अप्पासाहेब धर्माधिकारी

श्रीसमर्थ रामदासस्वामींनी आराध्यदैवत म्हणून श्रीरामाच्या मूर्तीची ठिकठिकाणी स्थापना केली आणि या रामाच्या भक्तीच्या माध्यमातून आत्मारामाशी तादात्म्य साधण्याचा प्रत्येकाला मार्ग दाखविला. श्री तुकाराम महाराजांनी आराध्यदैवत म्हणून विठ्ठलाला मानले व या विठ्ठलाच्या भक्तीतून पांडुरंगाशी तादात्म्य पावण्याचा मार्ग प्रत्येकाला दाखविला. वरवर पाहिले तर हे दोन्ही पंथ वेगवेगळे आहेत असा भास होतो. पण खरे तर संतांचा विश्वात्मक विचार मात्र असा नाही.

आषाढी कार्तिकी । भक्तजन येती ।

पंढरीच्या वाळवंटी । संत गोळा होती ॥

असे या पंढरीचे माहात्म्य वर्णिले गेले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी ही अनेक भक्तजनांसाठी महापर्वणीच असते. संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी या पंढरीचा महिमा अनेकप्रकारे वाढविला आहे. आजही लाखो भक्त या ठिकाणी गोळा होऊन महाभक्तीचा सोहळा साजरा करतात.

महाराष्ट्र ही संतांची खाणच आहे. या सर्व संतांनी प्रत्येकाला जीवनसार्थकतेचा रस्ता दाखविण्यासाठी आपल्या अंतरी असलेल्या चतन्यशक्तीची ओळख करून दिली. या चतन्यशक्तीचे अखंड स्मरण व चिंतन प्रत्येकाकडून व्हावे, हा सर्व संतांचा आजपर्यंतचा संकल्प राहिला आहे. आपल्या प्रयत्नांनी हे स्मरण किंवा चिंतन करायला गेलो, तर अनेक भ्रम तयार होतात किंवा भास निर्माण होतात. थोडक्यात, ही बाब सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचीच आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

मग अशा सर्वसामान्यांनी काय करावे? हे साध्य करून देण्यासाठीच संत जन्माला येतात. आराध्यदैवत म्हणून सगुण मूर्तीचे अधिष्ठान सर्वसामान्यांसाठी उभे करून त्याच्या अर्चनेतून शुद्ध भक्तिभाव उत्पन्न करतात. हा भावच प्रत्येकाला आपल्या अंतरी वसणाऱ्या चतन्यशक्तीशी तादात्म्य पावण्यासाठी मदत करतो. श्रीसमर्थ रामदासस्वामींनी आराध्यदैवत म्हणून श्रीरामाच्या मूर्तीची ठिकठिकाणी स्थापना केली आणि या रामाच्या भक्तीच्या माध्यमातून आत्मारामाशी तादात्म्य साधण्याचा प्रत्येकाला मार्ग दाखविला. श्री तुकाराम महाराजांनी आराध्यदैवत म्हणून विठ्ठलाला मानले व या विठ्ठलाच्या भक्तीतून पांडुरंगाशी तादात्म्य पावण्याचा मार्ग प्रत्येकाला दाखविला. वरवर पाहिले तर हे दोन्ही पंथ वेगवेगळे आहेत असा भास होतो. पण खरे तर संतांचा विश्वात्मक विचार मात्र असा नाही. अतिविशाल दृष्टिकोनातून ते सतत एकच बाब वेगवेगळ्या प्रकारे प्रस्थापित करतात. श्री तुकारामांची धारणा आहे की, विठ्ठलाची भेट होण्याची जागा पंढरी आहे. तेथे पोहचण्याचा मार्ग भक्तीचा आहे. या मार्गावर अखंड नामाचा गजर करीत भक्तिभावाने विठ्ठलाशी एकरूप होता होता देहभान विसरणारे भक्तजन आहेत. सूक्ष्मात हाच विचार दाखवितांना श्री तुकाराम महाराज म्हणतात की, ‘काया ही पंढरी। आत्मा हा विठ्ठल। येथे नांदतो पांडुरंग॥’ ज्या कायारूपी पंढरीत विठ्ठलरूपी अंतरात्म्याच्या नामाचा गजर अखंडपणे होत असतो, तेथेच पांडुरंग सर्वार्थाने नांदतो. या विठ्ठलाच्या विलक्षण ओढीत श्री तुकाराम महाराज म्हणतात, ‘अणुरेणुया थोकडा। तुका आकाशाएवढा।।’ मात्र ही स्थिती प्राप्त करण्यासाठी, मग ते श्री तुकाराम महाराज असोत नाहीतर श्रीसमर्थ असोत, प्रत्येकाने दास्यत्व स्वीकारले पाहिजे, ही दोघांचीही भूमिका एकच आहे. श्रीसमर्थ स्वतला ‘रामदास’ म्हणवून घेतात, तर श्री तुकाराम स्वतला ‘विष्णुदास’ म्हणवून घेतात. दोघेही एकादशीच मानतात. श्रीतुकाराम महाराज एकादशीचे महत्त्व पंढरीसाठी किती महत्त्वाचे हे प्रत्यक्ष कृतीने दाखवितात. श्रीसमर्थसुद्धा याच विचारांनी प्रेरित आहेत. प्रत्येकाने आपल्या देहातील दशेन्द्रिये एकाकडे म्हणजेच देहाला चालविणाऱ्या चतन्यशक्तीकडे वळवायची, म्हणजेच या देहरूपी पंढरीत  ही एकादशी साजरी करणे होय.

श्रीसमर्थ पंढरपुरी विठ्ठलमंदिरात गेले असता, त्यांना विठ्ठलाच्या रूपात श्रीरामच दिसला. श्रीसमर्थ विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहून म्हणाले,

येथे उभा कां श्रीरामा । मनमोहन घनश्यामा ॥

काय केली सीताबाई । इथे राही रखुमाई ॥

काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥

काय केली शरयूगंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥

धनुष्यबाण काय केले । कर कटावरि ठेवले ॥

काय केले वानर-दळ । येथे मिळविले गोपाळ ॥

रामीं रामदासी भाव । तसा होय पंढरि राव ॥

श्रीसमर्थानी पंढरपुरी विठ्ठलामध्ये श्रीराम पाहिला आणि मग त्यांना सीताबाईऐवजी रखुमाई, अयोध्यापुरीऐवजी पंढरी, शरयुगंगेऐवजी चंद्रभागा आणि वानरदळाऐवजी गोपाळ दिसले. यात श्रीसमर्थाच्या रामभक्तीचा अभिनिवेश नाही, तर सर्व जगच त्यांना सर्वत्र राममय दिसत आहे. ‘तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे’ अर्थात् ‘सर्व विष्णुमय जगत्’ या भूमिकेतून व या सद्भावातूनच या संपूर्ण श्लोकाचे परिशीलन करायला हवे. असे म्हणण्याचे प्रमुख कारण हेच की, या दोन्ही मूर्तीच्या रूपाच्या पलीकडे असलेल्या स्वरूपाशी ते एकरूप झालेले आहेत. त्यांना त्यांच्यात भेद दिसत नाही, भासत नाही. श्रीसमर्थानी पंढरपुराला श्री विठ्ठल मूर्तीकडे पाहिले व त्यांना सहजच स्फुरले की, जरी हा पांडुरंग दिसतोय तरी हा माझा श्रीरामच आहे.

तेथे येता रामदास । दृढ श्रीरामीं विश्वास ।

रूप पालटोनि त्यास । रामरूपी भेटला ॥

पुन्हा विठ्ठलस्वरूप । राम विठ्ठल एकरूप ।

पूर्वपुण्य हे अमूप । लक्ष पायी ठेविला ॥

श्रीरामाची उत्कट भक्ती करणारे व श्रीरामावर निस्सीम प्रेम करणाऱ्याच्या भूमिकेतून जरी श्रीसमर्थ पंढरपुरास गेले, तरी विठ्ठलमूर्तीत श्रीराम दिसले. याचे मुख्य कारण या श्लोकाचे शेवटचे चरण होय की, त्यांचे लक्ष चरणांकडे अथवा पायांकडे होते. दास्यत्व स्वीकारलेल्या प्रत्येकाचे हे अनन्यसाधारण लक्षण आहे की, त्याचे लक्ष सतत पायांकडे किंवा चरणांकडे असते. याच उत्कट भावातून हे दोन्ही त्यांना एकरूप भासले. अशी ही श्रीसमर्थाची निराकाराबाबतची अनन्यता पुढील रचनेतून अधिक स्पष्ट होते.

राम कृपाकर विठ्ठल साकार ।

दोघे निराकार एकरूप ॥

आमुचिये घरी वस्ती निरंतर ।

हृदयी एकाकार राहियेले ॥

रामदास म्हणे धरा भक्तिभाव ।

कृपाळू राघव पांडुरंग ॥

या रचनेतून श्रीसमर्थाना अभिप्रेत आहे की, जो श्रीराम भक्तांवर कृपा करणारा आहे, तोच विठ्ठलाच्या रूपाने साकार झालेला येथे दिसतो. त्याला आकारात पाहिले, तर दृश्यामुळे आपल्या दृष्टीकडे भेद येतो. मात्र स्वरूपाकडे पाहिले तर दोघेही निराकारच असून एकरूप आहेत. त्यांच्यात भिन्नत्त्व कोठे? ज्याचे ज्याचे अखंड ध्यान या निराकाराकडे लागले आहे, त्याची दृढ निष्ठा आहे की, आमच्या या देहरूपी घरात त्याची वस्ती निरंतर आहे. त्याच्या या आपल्या ठाई असणाऱ्या वस्तीमुळेच आपल्या आचरणात मांगल्य येऊ शकते. हीच जाणीव मनुष्याला मनुष्य बनवू शकते. त्याच्याकडून सर्वार्थाने मानवताधर्माचे अथवा भागवतधर्माचे पालन करवून घेता येते. मात्र यासाठी श्रीसमर्थ म्हणतात की, प्रत्येकाने या निराकाराबाबत शुद्ध भक्तिभाव अंतरंगापासून निश्चयात्मक भूमिकेतून धरला पाहिजे. जरी अंतरी संशय असेल, तर दृष्टीला भेद भासेल. पण जर निराकाराप्रती समर्पण असेल, तर जो कृपाळू राघव आहे तोच पांडुरंगाच्या रूपाने कृपा करण्यासाठी प्रत्यक्ष तेथे आहे. थोडक्यात, ‘असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तसा॥’

असे आपले महद्भाग्य आहे की, याच भूमीत हे दोघे संत अवतरले. एकादशीच्या तिथीमाहात्म्यातून देहातील दशेंद्रियांना एकाकडे वळविणारे दोघे स्वरूपाकारच होते. प्रत्येक व्यक्तीला  हीच प्रासादिक शिकवण देऊन ‘आपणासारखा करिती तात्काळ । नाही काळवेळ तयालागी।’ या जीवनध्येयाने प्रेरित होऊन या दोघांनीही मानवताधर्म किंवा भागवतधर्माची पुनस्र्थापना केलेली आहे.

पूर्वप्रसिद्धी लोकप्रभा, जुलै २०१२.