|| प्रशांत मोरे

विशेष मुलांच्या संगोपनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज ओळखून काही पालकांनी २००४ मध्ये ‘सोबती पालक संघटना’ स्थापन केली. प्रश्न आपला आहे, तर उत्तरही आपणच शोधले पाहिजे, ही त्यामागची भावना. संस्थेने अल्पावधीतच विशेष मुलांच्या पुनर्वसनाचा आदर्श निर्माण केला आहे. संस्थेची आश्वासक सोबत या मुलांना नवी उमेद देत आहे.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांचे संगोपन, शिक्षण हे पालकांपुढचे मोठे आव्हान आहे. क्रमिकशिक्षणाबरोबरच मुला-मुलींनी निरनिराळी कौशल्ये आत्मसात करावीत, यासाठी पालक आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. गरीब असो वा श्रीमंत, कुठल्याही घरात मूल जन्माला येणे ही एक आनंददायी घटना असते. मात्र, काही पालकांच्या आयुष्यात अपत्याचा जन्म ही एक आव्हानांची मालिका घेऊन येते. कारण ते विशेष मुलांचे पालक असतात. आपले मूल जन्मत:च अपंग असल्याचे कळताच त्यांचा अपत्यप्राप्तीचा आनंद लोप पावतो. मग, सुखाच्या जागी काळजी, दडपण, ताण आणि असह्य़ दु:ख या भावना कुटुंबाला घेरून टाकतात. अशा मुलांच्या पालकांना आजन्म कष्टाला पर्याय उरत नाही. शिवाय, समस्या आहे म्हणून स्वस्थ बसूनही चालत नाही. त्याची उत्तरे शोधावी लागतात. मनाच्या या नाजूक अवस्थेत आपले मूल पूर्णपणे बरे होईल, या आशेने पालक आपापल्या परीने उपाय करीत राहतात. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे कुणा एकटय़ा- दुकटय़ाचे काम नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, याची जाणीव झालेल्या विशेष मुलांच्या पालकांनी २००४ मध्ये ‘सोबती पालक संघटना’ स्थापन केली. गेल्या १४ वर्षांच्या वाटचालीत या संस्थेने अपंग पुनर्वसनाचा चांगला आदर्श निर्माण केला आहे. प्रश्न आपला आहे, तर उत्तरही आपणच शोधले पाहिजे, या भावनेने ‘सोबती’ परिवारातील पालकांनी अखंड प्रयत्न आणि कष्टाने वाडा तालुक्यात निवासी संकुल साकारले आहे. शासनाकडून कोणतीही मदत न घेता ही संस्था उभी राहिली हे विशेष.

‘सोबती’तील पालकांपुढे दुहेरी आव्हान आहे. या परिवारात दृष्टिहीन, स्वमग्नता, कर्णबधिरत्व, मतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा पक्षाघात) आदी व्याधी असलेली मुले आहेत. नोकरी-व्यवसाय सांभाळून या विशेष मुलांचे उपचार, थेरेपी, प्रशिक्षण, त्यांच्यासाठी असलेल्या विशेष शाळांचा शोध यात पालकांची दमछाक होऊ  लागली. या मुलांना सर्वसाधारण शाळेत प्रवेश देता येत नाही. त्यामुळे क्रमिक शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी बंदच असतात. मग अशा मुलांचे करायचे काय, हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो.

अंधांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय संघटनेने (नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड-नॅब) अशा पालकांना पहिल्यांदा मदतीचा हात दिला. अंध व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी ‘नॅब’संस्थेची एक योजना आहे. त्या योजनेनुसार ‘नॅब’चे प्रशिक्षित स्वयंसेवक अशा मुलांच्या घरी जातात आणि विशेष मुलगा अथवा मुलीला कसे वागवायचे याचे प्रशिक्षण देतात. विशेष मुला-मुलींना किमान त्यांची कामे त्यांना करता यावीत, ती अधिकाधिक स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरते.

विशेष मुलांसाठी असणारी शाळा किंवा अशा प्रकारची प्रशिक्षण सत्रे ही वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंतच असतात. नंतरच्या काळात मुलाची काळजी त्या कुटुंबालाच घ्यावी लागते. अशी समस्या भेडसावणाऱ्या सर्व कुटुंबांनी एकत्र आले पाहिजे, या विचारातून ‘सोबती’ संस्थेचा जन्म झाला.

२००४ मध्ये ‘सोबती पेरेंट्स असोसिएशन’ या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. संस्थेची स्थापना होण्यापूर्वी प्रत्येक जण आपापले प्रश्न स्वतंत्रपणे सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला आता सामूहिक स्वरूप प्राप्त झाले. सध्या ‘सोबती’ संस्थेत मुंबई-ठाणे परिसरातील १२० पालक सभासद आहेत. २००७ मध्ये ठाण्यात एका विश्वस्त संस्थेच्या जागेत १०-१२ वर्षांवरील मुला-मुलींसाठी ‘सोबती’ने व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नेमले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले-मुली आपापल्या क्षमतेनुसार मणी ओवणे, कुटून मसाले बनविणे, वजन करणे, पॅकिंग करणे, घरघंटी चालविणे अशी कामे शिकली.  ‘वर्क इज वर्शिप’ या उक्तीनुसार मुलांना या कामाची गोडी लागली. सर्वसाधारण मुले जशी शाळेत येतात, तशी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मुले व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात रमू लागली. मुले केंद्रात येऊ  लागल्याने पालकांनाही थोडी उसंत मिळू लागली. त्यांना आपल्या नोकरी-व्यवसायाकडे लक्ष देता येऊ  लागले.

अल्पावधीतच ‘सोबती’च्या या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची कीर्ती सर्वत्र पसरली. पार्किन्सन्स इंटरनॅशनल या अमेरिकेतील संस्थेने ‘सोबती’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच ‘सोबती’ सदस्यांच्या सोयीसाठी अंधेरी इथे दुसरे केंद्र सुरू करण्यासाठी सक्रिय मदत केली. ठाणे आणि अंधेरी येथील दोन केंद्रे हा ‘सोबती’च्या प्रवासाचा एक टप्पा होता. त्यानंतर पालकांना पुढील आव्हानेही दिसू लागली होती. मुले मोठी होत होती. कायमस्वरूपी निवासी पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. माजी आमदार विवेक पंडित यांनी वाडा तालुक्यातील तिळसा येथील त्यांच्या मालकीची पाऊण एकर जमीन संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यानंतर वास्तू उभारण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी निधी संकलनाचे प्रयत्न सुरू केले. दोन-अडीच वर्षांच्या अथक परिश्रमातून १३,५०० चौरस फुटांची देखणी आणि सुसज्ज वास्तू सध्या तिळसा इथे उभी राहिली आहे. या केंद्रात ५० विशेष मुले-मुलींची राहण्याची व्यवस्था आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यापासून ‘सोबती’चे हे निवासी केंद्र सुरू झाले. या केंद्रात मुले सोमवारी सकाळी येतात आणि पुढील पाच दिवस राहून शुक्रवारी दुपारी आपल्या घरी परत येतात. आठवडय़ाच्या अखेरीस पालकांच्या सुट्टीच्या दिवशी मुले त्यांच्या घरी असावीत, हा त्यामागचा हेतू. मुले आणि प्रशिक्षकांच्या सोयीसाठी बस सुविधा आहे. ‘तिळसा’तील केंद्र अतिशय अद्ययावत आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती, कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून इमारतीला पर्यावरणस्नेही दर्जा देण्यात आला आहे.

या निवासी केंद्रात सध्या १२ मुले वास्तव्यास असून सहा प्रशिक्षक कायमस्वरूपी त्यांच्यासोबत असतात. लवकरच निवासी केंद्रात मुलांची संख्या वाढणार असून त्यांच्यासाठी आणखी प्रशिक्षक नेमावे लागणार आहेत. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ‘सोबती’चे उद्दिष्ट या केंद्रामुळे काही प्रमाणात साध्य झाले आहे. या केंद्रात मुलांना तज्ज्ञ प्रशिक्षक विविध प्रकारची कौशल्ये शिकवितात. मोत्यांचे आणि मण्यांचे दागिने बनविणे, मोत्याची तोरणे, राख्या, दिवाळीतील शोभेचे दिवे, चहा मसाला, मुखवास, नैसर्गिक तेलापासून साबण बनविणे, मेणबत्त्या बनविणे, कागदी पिशव्या आदींचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. ‘सोबती’ परिवारातील पालक, हितचिंतक या वस्तूंची ठिकठिकाणी प्रदर्शने भरवून विक्री करतात.

ग्रामीण भागातील मुलांनाही मदत

विशेष मुलांची देखभाल आणि उपचारांचा ग्रामीण भागात अभाव आहे. त्यामुळे तिळसा केंद्रात वाडा तालुक्यातील विशेष मुलांसाठी प्रशिक्षण आणि उपचार केंद्र सुरू करण्याची ‘सोबती’ची योजना आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांकरवी या परिसरात सर्वेक्षण करून अशा मुलांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे आदिवासी विभागातील विशेष मुलांनाही तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल. ल्ल प्रशांत मोरे

धनादेश –‘सोबती पेरेंट्स असोसिएशन’ (SOBATI  PARENTS  ASSOCIATION)

या नावाने काढावा.  धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

सोबती पेरेंट्स असोसिएशन

पालघर जिल्ह्य़ातील वाडा या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ठाण्याहून दर अध्र्या तासाने एसटी बस सेवा उपलब्ध आहे. तिथून सात किलोमीटर अंतरावर तिळसा इथे ‘सोबती’ची निवासी वास्तू असून तिथे जाण्यासाठी सहा आसनी रिक्षांची सेवा उपलब्ध आहे.

  • नोंदणीकृत कार्यालय – १०, अविनाश सोसायटी, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम)
  • निवासी केंद्र- तिळसा, पोस्ट मौजे कासघर, तालुका वाडा, जिल्हा पालघर.

निवास केंद्र व्यवस्थापनासाठी मदतीचा हात हवा..

‘सोबती’ परिवारातील पालकांनी हितचिंतकांच्या मदतीने निवासी केंद्र सुरू तर केले, मात्र त्याचा दैनंदिन खर्च चालविणे ही एक मोठी कसरत आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी यांचे वेतन, दैनंदिन खर्च आणि देखभाल दुरुस्ती यासाठी दरमहा अडीच लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे वर्षभरात हे केंद्र चालविण्यासाठी ३० लाख रुपयांची आवश्यकता आहे. पालकांच्या वर्गणीतून इतका खर्च भागणे अशक्य आहे. त्यात काही पालक आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कमी वर्गणी घेतली जाते. त्यामुळे उर्वरित खर्च देणगीदारांच्या मदतीतूनच भागविला जातो. विशेष मुलांच्या पालकांनी अखंड परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर एक उत्तम पुनर्वसन केंद्र उभारले. मात्र, त्याच्या व्यवस्थापनासाठी दानशूरांकडून मदतीची गरज आहे. नागरिकांनी यथाशक्ती या प्रकल्पाला मदत करावी, असे आवाहन ‘सोबती’ परिवाराने केले आहे.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.