12 December 2017

News Flash

विज्ञान : मोर्चा आणि मार्ग

विचारस्वातंत्र्य धोक्यात आल्यामुळे अस्वस्थ झालेले लेखक, कलाकारही रस्त्यावर येत आहेत.

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ | Updated: August 9, 2017 1:47 AM

आज, ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनी निघणारा वैज्ञानिकांचा मोर्चा ही एरवी कधी न घडणारी घडामोड असल्याने त्यामागील भूमिका समजून घ्यायला हवीच; पण मोर्चानंतर काय याचाही विचार करायला हवा. विज्ञानाकडून लोकविज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हा पूर्वग्रहरहित आणि वैचारिक खुलेपणा जपणाराच असायला हवा..

दिवस मोच्र्याचे, महामोच्र्याचे आहेत. पुन्हा एकदा माणसे आपापल्या मागण्या घेऊन रस्त्यावर येऊ लागली आहेत. त्यात जागतिकीकरणामुळे परिघावर फेकले गेलेले कामगार, शेतकरी यांसारखे समूह आहेत, तसेच विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित राहिल्याचे दु:ख बाळगणारे समूहही (उदा. आरक्षणाची मागणी करणारे जातीविशेष) आहेत. विचारस्वातंत्र्य धोक्यात आल्यामुळे अस्वस्थ झालेले लेखक, कलाकारही रस्त्यावर येत आहेत. आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील रस्त्यांवर आता लोकशक्तीचा हुंकार घुमू लागला आहे. ९ ऑगस्ट २०१७ रोजी भारताच्या विविध शहरांतून निघणारा एक मोर्चा या सर्वापासून आगळावेगळा आहे, तसाच या प्रक्रियेचा तो एक भागही आहे. हा मोर्चा आहे वैज्ञानिकांचा.

भारताच्या इतिहासात आपल्या मागण्यांसाठी देशातील वैज्ञानिक रस्त्यावर उतरत आहेत, ही बाब अभूतपूर्व आहे. आर्थिकदृष्टय़ा संपन्न, संशोधनाच्या जगात रमणाऱ्या या वैज्ञानिकांवर असा कोणता अन्याय झाला, की त्यांना रस्त्यावर यावेसे वाटले, असा प्रश्न स्वाभाविकपणेच कोणाच्याही मनात येईल. कोणाला ‘काँग्रेसच्या राज्यात का नाही काढले असे मोर्चे?’ असा प्रश्नही विचारावासा वाटेल. त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपण या वैज्ञानिकांची भूमिका आधी समजून घेऊ. गेल्या काही वर्षांत विज्ञान व तंत्रज्ञानावरील संशोधनाच्या खर्चात सरकारने कपात केली आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळा, आयआयटी, एनआयटीसारख्या संस्था, तसेच विद्यापीठे या सर्वानाच या कपातीची झळ बसली आहे. तंत्रज्ञानाचा आधार विज्ञान हा आहे व या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने संशोधन करण्याला पर्याय नाही. शिवाय महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या देशात शिक्षणासारख्या मूलभूत जबाबदारीतून सरकार अंग काढून घेत आहे. म्हणून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादाच्या (जीडीपी) किमान ३ टक्के पैसा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनावर व १० टक्के शिक्षणावर खर्च करावा, अशी या मोर्चाची पहिली मागणी आहे. कोणत्याही पक्षाच्या सरकारला ही मागणी मान्य करणे अडचणीचे ठरणार आहे; पण तिच्या योग्यतेबद्दल कोणालाही शंका असण्याचे कारण नाही.

वैज्ञानिकांनी उभा केलेला पुढचा मुद्दा कळीचा, तसेच अनेकांना अस्वस्थ करणारा आहे. तो आहे जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा. तर्कशुद्ध विचार व विश्लेषण करण्याची रीत हा विज्ञानाचा गाभा आहे. कोणी व्यक्ती, ग्रंथ, विचारप्रणाली सांगते म्हणून मी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, तर जी बाब प्रयोगाने सिद्ध करता येते, जी तर्काच्या आधारावर टिकते, तीच मी स्वीकारेन हा झाला वैज्ञानिक बाणा. हा वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांमध्ये रुजविणे हे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे, असे भारतीय संविधानाचा अनुच्छेद ५१क आपल्याला सांगतो. एकविसाव्या शतकातही आपल्या देशात देवदासीसारख्या परंपरा टिकून आहेत. जात्याभिमानाच्या किंवा चेटूक केल्याच्या विकृत कल्पनांमधून येथे हत्या, नरबळीच्या घटना घडतात. ग्रहण, मासिक पाळी यांसारख्या नैसर्गिक घटनांबद्दल सुशिक्षित म्हणविणाऱ्यांच्या मनात आजही जुनाट कल्पना ठाण मांडून आहेत.  या सर्व बाबी आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नसल्याच्याच द्योतक नव्हेत काय? या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांत देशात विज्ञानाला उत्तेजन देण्याऐवजी त्या जागी छद्म-विज्ञानाला – विज्ञानाचा बुरखा पांघरलेल्या अवैज्ञानिक विचारसरणीला – प्रस्थापित करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत, असे या मोच्र्याच्या आयोजकांना वाटते. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागला तर तरुण पिढी पुराणातल्या वांग्यांवर विश्वास ठेवणार नाही, म्हणून हुशार मंडळी आता पुराणातल्या वांग्यांना खोटय़ा विज्ञानाची फोडणी घालून त्यांच्यापुढे वाढत आहेत. गणपतीचा जन्म हे जगातील प्लास्टिक सर्जरीचे पहिले उदाहरण आहे, शंभर कौरव म्हणजे जेनेटिक इंजिनीअरिंग, प्राचीन काळी आमच्या देशात जमिनीवर अनश्व रथ (म्हणजे मोटारगाडय़ा) व आकाशातून विमाने फिरत असत अशा बाबी आता सोशल मीडियातून, थोरामोठय़ांच्या भाषणांतूनच नव्हे तर पाठय़पुस्तकांतून सांगितल्या जात आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत (इंडियन सायन्स काँग्रेस) ‘प्राचीन भारतातील विमानविद्या’ या विषयावर एक तथाकथित शोधनिबंध वाचला गेला. मध्य प्रदेश सरकारने नुकतीच सरकारी रुग्णालयांत डॉक्टरांच्या जोडीला ज्योतिषांना बसवून रुग्णांची कुंडली मांडून त्याआधारे उपचार सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. म्हणजे विज्ञानाची उचलबांगडी करून त्या जागी छद्मविज्ञानाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा तर सरकारचा विचार नाही ना, अशी शंका अनेक वैज्ञानिकांना येऊ  लागली आहे. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे ही आपली संवैधानिक जबाबदारी असल्याची जाणीव सरकारला व जनतेला करून देणे त्यांना आवश्यक वाटले. हाच धागा पुढे वाढवत केवळ वैज्ञानिक आधार असणाऱ्या गोष्टीच शालेय शिक्षणक्रमातून मांडल्या जाव्या व पुराव्याधारित विज्ञानाच्या आधारावर देशाची धोरणे आखली जावीत, अशी या मोच्र्याची मागणी आहे.

झगडा नक्की कशाशी?

भारतीय परंपरेविषयी प्रेम असणाऱ्या काही लोकांना मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनाचे निमित्त करून पुरोगामी मंडळी भाजप सरकार, संघपरिवार यांच्यावर लक्ष्यवेध करीत आहेत अशी शंका येईल. त्यांना वाटतो त्याप्रमाणे हा ‘पाश्चात्त्य विचारसरणी विरुद्ध भारतीय परंपरा’ असा झगडा आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना भारतीय परंपरा म्हणजे काय, पारंपरिक ज्ञानाला विज्ञान मानायचे की नाही, असे प्रश्नही आपण विचारायला हवेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले. आयुर्वेदातील प्रश्नांवर झडणाऱ्या परिषदा, केसस्टडीजवरील चर्चा, वादविमर्श बंद पडले. संशोधन, नवी ज्ञाननिर्मिती यांचा वेग आधी मंदावला, नंतर थंडावला. हे वास्तव आपण मान्य केले तर आपण वृथाभिमानाच्या सापळ्यात सापडणार नाही. त्यासाठीही वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला मदत करील. विमान, रथ, जेनेटिक इंजिनीअरिंग, प्लास्टिक सर्जरी ही सर्व तंत्रज्ञाने आहेत. त्यांचा विकास होण्यापूर्वी समाजात त्यांच्याशी संबंधित विज्ञानशाखांचा विकास होणे आवश्यक असते. हे एकदा कळले, की मग या विज्ञानशाखांचा मागमूस नसताना आपल्या देशात असे तंत्रज्ञान विकसित होणे शक्य नाही हे आपल्याला सहजच कळेल. विमानशास्त्रावरील शोधनिबंधात दाखवलेल्या चित्रांवरून खरेखुरे विमान बनवून ते उडवून का दाखवत नाहीत, असा प्रश्नही मग आपण स्वत:च विचारू शकू. आजच्या विज्ञानाचे निकष लावून गोमूत्रापासून पुष्पक विमानापर्यंतचे दावे आपण तपासून पाहावे असा अभिनिवेशहीन, विवेकी विचार आपल्याला मग करता येईल.

याच विज्ञान-विवेकाची कास धरून या वर्षी २२ एप्रिलला जगभरातील शेकडो शहरांतून १० लाखांहून अधिक वैज्ञानिक-शिक्षक-कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले. भारतात ९ ऑगस्टला निघणारा मोर्चा हे याच प्रक्रियेतील पुढचे पाऊल आहे. संशोधनावरील खर्च कमी करणे, वैज्ञानिक आधारावर प्रस्थापित तथ्ये (उदा. वैश्विक तापमानवाढ) नाकारून छद्म-विज्ञानाचा आधार घेणे व गरीब जनतेच्या शिक्षण-आरोग्यासारख्या मूलभूत बाबींवर होणारा खर्च बंद करून कॉर्पोरेटचा खिसा भरणे या बाबी ट्रम्पच्या अमेरिकेतही होत आहेत. जागतिकीकरणासोबत समस्या व अरिष्टांचेही वैश्विकीकरण झाले असल्याचेच हे द्योतक आहे. वंचित, कलाकार व वैज्ञानिक यांच्या उद्रेकामागील हे समान सूत्र आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

वैचारिक खुलेपणाची गरज

वैज्ञानिकांच्या या कृतीचे स्वागत करतानाच त्यांची पुढची पावले विज्ञान-विवेकाशी सुसंगत असतील अशी अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही. आपल्याला विज्ञानवाद किंवा वैज्ञानिकांची एकाधिकारशाही प्रस्थापित करायची नाही. वैज्ञानिक पद्धत पूर्वग्रहरहित असते, पण वैज्ञानिक हा हाडामांसाचा माणूस असल्यामुळे तो पूर्वग्रहदूषित असू शकतो, त्याला प्रलोभने भुलवू शकतात, स्वार्थ तर्कदुष्टतेकडे नेऊ  शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. यापूर्वी विज्ञान-तंत्रज्ञानाचा (गैर)वापर वंशश्रेष्ठता, वंशशुद्धी, व्यापक संहार, स्त्रियांचे दमन अशा मानवताविरोधी बाबींसाठी करण्यात आला होता, हा इतिहास आहे. आजही विज्ञान-तंत्रज्ञान हे प्रस्थापित व्यवस्थेच्या हितासाठीच वापरले जातात. अनेक वैज्ञानिक ‘पर्यावरणशास्त्र हे विज्ञानच नव्हे’, ‘अणुशक्ती, बीटी बियाणे यांची सुरक्षितता अशा गोष्टी विज्ञानसिद्ध आहेत, त्यांवर चर्चा करण्याचा जनसामान्यांना अधिकार नाही’, ‘आयुर्वेद, पारंपरिक कृषिशास्त्र, आहारशास्त्र हे सर्व थोतांड आहे’ अशा टोकाच्या, पूर्वग्रहदूषित भूमिका घेताना दिसतात. विज्ञानाचा विकास हा वैचारिक खुलेपणाच्या अवकाशात व विवेकाच्या चौकटीत होत असतो. त्याचा गाभा  मानवकेंद्रित व सर्वजनहित हा आहे, हे भान राखले तरच आपली वाटचाल विज्ञानाकडून लोकविज्ञानाकडे होऊ  शकेल. वैज्ञानिकांचा मोर्चा हा या दिशेकडे जाणारे पहिले पाऊल ठरो!उ

लेखक आजचा सुधारकचे संपादक होते. ईमेल : ravindrarp@gmail.com

First Published on August 9, 2017 1:47 am

Web Title: scientist protest across india