सुनील कांबळी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या बुधवारी आपल्या लौकिकाला साजेसे धक्कातंत्र अवलंबत घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ राजीनामा द्यावा लागला. आता मिखाईल मिशुस्टीन हे रशियाचे नवे पंतप्रधान झाले. दोन दशकांहून अधिक काळ रशियाची सत्तासूत्रे हाती असलेले पुतिन २०२४ मध्ये अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहेत. त्याआधीच त्यांनी केलेल्या घटनादुरुस्तीच्या घोषणेला मोठे महत्त्व असून, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या निर्णयाचे सखोल विश्लेषण करत नवनवे पैलू उलगडले आहेत.

पुतिन यांनी घटनादुरुस्तीचा निर्णय जाहीर करताना सत्ता आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यात येणार असल्याचा दावा केला. प्रस्तावित सत्ता-पुनर्रचनेनुसार अध्यक्षांकडे कमी आणि संसदेकडे अधिक सत्ता असेल, असे सांगण्यात आले. म्हणजे सध्या अध्यक्षांकडून पंतप्रधानांचे नाव सूचविण्यात येते; संसदेकडून केवळ त्यावर शिक्कामोर्तब होते. आता मात्र पंतप्रधान निवडीचा अधिकार संसदेकडे असेल, असा प्रस्ताव आहे. मात्र, त्यातील सुप्त हेतू वेगळाच असून, पुतिन यांचा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव काय, त्यांचे पुढचे पाऊल काय असेल, याबाबत ‘बीबीसी’ने सखोल विश्लेषण केले आहे.

‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये ‘पुतिन द इम्मॉर्टल’ या शीर्षकाचा लेख आहे. ‘‘जुने एकाधिकारशहा क्वचितच पायउतार होतात किंवा सत्तापटलावरून दूर जातात. त्यामुळे व्लादिमिर पुतिन यांनी बुधवारी घटनादुरुस्तीची घोषणा केली, तेव्हा ते यापुढेही सत्तासूत्रे कायम राखण्याची पायाभरणी करीत आहेत, असे वाटणे साहजिकच आहे. पुतिन हे आजीवन सत्तेत राहण्यासाठी नवनवे डावपेच आखत आहेत,’’ असा या लेखाचा सूर आहे. यापुढे एखाद्या व्यक्तीला आयुष्यभरात दोन वेळाच अध्यक्षपद भूषविता येणार आहे. सध्या सलग दोन वेळाच अध्यक्षपद भूषविता येते, अशी तरतूद आहे. स्टेट कौन्सिलला जादा अधिकार देण्याचाही पुतिन यांचा प्रस्ताव आहे. याच कौन्सिलच्या माध्यमातून सत्तासूत्रे स्वत:कडे ठेवण्याचा पुतिन यांचा प्रयत्न आहे. अर्थात पुतिन यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या अधिकारांना कात्री लागलेली असेल, असे या लेखात म्हटले आहे. ‘पुतिन आणि सत्तेवर पकड ठेवतानाच सन्मानाने पायउतार होण्याची कला’ अशा आशयाचा आणखी एक लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे. या लेखातही पुतिन यांच्या सत्तालोलुपतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

राज्यघटनेद्वारे पुतिन यांनी केलेले हे बंड आहे, असे निरीक्षण नोंदवतानाच याबाबत रशियातील जनतेची काय प्रतिक्रिया असेल, याचा अंदाज घेणारा लेख ‘द वॉशिंग्टन टाइम्स’मध्ये आहे. २००८ मध्ये आपला अध्यक्षपदाचा सलग दुसरा कार्यकाळ संपला, तेव्हा पुतिन यांनी मोठय़ा चलाखीने आपले विश्वासू दिमित्री मेदवेदेव यांना अध्यक्षपदी बसवले. त्या वेळी पंतप्रधानपदाद्वारे पुतिन यांनी सत्तासूत्रे आपल्याकडेच ठेवली होती. आता २०२४ नंतरही सत्तासूत्रे स्वत:कडे राखण्यासाठी पुतिन यांनी नवा मार्ग अवलंबला, असे नमूद करताना या लेखात ‘हुकूमशहांना क्वचितच कार्यकाळमर्यादा लागू होते,’ हे सार्वकालिक सत्य अधोरेखित करण्यात आले आहे.

पुतिन यांच्या आजीवन सत्तेच्या डावपेचांबाबत ‘मॉस्को टाइम्स’पासून ते ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’सारख्या वृत्तपत्रांनी विश्लेषण केले आहे. रशियात सरकार बदलणार असले, तरी रशिया आणि चीन यांच्यातील संबंध दृढ राहतील, असा विश्वास ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’मधील एका लेखात व्यक्त करण्यात आला आहे. किंबहुना पुतिन यांच्याकडे सत्तासूत्रे असल्याने रशियाच्या धोरणात २०२४ पर्यंत आणि त्यानंतरही बदल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज अनेक माध्यमांनी नोंदवला आहे.

‘द गार्डियन’मधील एका लेखात पुतिन यांच्यावर तिखट टीका करण्यात आली आहे. पुतिन हे गुन्हेगार आणि अकार्यक्षम असून, ते रशियन जनतेचे शत्रू आहेत, असे या लेखात म्हटले आहे. प्रचंड भ्रष्टाचार, विरोधकांची गळचेपी, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा, लष्करी आक्रमण ही पुतिन यांच्या राजवटीची वैशिष्टय़े आहेत. आता घटनादुरुस्तीद्वारे पुतिन पुन्हा २०२४ मध्ये अधिक अधिकार असलेले पंतप्रधान किंवा स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष बनू शकतात. पडद्यामागून सत्तासूत्रे आपल्याकडे ठेवण्यासाठी ते आणखी डावपेच आखण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे या लेखात म्हटले आहे.

पुतिन यांनी सत्तासूत्रे हाती ठेवण्याचे सूतोवाच केले असले, तरी ते नेमकी कोणती भूमिका घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जनमत विरोधात जाऊ नये, यासाठी पुतिन यांनी सावध पवित्रा घेतल्याचे मानले जाते. अध्यक्षीय कार्यकाळ २०२४ मध्ये समाप्त झाल्यानंतरचा रशिया कसा असेल, असा प्रश्न पुतिन यांना वर्षभरापूर्वीच विचारण्यात आला होता. त्या वेळी पुतिन यांनी प्रश्नकर्त्यांलाच ‘तुम्हाला इतकी घाई का?’ असा प्रतिप्रश्न करत- ‘मी कुठेही जाणार नाही,’ असे म्हटले होते. या म्हणण्याचा अर्थ पुतिन यांनी बुधवारच्या भाषणातून नव्याने सांगितला आहे!