बाबा प्रजासत्ताकया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक प्लेटोने मांडलेल्या विचारानुसार ‘राजसत्ता जेव्हा नीतिमत्ता सोडून धर्मसत्तेची रखेल बनते तेव्हा देशाच्या अस्मितेवर बलात्कार होतो’ या वाक्याचा प्रत्यय आपल्याला काही दिवसांपूर्वी बाबा रामरहिमच्या अटकेपश्चात डेरा समर्थकांनी मांडलेल्या उच्छादावरून आला असेल. या काळात हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत हिंसेचा जणू आगडोंब उसळला होता. भारतात बाबा लोकांना मोठे होण्यास राजकीय आश्रय वेळोवेळी मिळत आलेला आहे हे जगजाहीर सत्य आहे. डॉ. आंबेडकरांनी भारतीय राजकारणाबद्दल म्हटले होते की, ‘भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अंध:पतनाचा आणि पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग बनायला वेळ लागणार नाही.’ अनतिकतेने बरबटलेल्या भारतीय राजकारणाबद्दल डॉ.आंबेडकरांनी मांडलेले मत आजही चपखल वाटते.

गेल्या काही दिवसांत भारतीय न्यायालयांनी दीर्घ काळ आठवणीत राहतील, असे निर्णय दिले आहेत. तिहेरी तलाकला दणका दिल्यापाठोपाठ ‘खासगीपणा हा मूलभूत अधिकार नसल्याचा’ केंद्र सरकारचा युक्तिवाद मोडून काढत खासगीपण जपण्याला घटनात्मकतेचं कोंदण देणारा निर्णय आला आणि लगेचच बाबा रामरहीम नावाच्या भोंदूला त्याची सगळी ताकद, समर्थकांच्या फौजांचा हिंसाचार, वेठीला धरण्याची क्षमता, राजकीय वरदहस्त असल्या कशाचीही पत्रास न ठेवता दिलेला झटका न्यायव्यवस्थेवरचा विश्वास बळकट करणारा आहे. तोंडानं कायद्याच्या राज्याची भाषा करायची आणि कुणी बडा अडकतो म्हटल्यावर शक्य तेवढे ‘किंतु-परंतु’ वाटेत आणायचे ही आपल्याकडची रीत. रामरहिमसाठीही ती वापरात आली. मात्र, न्यायालयानं बाबाचा न्याय केला. खऱ्या अध्यात्माला बदनाम करणाऱ्या दुकानदारीवर एक प्रहार जरूर झाला आहे. डेरा समर्थकांकडून झालेल्या हिंसाचाराची पूर्वकल्पना असूनही या हिंसाचाराला आवर घालता आला नाही म्हणून हरयाणा शासनावर भरपूर टीका झाली, कोर्टाने ताशेरे ओढले परिणामी बाबाला कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली तेव्हा अनागोंदीची पुनरावृत्ती सरकारने होऊ दिली नाही. पण मुळात बाबा आणि बाबाचे अनुयायी यांना राज्य शासनाने कायदा हातात घेण्याची इतकी मुभा का दिली गेली, हा प्रश्न उरतो.बाबाच्या मागे लाखोंच्या संख्येने अनुयायी का गोळा होतात हा दुसरा प्रश्न आणि हे असे किती बाबा देशभरात घटनाबाह्य शक्तिपीठं होऊन बसले आहेत, हा तिसरा प्रश्न. बाबाला शिक्षा फर्मावली आणि त्याची तुरुंगात रवानगी झाली; आता तो वरच्या कोर्टात अपील करेल वगरे गोष्टी घडत राहतील, पण या तीन प्रश्नांचा विचार व्हायला हवा. भारतीय जनतेचा बाबा मंडळींप्रति आणि एकूणच अध्यात्माप्रति असलेला भाबडा दृष्टिकोन हा देखील एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर एकीकडे दोन भगिनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रचंड शक्तिमान बाबाच्या विरोधात शेवटपर्यंत लढा देतात तर दुसरीकडे मात्र त्या पीडित भगिनींना साथ देण्याऐवजी बलात्कारी बाबासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरतात याला काय म्हणावे? आपल्याच भगिनींवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज न उठवता उलट आरोपीला सहकार्य करतात यावरून अशा धर्मद्रोही लोकांचे प्रस्थ वाढविण्यासाठी आपणच दोषी आहोत असेच म्हणावे लागेल. या देशाला सध्या अशा हरामखोर धर्मगुरूंपासूनच खरा धोका आहे. अतिरेक्यांचा वावर देशाच्या सीमेपुरता आहे आणि आमचे शूर जवान स्वत:च्या प्राणाचे बलिदान देऊन अतिरेक्यांचा खात्माही करीत आहेत. परंतु धर्माच्या नावावर नंगानाच करणारे हे धार्मिक अतिरेकी यांचा खात्मा कसा करायचा हे एक फार मोठे आव्हान देशासमोर निर्माण झाले आहे. राजकारणी काहीच करू शकणार नाहीत, कारण सर्वपक्षीय राजकारणी यांचे भक्त आहेत.

राजकारणी, उद्योगपती आणि बाबा लोकांची युती एक दिवस या देशाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की. तेव्हा आता वैचारिक बठक असलेल्या लोकांनीच अशा देशद्रोही बुवा, बापूंचा नायनाट करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. बाबा रामरहिमसारख्या वृत्ती बळावण्याचे कारण आपल्या देवभोळ्या मानसिकतेत आहे. माळ घालून गोपीचंदनाची नामाटी ओढणाऱ्याची विश्वासार्हता व प्रतिष्ठा गावात ‘बाय डिफॉल्ट’ इतरांपेक्षा जास्त असते. भगवी वस्त्रे घालून आयुर्वेदाचे नाव घेत एखादा बाबा ग्राहकांची मानसिकता कोळून प्यायलेल्या मार्केटिंग तज्ज्ञांच्या उरावर थयथया नाचत त्यांना पुरते झोपवू शकतो. पिढय़ान्पिढय़ा जीन्सच्या नेणिवेवर नोंदला गेलेला अध्यात्माचा गंज धुवून जायला

अजून बरीच युगे लोटावी लागणार आहेत..तोवर कोणतीही व्यवस्था अशा बाबा-बुवांचे काहीही वाकडे करू शकणार नाही हे मात्र खरे.

(फग्र्युसन महाविद्यालय, पुणे)