सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

ती घटना आठवून भवानसिंग आजही झोपू शकत नाहीत. मृत्यू आलाच तर तो आपल्या माणसांत यावा म्हणून चालत निघाले होते हजारो-लाखो लोक त्या काळात. साथरोगाने कवेत घेतलेच तर किमान आपल्या जवळचे कोणीतरी सोबतीला असावे असे माणसाला वाटणे स्वाभाविकच होते. म्हणूनच जालन्याच्या सळ्यांच्या कारखान्यात काम करणारे ‘ते’ वीसजण टाळेबंदीची पर्वा न करता रेल्वे- रूळावरून चालत राहिले रात्रभर. भूक लागली म्हणून जवळ असलेली शिदोरी खाल्ली आणि पाणी प्यायल्यानंतर थकल्या-भागलेल्या या जीवांचा कधी डोळा लागला, हे त्यांनादेखील कळलेच नाही. पहाटे पाचच्या सुमारास रेल्वे इंजिनच्या करकचून लावलेल्या ब्रेकचा आवाज काहींनी ऐकला, तेव्हा रूळावर आपल्याच १६ साथीदारांचे मृतदेह पाहून भवानसिंग सुन्न झाले होते. आजही त्यांना ही घटना आठवली की दु:खाने ते कळवळतात. आपल्या गावी निघालेल्या त्या २० जणांपैकी गावात पोहोचू शकलेल्या भवानसिंग यांचे आयुष्य तेव्हा होते त्यापेक्षा आज अधिक कठीण झाले आहे. ते आता गावातील यादवांच्या शेतात मजूर म्हणून काम करतात. सळ्यांच्या कारखान्यात त्यांना प्रतिदिन ४०० रुपये रोजंदारी मिळायची. आज शेतात मजुरी करून त्यांना कसेबसे २०० रुपयेच मिळतात. जगणं हे असं नेहमी र्अधच असतं असं म्हणतात तेच खरं. भवानसिंगांचा जीव वाचला असला तरी जगणं मात्र आक्रसून गेलंय. त्यांच्या घरातील सगळे लोक मजुरी करतात. गावात मजुरी मिळणं बंद झालं की पुन्हा त्यांना गाव सोडावं लागेल. त्यामुळे अजूनही त्यांना भीती वाटते आहे.

आता करोना लसीची चर्चा सुरू झाली असली तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल? समजा, पोहोचलीच आणि करोना साथ ओसरली, तरी ते पुन्हा महाराष्ट्रात कामाच्या ठिकाणी परततील?

टाळेबंदीतील भीषण अपघाताच्या त्या घटनेनंतर श्रमिक रेल्वेचे दळणवळण वाढले. परंतु तत्पूर्वी भवानसिंग यांच्यासारख्या मजुरांनी आपल्या मूळ गावी परतल्यास त्यांना परत येऊ दिलं जावं की नाही, यावरून बरीच खळखळ माजली होती. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ या राज्यांना त्यासाठी वारंवार विनंती करावी लागली. या मजुरांना संसर्ग झाला असणार हे गृहीत धरून त्यांना राज्यात परत येऊ  देण्यास काही सरकारे तयार नव्हती. श्रमिकांच्या बाजूने कोणीच नसते अशीच स्थिती होती. पण राज्य सरकारातील काही अधिकाऱ्यांनी या मजुरांची खाण्यापिण्याची, राहण्याची सोय केली.  रेल्वेने या मजुरांना आपापल्या राज्यांत पाठवण्यासाठी तिकीट कोणी काढायचे यावरूनही बरीच खळखळ झाली. करोनामुळे तेव्हा श्रमिकांचे अर्थशास्त्र बिघडले होते ते आजही पूर्ववत झाले आहे असे नाही. भवानसिंगांसारखंच अनेकांचं जगणं आज आक्रसून गेलंय. त्यांनी सुरुवातीला महिनाभर काहीच काम केलं नाही. पण नंतर घरात रिकामं बसणं शक्यच नव्हतं. प्रतिदिन २०० रुपये मजुरीवर ते आज राबताहेत. भय ही गेल्या वर्षभराची देन होती जणू. त्या भयछायेत वावणारी माणसं आजही मानसिकदृष्टय़ा सावरलेली नाहीत. ज्या रेल्वेखाली हा अपघात झाला त्याचे चालक राम आशिषकुमार म्हणतात, ‘आजही त्या भागातील रूळावरून गाडी घेऊन जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा छातीचे ठोक वाढतात. सारे बळ एकवटून पुन: पुन्हा रेल्वे रूळावर कोणी नाही ना, हे मी घाबरून पाहत असतो. त्या घटनेचं भय मनात दाटलं आहे. मोठंच दु:ख उराशी बाळगून जगतो आहोत आम्ही. तो अपघात विषाणूभयाचा होता.’

विषाणूभयाने अनेकांची आयुष्यं बदलली. मुखपट्टी तोंडाला लावूनही करोनाने किती माणसं मेली, याची आकडेवारी दररोज तपासणारी शासन यंत्रणा ‘आता लस येईल’ या दिलाशात असतानाच पुन्हा एकदा नव्या रूपात हा विषाणू आल्याच्या वृत्ताने धास्तावली आहे. वर्षांचा शेवटही पुन्हा भय वाढवणाराच ठरतो आहे. करोनाने असंख्य जणांची रोजीरोटी गेली. प्राणभयास्तव आपल्या गावांकडे निघालेल्यांपैकी किती जण सुखरुप पोहोचू शकले, किती वाटेतच प्राण गमावून बसले, याची कसलीच नोंद शासनाकडे नाही. या अपघातानंतर तरी किमान आपापल्या गावी पोहोचण्यासाठी कष्टकऱ्यांसाठी श्रमिक एक्सप्रेस सोडल्या गेल्या, हेही नसे थोडके.