मराठवाडय़ातील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. शैला लोहिया यांचे नुकतेच निधन झाले. अनाथांना ‘किनारा’ देण्याचे काम करताना ‘मनस्विनी’ या त्यांच्या प्रकल्पाने कित्येक महिलांनाही स्वतच्या पायावरच उभे केले. एका ज्येष्ठ पत्रकाराने जागवलेल्या त्यांच्या आठवणी..

प्रसंग तसा साधाच होता; पण अचानक गुंतागुंत झाल्याने जरा टेन्शन होते. आमच्या एका कार्यकर्ता मित्राने आंतरजातीय विवाह ठरवला. मुलगी धुळ्याची होती आणि ‘भारत जोडो’च्या निमित्ताने (१९८४-८५) मी धुळ्यातच होतो, अन् शैला द्वारकादास लोहिया यासुद्धा त्यांच्या माहेरी; पण ‘भारत जोडो’च्या स्वागतात मग्न होत्या. मी त्यांच्या कानावर ते लग्नप्रकरण घातले. त्यांना म्हटले, तुम्ही धुळ्याच्या. मुलगी इथलीच. बघा, जरा मध्यस्थी करा. आंतरजातीय विवाह होऊ घातलाय म्हटल्यावर शैलाभाभींच्या जणू अंगातच संचारले. त्यांनी २-४ तासांत सगळे जमवून टाकले. वरती एक छानसे भाषण दिले. मला आजही आठवते त्यांनी ‘अहिराणी भाषेत’ जो दृष्टांत त्या वेळी रस्साळ-मधाळ भाषेत सांगितला, तो प्रचंड सेन्टी होता अन् आंतरजातीय विवाह करण्यास धजावणाऱ्यांना प्रोत्साहित करणारासुद्धा. शैलाभाभींच्या व्यक्तित्वामधील तीन पातळ्यांचे दर्शन त्या वेळी झाले. १) सामाजिक मूल्यांसाठीचा आग्रह २) लोकभाषेवरील प्रभुत्व ३) कौटुंबिक ताणतणावात सहजपणे समुपदेशन करण्याची हातोटी. स्वत: आंतरजातीय विवाह करून त्या चळवळीला पुढावा देण्याचे मोठेच काम त्यांनी मराठवाडय़ात ४०-५० वर्षांपूर्वी केले. आमच्यापकी काहीजण तर अशा जोडप्यांना परस्पर अंबाजोगाईला त्यांच्याकडे पाठवून देत.
ध्येयवाद आणि चळवळीसाठी खस्ता खाण्याचे बाळकडू त्यांना वडील शंकरराव व आई शकुंतलाबाई परांजपे यांच्याकडून मिळाले. शंकरराव तसे बंडखोर आणि फटकळ. धुळ्यातील सर्व पक्षीय नेते त्यांना घाबरूनच असत. शेकापमध्येही काही काळ ते होते; पण िपड समाजवादी. त्यामुळे शैलाभाभींनी त्यातील नेमके गुण वेचले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेवून राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समजावून देण्याचे कसब त्यांनी वडील शंकरराव यांच्याकडून घेतलेले दिसते आणि आई शकुंतलाबाईंकडून अपार श्रमाचा वारसा मिळालेल्या शैला लोहियांना ‘भाभी’ हा किताब चळवळीतील कार्यकर्त्यांनीच दिला. लोहिया कुटुंबात त्यांना जरी भाभी म्हटले जायचे तरी लातूर-बीडमधील शेकडो तरुण-तरुणींनाही त्या मोठय़ा वहिनी वा वहिनीप्रमाणे वाटायच्या, हे त्यांचे वैशिष्टय़. लग्नानंतर धुळ्याहून त्या बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाईमध्ये राहणार म्हटल्यावरच अनेकांनी नाके मुरडली होती. पती द्वारकादास लोहिया हे वैद्यकीय व्यवसाय ग्रामीण भागात करण्यात आग्रही होते आणि हा व्यवसाय त्यांना खासगी नव्हे तर सार्वजनिक करायचा असल्याने शैलाभाभींनी अंबाजोगाई ही अखेपर्यंत आपली कर्मभूमीच मानली. मराठवाडय़ात त्या वेळी अशी काही मोजकी कुटुंबे होती ज्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा राबता असे. भाभींचे ‘किनारा’ घर आणि मानवलोक संस्था म्हणजे धबडगाच असे. ६५ ते ७५ या काळात समाजवादी युवजन सभा युक्रांद-संघर्ष वाहिनी, राष्ट्र सेवा दल अशा संघटनांची पर्वणी होती. अंबाजोगाईत तेव्हा दलित युवक आघाडीचा जोर होता. भाभींचा संपर्क सर्वत्रच असल्याने त्यांच्या घरातील बठकीत समाजवादी, दुसऱ्या खोलीत युक्रांदवाले, तर स्वयंपाकघरात सेवा दल. अमर हबीब हे संघर्ष वाहिनीचे कार्यकत्रे यावरून भाभींना म्हणायचेसुद्धा, तुमच्या घरात समाजवादांच्या विविध छटा नांदताहेत. अमर हबीब- अण्णा खंदारे- अशोक गुंजाळ, ज्ञानेश रेड्डी, मोरे अशा अठरापगड जाती-जमातींच्या तरुणांचा राबता कायम भाभी आणि डॉक्टरांच्या भोवती असे; पण विचाराने समाजवादी असूनही त्यांनी अंब्यात मुलींचा जो पहिला मोर्चा काढला तो भिन्न विचारांच्या ‘अभाविप’ संघटनेच्या विद्याíथनींना युवक काँग्रेसच्या टग्यांकडून होणाऱ्या त्रासाविरुद्ध. ‘नामर्दाचा धिक्कार असो’ अशा घोषणा १९६७ मध्ये अंब्यात घुमल्या अन् भाभींचे नाव जिल्हाभर झाले.
शैलाभाभींचे वैशिष्टय़ म्हणजे मराठवाडय़ातील पहिली लोकाभिमुख स्वयंसेवी संस्था मानवलोक. मनस्विनी, धडपड अशा संस्थाही त्यांनी यशस्वीपणे उभारल्या. लोहियांच्या ग्रामविकास, शेती आणि जलसंधारणविषयक दूरदृष्टीने या दाम्पत्याच्या या स्वयंसेवी संस्थेने फार मूलभूत काम मराठवाडय़ाच्या बाहेरही केले. आज बचत गटांचा बोलबोला आहे; पण भाभींनी १५ वर्षांपूर्वी स्वयंरोजगार निर्मितीच्या भूमिकेतून ‘मनस्विनी’तर्फे गृहपदार्थाची निर्मिती केली. मनस्विनी व धडपडचे ‘पापड’ तर जिल्ह्य़ात इतके लोकप्रिय झाले होते की, धाबे आणि हॉटेलवाले पापडांसाठी रांगा लावायचे. १२ अनाथ मुलांचे पालकत्व भाभींनी स्वीकारले होते. आज विविध राज्यांत व परदेशात ही मुले स्थायिक आहेत. अनाथांना ‘किनारा’ देण्याचे कामही त्यांनी प्रथम सुरू केले. योगेश्वरी या नामांकित कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांचा लौकिक दूर होता. साहित्याची उत्तम जाण व सर्जनशीलतेमुळे त्यांनी शिकवलेल्या कविता व धडे समजावून घेणे विद्यार्थ्यांना पर्वणीच वाटे. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधांवर त्यांनी बरेच लेखन केल्यावर पुढेही ‘भूमी आणि स्त्री’ या वेगळ्या विषयावर त्यांनी डॉक्टरेटही मिळवली. भुलाबाईची गाणी, भोंडल्याची गाणी आणि लोकसाहित्यातील अनेक रचनांचा संघर्ष भाभींकडे होता. खरे म्हणजे त्यांना ही आवड ६३ ते ७५ या काळात राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातील कामामुळे लागली. अंब्यासारख्या ठिकाणी ४० वर्षांपूर्वी ५० मुला-मुलींचा एक सांस्कृतिक गट त्यांनी निर्माण केला आणि राष्ट्र सेवा दलाचे हे कलापथक भाभींनी गावोगाव नेले. एक वगनाटय़ केल्यावर प्रबोधनपर रचनाही त्या सादर करत. डॉ. लोहियासुद्धा त्यांना उत्तम साथ देत. पु. ल. देशपांडे यांच्या एका सादरीकरणाने तर राम नगरकर आणि लीलाधर हेगडे हेसुद्धा प्रभावित झाले होते. लोकरंजनातून लोकशिक्षण ही संकल्पना कलापथकातून त्यांनी बीड, लातूर भागांत राबवली. परित्यक्ता, अत्याचारित महिला, स्त्री आरोग्य, विद्याíथनींचे प्रश्न यावर त्यांनी ४० वर्षांपूर्वीच बीडसारख्या मागास भागात एक भक्कम उभारणी केली. त्यांच्या या कामाचा इतका गवगवा होता की, अक्षरश: भाभींना पाहायला शेकडो बायका रोज येत असत. किमान १२ पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार त्यांनी मिळवले. चार परदेशी विद्यापीठांमध्ये जाऊन भारतीय स्त्री आणि स्त्रीवादी साहित्यावर त्यांनी निबंधवाचन केले. स्थानिक ते मुंबई-पुण्यापर्यंतच्या सर्व वृत्तपत्रांतून कसदार स्फुटलेखन त्यांनी केले. ‘गजाआडच्या कविता’ हा आणीबाणीनंतरचा त्यांचा काव्यसंग्रहही वेगळाच आहे. ‘स्वयंसिद्धा’ ही बाल कादंबरीही प्रसिद्ध आहे. ‘तिच्या डायरीची पाने’ हा ललित लेखनाचा संग्रहही काहीसा वेगळा म्हणता येईल. सासर आणि माहेरच्या द्वंद्वात अडकलेल्या अनेकांना शैलाभाभी या शेवटपर्यंत आधार वाटल्या. ‘मनस्विनी’ या त्यांच्या प्रकल्पाने तर कित्येक महिलांना स्वत:च्या पायावरच उभे केले. चिकाटी, जिद्द आणि परिश्रमांबरोबरच जीवनाचा आनंद उपभोगण्यातही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही आणि म्हणूनच शेवटपर्यंत शैलाभाभी या ‘लाइव्ह’ राहिल्या.