मनोहर पारनेरकर

हेडन, मोत्झार्ट, बेथोवन, शुबर्ट हे जगातील चार श्रेष्ठ पाश्चात्य संगीतरचनाकार आपल्या कारकीर्दीच्या एका विशिष्ट टप्प्यावर व्हिएन्नातच यावेत, या संकेताला काय म्हणावे? त्याकाळी जागतिक संगीताचे केंद्र मानल्या जाणाऱ्या व्हिएन्नातील या सांगीतिक योगायोगाबद्दल..

पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातला क्लासिकल कालखंड चार श्रेष्ठ रचनाकारांच्या कारकीर्दीने गाजला. अठराव्या शतकाची पाच अंतिम दशकं आणि एकोणिसाव्या शतकाची सुरुवातीची दोन दशकं व्यापणाऱ्या या कालखंडाला सांगीतिक इतिहासात संगीताची नव्याने व्याख्या सांगणारा काळ समजला जातो. Baroque शैलीच्या नंतरचा आणि Romantic शैलीचा उगम व्हायच्या आधीचा हा काळ मोत्झार्ट, हेडन, काही अंशी बेथोवन आणि काठावर शुबर्ट या चार श्रेष्ठ रचनाकारांचा मानला जातो. त्या सत्तर-पंचाहत्तर वर्षांतलं सर्वात महत्त्वाचं संगीत जवळपास पूर्णत: या चौघांनी रचलं. आखीवपणा, स्पष्टता, तोल आणि रूपबंधाच्या सौंदर्यावर भर ही त्यांच्या संगीताची सर्वसाधारण वैशिष्टय़े समजली जातात. या संगीताचा सार्वकालीन आणि सार्वत्रिक सन्मान झालेला आहे, तो त्याची सांगीतिक मूल्यं तरल नसून शाश्वत आहेत म्हणून.

ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टीने बघता ‘व्हिएन्ना घराणे’ ही उपाधी दिशाभूल करणारी आहे. तिचा विचार इतर संदर्भात व्हायला हवा. आपल्या चार व्हिएन्नाच्या संगीतकारांपकी फक्त शुबर्टचा जन्म त्या शहरात झाला होता. पण मुद्दा हा आहे की, त्याने व बेथोवनने आपल्या आयुष्याची सर्वाधिक सर्जनशील वष्रे तिथे घालवली. इतर दोघांनीदेखील आयुष्याचा बराच काळ व्हिएन्नात घालवला. म्हणूनच इतिहासाने चारही संगीतकारांवर व्हिएन्ना घराण्याचे लेबल चिकटवले. व्हिएन्नाशी निगडित या चौकडीच्या एकमेकांशी कधी गाठीभेटी झाल्या का? आणि संगीतकार म्हणून त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडला असल्याचे पुरावे मिळतात का? या दोन प्रश्नांची उत्तरे या लेखात शोधण्याचा प्रयत्न आहे.

आपण ज्या कालखंडाचा विचार करीत आहोत त्या ७०-७५ वर्षांत व्हिएन्ना शहर युरोपातला संगीताचा केंद्रिबदू म्हणून ओळखलं जात असे. साहजिकच त्या काळातल्या सर्व प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षी संगीतकारांचे पाय आपोआप व्हिएन्नाकडे वळत. त्याचप्रमाणे जवळपास समकालीन म्हणता येतील असे हेडन, मोत्झार्ट आणि बेथोवन हे संगीतकारसुद्धा त्यांच्या कारकीर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर व्हिएन्नाकडे ओढले गेले.

या चार श्रेष्ठ कलाकारांचा एकमेकांशी परिचय होता का? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी, ते वयाने एकमेकांपेक्षा किती लहान-मोठे होते ते पाहू. हेडन ऑस्ट्रियात रोहराऊ गावी १७३२ साली जन्मला. मोत्झार्टचा जन्म १७५६ साली ऑस्ट्रियातच झाला, पण साल्झबर्ग शहरात. बेथोवनचा जन्म जर्मनीतील बॉनमध्ये १७७० साली झाला आणि शुबर्टचा १७९७ साली व्हिएन्नात. याचा अर्थ मोत्झार्ट हेडनपेक्षा २४ वर्षांनी लहान होता आणि बेथोवनपेक्षा १४ वर्षांनी मोठा. हेडन १७९२ साली व्हिएन्नाला आला तेव्हा त्याचं वय ६० वर्षांचं होतं. मोत्झार्ट आला तेव्हा तो २५ वष्रे वयाचा होता आणि बेथोवन १७९२ साली आला तेव्हा २२ वर्षांचा होता. चौघेही व्हिएन्नातच गेले.. हेडन वयाच्या ७७ व्या वर्षी, मोत्झार्ट ३५ व्या वर्षी, बेथोवन ५७ व्या वर्षी आणि मूळ व्हिएन्नात जन्मलेला शुबर्ट ३१ व्या वर्षी.

त्यांच्या गाठीभेटी म्हणाल तर त्याची मजा अशी आहे की, मोत्झार्ट आणि बेथोवन या दोघांचाही हेडनशी संबंध आला, पण तो स्वतंत्रपणे, निरनिराळ्या वेळी आणि निरनिराळ्या नात्यांनी. मोत्झार्ट वयाने जरी हेडनच्या अध्र्याने होता तरी ते दोघे जिवलग मित्र झाले. बेथोवनचं हेडनशी वेगळं नातं होतं. तो एक वर्षांहून अधिक काळ हेडनचा शिष्य होता. पण मोत्झार्ट आणि बेथोवनची परस्पर भेट एकदाच झाली. शुबर्ट मात्र काही कारणास्तव इतर तिघांना कधीही भेटला नाही.

हेडनला जवळून ओळखणारे त्याला प्रेमाने ‘पपा हेडन’ म्हणत. तर पपा हेडन आणि मोत्झार्ट यांची पहिली भेट व्हिएन्नात १७८१ साली झाली. त्यावेळी हेडन ४९ वर्षांचा होता आणि मोत्झार्ट २५. या प्रथम भेटीनंतर त्यांच्यातील सलोखा वाढत गेला आणि त्याचं रूपांतर जिवाभावाच्या मत्रीत झालं. त्यांनी एकमेकांना जितके दिले, तितकेच एकमेकांकडून घेतले. त्यांची मत्री शेवटपर्यंत टिकून राहण्याचं कारण की, ते आपापल्या ठिकाणी सुरक्षित होते. त्यामुळे ते प्रतिस्पर्धी कधीच बनले नाहीत. उलटपक्षी, त्यांना एकमेकांविषयी कौतुकयुक्त आदर होता. शिवाय त्यांना एकमेकांच्या सोबतीत केवळ आनंद वाटत असे. सर्वात हलवणारी गोष्ट अशी की, त्यांनी एकमेकांच्या साथीने संगीतवादनही केल्याची एक नोंद आहे. स्टीफन सोरेस (१७६२-९६) हा ब्रिटिश संगीतकार दोघांचा मित्र होता. त्याने व्हिएन्नात १७८४ साली एक पार्टी दिली; ज्यात जमलेल्या संगीतकारांनी एक quartet पेश केलं होतं. त्यात हेडनने व्हायोलिन वाजवलं होतं, तर मोत्झार्टने व्हायोला. या पार्टीत रचनाकार-गायक मायकल केली (१७६२-१८२६) हजर होता. त्याने नंतर लिहिलेल्या आठवणींमध्ये हेडन आणि मोत्झार्टने एकत्र केलेल्या वादनाविषयी म्हटलं आहे.. ‘‘याहून मोठं कर्णसुख ते कोणतं असू शकलं असतं!’’ आज सव्वादोनशे वर्षांनंतर विचार करता असं वाटतं की, त्या असामान्य घटनेचं हे वर्णनही काहीसं फिक्कंच आहे.

त्यांच्यातल्या वयाच्या फरकामुळे त्यांच्या मत्रीत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. मोत्झार्टबद्दल बर्नार्ड शॉ एकदा म्हणाले होते की, ‘वयाच्या ३० व्या वर्षी त्याच्या ठिकाणी बालसुलभ गोडवा होता. तसंच वयाच्या पाचव्या वर्षी प्रौढ पुरुषाचं गांभीर्य.’ १७८१ मध्ये मोत्झार्ट हेडनला भेटला तेव्हा तो माणूस म्हणून आणि संगीत रचनाकार म्हणून वयाच्या मानाने खूपच प्रगल्भ झाला होता. त्याने आपल्या २५ वर्षांच्या झंझावाती आयुष्यात पपा हेडनच्या तुलनेने शांत आयुष्यापेक्षा जीवनाचे कितीतरी अधिक आनंदाचे आणि दु:खाचे, वेदनेचे आणि उल्हासाचे, विजयाचे आणि दुर्दैवाचे प्रसंग अनुभवले होते. तोपर्यंत मोत्झार्टने त्याच्याहून वयाने दुप्पट असलेल्या हेडनइतकीच किंवा अंशत: अधिकच सांगीतिक सुजाणताही कमावलेली होती. म्हणूनच त्यांच्यातली मत्री ही लहान-मोठय़ातली मैत्री नसून समान तोलाच्या व्यक्तींची होती. भारतात किंवा एकूणच पौर्वात्य देशांमध्ये मोठय़ांना केवळ त्यांच्या वयासाठी जसा मान दिला जातो तसा पाश्चिमात्य देशांत दिला जात नाही. हेही या मत्रीमागचं आणखी एक कारण असू शकतं. कुतूहलाची गोष्ट अशी की, हे दोघेही १७८४ साली फ्रीमेसन या पंथाचे सदस्य झाले. एकंदर लोकांचा समज असा आहे की, याबाबतीत हेडन प्रथम उत्सुक नव्हता, पण मोत्झार्टने त्याचं मन वळवलं.

या दोन संगीतकारांचा परस्परांच्या संगीतावर- खासकरून त्यांच्या सिम्फनी रचनांवर बराच प्रभाव पडला होता. शिवाय मोत्झार्ट हेडनच्या quartet रचनांनीदेखील प्रभावित झाला होता. म्हणूनच त्याने आपल्या स्वत:च्या तंतुवाद्यांसाठी लिहिलेल्या सहा quartets चा संच हेडनला अर्पण केला. या १४ ते १९ क्रमांकाच्या quartets नंतरच्या काळात ‘हेडन quartets’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. हेडनने या सन्मानाची परतफेड आपल्या Opus 50 Quartetsचा संच मोत्झार्टला अर्पण करून केली.

हेडनने मोत्झार्टच्या Quartets ऐकल्या तेव्हा तो म्हणे मोत्झार्टच्या वडिलांना- लिओपोल्ड मोत्झार्ट यांना म्हणाला, ‘‘देवाला स्मरून आणि एक प्रामाणिक माणूस म्हणून तुम्हाला सांगतो की, तुमचा मुलगा माझ्या ऐकिवात असलेल्या किंवा माझ्या परिचयातल्या सर्व संगीतकारांपेक्षा श्रेष्ठ आहे असे मी मानतो. त्याच्याकडे उत्तम अभिरुची तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संगीताबद्दलचं गाढ ज्ञान आहे.’’ (जाता जाता उल्लेख करण्यासारखी गोष्ट अशी की, हेडनची ही प्रख्यात उक्ती ज्या निबंधातून उद्धृत केली आहे, तो निबंध Sothebyls या चित्रांचा लिलाव करणाऱ्या संस्थेने १९९० साली अंदाजे दोन लाख यूएस डॉलरना विकला.)

मोत्झार्ट आणि बेथोवनची कधी भेट झाली का, या प्रश्नाचं उत्तर- ‘हो, झाली. पण दुर्दैवाने एकदाच.’ संगीतजगतातल्या या दोन अमर व्यक्तींची भेट १७८७ साली एप्रिल महिन्यात व्हिएन्नामध्ये झाली. देवांच्या नजरेत भरावी अशी ही भेट आपणही काळ फिरवून अनुभवावी असं वाटतं. असामान्य प्रतिभेची देणगी लाभलेला मोत्झार्ट तेव्हा ३० वष्रे वयाचा होता आणि सर्जनशीलतेच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर उभा होता. अलौकिक प्रतिभा लाभलेल्या बेथोवनचे वय तेव्हा फक्त १७ वर्षांचे होते. तो नुकताच त्याचे जन्मस्थान- म्हणजे काहीशा संकुचित जीवनशैलीचे बॉन सोडून व्हिएन्नाला आला होता.

त्याचा उद्देश..?

मोत्झार्ट नामक उस्तादाचा शागीर्द होणे!

या प्रसंगाचे छायाचित्र उपलब्ध नाही. कारण छायाचित्रणाची कला त्यानंतर अध्र्या शतकाने जन्मास आली. पण एका चित्रकाराने कल्पिलेले एक चित्र मात्र आहे. ते िलकन सेंटरमधल्या न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीत बघावयास मिळते. ते चित्र बारकाईने जर न्याहाळलं, तर एक-दोन मजेदार गोष्टी लक्षात येतात. त्या काळात व्हिएन्नाच्या दिवाणखान्यांमध्ये कलाकार मंडळी संध्याकाळी भेटत तेव्हा पावडर लावलेले टोप परिधान करीत. पुरुषांसाठी हा अनिवार्य रिवाज होता. पण चित्रात एकटय़ा बेथोवनने टोप घातलेला नाही. पण हे तारुण्याच्या उद्दामपणाचं चिन्ह नसून त्याच्या आर्थिक परिस्थितीची खूण होती. मोत्झार्टसाठी आपल्या संगीताचा चाचणी प्रयोग पेश करून तो बॉनला परत गेला तेव्हा त्याला बिचाऱ्याला मित्राकडून उसने पसे घ्यावे लागले. आश्चर्य म्हणजे त्याकाळी त्याच्या वयाचे आणि सामाजिक स्तराचे तरुण पोनीटेल घालत असत, तेही चित्रात त्याने केलेले दिसत नाही.

बेथोवनने त्याच्या चाचणी प्रयोगात प्रथम ठरावीक साच्यातला एक पियानोचा तुकडा वाजवला. अपेक्षेप्रमाणे मोत्झार्टवर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. त्यानंतर त्याने गुरुवर्याना एखादी मूळ धून देण्याची विनंती केली. ती घेऊन त्याने ती अत्यंत कलात्मकतेने विस्तारली, नटवली आणि निरनिराळ्या छटांनी सजवली. या प्रयोगाने काम साधलं. मोत्झार्ट प्रभावित झाला असल्याचं त्याचा चेहराच सांगत होता. तिथे हजर असलेल्या एका मित्राला तो म्हणाला, ‘‘या युवकावर नजर ठेव. लवकरच तो असं काही करून दाखवेल, की जग त्याच्याविषयी भरभरून बोलेल.’’ हे शब्द भविष्यसूचक ठरले. आज दोनशे वष्रे उलटली तरी बेथोवनबद्दल जग बोलायचं थांबलेलं नाही. जोपर्यंत जगात संगीत आहे तोपर्यंत हे असंच चालू राहील यात शंका नाही.

पुढच्या दोन आठवडय़ांत मोत्झार्टने त्याच्या नव्या शिष्याला एक-दोन धडे दिले असतील-नसतील इतक्यात बेथोवनला मरणावस्थेत असलेल्या त्याच्या आईची शुश्रूषा करण्यासाठी बॉनला जावं लागलं. १७९२ साली तो जेव्हा व्हिएन्नाला परतला तेव्हा मोत्झार्ट गेल्याला एक वर्ष झालं होतं. यापुढे बेथोवनला मोत्झार्टच्या कलेचा ‘आत्मा’ हेडनकडून मिळायचा होता.

१७९२ साली लंडन गाजवून हेडन व्हिएन्नास परत येत असताना बॉनमध्ये थांबला होता, तेव्हा बेथोवन त्याला भेटला. ही त्यांची दुसरी भेट. आदल्या वर्षीच्या त्यांच्या पहिल्या भेटीतून काही निष्पन्न झालं नव्हतं. या खेपेस मात्र बेथोवनच्या कलेने आधीच प्रभावित झालेल्या हेडनने त्याला शिष्य म्हणून स्वीकारण्यास मान्यता दिली. बेथोवनचा मित्र, चाहता आणि पुरस्कर्ता कौंट वोल्डश्टाइन याने बॉन अधिष्ठित जर्मन राजघराण्यातला उमराव Maxmillian Franz याला हेडनकडे शिकण्यासाठी लागणारे पसे बेथोवनला देण्यास उद्युक्त केलं. अनेक वर्षांनंतर बेथोवनने आपली क्रांतिकारी Piano Sonata No. 21 in C Op 53 ही रचना कौंट वोल्डश्टाइनला अर्पण केली. ही प्रसिद्ध रचना नंतर ‘वोल्डश्टाइन सोनाटा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. त्याच वर्षी बेथोवन एक वर्षांहून अधिक काळ व्हिएन्नात राहिला आणि हेडनकडून संगीताचे शास्त्र, रचनातत्त्व आणि इतर तांत्रिक गोष्टी शिकला.

Maxmillian Franz च्या कृपेने व्हिएन्नास पोहोचल्याबरोबर बेथोवन पियानो विकत घेऊ शकला. सुरुवातीच्या काळात तो असाधारण प्रतिभेचा पियानोवादक म्हणून प्रसिद्धीस आला. व्हिएन्नातल्या उच्चस्तरीय सामाजिक जीवनात आपले स्थान कमावण्यासाठी त्याने ढोपरापर्यंत वर पोचणारे पांढरे मोजे, ढोपरापर्यंत खाली येणारी पतलून, वेल्व्हेटचे कोट, सफेद शर्ट, क्राव्हात इत्यादी अनेक नवीन कपडे शिवून घेतले. अनिवार्य असा टोपसुद्धा त्याने बनवून घेतला होता, पण तो क्वचितच घालत असे.

हेडन आणि बेथोवन यांचे संबंध अगदीच अयशस्वी ठरले असे जरी म्हणता आले नाही, तरी ते फार फलदायी ठरले असेही म्हणता येणार नाही. या द्वयीपेक्षा एकमेकांहून भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती सापडणे कठीण. त्यांची व्यक्तिमत्त्वे, स्वभाव आणि संगीताकडे बघण्याचा त्यांचा मूळ दृष्टिकोण यांत कोठेही मेळ बसत नव्हता. त्यात भर पडली त्यांच्या एकत्र येण्याच्या काळाची. तोपर्यंत हेडनने केवळ ऑस्ट्रियातच नव्हे, तर संपूर्ण युरोपात सर्वश्रेष्ठ समकालीन संगीतकार म्हणून भव्य प्रसिद्धी संपादन केली होती. त्याचं वय तेव्हा ६० वर्षांचे होते. बेथोवनसारख्या २२ वर्षीय बेबंद, उद्दाम, मताग्रही आणि असहनीय अशा माणसाला आपले सांगीतिक ज्ञान आणि विचार दान करण्यात त्याला विशेष रस वाटेना. नंतरच्या काळात तो बेथोवनला ‘महान मोगल’ म्हणून संबोधत असे. हेडनविषयी जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून तो फार महान गुरू होता असे वाटत नाही. पण त्याला न्याय द्यायचा असेल तर असे म्हणावे लागेल की, जगातल्या थोरातल्या थोर गुरूंनादेखील बेथोवनसारख्या असामान्य प्रतिभेच्या संगीतकारासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम आखणे दुष्कर झाले असते.

काही काळाने आपल्याला पुरेसा वेळ न देणारा हा गुरू बेथोवनच्या मनातून उतरला. आपल्या बजू बावराप्रमाणे ‘गुरू बिन ग्यान कहां से पाऊ’ इत्यादी उत्तर अपेक्षित नसलेले प्रश्न विचारण्यात वेळ न दवडता त्याला जे हवे होते ते मिळवण्यासाठी त्याने प्रत्यक्ष उपाय शोधला. हेडनच्या नकळत त्याने इतरांकडून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. या गुरूंपकी एक होता प्रसिद्ध इटालियन संगीतकार अन्तोनिओ सालीएरी- ज्याने मोत्झार्टला विष घातलं अशी कल्पित कथा आहे. हेडनच्या मते, त्याच्या तरुण शिष्याची सांगीतिक सिद्धांतावर आणि counterpoint या पाश्चात्त्य संगीतातल्या महत्त्वाच्या तंत्रावर पकड काहीशी सल होती. गुरू-शिष्यात जरी उघडउघड बेबनाव नव्हता तरी त्यांच्या मुळातल्या विजोडतेमुळे शेवटी त्यांची फारकत झाली. असे असूनही संगीत रचनाकार म्हणून हेडनविषयी बेथोवनला जो आदर होता तो कायम राहिला. अनेक वर्षांनी- म्हणजे १७९५ साली त्याने रचलेले तीन पियानो सोनाटा Op. 2 हेडनला अर्पण केले.

शुबर्टची मात्र व्हिएन्ना घराण्याच्या या तीन महापुरुषांशी कधीच भेट झाली नाही. प्रथम म्हणजे तो जन्मायच्या आधी सहा वष्रे मोत्झार्ट स्वर्गवासी झाला होता. हेडन १८०९ मध्ये गेला तेव्हा शुबर्ट केवळ १२ र्वष वयाचा होता. राहता राहिला बेथोवन. त्याच्याविषयी शुबर्टच्या मनात इतकी श्रद्धा होती, की त्याच्या भेटीसाठी दोन्ही हात आणि पाय गमावायची त्याची तयारी झाली असती. बेथोवन शुबर्टविषयी ऐकून होता. त्याने लिहिलेल्या गाण्यांबद्दल त्याला कौतुक होते. तरीही त्यांची भेट न होण्यास कारणीभूत होता शुबर्टचा अति लाजाळू स्वभाव. तो बेथोवनला इतका पूज्य मानत असे, की त्याच्याकडे भेटीसाठी विनंती करण्याचं धाडस तो कधी करूच शकला नाही. त्याची बेथोवनशी एकदाच भेट झाली; पण ती खऱ्या अर्थाने भेट नव्हती. ते बेथोवनचं मृत्युशय्येवरचं दर्शन होतं. या दोन प्रतिभावंतांचे मृत्यू एकमेकांच्या मागेपुढे दीडएक वर्षांच्या आत झाले. बेथोवन १८२७ च्या मार्चमध्ये गेला, तर शुबर्ट १८२८ च्या नोव्हेंबरमध्ये. बेथोवनच्या अंतिम यात्रेत शुबर्ट खांदेकरी होता. त्याला स्वत:ला ३१ व्या वर्षी अकाली मृत्यू आला तेव्हा त्याचे दफन त्याच्या या दैवताच्या शेजारीच करण्यात आले. अशा प्रकारे शेवटी एकत्र येणे याला शोकांतिका नाही म्हणायची तर काय?