शर्मिला रेगे या एक प्रकांड बुद्धिमत्ता असणाऱ्या ध्येयवेडय़ा प्राध्यापिका होत्या.  नुकतेच त्यांचे निधन झाले. सामाजिक चळवळींमध्ये सदैव त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या एका मैत्रिणीने जागवलेल्या आठवणी..

शर्मिला रेगे या विद्यार्थिदशेपासून सामाजिक चळवळींमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या, क्रांतिकारी पर्यायी संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या, सामाजिकशास्त्रांसह विज्ञानादी ज्ञानशाखांची जात -लिंगभावात्मक दृष्टिकोनातून पुनर्रचना करण्याचा आग्रह धरणाऱ्या, दलित स्त्रीवादी भूमिदृष्टीच्या खंद्या समर्थक होत्या. विचार व लेखनासाठी मिळालेल्या अल्प कालावधीत त्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील अशा ग्रंथांचे लेखन केले. विद्यार्थिदशेपासून संशोधनाचा पिंड असणाऱ्या शर्मिला रेगे यांनी १९८७ मध्ये समाजशास्त्रात एम. ए. पदवी संपादन केली. १९८९ मध्ये एम. फील पदविकेसाठी लघु शोधनिबंध त्यांनी ),  ‘Sati: A Sociological Analysis’  या विषयावर लिहिला. १९९५ मध्ये’Form malestream Sociology to a Gender Sensitive Sociology’ या विषयावर पीएच.डी.चा प्रबंध सादर करून समाजशास्त्राची स्त्रीवादी परिप्रेक्षातून चिकित्सा केली. त्यानंतर), X Sociology of Gender (sqqt), Not a Small place in Brahman Galli (२००३), Understanding Culture, Writing Cast/Writing Gender. narrating dalit women’s testimonios (२००६), Education as a Trutiya Ratna towards Phule-Ambedkariet feminist pedaogical practice (२००९), स्त्रीवाद : जागतिक/ स्थानिक द्वैताच्या पलीकडे (२०११), ही थाळी भारतीय नाही काय?, (संपा., २०१२), लोकप्रिय संस्कृती व भारतातील आधुनिकता : लिंगभाव परिप्रेक्षातून (२०१२),  Against The Madness of Manu: (B.R. Ambedkar’s Writngs on Brahmanical patriarchy, Plundering Popular Cultureहे त्यातील मौलिक ग्रंथ आहेत.
१९९१ पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री- अभ्यास केंद्रात त्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. २००५ मध्ये त्यांनी समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. स्त्री अभ्यास केंद्र- समाजशास्त्र विभाग-आयआयटी (पवई) आणि पुन्हा स्त्री अभ्यास केंद्र हा प्रवास वैचारिक बांधीलकीचा, आपण मानत असलेल्या सिद्धांतांसाठी आणि नव्या ज्ञानरचनेसाठी होता. म्हणूनच हा प्रवास करताना त्यांनी ना आर्थिक लाभ-नुकसानीचा, ना विद्यापीठीय जेष्ठ-कनिष्ठतेचा, ना दर्जाचा या कशाचाही विचार केला नाही. त्यांनी स्त्री अभ्यास केंद्राची धुरा यशस्वी आणि समर्थपणे सांभाळली. देशातील इतर स्त्री-अभ्यास केंद्रांचे नेतृत्व आणि दिशा दिग्दर्शनाचे काम करणारा विभाग म्हणून पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राची ओळख त्यांनी निर्माण केली. इतर ज्ञानशाखा आणि स्त्री अभ्यास केंद्रांना ऊर्जा देणारा विभाग म्हणून आपला विभाग यशस्वी आणि समर्थपणे उभा केला. Counter Culture, Feminism, Cast, Class, Gender आणि चळवळ किंवा सार्वजनिक क्षेत्रात होणारी ज्ञाननिर्मिती यांच्या सहसंबंधाला महत्त्व दिले . पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्र केवळ स्त्री अभ्यासालाच नव्हे तर सत्यशोधक, विद्रोही, दलित-बहुजनवादी चळवळी व विद्यापीठीय सर्वच ज्ञानशाखांना वैचारिक ऊर्जा देणारे केंद्र बनवणे हे डॉ. शर्मिला रेगे यांचे खरे योगदान होते.
दलित स्त्रीवादी असल्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी पर्सनल इज पॉलिटिकल असे मानले होते, तसेच चळवळ आणि ज्ञाननिर्मितीचे काम यांतील कप्पेबंधपणा त्यांनी मान्य केला नव्हता. चळवळी उभ्या करताना, मोर्चे-आंदोलन संघटित करताना त्याला ज्ञानाचा पाया असतो आणि ज्ञान निर्मितीचीही एक चळवळ असते. चळवळ आणि अभ्यास, सिद्धांत आणि व्यवहार यांच्यातील फारकत त्यांनी मान्य केली नाही. सिद्धांत आणि व्यवहार याचा सहसंबंध त्यांनी केवळ लिखाणापुरता लावला नव्हता तर जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अंगीकारला होता. त्यामुळेच त्या सत्यशोधक विद्यार्थी संघटना, क्रांतिसिंह नाना पाटील अकादमी, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, दलित महिला संघटना व बहुजन महिला आघाडी त्यांच्याशी जैविकरीत्या जोडल्या गेल्या होत्या. तथाकथित एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने काढलेल्या समता हक्क रॅलीमध्ये त्या कार्यकर्त्यां बनून ‘मनुवाद मुर्दाबाद’, ‘पुरुषसत्ता हाय हाय’ या घोषणा मोठय़ा आवाजात देत होत्या. आणि ‘प्रेमाचा अधिकार आणि हिंसेचा प्रश्न’  ही पुस्तिका लिहून या हिंसाचारामागील कारणमीमांसा आणि पर्यायी सत्यशोधक प्रेमाचा अन्वयार्थ स्पष्ट करणारी पुस्तिकाही त्यांनी लिहिली होती. ब्राह्मणी-भांडवली-पुरुषसत्ताक मूल्यसंस्कृतीला नकार देत उभी राहिलेली विद्रोही सांस्कृतिक चळवळ शर्मिला रेगेंना पर्यायी संस्कृतीच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा वाटत होती. म्हणूनच त्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या केवळ सहानुभूतीदारच नाही तर तिच्या अविभाज्य भाग होत्या.
दिल्ली विद्यापीठातील भित्तिपत्रकातून जणू एक सांस्कृतिक युद्धच उभे राहिले होते. निमित्त होते सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे. प्रस्थापित उच्चजात-वर्गीय विद्यार्थ्यांना वीणावादन हा अभिजात सांस्कृतिक कार्यक्रम वाटला. तर कनिष्ठ जातीतील विद्यार्थ्यांनी त्या पत्रकाशेजारी भोपू वादनाचा कार्यक्रम जाहीर केला. या निमित्ताने उभ्या राहिलेल्या वीणा विरुद्ध भोपू हा वाद केवळ दोन वाद्यांमधील सादरीकरणाचा नसून एकंदरच दोन संस्कृतीच्या संघर्षांचा आहे. अभिजात म्हणजे काय? अस्सल संस्कृती कोणती? अभिजात संस्कृती म्हणजे ब्राह्मणी संस्कृती? या वादासंदर्भात त्यांनी ‘लोकप्रिय संस्कृती व भारतातील आधुनिकता’ या पुस्तकाचे लेखन केले.
सदैव सर्वाना देत राहणं हा डॉ. शर्मिला रेगे यांचा स्वभाव होता. त्यांनी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना फीमध्ये कमी पडणारे पैसे देण्यासोबतच शहरी, ब्राह्मणी विद्यापीठीय वातावरणात भेदरून गेलेल्या मुलामुलींना प्रचंड आत्मविश्वास देण्याचे काम अखंडपणे केले. सर्व डाव्या पुरोगामी चळवळींना सतत आर्थिक मदत केली. शर्मिला रेगे यांच्या जाण्यातून दलित-बहुजन स्त्रीवाद, अब्राह्मणी वैचारिक ज्ञानसंघर्ष, क्रांतिकारी पर्यायी संस्कृतीच्या क्षेत्रात न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांचा मृत्यू वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी व्हावा आणि तोही कॅन्सरसारख्या आजारातून याचे मनाला दु:ख होत आहे. आपल्या आजाराबद्दल कळल्यानंतर त्यांनी अत्यंत धैर्याने वास्तवाचा स्वीकार केला. कॅन्सर शेवटच्या टप्प्यावर पोचलेला असल्यामुळे आपण फार काळ जगू शकणार नाही या वास्तवाचा धीरोदात्तपणे स्वीकार करून केमोथेरपीला, इतर उपचारांना त्यांनी ठाम नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं, मी जर त्याही उपचारानंतर फक्त अंथरुणाला खिळून राहणार असेल आणि वाचन, लेखन आणि शिकवण करू शकणार नसेल तर मला असं जगायचं नाही. माझ्या मृत्यूनंतर घरात डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा फोटो लावून चळवळीतल्या गाण्यांची कॅसेट लावावी आणि अस्थी विसर्जन भीमाकोरेगाव येथील विजयस्तंभाजवळ करावे, असे धीरोदात्तपणे सांगणारी आमची मैत्रीण हरपली.
तिच्या जाण्यामुळे डोळ्यातून अश्रू तर वाहणारच! पण स्वत:ला सावरत त्यांनी आग्रही प्रतिपादन केलेल्या जात, वर्ग, लिंगभाव सहसंबंधी परिप्रेक्षातून अधिकाधिक ज्ञान मिळवणे आणि ब्राह्मणी, भांडवली, पुरुषसत्ताक मूल्य संस्कृतीपासून ते ज्ञानक्षेत्रापर्यंत सर्वच आव्हान उभे करत जाणे हीच खरी शर्मिला रेगे नावाच्या सत्यशोधक बुद्धिजीवीला खरी आदरांजली ठरेल. आम्हा चळवळवाल्यांकडून तिने दोन अभिवादनांचा मन:पूर्वक स्वीकार नेहमीच केला. त्याच अभिवादनांनी तिला ही अखेरची आदरांजली. शर्मिला रेगे यांना अखेरचा जय भीम!

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
caribbean writer maryse conde profile author maryse conde information zws
व्यक्तिवेध : मारिस कॉण्डे