रा स्व संघाच्या कोकण प्रांतातर्फे गेल्या रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात २५५ ठिकाणी  ‘हिंदू चेतना संगम’चे आयोजन करण्यात आले होते. त्यास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा आढावा घेणारा लेख..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांतातर्फे ७ जानेवारी रोजी हिंदू चेतना संगमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई ते गोवादरम्यान २५५ ठिकाणी ३५ हजार संघाच्या पूर्ण गणवेशातील स्वयंसेवक आणि ७३ हजारांपेक्षा अधिक महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. १५२१ गावांतून आणि २३७३ वस्त्यांतून हा सहभाग होता.

हिंदू चेतना संगमाची नोंदणी २०१७ च्या दसऱ्यापासून सुरू झाली होती. घरोघरी संपर्क करण्याला प्राधान्य दिले होते. पथनाटय़, जॉइन आरएसएसचे स्टॉल या द्वारे हिंदू चेतना संगमाची माहिती दिली जात होती.

संघाचे यापूर्वी कार्यक्रम केंद्रित स्वरूपाचे होत. एका मध्यवर्ती ठिकाणी सर्व भागांतून स्वयंसेवक, नागरिक एकत्र येत असत. संघकामाचा विस्तार त्यातून दिसून येत असे. संघाचे संख्याबळ दिसत असे.  रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताने हिंदू चेतना संगम विकेंद्रित योजला होता. विकेंद्रीकरणामुळे संख्याबळाचे शक्तिप्रदर्शन झाले नाही.

स्वयंसेवकांचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण, वस्ती-वस्तीत संपर्क, सामान्य व्यक्तीतील चांगुलपणाला हाक, संघ कामाचा विस्तार यासह समाजहितासाठी भाषा-पंथ-जात आणि आर्थिक भेद बाजूला सारून एकत्र येण्याचा सामूहिक प्रयत्न यावर लक्ष केंद्रित केले होते. या उपक्रमानिमित्त स्वयंसेवकांनी नागरिकांच्या घेतलेल्या थेट भेटीमुळे समाजाशी आपुलकीचा संवाद होण्यास मदत झाली. आपल्या सभोवताली काय घडत आहे, कुटुंबांतून काय चर्चा होत आहेत, समाजाच्या हृदयाची धकधक कोणत्या कारणाने वाढते, ठोके कोणत्या बाबींमुळे स्थिर राहतात, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे काय परिणाम होतात, हे समजून घेण्याचा यातून प्रयत्न झाला.

घर, संसार, ऑफिस, करिअर, नातेवाईक, मित्र, कौटुंबिक कार्यक्रम, आजारपण, सुख-दु:ख, सण-उत्सव, इच्छा-स्वप्न या स्वाभाविक जगण्याला रोज नव्या उमेदीने सामोरी जाणारी व्यक्ती, मानवी समूह कसा विचार करतात? त्यांची व्यक्त होण्याची पद्धत काय? हे जाणून घेतले गेले. विचारांची देवाण-घेवाण झाली. मनोव्यापाराची, भाव-भावनांची माहिती यातून संकलित झाली आहे. हीच माहिती स्वयंसेवकांना आपल्या परिसराचा सर्वागीण विकास करण्यास उपयोगी ठरेल. ‘सर्वजनहिताय – सर्वजनसुखाय’चे उपक्रम यातून सुरू होण्यासाठी मदत होईल.

हिंदू चेतना संगमाच्या यशस्वितेसाठी संघाच्या वयोगट १५ पुढील सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम केले आहेत. तरुण स्वयंसेवकांनी आपल्या बांधिलकीला व्यवस्थापन कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेची जोड देऊन सहभाग दिला आहे.

संघाच्या हिंदू चेतना संगमचे स्वरूप साधेच होते. कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याने त्याच्याविषयी उत्सुकता, कुतूहल होते. ‘सज्जन शक्ती सर्वत्र’ हे घोषवाक्य चर्चिले जात होते. समाजात चांगुलपणा मोठय़ा प्रमाणात आहे, असा विश्वास संघाने संगमानिमित्त व्यक्त करून अधोरेखित केला होता. संघाने व्यक्त  केलेला हा विश्वास हाच समस्त हिंदूंचा डीएनए आहे. हा डीएनए हजारो वर्षांपासून असल्याचे विज्ञानाने सिद्ध केले आहे. संघ त्याच समान गुणसूत्रांच्या आधारे समरस देशाची राष्ट्राची पुनर्माडणी करत आहे. भेदभावविरहित हिंदूपणाचा जागर करत आहे. हिंदू चेतना संगम त्या कामाला पुढे नेणारा ठरेल.

महाविद्यालयीन विद्यार्थी या वयोगटातील स्वयंसेवकांच्या दृष्टीचा विस्तार होण्यास हिंदू चेतना संगमाने सहायकाची भूमिका बजावली आहे. त्यांची संवेदनशीलता उपक्रमाच्या अनुभूतीने वाढीस लागतील. जनसामान्यांची किमान सुखाच्या आधारे रोजचे जगणे जगण्यासाठी होत असलेली त्यांची धडपड या स्वयंसेवकांनी यानिमित्त जवळून पहिली आहे. एक दिवसाच्या हिंदू चेतना संगमची तयारी त्यांच्या मनात काही महिने सुरू होती. यानिमित्त त्यांच्या मनात झालेल्या मानसिक घुसळणीतून हे तरुण स्वयंसेवक सामाजिकदृष्टय़ा अधिक सक्रिय होण्याची प्रक्रिया वेग घेईल.

हिंदू चेतना संगम दिनांक ७ जानेवारी रोजी होता. त्या भीमा-कोरेगावच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर दंगल आणि महाराष्ट्र बंद ही घटना घडली होती. असे काही झाल्यावर हिंदू संघटना, हिंदुत्व, रा. स्व. संघ, अभाविप, भाजप यांवर भरघोस टीका झाली होती. हिंदू चेतना संगमातून या टीकेवर प्रहार होतील, टीकाकारांचा समाचार घेईल असे काही जणांना वाटत होते. संघाकडून प्रत्युत्तर यावे असे वाटत होते. मात्र स्थिर-शांत असलेल्या संघाने या मुद्दय़ाचे भांडवल केले नाही. सर्व २५५ ठिकाणच्या वक्त्यांनी आपल्या भाषणांवर हिंदुत्वावरील जहरी टीकेचे सावट पडू दिले नाही. सर्व ठिकाणची भाषणे अत्यंत संतुलित, संयमी झाली. देशाच्या ऐक्यासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आणि व्यक्तीच्या सन्मानासाठी  हिंदूपण, समरसता याआधारे संघटित होण्याचे आणि चांगुलपणाला कृतिशील करण्याचे आवाहन सौम्य शब्दांतून केले गेले.

हिंदू चेतना संगमसारख्या उपक्रमांची उपलब्धी आणि परिणाम मोजण्याचे शास्त्र विकसित झाले आहे. समाज विज्ञान संस्था, समाजशास्त्रज्ञ याचे मोजमाप करतील. विश्लेषण करून त्यावर समाजशास्त्रीय परिभाषेतून भाष्य करतील. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समाज प्रतिसाद देतो. संघाच्या कार्यक्रमात जाताना तो आपले ‘मी’पण बाजूला ठेवतो. पंथ-भाषा-जात पूर्णत: विसरून समरस हिंदू अशी ओळख सांगतो. मन आणि मतभेदांच्या चौकटीत तो अडकत नाही. ही महत्त्वपूर्ण उपलब्धी मोकळेपणाने स्वीकारावी लागेल. भारताच्या सर्वागीण प्रगतीसाठी, ऐक्य-बंधुभावाचे संवर्धन करण्यासाठी संघाने चालवलेल्या राष्ट्रीय चळवळीत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठय़ा संख्येने पुढे येत राहतील, हा त्याचा सकारात्मक परिणाम असेल.

हिंदू चेतना संगम ही २०१९च्या निवडणुकांची पूर्वतयारी आहे, असे काही जणांनी म्हटले आहे. विकासाचे राजकारण विरुद्ध जातीय राजकारण असाच अजेंडा मांडला जात आहे. समतोल विकासाच्या विजयासाठी सत्य आधारित नॅरेटिव्ह अशा कार्यक्रमातून उभे राहात असेल तर ते ‘बायप्रोडक्ट’ असेल. त्यामुळे संघविरोधक हिंदू चेतना संगम निवडणुकीच्या राजकारणाशी जोडत असले तरी असे अभियान सर्वस्पर्शी राष्ट्रकारणाच्या सबलीकरणात योगदान देणारे ठरते.

मकरंद मुळे mak2244@gmail.com