|| विश्वास पवार

निसर्गाने अन्याय केलेल्या गतिमंद मुलांची समाजात रुळण्याची प्रक्रिया खडतर असते. या मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी व्रतस्थपणे ‘रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट’ कार्यरत आहे. गतिमंद मुलांवर मायेची पखरण करीत त्यांना रोजगारक्षम बनवण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे. या मुलांसह त्यांच्या पालकांसमोर आयुष्यभर उभ्या ठाकलेल्या समस्यांवर मात करणाऱ्या या संस्थेला या सेवाकार्यात समाजाकडून मदतीचे हात हवे आहेत. दानशूरांची मदत या संस्थेच्या कार्याला आणखी बळकटी देऊ शकेल.

‘रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट’ ही संस्था वाई येथे गतिमंद मुले आणि प्रौढांच्या प्रश्नावर गेली ३६ वर्षे निरंतर कार्य करीत आहे. विशेष मुलांच्या गरजा, मर्यादा आणि क्षमता यांचा विचार करून त्यांचे जीवन सुखी, आनंदी आणि अर्थपूर्ण करण्यासाठी ही संस्था झटत आहे. या मुलांचे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक-मानसिक विकास, रोजगार कौशल्य प्रशिक्षण यांची जबाबदारी नेटाने पार पाडत ही संस्था मुलांना स्वत:च्या पायावर उभे करणारी व्यवस्था तयार करते. सध्या संस्थेत १०० हून अधिक गतिमंद मुले शिक्षण घेत आहेत. तेवढय़ाच संख्येने शिक्षण पूर्ण झालेले प्रौढ गतिमंदही संस्थेतर्फे सुरू असलेल्या विविध रोजगार उपक्रमांतून स्वत:च्या पायावर उभे आहेत.

गतिमंद मुलांच्या पालकांनी सुरू केलेली ही संस्था १९८२ साली एका मंदिरात सुरू झाली. पुढे देणगीदाखल मिळालेल्या एक-दोन खोल्यांमध्ये आणि आज स्वत:च्या इमारतीत संस्थेचे काम सुरू आहे. या विशेष मुलांसाठी इथे शाळा आहे. ज्यामध्ये औपचारिक शिक्षणासोबतच कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासही घडवला जातो. हस्तकला-कुटीर उद्योगापासून ते छोटय़ा-मोठय़ा औद्योगिक उत्पादनाच्या निर्मितीपर्यंत इथे विविध कार्ये सुरू आहेत. यातून ही मतिमंद मुलेही स्वत:च्या पायावर उभी राहू लागली आहेत.

या कार्याचा पसारा आता वाढला आहे. या मुलांच्या प्रश्नाची व्यापकता लक्षात घेतली तर तो गरजेचाही आहे. पण हे कार्य सुरू ठेवण्यासाठी संस्थेला निधीची सतत चणचण भासते. अनेक अडचणी-आव्हानांचा सामना करावा लागतो. संस्थेचा दैनंदिन खर्च, कर्मचाऱ्यांचे अल्प वेतन, संस्थेतील व्यवस्था या साऱ्या गोष्टींचा मेळ घालतानाही संस्थाचालकांना रोज कसरत करावी लागत आहे. समाजात उपेक्षेचे जीवन जगणाऱ्या, निसर्गाने काही प्रमाणात अन्याय केलेल्या या मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा, जगण्याचा आशावाद निर्माण व्हावा यासाठी झटणाऱ्यांचे हे कार्य निरंतर सुरू ठेवण्यासाठी संस्थेला मदतीचे हात हवे आहेत.