News Flash

‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा : तपश्चर्या आणि आहुती

मूळ चित्रांबरहुकूम चित्रांमधली प्रमाणे तर राखायची, पण त्यातले तपशील सुटू द्यायचे नाहीत.

रॉबर्ट गिल : १८७९ मधील छायाचित्र

|| प्रदीप आपटे

रॉबर्ट गिल अजिंठ्यात पोहोचला १३ मे १८४५ रोजी; पण ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल संपल्यावरही तो इथेच राहिला… प्रयत्न न सोडता!

अजिंठा लेण्यांनी परदेशी लोकांना फार पूर्वीपासून भुरळ घातलेली आहे. म्हणजे खुद्द लेण्यांपेक्षा फार तर दोन-तीन शतके कमी इतकी ती भुरळदेखील प्राचीन आहे. ब्रिटिश अभ्यासकांमुळे त्याला पुन्हा एकदा उकळी फुटल्यागत उजाळा मिळाला. राल्फ, जेम्स फग्र्युसन यांच्या पाठपुराव्यामुळे तेथील भित्तिचित्रांची पडझड आणि नासधूस यांचा गवगवा झाला. १८४३ साली रॉयल एशियाटिक सोसायटीच्या प्रबंधामध्येच जेम्स फग्र्युसनने गुंफांची पडझड होण्यापूर्वीच त्यांचे जतन करण्याचा, निदान मूळ रूप आहे तसे नोंदवून ठेवण्याचा धोशा लावला होता. त्याने मोठ्या संतापाने कंपनी सरकारला लिहिले होते, ‘‘इथे भेट देणारे प्रेक्षक महाभाग आवडेल ती काही ना काही स्मरणवस्तू ओरबाडल्याखेरीज येथून जात नाहीत. खरे तर ते आपल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याचा पार भुगा होतो. पण असे होता होता थोड्याच काळामध्ये उरलेल्या जगासाठी फक्त धूळधाण शिल्लक राहील.’’ परिणामी गुंफांमधील चित्रे जशी आहेत त्याची निदान रेखाटन-नोंद म्हणावी अशी आवृत्ती लगोलग करून घ्यावी असा विचार जोम धरू लागला. ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने हा पर्याय चोखाळायचे ठरविले. कंपनी सरकारच्या सर्व केंद्रांकडे अशा कामगिरीला लायक कुणी आहे का याचा धांडोळा घ्यायला सुरुवात झाली. मद्रास आर्मीत रॉबर्ट गिल नावाचा एक कॅप्टन होता. त्याची भरती आलेखकार म्हणून झालेली होती. तो उत्तम चित्रकार होता. त्याची या कामासाठी निवड करताना केलेला शिफारशी शेरा असा आहे, ‘‘आलेखकार म्हणून कॅप्टन गिलचे कौशल्य सर्वविदित आहे. प्रस्तावित काम जोखमीचे आहे. ते निभावताना साहसी आयुष्य जगण्याची ओढ पाहिजे. कॅप्टन गिलची कलाकारी साहसाची जी धारणा आहे त्याचा या कामगिरीशी अगदी मेळ बसतो.’’

त्याला नेमून दिलेले काम चांगलेच कठीण होते. तेही अनेक अर्थाने. उष्ण कोरडी हवा, दिवस चढावा तसतसे वाढणारे रणरण तापमान. असाईच्या लढाईच्या वेळी जिथे ड्यूक ऑफ वेलिंग्टन राहात होता तोच बंगला निवासाकरिता गिलला दिला गेला. हा मुक्काम औरंगाबादपासून ६३ मैलांवर किंवा जालन्यापासून ५४ मैलांवर. टपाल घ्यायला किंवा द्यायला, सामानसुमान खरेदीला, पाठविलेली वस्तू मिळवायला किंवा पाठवायला एवढे अंतर तुडविण्याखेरीज तरणोपाय नव्हता. रोज तेथून वाघिरा दरीपर्यंत यायचे. टेकाडे तुडवून लेण्यांशी पोहोचायचे. जनावरांचे भय आणि वाटेवरचा चोराचिलटांचा उपद्रव नेहमीचाच. गिल आणि त्याचा चमू यांची तिथली रोजची हजेरी म्हणजे तर भिल्लांच्या दृष्टीने त्यांच्या मुलुखात केलेली घुसखोरीच! ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गिलबरोबर शरीररक्षक देण्याची शिफारसदेखील केलेली होतीच. प्रवासाची यातायात इतकी की, कित्येकदा एखाद्या जरा बऱ्या गुंफेमध्येच तो आठ-दहा दिवसांसाठी मुक्काम करीत असे (फग्र्युसनने लिहिलेल्या वृत्तांतानुसार क्रमांक वीसची गुंफा). या सगळ्या जिकिरींची त्याला पूर्वकल्पना दिलेली होती. त्यात स्पष्ट लिहिले होते, ‘‘अनेक गुंफांमध्ये इतका अंधार आहे की झगमग दिव्यांखेरीज तिथले काहीही दिसणार नाही. काहींची छताची उंची इतकी आहे की शिडीवजा मचाण बांधूनच तेथील चित्रे दृग्गोचर होतील. काही गुंफांमध्ये चिखल-पाण्याचा  बुजबुजाट आहे. तिथे वायुविजन शून्यवत असते. एकूण वातावरण मलिन आणि रोगट आहे. मधमाश्यांची मोहोळे आणि वाघुळांचे थवे आहेत. भिंती आणि छतावरील ही राड आणि डागाळणाऱ्या मोहोळांचा निचरा केल्याखेरीज चित्रे दिसणार नाहीत.’’

निवड झाल्यानंतर गिल मद्रासहून अजिंठा गावी निघाला डिसेंबर १८४४ मध्ये. त्याला रेखाटन आवृत्त्या बनविणे यासाठी ‘एक सहायक रेखाकार आणि तीन आवृत्ती सहायक’ नेमायची मुभा होती. त्याने वेल्लोरमधला एक निष्णात चित्रकार सहायक म्हणून मिळविला. तो १३ मे १८४५ रोजी पोहोचला. त्यानंतर चार महिन्यांनी सप्टेंबरमध्ये गरजेचे साहित्य (म्हणजे रंग, किन्तान, रंगफळा, कुंचले, तेल, कोळसाकांड्या इ.) पोहोचले.

त्याच्या हातातली चित्रसामग्री अर्थातच मूळ चित्रांपेक्षा अगदीच निराळी होती. त्याच्या किन्तानी पटाचा आकार मूळ चित्रांपेक्षा अर्थातच सरासरीने लहान होता. मूळ चित्रांबरहुकूम चित्रांमधली प्रमाणे तर राखायची, पण त्यातले तपशील सुटू द्यायचे नाहीत. (खरे तर निदान नजरेस पडू शकतात तेवढे तपशील तरी) प्रकाशाची मात्रा, रंगांची ठेवण, छटांचे मिश्रण असा सगळा तोल सांभाळण्याची बिकट कसरत साधायची होती. म्हटले तर चित्राचे चित्र, पण तरी मूळ चित्राचे लघुरूप. काही अगदी ‘लघु’ नव्हती. ९० चौरस फुटांचे किन्तान लागणारीदेखील होती. त्याने बहुतेक गुंफांचे नकाशे बनविले. अनेक चित्र/ शिल्पांतील आकृतींचे साधे सुटे रेखाटन करून केले. त्याची आणखी एक अडचण होती. या चित्रांतले प्रसंग, त्यामागची प्रेरणा आणि धारणा, त्यांचा गर्भितार्थ हे उमगावे तरी कसे? त्याचे आकलन होईल असे जे काही वाङ्मय असेल ते मला पाठवा असे त्याने लिहिलेदेखील. पण त्या काळात बुद्धचरित्र, इतिहास, जातककथा, त्यातील प्रसंग असे सहजसुगम आकलन आणि माहिती तुटपुंजीच होती. जी होती ती या चित्रांत कशी उमटली याची तर सुतराम जाणीव नव्हती.

हे अवजड काम पूर्ण करायला किती काळ लागणार? प्रारंभी गिलला वाटत होते की सुमारे अठरा महिने लागतील! तिथले अडथळे आणि अडचणींचा डोंगर त्याला अजून पुरेसा कळला नव्हता! त्याचे काम हरप्रकारच्या अडचणींनी रेंगाळणार होते. तिथली साफसफाई हे पहिले काम! पावसाळ्यात वाघिरा ओलांडणे आणि वर गुंफांमध्ये पोहोचणे मुश्कील म्हणून काम ठप्प! १८५२ साली तर त्याचे किन्तानी कापडच चोरीला गेले! थंडीमुळे चोरांनी ते पळविले होते! त्यात लेण्यांचा अर्धगोली पसारा! त्यामुळे दिवस चढावा तसतशी प्रत्येक लेण्यांमधील सूर्यप्रकाशाची ठेवण बदलायची. ‘हले सावली प्रकाश तैसा’ न्यायाने काम करण्याची गुंफा बदलणे भाग पडायचे. उंचीवरील रेखाटने मचाणावरती पाठीवर झोपूनच करावी लागायची. १८५३ नंतर धाडलेल्या अनेक अहवालांमध्ये थकवा, आजारपण, रोगराई, औषधांची वानवा याबद्दल अनेकवार तक्रारी आहेत. एकदा चित्र पूर्ण झाले की त्यांचे तेल आणि रंग वाळायला दीड-दोन महिने जायचे. मग ते गुंडाळी करून टिनच्या डब्यात भरायचे. मुंबईमार्गे मद्रासला धाडायचे. कधी मूळ ‘हात देण्या’तील कमतरता व्हायची तर कधी हवा अतिकोरडी व्हायची, कधी सुरळी डब्यात भरताना हेळसांड व्हायची यामुळे काही चित्रांना चिराळलेपणा यायचा.

त्याने पाठविलेल्या रेखाटनांची, त्यावरून लाकडात खोदलेल्या उठावचित्रांची प्रसिद्धी आणि वाहवा होऊ लागली होती. क्रिस्टल पॅलेसमध्ये अनेक प्रकारची प्रदर्शने भरविली जात असत. ईस्ट इंडिया कंपनीच्या म्युझियमला १८५३ साली क्रिस्टल पॅलेस कंपनीच्या संचालकांनी रीतसर विनंती केली. ‘‘भारतीय कला आणि रूढींवर आधारित वेगळे दालन प्रदर्शनात असेल. त्यामध्ये कंपनीच्या संग्रहातील अजिंठा गुंफांची चित्रे प्रदर्शनामध्ये ठेवली गेली तर ती पाहण्याचा अनेकांना लाभ मिळेल. फार मोठ्या प्रमाणावर ती बघितली जातील.’’ या चित्रांचा कौतुकमय उदोउदो झाला. त्या काळात ओवेन जोन्स नावाचा ख्यातकीर्त वास्तुकार आणि नक्षीकार होता. १८५६ साली त्याने दुनियाभरच्या दागिन्यांचे सजावटी नमुने असलेले ‘ग्रामर ऑफ ऑर्नमेन्ट’ हे गाजलेले पुस्तक लिहिले. त्यातली भारतीय नक्षीकामाची उदाहरणे गिलच्या ‘अजिंठा चित्रां’वरून बेतलेली होती! त्याच सुमाराला प्रवाशांसाठी ‘भारतदर्शन’ मार्गदर्शक पुस्तकनिघाले; त्यातदेखील ही लेणी आणि तेथे तळ ठोकून राहिलेल्या गिलचा उल्लेख होता.

या धाडसी कलाकारीचे आपल्याला यथोचित श्रेय मिळावे अशी गिलची स्वाभाविक इच्छा आणि आकांक्षा होती. फग्र्युसनने हे प्रदर्शन पाहिले होते. त्याला या चित्रांचे अपार मोल वाटत होते. परंतु तो प्रदर्शनातील मांडणीवर फार नाराज झाला होता. तेथील प्रकाश यथोचित नसावा. खेरीज ही कुठली चित्रे आहेत? त्यांचे मूळ प्राचीनपण किती? त्यांचा संदर्भ काय? आणि महत्त्व काय? याची काही ओळखदेख न करताच ती मांडली गेली होती, अशी तक्रार त्याने नमूद केली आहे.

पण १८६६ साली या क्रिस्टल हॉल नावाच्या भव्य वास्तूमध्ये मोठी आग लागली आणि गिलची ही तपश्चर्या एका फटक्यात भस्मसात झाली. त्यांचे कोठलेच छायारूपदेखील मागे शिल्लक नव्हते. कोणकोणती चित्रे गमावली हे सांगणेदेखील मुश्कील होते. १८५८ नंतरसुद्धा उरलेसुरले काम आणि खूप पैसे मिळतील या आशेतला बेदरकार छांदिष्टपणा यात रमलेला गिल तिथेच राहिला होता. थोडाफार कर्जबाजारी झाला होता. त्याने मागविलेल्या नव्या धाटणीच्या कॅमेऱ्याने त्याने घेतलेले अनेक फोटो होते. तेही त्याला जरा पडत्या किमतीला कंपनीला विकावे लागले! काही फोटो, रेखाटने आणि अपघातवशाने मद्रास डेपोत पडून राहिल्याने बचावलेली दहा चित्रे सोडली तर मागे राहिली या अवलियाच्या चित्राहुतीची शोकान्त कहाणी.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 12:06 am

Web Title: robert gill to foreigners in ajanta caves akp 94
Next Stories
1  अभ्यासाशिवाय सुटका नाही!
2 ग्राम बीजोत्पादन मोहीम
3 आत्मविश्वास जागवणारी  रेशीम शेती!
Just Now!
X