News Flash

पाळीव पशुपक्ष्यांची उन्हाळय़ातील काळजी

जनावरांना मुळातच उष्णता नियमन हे योग्य प्रकारे करता येत नाही.

व्यंकटराव घोरपडे

उन्हाळा वाढला, की सगळय़ांचीच तगमग सुरू होते. मग याला पाळीव जनावरे, पक्षी तरी कसे अपवाद ठरणार? या भाजणाऱ्या उन्हात पाळीव पशुपक्ष्यांची काळजी कशी घ्यायची याची उपयुक्त माहिती..

वाढता उन्हाळा, तापमान वाढ ही आता नियमित बाब होऊ लागली आहे. इथून पुढे आपल्याला याचा मुकाबला प्रत्येक पातळीवर करावा लागणार आहे. किंबहुना वाढते ऊन आणि कडक उन्हाळ्याबरोबर आपल्याला पुढे जावे लागणार आहे. आपल्याला दैनंदिन व्यवहारात बदल करावे लागणार आहेत आणि ते आपण करत आहोत. यामध्ये पशुधन, पशुधनउद्योग तरी कसा मागे राहणार?  एकूणच येणाऱ्या काळातील पशुधनाचे, प्राणिजन्य उत्पादनाचे महत्त्व ओळखून संबंधित सर्व घटकांनी याबाबत पुढाकार घेऊन त्या समस्येवर उपाय शोधणं आणि ते अमलात आणून पशुधनासाठी उन्हाळा सुखकर करून उत्पादन घट रोखणे ही काळाची गरज बनली आहे.

जनावरांना मुळातच उष्णता नियमन हे योग्य प्रकारे करता येत नाही. तशी सोय निसर्गत त्यांच्यामध्ये नाही. घामाच्या रूपाने उष्णतेचे नियमन करण्यासाठी घामाच्या ग्रंथींची पुरेशी वाढ नसल्यामुळे श्वासोच्छवासाची गती वाढवून त्या मार्गाने ते त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटात किण्वन प्रक्रियेद्वारे उष्णता निर्माण होत असते. ती बाहेर टाकण्यासाठी जनावरांना विशेष प्रयत्न करावे लागतात. दिवसभर अशी उष्णता शरीरात साठवून रात्रीच्या वेळी तापमान कमी झाल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न जनावरे करतात.

जनावरांमध्ये फक्त तापमान वाढ  हे ताण निर्माण करत नाही, तर हवेतील आद्र्रता सुद्धा महत्त्वाची आहे. साधारणपणे ४० डिग्री सेल्सियस (१०४ डिग्री फॅरनाईट) च्या वरती तापमान जर सात ते आठ तास राहिले तर जनावर धापा टाकते, मोठय़ा प्रमाणात तोंडाने श्वासोच्छवास करते, श्वासोच्छवासाची गती वाढते, लाळ गाळते, घामाच्या रूपाने उष्णता बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न करते व पाणी पिण्याकडे त्याचा कल वाढतो. म्हणून तापमानवाढीचा ताण हा वाढलेले तापमान, हवेतील आद्र्रता, त्याचबरोबर बाष्पीभवनाची गती यावर अवलंबून असते. ४० डिग्री सेंटिग्रेड तापमानात साधारण श्वासाचा दर प्रति मिनिट १०० पर्यंत वाढतो.

वाढलेल्या तापमानात जनावरांचे उत्पादन घटते. शारीरिक तापमान स्थिर ठेवण्यासाठी तोंडाने श्वासोच्छवास सुरू होतो. त्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर सोडला जातो,लाळ गळते, त्यामुळे शरीराचे बफर संतुलन बिघडते. सामू बिघडतो आणि त्याचा थेट परिणाम पोटातील किण्वन प्रक्रियेवर होऊन पचनशक्ती कमी होते. शरीरातील अन्न घटकाच्या शोषणावर परिणाम होऊन उत्पादनावर थेट परिणाम होतो. जनावरांची हालचाल कमी होते. बेचनी वाढते. गार वारा, सावली कडे जनावर धाव घेते. शक्यतो निवांत बसून रवंथ न करता उभे राहून धापा टाकते. मोठय़ा प्रमाणात तोंडाने श्वास घेणे सुरू होते. लाळ गळते, वैरण कमी खातात. ज्यादा पाणी पिण्याकडे कल वाढतो, परिणामी लघवी करण्याचेही प्रमाण वाढते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रोलाईटची कमतरता निर्माण होते. वजन घटते. एकूण खाण्याचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत घटते, त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. जवळजवळ ४० ते ५० टक्के दूध उत्पादन घटते. दुधाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो. फॅट, एसएनएफ घटते. कासेवर परिणाम होऊन स्तनदाहचे प्रमाण वाढते. चयापचयांच्या आजारांचे प्रमाण वाढते. मायांग बाहेर पडणे, कासेवर सूज येणे, लंगडणे असे प्रकार देखील वाढीस लागतात. या ताणतणावामुळे जनावरातील तात्पुरत्या वंध्यत्वाचे प्रमाण वाढते.  प्रति जनावर कृत्रिम रेतनांची संख्या सुद्धा वाढते. पशुपालकांना नेमका माज ओळखणे अवघड जाते, त्यामुळे भाकड काळ वाढतो. दुधाचे दिवस कमी होतात. पुष्कळ वेळेला जनावरे मुदतीपूर्वी वेतात, कमी वजनाची वासरे निर्माण होतात. वासरांच्या वजन वाढीवर देखील त्याचा परिणाम होतो. एकूणच शरीरातील पोटॅशियम, सोडियम बायकाबरेनेटचे प्रमाण कमी होते. ताण-तणाव वाढल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. साधारणपणे २० डिग्री सेल्सियस तापमानात दुधातील जनावर १८.२ किलो वैरण (सुका चारा) खाऊन २७ लिटर दूध उत्पादन देते व ६५ लिटर पाणी पिते.तेच जनावर उष्णतेच्या ताणतणावात ४० डिग्री सेल्सिअस तापमानात १०.२ किलो वैरण (सुका चारा)  खाऊन फक्त ११.८ लिटर दूध उत्पादन देते व १००-१०६ लिटर पाणी पिते, इतका परिणाम उष्णतेच्या ताणतणावामुळे जनावरावर होत असतो.

उपाय योजना

सगळ्यात प्रथम सर्व जनावरांना थंड पाणी आणि चांगल्या प्रकारचा निवारा उपलब्ध करून द्यायला हवा. उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे ते सहज उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी खूप अंतरावर जावे लागू नये. जनावराच्या संख्येवर पाण्याची उपलब्धता ठेवावी. जनावरात पाणी पिण्याची स्पर्धा होता कामा नये अशी उपलब्धता करावी. साधारणपणे ०.६५ स्क्वेअर फूट जागा प्रति जनावर पाण्याच्या पातळीवर असावी, जेणेकरून सर्व जनावरांना निवांतपणे पाणी पिणे शक्य होईल. आपल्या गोठय़ातील पाणी पिण्याच्या जागा व टाक्या पूर्णपणे रिकाम्या होत असतील तर नक्कीच त्यामध्ये वाढ करायला हवी हे जाणून घ्यावे. त्याचबरोबर तुषार सिंचनाचा वापर करून वातावरण थंड ठेवता येऊ शकते. मोठय़ा पंख्यांची सोय देखील करता येऊ शकते. याद्वारे मोठय़ा प्रमाणात जनावरांच्या शरीरावर हवेचा झोत सोडून स्प्रिंकलर मुळे ओले झालेले शरीर थंड करता येऊन चांगले परिणाम मिळवता येतात. कमीत कमी तंतुमय पदार्थ असणारी वैरण जनावरांना खाऊ घालावी, जेणेकरून पचनसंस्थेवर ताण येणार नाही. साधारणपणे क्रुड प्रथिनांचे प्रमाण वाढवून आहार संतुलित करणे आवश्यक आहे. चांगल्या प्रतीचे खनिज मिश्रण देणे, तसेच अ,ड,ई, जीवनसत्त्वाचे  प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. ६० ते ७० टक्के पशुखाद्य हे रात्रीच्या वेळी आठ ते सकाळी आठ पर्यंत द्यावीत, तसेच थंड काळात सकाळी लवकर व उशिरा रात्री वैरण टाकल्यास त्याचे चांगले परिणाम आढळून येतात. जनावरे चरायला सोडणार असाल तर सकाळी लवकर व उशिरा संध्याकाळी सोडावे. मोठय़ा प्रमाणामध्ये अ जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी पातळ औषधे, पावडरी याचा वापर करावा. तातडीची गरज असल्यास इंजेक्शनच्या रूपाने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत. गार पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कमी जनावरांना मोठाले रांजण किंवा जादा जनावरांसाठी जमिनीखाली टाकी बांधून घ्यावी जेणेकरून १२ ते १८ डिग्री सेल्सियस गार पाणी मिळेल. गोठय़ाची उंची मध्यभागी १५ ते १७ फूट ठेवून पूर्व-पश्चिम गोठा बांधला असता हवा खेळती राहून उष्णतेचा त्रास कमी जाणवेल.

उन्हाळ्यातील ताण – ज्या वेळी जनावरे उन्हाळ्यात चरायला सोडल्यावर डबक्यात साठलेले गढूळ,गरम पाणी पितात, त्या वेळी जनावरांना जोराची पातळ हागवण लागते, जनावर मलूल होऊन सारखी तहान लागते, उत्पादन घटते.

उष्माघात – या मध्ये कडक उन्हात जनावरे चरायला सोडली, जवळपास सावली नसेल तर धाप लागणे, लाळ गळणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात.अशावेळी तत्काळ जनावरांना सावली करून गार पाण्याने धुऊन घेऊन बर्फाच्या पाण्याने एनिमा द्यावा म्हणजे ताबडतोब त्रास कमी होतो.

किरळ लागणे (हायड्रोसायनिक आम्ल विषबाधा) – या मध्ये ज्वारीची कापणी नुकतीच झालेली असते ,त्यामुळे काही ठिकाणी जर त्याला फुटवा फुटलेला असेल तर ती फूट जनावरांनी खाल्ली की त्यात असणाऱ्या हायड्रोसायनिक आम्लाची विषबाधा होते. त्यामुळे लाळ गळणे, चक्कर येणे, थरथर कापणे, पोट फुगणे अशी लक्षणे दिसतात. अशा ज्वारीच्या फु टवा  फुटलेल्या शेतात जनावरे चरायला सोडू नये.बाधा झाल्यास ताबडतोब तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. अशाप्रकारच्या उन्हाळी आजाराबाबत नेमकी काळजी आणि तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करून घेऊन नुकसान टाळता येते.

शेळ्या मेंढय़ांची काळजी – उन्हात चरायला सोडू नये. सकाळी आणि संध्याकाळी ऊन खाली असेल त्यावेळी सोडावे. शेड जर पत्र्याचा असेल तर त्यावर नारळाच्या झावळ्या किंवा खराब कडबा, सरमाड टाकून आच्छादन करून घ्यावे. त्यामुळे शेडमधील तापमान कमी राहण्यास मदत होते. शेळ्यांना थंड (जास्त थंड नसावे) पाणी मिळू शकेल अशी व्यवस्था करावी. उन्हाळ्यात शेळ्या पाणी जास्त पितात. त्यासाठी पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.

बंदिस्त शेड मध्ये जर शेड नेट असेल तर त्यावर पाणी मारून ठेवले तर शेड थोडे थंड राहण्यास मदत होते. शेड भोवती झाडे लावून घेतली (उदा. हादगा, सुबाभूळ, लिंब, इत्यादी) तर त्याची नैसर्गिकरीत्या तापमान कमी राहण्यास मदत होते.

जर शेड मोठय़ा झाडाखाली असेल तर शेळ्यांना सावली मिळून उन्हापासून थोडे संरक्षण मिळते. लहान पिल्लाना उष्णेतेचा जास्त त्रास होतो, त्यांची काळजी घ्यावी. शेडमध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. काही शेडमध्ये उन्हाळ्यापुरते फॉगर सुद्धा वापरले जातात. खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात दिली तर शेळ्यांना अशा वेळी आराम मिळतो.एखाद्या शेळीच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे ती कमजोर झाली आहे का यावर रोज लक्ष ठेवावे.

कुक्कुटपालन – उन्हाळ्यात कुक्कु टपालनावर, कोंबडय़ांच्या आरोग्यावर देखील फार मोठा परिणाम होतो. मांस, अंडी उत्पादनावर थेट परिणाम होतो. वातावरणातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास पक्ष्यांना धोका उत्पन्न होतो. त्यामुळे पोल्ट्री शेडचे तापमान नियंत्रित करणे आवश्यक आहे. पिल्लांपेक्षा मोठे पक्षी ज्यादा वाढीव तापमानाला बळी पडतात. त्यांना श्वास घेताना त्रास होतो. कोंबडय़ातही घामाच्या ग्रंथी नसल्याने श्वसनाद्वारे उष्णता नियमन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शेडमध्ये पंखे, फॉगर, शेडचे पत्रे तापू नये म्हणून भिंतीवर, छतावर आतून-बाहेरून चुना मारावा. शेडवर तुषार सिंचनाने पाणी सोडल्यास उन्हाळ्यात त्रास कमी जाणवेल. शेडभोवती गवत, झाडे लावावीत. झाडांच्या फांद्यांमुळे वायुविजनास अडथळा येणार नाही हे पाहावे. शेडभोवती पाणी शिंपडल्यास देखील उष्णतेची तीव्रता कमी करता येते. शेडमध्ये पक्ष्यांची गर्दी होता कामा नये. प्रतिपक्षी १.१ ते १.२ चौरस फूट जागा ठेवावी. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यावर शेड,छत करावे. शक्यतो काळ्या  टाक्यांऐवजी पांढरा टाक्या वापराव्यात. शेडमध्ये हवा खेळती ठेवावी. वारंवार भांडय़ातील पाणी बदलावे तसेच पाईप लाईन मधील पाणी देखील बदलत राहावे. मोठय़ा जनावरांप्रमाणे थंड तापमानाच्या वेळी खाद्य द्यावे.

तापमान वाढीच्या येणाऱ्या काळात आपल्याला एकूणच आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये ज्याप्रमाणे बदल करावे लागतात त्या पद्धतीने सर्व पशुपक्ष्यांच्या व्यवस्थापनामध्ये नेमके आणि शास्त्रीय बदल घडवून सर्व पशुपक्ष्यांना उन्हाळा, तापमानवाढ सुस केल्यास  उत्पादनवाढ  नियमित ठेवून आर्थिक फायदा मिळवता येईल हे निश्चित.

(लेखक पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:28 am

Web Title: pet animals care in summer season zws 70
Next Stories
1 महाराष्ट्रातील कॉफी लागवडीचे प्रयोग!
2 रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण व्हावेच; पण…
3 विनोबांची भाषिक भूमिका…
Just Now!
X