्याच्या फुलांपासून सरबत, गुलकंद, गुलाबजल यांसारखे तुलनेने सोपे प्रक्रिया पदार्थ तयार करून विक्री करण्याला वाव आहे.

शेताच्या बांधावर किंवा विहीर, जनावरांचा गोठा, शेतजमिनीतील अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या मोकळ्या जागेत आपण यापैकी बऱ्याच खाद्य पुष्पांच्या उत्पादनासाठी लागवड करू शकतो.

कमळाचे गड्डे ज्याला कमळ काकडी असेही म्हणतात, तिचा देखील आहारात वापर करता येतो. त्याचे आरोग्याच्या दृष्टीने बरेच फायदे आहेत, पण आजही बऱ्याच शहरांमधील ग्राहकांना ते उपलब्ध होत नाहीत. कमळाच्या फुलांच्या पाकळ्या, त्याच्या कोवळ्या बिया याचाही वापर वेगवेगळ्या पाककृतींमध्ये केला जातो. शेतातील एका तुकडय़ावर चार ते पाच फुट खोलीचे चर काढून त्यात आपण कमळाची शेती करू शकतो. गावात नैसर्गिक तळी असतील, तर त्यातही कमळाची लागवड आपण करू शकतो.

गोकर्णच्या निळ्या फुलांचा चहा बऱ्याच लोकांना आता परिचयाचा झाला आहे. पण हिबिस्कस टी अर्थात जास्वंद चहा, मेरीगोल्ड टी अर्थात झेंडूचा चहा आणि सॅफ्लॉवर टी अर्थात करडई चहा आपल्याकडे इतका प्रचलित प्रकार नसला, तरी या फुलांच्या वाळलेल्या पाकळ्या युरोपियन देशांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर विकल्या जातात. याचा चहा रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, त्वचेचे विकार बरे करण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी तिकडे नियमितपणे केला जातो. लाल जास्वंदीच्या कांडय़ा लावून आपणही याची अभिवृद्धी करु शकतो आणि जास्वंद चहा आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकतो.

शेवग्याची फुले, हादग्याची फुले पूर्वीच्या काळी आहारात वापरली जायची. पण आजकाल हादगा ही वनस्पती सहसा बघायलाही मिळत नाही. या फुलांच्या विक्रीतूनही आपणास उत्पन्न मिळू शकते.

काकडी, भोपळा, झुकीणी या वेलवर्गीय भाजीपाल्याच्या फुलांचा वापर आहारात वाढविण्यासही खूप वाव आहे. आजकाल गृहिणी टीव्ही किंवा यूटय़ुबवर विदेशातील पाककला पाहून घरी करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मुख्य अडचण असते ती म्हणजे त्यातील वनस्पती घटक आपल्याकडे उपलब्ध न होणं. भोपळा, झुकीणी, काकडी याच्या फुलांच्या भजी आणि कोशिंबिरी खूप चांगल्या प्रकारे करता येतात.

डाळिंबाची झाडे चांगली येतात, वाढतात, फुलतातही पण रोगराईचं प्रमाण वाढलं की फळधारणा चांगली होत नाही. अशावेळी डाळिंबाची फुले विक्री करण्याचा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे कारण डाळिंब आणि पपईच्या फुलांचाही वापर वेगवेगळ्या भाज्यांमध्ये सर्रास केला जातो.

चोखंदळ ग्राहकांना त्यांच्या आहारात सतत बदल हवा असतो. हा बदल त्यांना उपलब्ध करून देण्यासोबतच परवलीच्या भाजीपाला शेतीला या खाद्यपुष्पोत्पादनाची जोड देऊन जास्त नफा मिळविण्यासाठी असे काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवायला पाहिजेत. ग्राहकाची नजर कायम काहीतरी नवीन शोधत असते. त्यासाठी चांगली किंमत मोजणारा ग्राहक वर्ग आहे. आरोग्यावर गुंतवणूक करणाऱ्या अशा वर्गाला डोळ्यासमोर ठेवून आज शेतकऱ्यांनी उत्पादन घेणे गरजेचे आहे.

चीन आणि जपानमधील लोक फुलांचा वापर आहारात मोठय़ा प्रमाणावर करतात. त्यापाठोपाठ भारतातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये फुलांचा आहारात आणि विविध पारंपरिक औषधांमध्ये वापर केला जातो.

जगभरात फुलांचा खाद्यपदार्थातील वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे. बेकरी उत्पादने, नैसर्गिक खाद्य रंग तयार करण्यासाठी, विविध पदार्थांना गार्निश अर्थात सजविण्यासाठी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि मद्य निर्मितीमध्ये, विविध चवीच्या आणि स्वादाच्या चहा निर्मितीमध्ये गुलाब, जास्वंद, झेंडू, जाई, जुई, चमेली, गोकर्ण, लव्हेंडर, पॅन्सी, हॉप, कमळ यांसारख्या फुलांना मागणी असते.

पारिजातच्या फुलांचे आकर्षक केशरी रंगाचे देठ उन्हात वाळवून काचेच्या बरणीत साठवून विविध पदार्थांमध्ये महागडय़ा केशरच्या ऐवजी वापरण्यास वाव आहे.

जागतिक खाद्य पुष्पांची बाजारपेठ

ही त्या फुलांचा दैनंदिन खाद्यपदार्थातील वापर, बेकरी उत्पादनातील वापर आणि पदार्थ सजावटीसाठीचा वापर अशा तीन प्रकारांमध्ये विभागले गेल्याचे दिसून येत आहे. यातही उत्तर अमेरिका, युरोप, आशिया पॅसिफीक आणि उर्वरित जग अशा चार विभागांमधे जागतिक खाद्य फुलांची विक्री केंद्रे वाढत असल्याचे पाहायला मिळते.

युरोपातील लोकांच्या बदलत चाललेल्या आहारशैलीत खाद्य फुलांचे महत्त्व वाढत असल्याचे आणि युरोप आता खाद्यपुष्प मार्केटमध्ये जागतिक स्तरावर आपले स्वतंत्र वर्चस्व निर्माण करत असल्याचे गेल्या काही वर्षांंपासून निदर्शनास येत आहे

खाद्यपुष्प पदार्थाला रंग आणि सुगंध प्रदान करतात. त्यासोबतच फुलांमध्ये असलेले औषधी गुणधर्म, त्यांमधील जीवनसत्त्वांची मुबलक उपलब्धता आणि आरोग्याबाबतची वाढत चाललेली सजगता यामुळे खाद्यपुष्पांची बाजारपेठ वाढत चालली आहे.

बऱ्याच फुलांमधे जीवनसत्त्व अ, क आणि ई चे प्रमाण चांगले असते. काही फुलांमध्ये जीवनसत्त्व ड ची उपलब्धता देखील आढळते. गडद रंगाच्या खाद्यपुष्पांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण चांगले असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. खाद्यपुष्पांचा आहारातील वापर पोटाचे आरोग्य उत्तम ठेवण्यास उपयोगी ठरतो.

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना खाद्यपुष्प उत्पादनासोबतच प्रक्रिया आणि विपणनाला संधी उपलब्ध आहेत. आजचे जग ग्राहकाची वाट बघत बसण्याचे नाही तर ग्राहक तयार करण्याचे आहे, हे ओळखून बाजारात खाद्यपुष्प विक्रीसाठी उपलब्ध करून देणे आणि त्यासोबतच या फुलांचे आहारातील आणि आरोग्यासाठीचे उपयोग पटवून देणे, खाद्यपुष्प पाककला महोत्सवांच्या आयोजनाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर याचे महत्त्व बिंबवणे यांसारखे उपक्रम राबवायला हवेत.

खाद्यपुष्प प्रक्रिया पदार्थ निर्मिती करून हंगामी फुले विक्रीसाठी वर्षभर उपलब्ध करून देऊ शकतो.

उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मोहाची फुले उपलब्ध होतात. परंतु मोहाला जसे महत्त्व प्राप्त झाले तसे बकुळ, पारिजात यांसारख्या फुलांना अद्याप प्राप्त झाले नाही.पपईच्या फुलांच्या रसरशीत पाकळ्या कोशिंबीर करण्यासाठी वापरात आणता येतात. तुळशीच्या ताज्या रसरशीत मंजिरी सरबतांना एक मस्त सुगंध प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात रस्त्याकडेला फुलणारा काटेसावर, पांगारा याची फुले गोळा करून साठवून ठेवता येतात आणि वर्षभर विविध पदार्थांना नैसर्गिक केशरी रंग देण्यासाठी वापरात आणता येतात. अर्थार्जनाचे तुलनेने स्वस्त माध्यम म्हणून खाद्यपुष्प उत्पादनाकडे आता वळावे लागेल.

parag.parit@yahoo.com