28 May 2020

News Flash

प्रयत्ने वसति लक्ष्मी:

आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते आणि आपल्या वास्तव्यासाठी ती योग्य जागा शोधत असते.

(संग्रहित छायाचित्र)

 

मेधा सोमण

या वर्षी २७ ऑक्टोबर म्हणजेच आज लक्ष्मी-कुबेर पूजन करावयाचे आहे. आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी प्रदोषकाली लक्ष्मीपूजन करावे, असे शास्त्रग्रंथात सांगण्यात आले आहे. या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६-०६ पासून रात्री ८-३७ पर्यंत प्रदोषकाल आहे.

आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते आणि आपल्या वास्तव्यासाठी ती योग्य जागा शोधत असते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, नैतिकता, प्रामाणिकपणा, मेहनत यांचा निवास असतो त्या ठिकाणी लक्ष्मी आकर्षित होते आणि तेथेच ती राहते.

लक्ष्मी म्हणजेच श्री, संपत्ती, समृद्धी, सौंदर्य, वैभव, कीर्ती, कांती मांगल्य! श्री म्हणजे शोभा- सौंदर्य असे ऋग्वेदातही सांगितलेले आहे. त्यामुळे लक्ष्मी म्हणजेच श्री आणि श्री म्हणजेच लक्ष्मी होय.

पुराणामधून देवदानवांच्या समुद्रमंथनाची कथा सांगितलेली आहे. देवदानवांनी समुद्रमंथन केले त्या वेळी चौदा रत्ने बाहेर आली. त्या वेळी लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी समुद्रमंथनातून बाहेर आली. अलक्ष्मी म्हणजे दारिद्रय़, विपत्ती, कलह, अस्वच्छता, आळस, अनैतिकता, खोटेपणा! अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण म्हणूनच समजली जाते.

आश्विन अमावास्येला लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. त्याचबरोबर अलक्ष्मी निस्सारणही केले जाते.

अलक्ष्मी निस्सारण म्हणजे अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाणे! अलक्ष्मीचे तोंड काळे, डोळे लाल आणि केस पिंगट होते. तिच्या शरीरावर वार्धक्याच्या खुणा होत्या. समुद्रमंथनातून वर आल्यावर तिने देवांना विचारले- ‘मी कुठे राहू?’ देव म्हणाले- ‘तू कोळसे, केस, केरकचरा, अस्थी, अस्वच्छ जागा असेल तेथे तू राहा. ज्या घरात कलह असेल, जिथे असत्य भाषण चालू असेल, जिथे अभक्ष्य भक्षण असेल, जिथे देव, गुरू, माता-पिता, अतिथी यांचा अनादर होत असेल, जिथे परद्रव्यहरण, परदारागमन, सज्जन निंदा होत असेल तेथे तू राहा.’

अलक्ष्मीचे वाहन ‘गाढव’ असून, तिच्या हातात ‘झाडू’ हे शस्त्र असते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची प्रतीक आहे. ती आपल्या घरातून निघून जावी यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते.

लक्ष्मी ही ऐश्वर्य, समृद्धी, संपन्नता देणारी असल्याने लक्ष्मीची आठ रूपे कल्पिलेली आहेत. धान्य लक्ष्मी, धन लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, शौर्य लक्ष्मी, विद्या लक्ष्मी, कीर्ती लक्ष्मी, विजय लक्ष्मी आणि राज्य लक्ष्मी अशी ती आठ रूपे वंदनीय ठरली आहेत. कमळ, हत्ती, सुवर्ण, स्वस्तिक आणि बिल्वफळ या वस्तू तिला प्रिय आहेत. कमळ जसं पवित्र, निर्मळ असतं तसं सन्मार्गाने मिळविलेलं आणि सन्मार्गासाठी खर्च होणारं धन म्हणजेच लक्ष्मी होय. बिल्वफळ म्हणजे श्रीफळ! आयुर्वेदात हे औषधी म्हणून सांगितलेले आहे. लक्ष्मी ही हत्तीच्या आवाजाने जागी होते असं श्रीसूक्तात सांगितलेले आहे. आश्विन महिन्यात शेतात तयार झालेली पिके सुवर्णासारखी समृद्ध दिसतात. स्वस्तिक हे ‘श्री’पासूनच निर्माण झालेले आहे, म्हणून लक्ष्मीला या सर्व गोष्टी प्रिय आहेत.

महाभारतातील शांती पर्वात लक्ष्मीला कुठे राहणे आवडते ते सांगितलेले आहे. लक्ष्मी म्हणते- ‘‘मी प्रयत्नात राहते. प्रयत्नांच्या फलात राहते. मी उद्योगरूप आहे. मी समृद्धी आहे. मी धर्मात्मे आणि सत्यवादी माणसांकडे राहते. जोपर्यंत असुर सत्याला स्मरून वागत होते तोपर्यंत मी त्यांच्याही घरी राहिले. पण त्यांची बुद्धी भ्रष्ट होताच मी त्यांचा त्याग केला. शांती, प्रेम, दया, सलोखा, न्यायनीती, औदार्य मला जास्त प्रिय असते.’’

लक्ष्मी-अलक्ष्मी

एकदा लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणी गप्पा मारीत बसल्या होत्या. बोलता बोलता लक्ष्मी म्हणाली, ‘सगळ्या लोकांना मीच हवी असते, म्हणून ते माझीच प्रार्थना करतात.’’ त्यावर अलक्ष्मी म्हणाली- ‘असं तुला वाटतं; पण मी जेथे वास्तव्याला असते तेथे लोक खूप मेहनत करायला प्रवृत्त होतात. माझं दुसरं नाव ‘विपत्ती’पण आहे. कुंतीने भगवान कृष्णापाशी, ‘मला विपत्ती दे म्हणजे मला तुझी वारंवार आठवण येईल,’ असं मागणं मागितलं होतं. संकटात, आपत्तीत असतानाच लोकांना देवाची आठवण जास्त येत असते.’’ त्यावर भांडत भांडत दोघी ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की, ‘‘पृथ्वीवर भारत देश आहे. त्या देशात जिनदास नावाचे एक तत्त्वज्ञ राहतात. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना तुमचा प्रश्न विचारा.’’ त्याप्रमाणे दोघीही भारत देशात आल्या. जिनदासांकडे जाऊन दोघींनीही वादाचा विषय सांगितला.

लक्ष्मी म्हणाली- ‘‘मी लक्ष्मी म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धी! लोक माझीच प्रार्थना करून माझीच इच्छा करतात. मीच त्यांना हवी असते. तुम्ही मीच श्रेष्ठ असा निर्णय दिलात तर मी तुमच्या घरी कायमची राहीन.’’

अलक्ष्मी म्हणजे विपत्ती म्हणाली- ‘‘महोदय, मी अलक्ष्मी! मी जेथे राहते तेथे लोक जास्त मेहनत करायला सुरुवात करतात. परमेश्वराचे ते नेहमी स्मरण करतात. परमेश्वराची नेहमी भक्ती करतात. मी श्रेष्ठ आहे असे तुम्ही सांगितलेत तर मी तुमच्या घरी कायमची राहीन.’’

तत्त्वज्ञ जिनदास त्या दोघींना म्हणाले- ‘‘मला जरा चिंतन-विचार करू दे. तुम्ही शांत व्हा. समोर असलेल्या वृक्षाला स्पर्श करून या. मग मी माझा निर्णय तुम्हाला सांगतो.’’

त्यानंतर लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघीही चालत चालत वृक्षाला हात लावून परत जिनदासांकडे आल्या. दोघीही त्यांचा निर्णय ऐकण्यासाठी उत्सुक होत्या.

जिनदास म्हणाले- ‘‘अलक्ष्मी तू मोठी बहीण आहेस. तू जेव्हा इथून वृक्षाला हात लावायला गेलीस तेव्हा तुझं चालणं, तुझं जाणं तेव्हा जास्त आकर्षक, आनंददायी वाटलं. तेव्हा.. तू जाताना श्रेष्ठ वाटलीस. लक्ष्मी तू लहान बहीण आहेस. तू वृक्षाला हात लावून परत येताना जास्त आकर्षक, आनंददायी वाटत होतं. तेव्हा येताना तू श्रेष्ठ वाटलीस.’’

त्यावर दोघी समजायचं ते समजल्या. दोघीही श्रेष्ठ होत्या. पण अलक्ष्मी जाताना आणि लक्ष्मी येताना!

सर्वाना असेच वाटत असते. अलक्ष्मीचे घरातून जाणे आणि लक्ष्मीचे घरात येणे हेच प्रत्येकाला हवेहवेसे वाटत असते. छ

लक्ष्मीपूजन करताना..

लक्ष्मी म्हणजे भगवान विष्णूची पत्नी. ती धनलक्ष्मी होय. म्हणून या दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा करावी. लक्ष्मीची पूजा करताना एका चौरंगावर तांदूळ पसरवावेत. त्यावर हळद-कुंकवाने अष्टदळ काढावे. त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. मूर्ती नसल्यास सोने-चांदी, नवीन नोटांची गड्डी, भरपूर नाणी ठेवावीत.गायीच्या दुधाचा खवा, साखर, लवंग, वेलची एकत्र केलेला प्रसाद, धने, गूळ, साळीच्या लाह्य, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला अर्पण करावेत. क्षुधा पीडितांना भोजन (अन्नदान) घालावे. रात्री जागरण करावे. मध्यरात्रीनंतर सुपे व दिमडी वाजवून अलक्ष्मी हाकलून द्यावे. संतानलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी अशी एक ना अनेक रूपे लक्ष्मीची आहेत.

जगातील सर्व संपत्तीचा रक्षणकर्ता कुबेर आहे. एवढी संपत्ती तो रक्षण करतो पण त्याला धनाचा अजिबात मोह नाही. कधीच तो रागावणार नाही. शांत, निर्मळ, स्थितप्रक्ष, संयमी, उदासमूर्ती कुबेराला लक्ष्मी शेजारीच ठेवून पूजा करावी. कुबेराची प्रतिमा सोनाराकडे मिळते. ती सोन्याचीच असावी. कारण कुबेर आपल्या संपत्तीचा पालनकर्ता आहे.

‘धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच। भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि सम्पद॥

निधी व पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेरा तुला माझा नमस्कार. तुझ्या कृपेने मला धन-धान्यादी प्राप्त होवो व रक्षितही होवो, अशी स्तुती करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2019 1:31 am

Web Title: loksatta special article on diwali laxmi pujan abn 97
Next Stories
1 नागरी बँकिंग क्षेत्राला हवे आहे- अष्टावधानी संचालक मंडळ!
2 चाँदनी चौकातून : नाइलाजच!
3 ‘मोदी प्रतिमाना’ला पहिले आव्हान?
Just Now!
X