मणिपूरमधील अफ्स्पाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने ८ जुलै रोजी दिलेल्या निकालानंतर महिन्याभरानं इरोम शर्मिलानं उपोषण सोडलं.. तिला फक्त राजकीय कार्यकर्ती म्हणून पाहिल्यास तिला मुख्यमंत्रिपद मिळेल की नाही याचीच चर्चा महत्त्वाची ठरेल.. तसं न होता, एक माणूसम्हणून शर्मिलाकडे पाहण्याची दृष्टी एका रंगकर्मीला हळूहळू मिळत गेली.. या रंगकर्मीनं शर्मिलाशी साधलेला हा पत्रसंवाद..

प्रिय इरोम शर्मिला,

खरं तर आजच्या सोशल मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक जगात पत्र लिहिणं म्हणजे मागासपणाच! पण गेली १६ र्वष तू तुरुंगात होतीस तेव्हा पत्र हे एकच माध्यम तुला बाहेरच्या जगाशी जोडणारं होतं. आताही तू बाहेर आली असलीस तरी फेसबुक, ई-मेल तर सोडाच, तुझ्याकडे साधा फोनही नाही. मणिपूरसारख्या ठिकाणी जिथे चोवीस तासांतले २ तासच वीज असते तिथे अजूनही पत्र हेच संवादाचं माध्यम असल्यामुळे तुला पत्रच लिहायचं ठरवलं..

सर्वात आधी उपोषण सोडण्याच्या निर्णयाबद्दल तुझं अभिनंदन आणि ‘सामान्य’ जीवन जगण्यासाठी स्वागत! अर्थात, मराठी माणसाचं आणि मणिपुरी माणसाचं ‘सामान्य जीवन’ यांत किती तफावत आहे हे नव्यानं सांगायला नकोच. तू उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केलास तेव्हाच मणिपुरी जनतेत, तुझ्या साथींमध्ये, तुझ्या परिवारामध्ये संमिश्र भावना उमटल्या- ते अपेक्षितच होतं. अनेकांची नाराजी उमटली, अनेकांना ‘आता लढय़ाचं काय होणार’ अशी काळजी वाटली. हे सगळं असलं तरी सर्वाच्या मनात तुझ्याप्रति आणि तुझ्या आजवरच्या लढय़ाप्रति अत्यंत आदर आणि कृतज्ञताच आहे.

२ नोव्हेंबर २००० रोजी मालोममध्ये आसाम रायफल्सच्या जवानांकडून झालेल्या बेछूट गोळीबारात जेव्हा म्हातारी बाई, लहान पोरांसह १० सामान्य नागरिक मारले गेले तेव्हाही अस्वस्थ होऊन फार कोणाला विचारत न बसता तू सरळ उपोषण सुरू केलंस तेव्हा केवळ अठ्ठावीस वर्षांची होतीस तू. तेव्हाही ‘देशाच्या एका कोपऱ्यात बसून एका तरुण मणिपुरी मुलीने उपोषण करून काय फरक पडणार?’ अशी टीका झालीच. तरीही तू उपोषण जारी ठेवलंस ते तब्बल सोळा र्वष! जिथे विद्रोही गटांच्या बंदुका निष्प्रभ ठरल्या, त्यांचे उठाव सहज चिरडले गेले – त्यापायी अनेक निरपराध मणिपुरी नागरिक मारले गेले, अनेक तरुण गायब झाले, अनेक महिला बलात्कारल्या गेल्या – त्या ठिकाणी शांतिपूर्ण मार्गावर ठाम विश्वास ठेवत बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबत तू वैयक्तिक सत्याग्रह सुरू ठेवलास. तुला चिरडणं मात्र ना सरकारला शक्य झालं ना सशस्त्र सेनेला! उलट तुझ्या वैयक्तिक सत्याग्रहाभोवती चळवळ उभी राहिली. अनेक ‘मैरा पैबी’ (मणिपुरी लढाऊ  महिला) गावोगाव मशाली घेऊन उभ्या राहिल्या. तुझ्यासोबत अनेक ‘इमा’ (मणिपुरी आयांची संघटना) साखळी उपोषणाला बसल्या. अनेक मणिपुरी कलाकारांच्या कलाकृतींमध्ये, नाटकांमध्ये, संगीतामध्ये तुझ्या लढय़ातून घेतलेली प्रेरणा जगासमोर आली. आजच्या सोशल मीडियाच्या युगात ती जगभर व्हायरल झाली. ही चेतना तुझ्या लढय़ाने निर्माण केली. मुख्य म्हणजे मणिपुरी माणसाचा आशावाद जागा झाला. ही हिंसक, दमनकारी, अवाढव्य व्यवस्था आपल्या पातळीवरच्या छोटय़ा कृतीने उलथवली जाऊ  शकते, हा आत्मविश्वास तुझ्या कृतीने दिला.

त्याहूनही महत्त्वाचं हे की, ज्या देशातून सत्याग्रह आणि शांती मार्गाचं तत्त्वज्ञान जगापर्यंत पोचलं त्याच देशाच्या शांती आणि न्यायाचा विसर पडलेल्या सरकारला, यंत्रणेला आणि जनतेला तू नव्यानं सत्याग्रह समजावलास. दिल्ली-मुंबईपलीकडे न पोचणाऱ्या देशभरच्या मुख्यधारा विचारप्रवाहांना, अनेक दशकं दुर्लक्षित असलेल्या मणिपूरसारख्या ईशान्य कोपऱ्यात घडणाऱ्या लोकशाहीविरोधी कृतींविषयी चर्चा करायला लावलीस (अर्थात, दिल्लीत उपोषणाला बसली असतीस तर फार लवकर ही चर्चा घडली असती!). ‘गाईसमान पवित्र’ पर्यायत: ज्यांविरोधी ‘ब्र’ही उच्चारणे म्हणजे देशद्रोह अशी धारणा असलेल्या सैन्याच्या दृष्टिआडच्या कारवायांविषयी देशभरातून प्रश्न उभे केलेस.

आता, ‘तू मागितलेल्या ‘अफ्स्पा रद्द करा’ मागणीचं काय?’, ‘ती कुठे पूर्ण झाली?’, ‘बघा, उपोषणाचा काही उपयोग नाही’ अशा अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. संघर्षांचं ‘यश’ हे ‘जीत’ की ‘हार’.. ‘एक’ की ‘शून्य’ या संकुचित परिमाणामध्ये मोजण्याचा सामाजिक आजार आपल्याला जडला आहे. मणिपूरमध्ये जी चेतना आली, शांतिपूर्ण जीवन असू शकतं, ही कल्पना लोकांच्या मनात रुजण्याची आणि त्यासाठी संवाद करत संघर्ष करण्याची प्रेरणा मणिपुरी समाजात आली, हे कसं मापणार? मनोरमा या कार्यकर्तीवर झालेला निर्घृण बलात्कार आणि खुनानंतर प्रतिक्रिया देत आसाम रायफल्स हेड क्वार्टरसमोर हिमतीने नग्न उभ्या ठाकलेल्या इमा आणि त्यांनी वेशीवर टांगलेली व्यवस्थेची लक्तरं – त्या घटनेनंतर जगभरातून उमटलेल्या प्रतिक्रिया,  त्या मणिपुरी किल्ल्यातून हेडक्वार्टर हलवण्याइतपत झालेल्या नाचक्कीचा हिशोब कुठल्या पारडय़ात मोजणार? २००६ साली आलेला (आणि तितक्याच त्वरेने लुप्त झालेला) न्यायमूर्ती सुरेश रेड्डींचा ‘‘‘अफ्स्पा’ निरुपयोगी आहे, तो रद्द करा’’ असं सांगणारा अहवाल असो, की ‘एक्स्ट्राज्युडिशिअल एग्झिक्यूशन व्हिक्टिम फॅमिली असोसिएशन’ (ईईव्हीफॅम) ने उभारलेल्या विधवा, अर्धविधवा (ज्यांचा नवरा अनेक र्वष ‘डिसॅपिअर्ड’ आहे) महिलांनी खिशातले पै-पै साचवून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या केसेसचा निकाल देताना आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने ‘अफ्स्पा’ राबवणाऱ्या सरकारवर- सैन्यावर ताशेरे ओढत, कोणत्याही परिस्थितीत सैन्याने केलेल्या हत्येचे कारण दिलेच पाहिजे, असे स्पष्ट सांगत ८ जुलै २०१६ रोजी ‘अफ्स्पा’ निष्प्रभ करणे असो- या गोष्टींनी ‘अफ्स्पा’सारख्या विशेषाधिकाराला तडे जातच आहेत. अर्थात ‘अफ्स्पा’ नावाचा पोपट मेला आहे, ‘अफ्स्पा’ विद्रोही गटांना नष्ट करण्यात निरुपयोगी ठरला आहे हे मान्य करायला सरकार कित्येक र्वष लावेल. कदाचित तसं स्पष्ट मान्य करणारही नाही. त्यामुळे ‘अफ्स्पा रद्द झाला’ या शब्दांत मान्य होऊन मग उपोषण सोडायचं ठरवलं तर किती जन्म लागतील याचा अंदाज नाही! त्यामुळे लोकांमध्ये, न्यायसंस्थांमध्ये, सरकारांमध्ये पुरेशी सामाजिक परिपक्वता आणवून; अफ्स्पाविषयी पुरेसं विचारमंथन घडवून उपोषण सोडते आहेस हे खरं.

गेली अनेक र्वष तू म्हणते आहेस, की ‘‘मला हुतात्मा नाही बनायचं आहे. मला अफ्स्पारहित शांतिपूर्ण जीवन जगायचंय!’’ हे म्हणणं वेगळं आणि खरोखर लढय़ाचा केंद्रबिंदू बनलेलं असताना त्यातून सामान्य माणूस म्हणून निघणं अतिशय कठीण! गेली सोळा र्वष हा लढा तुझ्याभोवती केंद्रित आहे तरी त्याने प्रभावित न होता एक सामान्य माणूस म्हणून निर्णय घेण्याची, चुका करण्याची संधी तू घेतली आहेस – इतकं मानवीय राहणं खरंच सोपं नाही आणि तितकंच तुझ्याभोवतीच्या समर्थक-साथींसाठी तुझ्या संघर्षांची ज्योत केंद्रबिंदूतून निघून जाऊ  देणं कठीण आहे. त्यामुळे त्यांची टीका साहजिक आहे.

तुझ्या मानवीयतेचा प्रत्यय मला २०१० मध्ये आला होता. २००८ मध्ये म्हणजे तुझं उपोषण सुरू होऊन तब्बल आठ वर्षांनी एका मणिपुरी विद्यार्थ्यांच्या बोलण्यामधून मला तुझ्याविषयी कळलं होतं. तेव्हा माझा त्यावर विश्वास बसला नव्हता. नंतर मात्र तुझ्याविषयी थोडंसं कुठे तरी वाचलं- ऐकलं. मे २०१० मध्ये सिविक चंद्रन यांचा ‘हिंद स्वराज पीस मार्च’ मल्याळी नाटक घेऊन केरळवरून इम्फाळला येत होता. त्यात उत्तर भारतात समजायला सोपं जावं म्हणून मी त्यांचंच मल्याळी नाटक ‘ले मशाले..’ नावाने हिंदीत करून त्यांच्यासोबत पाच प्रयोग केले. त्या नाटकाची तयारी करताना मी तुझ्याविषयी, मणिपूरविषयी, तिथल्या दमनाविषयी, तिथल्या बायांच्या लढय़ाविषयी जे वाचलं-पाहिलं त्याने अवाक् झाले! पण तेव्हा मी एका ‘राजकीय कार्यकर्तीविषयी’ नाटक करत होते. त्यानंतरही कुठे ना कुठे प्रयोग होत राहिले आणि नोव्हेंबर २०१० मध्ये तुझ्या उपोषणाचं १० वं वर्ष साजरे करण्यासाठी देशभरातले समर्थक इम्फाळमध्ये जमले होते; तेव्हा मी मणिपुरी समाज जवळून पाहिला. तू त्यांच्या मनात पेटवलेली आशेची ज्योत पाहिली. सततच्या कर्फ्यूतून वाट काढत तो दिवस साजरा करण्यासाठी काही न काही करण्याची तरुणांची धडपड पहिली. गल्लोगल्ली स्वयंप्रेरणेने समर्थनार्थ लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या बाया पहिल्या. आम्हाला तुला भेटण्याची परवानगी नाकारली. त्या दिवशीही तुला अन्य कुणाला भेटू देत नव्हते – एखाद्या गुन्हेगार कैद्याप्रमाणे! संध्याकाळी केव्हा तरी आपण काहीही करून तुला बघूच या निर्धाराने मेणबत्त्या घेऊन आम्ही तुझ्या वॉर्डाजवळ आलो आणि कशीबशी डॉक्टरांनी तुला लांबून भेटण्याची परवानगी दिली. तू तुझ्या खोलीतून डोकावलीस आणि केवळ तुझ्यासाठी आलेल्या एकदम इतक्या समर्थकांना पाहून तुझा अश्रूंचा बांध फुटला. तू मनमोकळी रडलीस आणि मग निर्धाराने चालत आलीस. क्षीण पण ताठ!

त्या तेवढय़ा भेटीतून मला तू बरीच कळलीस – एक माणूस म्हणून. त्यानंतरच्या प्रयोगात मी कधीच ‘राजकीय कार्यकर्ती’ साकारली नाही. मी एक तरुण, निर्धारी, आग्रही, ठाम विश्वास असणारी ‘माणूस’ साकारली आणि खरं सांगायचं तर ती व्यक्तीच देशभरातल्या प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचली. त्या व्यक्तीतून मला मणिपुरी मैरा पैबी उलगडल्या, फौऊ ओईबी समजली, ‘इमा’ समजून घेता आल्या.

मातृप्रधान समाजाची अभिव्यक्ती कळणं तितकंसं सोपं नसतं – पण ती मनाचा ठाव साधते – हेच खरं! हे नाटक घेऊन मी देशभरातल्या १९ राज्यांत सुमारे २०० प्रयोग केले. प्रत्येक प्रयोगानंतरची एकही टाळी माझ्यासाठी नसून ती तुझ्या अनोख्या संघर्षांसाठी, कहाणीसाठी असते हे मला चांगलंच माहीत आहे. हिंदीचा गंधही नसलेल्या अगदी ओरिसातल्या आदिवासी पाडय़ावर किंवा तामिळ, मल्याळी, मराठी, राजस्थानी, हिंदी भाषिक शहरा-खेडय़ांत ही कथा पोचते तेव्हा ती काही केवळ ‘अफ्स्पाविरोधी चळवळ’ उभारण्याचं काम करत नसते.. ती एका वेगळ्या पातळीवर एका निर्धारी महिलेच्या आत्मबलाची अनुभूती करून देत असते. लोकांना आपल्या जागी ठामपणे उभे राहण्याचं बळ देत असते.

तू ती मशाल पेटवून दिली आहेस, त्यातून प्रत्येक जण आपापली ज्योत पेटवत आहे. त्यामुळेच मला खात्री आहे की, तू हाती मशाल घेऊन उभी नसलीस तरीही ती मशाल पेटतच राहील आणि शांतिज्योती अंधार भेदत आसमंत उजळवत राहतील..

तुझं नाटक घेऊन मी वेगवेगळ्या प्रांतांत फिरले, तिथल्या विविध पदार्थाचा आस्वाद घेताना मला तुझी आठवण यायची. तू काहीच खात नाहीस हे घासागणिक बोचायचं. आता आपण जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा तू घन आहार सुरू केला असशील, अशी आशा आहे. तेव्हा आपण दोघी एकत्र अन्नाचा आस्वाद घेऊ. हा माझ्यासाठी खूप अनमोल क्षण असेल!

तुझी,

– ओजस सुनीती विजय

meetojas@gmail.com