|| देवेंद्र गावंडे
सचोटी, सेवाभाव, टीका झाली-विघ्ने आली तरीही अविचल राहणारी निष्ठा या गुणांच्या बळावर शेगावचे संत श्री गजानन महाराज संस्थान जवळपास एकहाती सांभाळणारे ‘भाऊ’ ऊर्फ शिवशंकर पाटील ४ ऑगस्ट रोजी निवर्तले. सेवाभावी व्यवस्थापनाचा त्यांनी घालून दिलेला वस्तुपाठ कोणता, याचा हा वेध…

विक्रम पंडित सिटी बँकेचे अध्यक्ष असतानाची गोष्ट. त्यांच्या कानावर शेगाव संस्थानच्या सेवाभावी प्रकल्पांची माहिती गेली. एकदा वेळ काढून त्यांनी शेगावला भेट दिली. शिवशंकर पाटलांशी झालेल्या चर्चेतून दुर्गम भागासाठी आरोग्यसेवा प्रकल्प राबवायचे ठरले. अमेरिकेत परतल्यावर पंडित यांनी तब्बल साडेतीनशे कोटी रुपये संस्थेला देऊ केले. प्रत्यक्षात प्रकल्प आकाराला आला तेव्हा त्याला एवढ्या पैशाची गरज नाही असे पाटलांच्या लक्षात आले. त्यांनी केवळ १७ कोटी रुपये मागितले व त्याच्या व्याजावर हा प्रकल्प सुरू केला. विक्रम पंडित आरोग्य योजना असे नामकरण झालेला हा प्रकल्प आजही सुरू आहे. त्यातून हजारो रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. देऊ केलेल्या निधीतील मोठी रक्कम पाटलांनी नम्रपणे नाकारली याचे कारण पाटलांच्या नेकी व सेवाभावी वृत्तीत दडलेले.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

सारेच त्यांना भाऊ म्हणायचे. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत. ज्यांच्याशी त्यांची व्यक्तिगत ओळख होती असे लोक मोजकेच, पण त्यांचे कर्मयोगीपण जाणणाऱ्यांची संख्या लाखोंत. या साऱ्यांनी दिलेली ही टोपणनावाची उपाधी त्यांनी आयुष्यभर मिरवली. १९८२ मध्ये ते गजानन महाराज संस्थेचे प्रमुख विश्वस्त झाले. काही दिवसांत त्यांच्या लक्षात आले, लोक मंदिरात जाऊन पाया पडतात, मग कार्यालयात येऊन आपलेही पाय धरतात. ही तर देवत्व बहाल करण्याची प्रक्रियाच. एका देवाच्या बळावर दुसरा देव तयार होऊ द्यायचा नसेल तर आताच आचार, विचार व वर्तनाची सीमारेषा आखून द्यायला हवी असे म्हणत भाऊंनी लोकांना टाळायला सुरुवात केली. तुमचा देव तिकडे, इकडे फक्त सेवा. तीही दीनदलित, गरीब, दुबळ्यांची असे मनाशी ठरवत त्यांनी गेल्या चाळीस वर्षांत संस्थेला सेवाक्षेत्रात परमोच्च उंची गाठून दिली. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी अशी तीन सुसज्ज रुग्णालये, त्यात काम करणारे शेकडो वैद्यक, डॉक्टर्स या बळावर त्यांनी केवळ वऱ्हाडातच नव्हे तर देशभरातील रुग्णांना मोठा दिलासा दिला. आजमितीस या रुग्णालयांमधून उपचार घेणाऱ्यांची संख्या एक कोटी ६८ लाखांवर पोहोचली. अवघड शस्त्रक्रिया असो वा साध्या आजारावरचा उपचार, रुग्णांकडून एक पैसाही न घेता मोफत केले जातात. सारा खर्च संस्था करते. गेल्या वर्षी करोनाचा प्रकोप सुरू झाल्याबरोबर भाऊ पाचशे खाटांच्या रुग्णालयासह सज्ज झाले. प्रशासनाने विनंती करण्याआधीच. सरकारने खर्च देऊ केला, पण त्यांनी नम्रपणे तो नाकारला. मंदिराच्या भोजनगृहातून पश्चिम वऱ्हाडातील अनेक विलगीकरण केंद्रांवर जेवणाचे डबे मोफत पुरवण्यात आले.

तसे हे पाटील मूळचे मालगुजार. घरी शेकडो एकर जमीन. त्या साऱ्या ऐश्वर्याकडे पाठ फिरवत भाऊंनी साधेपणा स्वीकारला. तो शेवटपर्यंत जपला. रोज जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी घेऊन संस्थेच्या कार्यालयात येण्याचा दंडक त्यांनी शेवटपर्यंत पाळला. करडी शिस्त व स्वच्छतेचे भोक्ते असलेल्या भाऊंनी संस्थेचे व्यवस्थापन, त्या शास्त्रात पदवी घेणाऱ्यालाही लाजवेल अशा पद्धतीने हाताळले. त्याची कीर्ती जगभर पसरली होती. या शास्त्राचे देशविदेशातील विद्यार्थी शेगावला यायचे व थक्क व्हायचे. एकदा ऑस्ट्रेलियातून एक चमू आला होता. त्यांच्याशी बोलताना भाऊंनी आनंदसागर प्रकल्पाचे स्वप्न सांगितले. या चमूने परतल्यावर त्यांना आराखडा तयार करून पाठवला. त्यांनी खर्च सांगितला होता ३२५ कोटी. भाऊंनी त्याच आराखड्यानुसार ११ कोटींत प्रकल्प उभा केला.

केवळ अंगारे, धुपारे लावून देव जिवंत ठेवता येत नाही तर गोरगरिबांची सेवा करूनच तो ठेवता येतो यावर त्यांची ठाम श्रद्धा. त्यातूनच त्यांनी एकेक सेवा प्रकल्प उभारायला सुरुवात केली. सध्या असे शंभर प्रकल्प वेगवेगळ्या क्षेत्रांत निष्ठा व सचोटीने कार्यरत आहेत. केवळ आरोग्यच नाही तर आदिवासींना सोयीसुविधा, धान्यपुरवठा, कपडेवाटप, जनावरांना चारा, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे अशी कामांची भलीमोठी यादी आहे. फिरती रुग्णालये व मेळघाटात असलेला सातपुडा प्रकल्प वेगळाच. हे सर्व सेवा प्रकल्प ‘सेवेकरी’ सांभाळतात. यातले जे गरीब आहेत त्यांना मानधन दिले जाते. आजही या संस्थेकडे विनामूल्य सेवा देण्यास तयार असलेल्या इच्छुकांची संख्या १० हजार आहे. गजानन महाराज हा गरिबांचा देव आहे असे म्हणणाऱ्या भाऊंनी त्याचा बाजार मांडला जाणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली. इतकी की ते येणाऱ्या भक्तांना निरोप द्यायचे. कृपया सोने वाहू नका. मोठ्या देणग्या देऊ नका. तुमचा एक रुपया सेवेसाठी पुरेसा आहे. राज्यातली इतर मंदिरे सोन्याने मढवली जात असताना शेगाव आधी होते तसेच राहिले.

भाऊंचा कारभार पारदर्शक. इतका की आजही संस्थेच्या दर्शनी भागावर रोज किती पैसे गोळा झाले, त्याचा इत्थंभूत हिशेब फलकावर लिहिला जातो. सरकारने ताब्यात घेतलेल्या इतर मंदिरांतसुद्धा राज्यात कोठे ही प्रथा नाही. विश्वस्त व सेवेकऱ्यांनी साधे राहावे याकडे त्यांचा कटाक्ष. त्यामुळेच एका व्यक्तीच्या ताब्यात असूनही या संस्थेवर इतक्या वर्षांत गैरव्यवहाराचा साधा शिंतोडादेखील उडाला नाही.

काही दशकांपूर्वी भाऊंनी शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. राज्यातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये डबघाईला आलेली असताना शेगावचे महाविद्यालय मात्र आजही दिमाखात उभे आहे. ‘प्रवेशाच्या बदल्यात देणगी’ नाही, हा भाऊंचा नियम. अगदी व्यवस्थापन कोट्यातल्या जागा भरतानासुद्धा येथे गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. इंग्रजी व मराठी शाळांमध्येही हा नियम कटाक्षाने पाळला जातो. शिर्डी व शेगाव ही राज्यातली दोन प्रमुख श्रद्धास्थाने. या दोन्ही ठिकाणी रोज लाखो लोक भेट देतात. सरकारीकरण झालेल्या शिर्डीभोवती खासगी क्षेत्रातून पंचतारांकित सुविधांचा विळखा पडला. भाऊंनी शेगावला यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. त्यांच्या पुढाकाराने संस्थेनेच वाजवी दरांत पंचतारांकित सुविधा उभ्या केल्या. यामुळे भाऊंचे विरोधकही वाढले. त्यातून तक्रारी सुरू झाल्या. आनंदसागर प्रकल्प यामुळेच बंद पडला. तरीही भाऊ डगमगले नाहीत. त्यासाठी कधी राजकारण्यांचा आधार घेतला नाही. रोज कोट्यवधीची कमाई असलेले हे संस्थान ताब्यात घेण्यासाठी सरकारी पातळीवर खूप प्रयत्न झाले. या प्रत्येक वेळी शरद पवार भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पवार तसे नास्तिक पण या दोघांमधील मैत्रीचा धागा जोडला गेला तो सेवाभावातून.

भाऊंनी आयुष्यभर कोणताही पुरस्कार घेतला नाही. पद्मश्री, पद्मभूषण त्यांनी विचारणा होताच नाकारले व त्याची बातमीही होणार नाही याची काळजी घेतली. भक्तीला प्राधान्य देणाऱ्या उजव्या शक्तींचा अंमल देशभरात सुरू झाल्यावर पुन्हा या संस्थेवर अनेकांची वक्रदृष्टी पडली. भाऊ बधत नाहीत, बाहेरच्यांना विश्वस्त नेमत नाहीत म्हणून तक्रारींचा ओघ सुरू झाला. शेगाव विकास आराखड्याला सरकारचा निधी मिळू न देण्याचे प्रयत्न झाले. तरीही भाऊ अविचल राहिले. संस्थेमार्फत देता येईल तेवढा पैसा त्यांनी विकासाला दिला. सरकारचे घ्यायचे नाही व सरकारला द्यायचे नाही. संकटसमयी मात्र जरूर मदत करायची. राजकारण्यांच्या ताब्यात संस्था द्यायची नाही यावर ते ठाम होते. २००८ ला झालेल्या शताब्दी सोहळ्यात सरकारकडून अनेक विघ्ने आणली गेली. लहानसहान मुद्द्यांवरून संस्थेची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला पण भाऊंनी झुकण्यास नकार दिला.

विदर्भात सेवा व प्रबोधनाची परंपरा मोठी. गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांनी यावर कळस चढवला. या दोघांसोबतच विवेकानंदांच्या विज्ञाननिष्ठेला महत्त्व देणाऱ्या भाऊंनी याच सेवेचा वारसा पुढे नेला. केवळ विदर्भच नाही तर देशभरातील अनेक सेवा प्रकल्पांना त्यांनी मदतीचा हात दिला. बाबा आमटे ईश्वर ही संकल्पनाच न मानणारे. भाऊंच्या या वृत्तीमुळे ते त्यांच्या प्रेमात पडले. इतके की एकदा कसरावदला जाताना त्यांनी शेगावला मुक्काम केला. समाजसेवेच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाकडे भाऊंचे लक्ष. योग्य माहिती गोळा झाली की लगेच त्यांच्याकडून मदत पोहोचवली जायची. याची वाच्यता नको असा प्रेमळ दमही दिला जायचा. मेळघाटात काम करणाऱ्या अनेक संस्थांना भाऊंनी सढळ हाताने मदत केली. तीही प्रसिद्धीपासून दूर राहून. मंदिरात जमा होणारे सारे धन लोकांचे आहे. मग ते लोकांसाठी उपयोगात आणणेच योग्य या मताचा शेवटपर्यंत त्यांनी पुरस्कार केला.

देव म्हटले की दंतकथा, अफवा आल्याच. देवाच्या नावावर स्वत:चे भले करून घेणारे आलेच. भाऊंनी या साऱ्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले. गजाननाला पिठलं भाकरी आवडायची हे लक्षात ठेवा असा सल्ला ते प्रत्येकाला द्यायचे. वारी व पालखी उत्सव याचा उगम पश्चिम महाराष्ट्रातला. भाऊंनी त्यात सहभागी होऊन विदर्भाला राज्याशी जोडले. सरकारच्या ताब्यात असलेली अनेक श्रद्धास्थळे आहेत. तिथूनही अनेक गरजूंना मदत केली जाते हे खरे पण भाऊंनी संस्थेच्या माध्यमातून जो सेवाकार्याचा विस्तार केला तसा अन्यत्र कुठे झाला नाही. भाऊंचे मोठेपण यात होते. त्यांच्या जाण्याने एक निष्काम कर्मयोगी राज्याने गमावला आहे.

devendra.gawande@expressindia.com