News Flash

नवी नावं, जुन्या खुणा!

मुंबई बदलते आहे, या बदलाचे वारे अनेकांना सुखावणारेदेखील आहेत, त्यामुळे हा बदल हवाहवासाही आहे. तरीही, त्या नव्या बदलाची जुनी ओळख कायम राहावी, अशी एक सुप्त

| March 22, 2015 02:36 am

मुंबई बदलते आहे, या बदलाचे वारे अनेकांना सुखावणारेदेखील आहेत, त्यामुळे हा बदल हवाहवासाही आहे. तरीही, त्या नव्या बदलाची जुनी ओळख कायम राहावी, अशी एक सुप्त इच्छा खऱ्या मुंबईकराच्या मनात कायमची घर करून राहिलेली दिसते.. ‘स्वराज्यभूमी’ला विरोध नसतो; पण ‘गिरगाव चौपाटी’च अधिक हवी असते..

एखाद्या मुलाला कौतुकानं एखादं छानसं नाव ठेवावं आणि ते उच्चारायला अवघड वाटतं, म्हणून त्याला भावडय़ा, बंडय़ा, दाद्या असं काही तरी टोपणनाव ठेवावं आणि याच नावानिशी त्यानं मोठं व्हावं तशी मुंबईची अवस्था व्हायला लागली आहे. उपनगरातून शहराकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या नवख्यांना त्यामुळे अनेकदा भांबावल्यासारखं होत असेल. उतरायच्या स्टॉपचं तिकीट कंडक्टरकडे मागितल्यावर ‘मुंबईत नवा दिसतोय’ असा भाव आणत कंडक्टरनं स्वभावातली अवघी कणव डोळ्यांत साठवत आपल्याकडे vv06बघितलं, की जे ओशाळेपण येतं, त्याला तोड नाही. जुना मुंबईकर आणि नवा मुंबईकर यांच्यातील फरक ओळखायचं हे एक हुकमी साधन झालंय. तुम्हाला गोपाळराव देशमुख रस्त्यावर जायचं असतं. स्टॉप आला की सांगा, असं कंडक्टरला सांगून तुम्ही निर्धास्त होता आणि गाडी शेवटच्या स्टॉपवर जाऊन थांबते, तेव्हा तुम्ही कंडक्टरशी हुज्जत घालू लागता. मी स्टॉप आल्यावर आवाज दिला होता, असं कंडक्टर शांतपणे सांगतो. मग आपण आजूबाजूच्या प्रवाशांची साक्ष काढतो आणि तिथेही आपली फजिती होते. पेडर रोडचा स्टॉप आल्यावर कंडक्टरने तसा पुकारा केला होता, हेच सांगून सहप्रवासीही तुम्हालाच वेडय़ात काढतात. मग खरोखरीच ओशाळेपण येतं. जुन्या ओळखीच्या खुणा झपाटय़ानं अदृश्य होताहेत, तरीही त्या खुणांची नावं स्वीकारायला मात्र जुना मुंबईकर तयार नसतो, हे जाणवतं. कारण, हे शहर दररोज नवं रूप धारण करत असलं, तरी त्याच्या नवेपणातला इतिहास जपण्याची उराउरी धडपड जुना मुंबईकर करतो आहे.. खरं म्हणजे, नव्याने अस्तित्वात येणाऱ्या नव्या खुणादेखील इतिहासाला उजाळा देण्यासाठीच धडपडत असतात. पण ते मात्र जुन्या मुंबईकराला मानवत नाही..
असं का होत असेल?..  मुंबई बदलते आहे, या बदलाचे वारे अनेकांना सुखावणारेदेखील आहेत, त्यामुळे हा बदल हवाहवासाही आहे. तरीही, त्या नव्या बदलाची जुनी ओळख कायम राहावी, अशी एक सुप्त इच्छा खऱ्या मुंबईकराच्या मनात कायमची घर करून राहिलेली दिसते. मुंबईच्या गल्लीबोळाच्या, रस्त्याच्या आणि प्रत्येक भागाच्या नावामागे एक इतिहास आहे. म्हणूनच, मराठी बाणा जागा असूनही ‘अँटॉप हिल’ भागाच्या इंग्रजाळलेल्या नावासाठी कुणी राजकीय पक्षांनी आंदोलनं केली नसावीत. अँटॉप हिलचा हा परिसर म्हणजे, इतिहासातल्या कुणा मराठमोळ्या ‘अंतोबाची टेकडी’च आहे, ही सुखावणारी जाणीव कदाचित त्यामागे असावी. चर्नी रोड परिसरात पूर्वी कधी तरी गुरांचं चराऊ कुरण होतं. गुरांच्या चरणीची जागा असलेल्या त्या भागाला इंग्रजांनी मराठीच्या अर्धवट ज्ञानापोटी चर्नी रोड नाव दिलं असावं, याचाही अभिमान जुन्या मुंबईकराच्या मनात ताजा आहे. दक्षिण मुंबईत फेरफटका मारताना, गिरगाव चौपाटीच्या आसपास कुठे तरी  ‘खोटे फुटपाथ’ नावाची एक पाटी दिसते आणि पावलं थबकतात. मुंबईत ‘खरे फुटपाथ’ अदृश्य होऊ लागताना, एक फुटपाथ नावासह आपलं अस्तित्व शाबूत ठेवतो, या जाणिवेनं एखाद्या जुन्या मुंबईकराचं मन भरूनही येतं. मराठी माणूस जिथून बाहेर फेकला गेला, त्या भागात अजूनही ‘ओक लेन’ नावाचा महापालिकेचा एखादा फलक दिसतो आणि मन सुखावतं. पण ओक हे एखाद्या माणसाचं आडनाव नसतं, तर कधी काळी त्या रस्त्यावर असलेल्या ओकच्या झाडाची आठवण त्या रस्त्यानं जपलेली असते. ‘टॅमिरड लेन’ नावाच्या रस्त्यावरही कधी काळी चिंचेची भरपूर झाडं होती. आता तो इतिहास झाला. तरी नावाच्या रूपानं तो जिवंत ठेवण्याची धडपड मात्र अजूनही ताजी दिसते. चार-पाच दशकांपूर्वी, नोकरीधंद्याचं जमलं तरच मुंबईला यायचं, असा ‘मराठी बाणा’ असलेल्यांच्या गावाकडच्या घराघरांत, सणासुदीच्या निमित्तानं मुंबईहून येणारा चाकरमानी मुलांसाठी मुंबईची खेळणी आणायचा. त्यात ‘नवा व्यापार’ नावाचा बैठा खेळ दिसला, की अवघी मुंबई कवेत आल्यासारख्या आनंदानं घरातली मुलंबाळं हरखून जायची आणि पट मांडला जायचा. मुंबईची पहिली ओळख अशी घरबसल्या व्हायची आणि त्या पटावरची नावं पाठ करूनच मनातलं मुंबईचं रूप सजवलं जायचं. पुढे प्रत्यक्षात मुंबईला आलं, की वेगळीच नावं समोर दिसायची. बोरीबंदरचं छत्रपती शिवाजी टर्मिनस झालं, तरी त्याला लघुरूपात ‘छशिट’ असं रेल्वेसोबत ‘बेस्ट’ही म्हणते आणि लोकमान्य टिळकांच्या नावानं उभं राहिलेलं लोकमान्य टिळक टर्मिनस असो, नाही तर शीवचं महापालिका रुग्णालय असो, ‘एलटी टर्मिनस’ नाही तर ‘सायन हॉस्पिटल’ म्हणूनच त्याची ओळख पक्की व्हायची. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव उच्चारलं तरी अभिमानानं ज्यांची छाती फुलून येते, त्यांना दादरच्या शिवाजी पार्कबाहेरचा रस्ता मात्र, ‘कॅडल रोड’ म्हणूनच आपला वाटतो आणि ‘एस. व्ही. रोड’चं खरं नाव ‘स्वामी विवेकानंद मार्ग’ आहे, हे अनेकांना माहीतच नसतं. गिरगावातल्या ऑपेरा हाऊसकडून निघून पोर्तुगीज चर्चच्या रस्त्याने पुढे आलं, की लागणाऱ्या ‘बनाम हॉल लेन’चं कधी काळी डी. डी. साठे मार्ग असं नामकरण झालेलं होतं, हे गिरगावकरांनाही फारसं आठवत नसेल. अंधेरीहून निघून चर्नी रोड स्टेशनजवळ जाणाऱ्या बेस्ट बसवर ‘पं. पलुस्कर चौक’ असा फलक दिसला, तरी शेवटचा थांबा मात्र, ‘ऑपेरा हाऊस’चाच असतो..
कालांतरानं राजकीय नेत्यांनी लोकभावनांचा मुलामा देत रस्ते, जागांना नवी नावं दिली. लालबाग-परळसारखा मराठमोळा भाग व्यापारी संकुलांनी गजबजू लागताच ‘अप्पर वरली’ असं ‘श्रीमंत’ नाव घेऊन दिमाख दाखवू लागला असला, तरी तिथे राहणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडून वसई-विरार किंवा डोंबिवली-कल्याणला फेकले गेलेल्या मूळच्या मुंबईकरांना लालबाग किंवा परळच आपलं वाटत असतं. नव्या नावांचा मुलामा लेवून ताजेतवाने झालेल्या अनेक ठिकाणांचा जुना चेहरा आठवताना खरा मुंबईकर आजही हरखून जातो. गिरगावच्या समुद्रकिनाऱ्याची चौपाटी हे मुंबईकराच्या हक्काचं विरंगुळ्याचं ठिकाण आता नव्या मुंबईकरासाठी नवी ओळख घेऊन येत आहे. आता चौपाटी ‘स्वराज्यभूमी’ असेल. म्हणजे, चौपाटीसमोरच्या रस्त्यावरील बस थांब्यावरील पाटी बदलेल. ‘स्वराज्यभूमी’ अशी अक्षरं तिथे दिसू लागतील. पण तुम्ही कधी बसने प्रवास केलात आणि स्वराज्यभूमीचा बसथांबा आल्यावर सांगा असं कंडक्टरला सांगून निर्धास्त झालात, तर चौपाटीचा स्टॉप येऊन गेल्याचं तुम्हाला कळणारदेखील नाही. वाळूत रेघोटय़ा मारत भविष्याची स्वप्नं रंगविणाऱ्यांसाठी, रविवारच्या संध्याकाळचा सुंदर सूर्यास्त न्याहाळत मस्तपकी हुंदडणाऱ्या, भेळपुरी, गंडेरी, नारळपाणी चाखत सुट्टी घालविणाऱ्या बच्चे कंपनीसाठी आणि सूर्यास्तानंतर चढत जाणाऱ्या रात्रीच्या मस्त गारव्यात रस्त्याकडेच्या कठडय़ावर उघडेबंब होऊन भय्याच्या हातून तेलानं अंग रगडून मालिश करून घेणाऱ्या  ‘बेपारी’ वर्गासाठी मात्र नवी ‘स्वराज्यभूमी’, जुनी ‘चौपाटी’च असणार आहे. स्वराज्यभूमी या नावानं कदाचित इतिहासाचा गौरव होईल. स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्कासाठी लढणाऱ्या लोकमान्यांच्या स्मृतीला नवी ओळख मिळेल, पण रविवारच्या आणि सुट्टीच्या संध्याकाळी, भेळपुरी खायला ‘स्वराज्यभूमी’वर जायचं, ही कल्पना मात्र तितकीशी रुचणार नाही. मग स्वराज्यभूमी हे नाव कदाचित कागदावरच राहील आणि ‘व्यापारा’च्या ‘पटा’वरून ओळखीची झालेली गिरगावची चौपाटीच, नव्या चेहऱ्यानं झगमगणाऱ्या मुंबईवरच्या बाकीच्या जुन्या खुणांसारखीच आपली वाटत राहील..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 2:36 am

Web Title: mumbai new names old landmarks
Next Stories
1 महाराष्ट्राचा बुलंद आवाज!
2 लोककलेतील शेवटचा तारा!
3 अपप्रवृत्तींवर प्रहार करणारा शाहीर
Just Now!
X