‘जागते रहो’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत. 

एकीकडे सारे जग २०१६ या वर्षांचे जल्लोषी स्वागत आतषबाजीने करीत होते, तर दुसरीकडे पाकिस्तानने पाठविलेले विशेष प्रशिक्षित दहशतवादी पठाणकोट या पंजाबमधील भारताच्या लष्करी विमानतळावरील भारतीय जवानांवर बंदुकांमधून गोळ्यांची आतषबाजी करीत होते. चार दहशतवादी रक्षक नसलेल्या भागातून झाडावरून आत शिरले आणि त्यांनी सहा जणांचा बळी घेतला. त्यानंतर पाम्पोर येथे दोन दहशतवाद्यांनी आठ जणांचा बळी घेतला. सप्टेंबरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’ला कारणीभूत ठरलेला उरी येथील दहशतवादी हल्ला ज्यामध्ये दोन गार्ड टॉवरच्या आतमधील रस्त्यावरून आत घुसून निद्रिस्तावस्थेतील असलेल्या १९ जवानांची चार दहशतवाद्यांनी केलेली कत्तल आणि आता २९ नोव्हेंबरला झालेल्या सीमेपासून फक्त ४० किलोमीटरवर असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील नगरोटा या भारतीय लष्करी ब्रिगेडच्या मुख्यालयावर झालेला हल्ला ज्यात तीन दहशतवाद्यांनी सात जवानांचा बळी घेतला. देशाची सुरक्षा करता करता शहीद होणे हेच सीमेवरील जवानांचे काम नाही. हा, प्रसंगी गरज पडल्यास ते मृत्यूला आिलगन देतील; पण तशी वेळ येऊ नये ही प्रत्येक नागरिकांची भावना असतेच. पाकपुरस्कृत या दहशतवादाला तोंड देत देत किती तरी बळी हकनाक पडत आहेत. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असं काही तरी पाकिस्तानच्या बाबतीत आहे. स्वातंत्र्यापासून भारताचे पाकशी संबंध म्हणजे शून्याचा पाढा आहे. पाकने १९८४ पासून सुरू केलेला दहशतवाद ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतरही अनेक छोटे-मोठे हल्ले करून कायम ठेवला. त्यांना पाठबळ मिळतं ते तेथील लष्कर आणि आयएसआय गुप्तचर यंत्रणेकडून. तेच तेथीली decision makers आहेत. पाकिस्तानी सरकारचे हात तर फार पूर्वीपासून लष्कराच्या दगडाखाली ठेचले गेले आहे. तिथे लोकशाही फक्त नामधारी स्वरूपात अस्तित्वात आहे. नवनियुक्त  लष्करप्रमुख बाजवासुद्धा तीच परंपरा पुढे रेटणारे, शिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांना लष्करी कारवाईचा दांडगा अनुभव आहे. राजकारणी आणि लष्कराच्या या खेळापायी जीव जातोय तो भारतीय जवानांचा. हे सत्र थांबविण्यासाठी पुन्हा लक्ष्यभेदी हल्ल्यांची शक्यता नाकारता येत नाही. कारण ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ असाच काहीसा अनुभव राहिला आहे. असे लक्ष्यभेदी हल्ले वारंवार Covert Operational Division नावाची तुकडी भारतीय सन्यात अस्तित्वात होती; परंतु शांतीप्रिय पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी ती बंद करून टाकली. १९७१ला पाकिस्तानचे तुकडे करूनही तेथील लष्कराची अक्कल ठिकाणावर आली नाही. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडण्याचे, त्याला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत. सिंधू नदीचे पाणी अडविणे, पाकसोबतचा व्यापार, ४००० मेगावॅटचा वीजपुरवठा खंडित करणे, पाकमधील अंतर्गत अस्थिरतेचा फायदा घेणे, बलुचिस्तान प्रकरणात हात घालणे इत्यादी मुत्सद्देगिरीचे मार्ग भारताला राबवावे लागणार आहेत. युद्ध हा पाकिस्तानसोबतचा पर्याय नाही, असे म्हणणे हा आपला संपूर्ण गरसमज होईल. कारण भारतीय सन्य युद्धाचे पारडे स्वत:कडून जड करण्याची क्षमता ठेवतो, परंतु युद्धापूर्वी अशा काव्याचा वापर करणे योग्य वाटते. पण या सर्वामध्ये एक गोष्ट आपणास लक्षात ठेवावी लागेल की, पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि तेथील सरकार फक्त याबद्दल आपले हे धोरण असावे; तेथील नागरिकांसाठी नाही. मग आपल्यात आणि दहशतवाद्यांमध्ये काय फरक? हे झालं आपलं शत्रूबरोबरचे धोरण. आता आपल्या लष्करी सुरक्षेच्या आधुनिक उपाययोजनांबद्दल आपण चर्चा करू.

नगरोटा येथील दहशतवादी सीमेपासून ४० किलोमीटर आत घुसून पोलिसांच्या गणवेशात हल्ला करतात. त्यांना गणवेश कुठून मिळाला? आणखी ते ज्या मुख्यद्वारातून आत शिरतात तिथे एक पण सुरक्षारक्षक नसतो. कसं काय? याचा अर्थ तिथल्या स्थानिकांपैकी कोणी तरी त्यांना माहिती पुरवीत होता. उरीमधील हल्ल्यामध्ये १९ पकी काही जवान हे तंबूला लागलेल्या आगीमुळे मृत्यू पावले. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी निवृत्त लेफ्ट. जनरल फिलिप कंपोज यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या. यात तळाच्या आत तातडीने उपाययोजना करणारी एक विशेष तुकडी नेमणे, सुरक्षारक्षकाला नियुक्त करावे जेव्हा तो सन्याच्या सेवेमध्ये कार्यरत असतो, मोठय़ा लष्करी तळांवर विविधस्तरीय सुरक्षाचक्र बनवावे आदी. कंपोज यांच्या समितीच्या या शिफारशी जर पाळल्या गेल्या असत्या तर उरी आणि नगरोटासारख्या घटना घडल्या नसत्या. सरकारने देशाच्या सीमासुरक्षेचे आणि सुरक्षेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलले पाहिजे. भारत-पाक सीमेवर आजवर १२ ठिकाणी laser beam detection system चालू केल्या आहेत. लक्ष्य आहे ४८ ठिकाणांचं. ते लवकर पूर्ण झालं पाहिजे. शिवाय रात्रीच्या वेळी गस्तीसाठी लागणारे जुने Thermal image कॅमेरे बदलून नवीन अधिक सुस्पष्ट दिसणारे आधुनिक कॅमेरे घ्यावेत. कारण सीमारेषेवर तस्करीचे प्रमाण रात्रीच्या वेळी जास्त असते. जवानांना आधुनिक शस्त्रास्त्रे, असौल्ट रायफल्स, वजनाने हलके पण उत्तम प्रतीचे बुलेटप्रूफ जाकिटे पुरविणे, सीमेनजीकच्या तळांवरील तंबू किमान अग्निरोधक कापडाचे असावेत, 5 level hightech security, underground sensor, lazer wall Division यासारख्या सुरक्षातंत्रात सुधारणा करणे, अत्याधुनिक भारतीय बनावटीच्या rustom–2 या मानवरहित ड्रोन कॅमेऱ्यांचा टेहळणीसाठी वापर करणे, असे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरक्षा यंत्रणेत सामील करावे लागेल. भारतीय शास्त्रज्ञांना सुरक्षा आणि शस्त्रासंबंधी क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन देणे जेणेकरून इतर विकसित देशांवर आपणास कमीत कमी अवलंबून राहता येईल. एकूणच ‘जागते रहो’चा सल्ला फक्त सन्यातील जवानांसाठी नसून सुरक्षेसाठी सीमेवर जागरण करणाऱ्यांसाठी नागरिक किती जागे आहोत, याचे आत्मचिंतन करण्यासाठीही आहे हे लक्षात ठेवायला हवे.

(दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी मुंबई)