|| आनंद हर्डीकर

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘रविवार विशेष’मध्ये (१० जानेवारी) प्रसिद्ध झालेल्या ‘विवेकानंदांचा ‘धर्म’!’ या दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या लेखाबद्दलचे आक्षेप विस्ताराने मांडलेच पाहिजेत.

‘विवेकानंदांना सर्वधर्म परिषदेचे रीतसर आमंत्रण नसताना त्यांनी तिकडे जाणे म्हणजे खेड्यातील जत्रेत कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानाने ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळायला जाण्यासारखे होते,’ हे लेखकाचे विधान अश्लाघ्य तर आहेच, तसेच स्वामी विवेकानंदांनी परदेशगमनापूर्वी जी आध्यात्मिक पूर्वतयारी केली होती, तिच्याबद्दलचे मतलबी अज्ञान प्रकट करणारेही आहे. वास्तविक रामकृष्ण परमहंसांच्या या शिष्याने केलेली साधना आणि मायदेशाच्या परिक्रमेतून त्याला झालेले देशकाल परिस्थितीचे ज्ञान या आधारावर तर त्याने ती सर्वधर्म परिषद जिंकली होती. त्याच परिच्छेदाच्या शेवटी लेखकाने विवेकानंदांच्या त्या परिषदेतल्या प्रवेशाबद्दलचे अर्धसत्य सांगून गोंधळ उडवून दिला आहे. स्वागत कक्षातून विवेकानंदांना परत पाठवले होते, हे खरे आहे; पण ‘त्यांनी आमंत्रण कसे मिळवले, हा एक विलक्षण प्रकार आहे,’ असे म्हणणाऱ्या लेखकाने कोणताही खुलासा मात्र केलेला नाही. वास्तविक त्या सर्वधर्म परिषदेपूर्वी विवेकानंदांनी अमेरिकेत ठिकठिकाणी मिळून एकूण ११ भाषणे दिली होती. पंडिता रमाबाई या ख्रिस्ती धर्मांतरित भारतीय स्त्रीने १८८७-१८९० या कालावधीत स्वदेशातील बालविधवांसाठी अमेरिकेत निधीसंकलनाची मोहीम राबवली होती. त्या मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी स्वदेशाचे जे चित्र तिकडे रेखाटले होते, ते वस्तुस्थितीला धरून नाही, विकृत आहे, हे विवेकानंदांनी ठणकावून सांगितले होते. काही ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी त्यांचे खटकेसुद्धा उडाले होते. स्टॅन्फर्ड विद्यापीठातील नामांकित प्राध्यापक जॉन हेन्री यांच्या संपर्कात आल्यानंतर विवेकानंदांचा सर्वधर्म परिषदेतील प्रवेश कसाबसा सुकर होत गेला. प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासारख्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने विवेकानंदांची जी कथा महाराष्ट्रभर सर्वत्र पोहोचवली, ती अधिक विस्ताराने अमेरिकेत संशोधिका मेरी लुई बर्क यांच्या विवेकानंदांबद्दलच्या सहा खंडांमधून (आणि तीही सचित्र पुराव्यांनिशी) उपलब्ध होऊनही जवळजवळ तीन दशके उलटली आहेत. (वाचा : मेरी लुई बर्क यांचा ‘स्वामी विवेकानंद इन दि वेस्ट : न्यू डिस्कव्हरीज्’ हा सहा खंडात्मक ग्रंथराज!) तरीही लेखक विवेकानंदांच्या सर्वधर्म परिषदेतील प्रवेशाबद्दल संभ्रम निर्माण करू पाहतात, हेच मुळी विलक्षण आहे.

दुसरे म्हणजे, संपूर्ण लेखात धर्म आणि समाज यांची गल्लत अनेकदा झाली आहे, ही बाब तूर्त बाजूला ठेवली, तरी विवेकानंदांचा ‘धर्म’ कोणता होता, हे निर्णायकपणे सांगण्याच्या आविर्भावात लेखकाने उद्धरणे, प्रसंग यांची निवड केली आहे. तो लेखकीय अधिकार क्षणभर मान्य करू. संपूर्ण मांडणी पाहिली तर मात्र विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत किंवा मायदेशी परतल्यावरही फक्त हिंदू धर्मावर, समाजावरच कडक टीका केली होती, असे चित्र दिसते. ते वस्तुस्थितीच्या विकृतीकरणाकडे झुकलेले आहे. लेखात उद्धृत केलेली विवेकानंदांची सर्व मते हिंदू समाजावर टीका करणारी आहेत असे वरवर दिसले, तरी हिंदू समाजाचे प्रबोधन घडवण्याचा हेतूच त्यामागे होता. त्याउलट सर्वधर्म परिषदेतील विवेकानंदांच्या टीकेचे खरे लक्ष्य मात्र लेखकाने अनुल्लेखित ठेवले आहे, त्याचे काय करायचे?

विवेकानंदांनी परिषदेत केलेल्या विविध भाषणांचा गोषवारा ‘बोस्टन इव्हिनिंग ट्रान्स्क्रीप्ट’च्या ३० सप्टेंबरच्या (१८९३) अंकातून लेखकाने उद्धृत केला आहे. वेळोवेळी दिलेल्या भाषणांतून विवेकानंद फक्त मानवधर्माचीच महती गात होते, असा आभास निर्माण करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच १५ सप्टेंबरला ‘व्हाय वुई डिसअ‍ॅग्री’ आणि १९ सप्टेंबरला ‘हिंदुइझम’ या विषयांवर विवेकानंद जे बोलले, त्याचा लेखात ओझरतासुद्धा उल्लेख केलेला नाही. मग २० सप्टेंबरला विवेकानंदांनी दिलेल्या आयत्या वेळच्या भाषणाची लेखकाने दखल घेतलेली नाही, याबद्दल आश्चर्य वाटायला नको! त्या दिवशी नियोजित वक्त्यांपैकी काही जण ऐनवेळी अनुपस्थित राहिले. श्रोत्यांमध्ये बसलेल्या विवेकानंदांकडे काहींचे लक्ष गेले आणि त्यांच्या आग्रहामुळे संयोजकांनी लोकप्रिय ठरत चाललेल्या विवेकानंदांना भाषणासाठी पाचारण केले. मग विवेकानंदांनी जे भाषण केले, ते २१ सप्टेंबरच्या ‘शिकागो इंटरओशन’मधील वृत्तान्तावरून आता आपल्याला सहज समजू शकते. (मेरी लुई बर्क यांच्याप्रमाणेच स्वामी विवेकानंदांच्या कार्यकर्तृत्वाचे संशोधन करण्यातच उभी हयात वेचणारे असीम चौधरी यांच्या पुस्तकांमुळे! वाचा : ‘द वेदान्त केसरी’ या मासिकाच्या जुलै-२०१४ च्या अंकामधील ‘बिशप जॉन जे. कीन इन डिफेन्स ऑफ स्वामी विवेकानंद’ हा चौधरी यांचा लेख.)

त्या भाषणात विवेकानंदांनी भारतातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यावर कडक टीका केली होती व ‘भारताला धर्म ख्रिश्चनांकडून जाणून घ्यायची मुळीच गरज नाही, आमची संस्कृती-परंपरा पुरेशा समृद्ध व समर्थ आहेत,’ असेही ठणकावून सांगितले होते. दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टनच्या कॅथॉलिक विद्यापीठाचे रेक्टर बिशप जॉन जे. कीन यांनी विवेकानंदांच्या वक्तव्याची अनुकूल दखल घेतली… वगैरे तपशील दिसला असता, तर दत्तप्रसाद दाभोळकर यांना अप्रत्यक्षपणे हे मान्यच करावे लागले असते की, विवेकानंद त्या सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्मसंस्कृतीचे अभिमानी प्रतिनिधी म्हणूनच वावरत होते.

अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान मांडणारे स्वामी विवेकानंद, ‘ओम् तत् सत्’ची ललकारी आपल्या इंग्रजी कवितेतून घुमवणारे स्वामी विवेकानंद, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चारित्र्यहनन करण्याच्या कुटिल हेतूने फेकलेले मायावी ललनांचे जाळे लीलया भेदणारे स्वामी विवेकानंद, ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी १८५७ साली केलेल्या अत्याचारांचे पाढे वाचून त्या साम्राज्याच्या पतनाची भविष्यवाणी अमेरिकन चर्चमधील मेळाव्यात करणारे स्वामी विवेकानंद… अशी त्यांची कितीतरी रूपे त्यांचा धर्म ‘हिंदू’च होता, हे स्पष्ट करणारी आहेत. लेखकाच्या एकाक्ष नजरेला ही रूपे पडलीच नाहीत की ती दिसू लागताक्षणीच त्यांनी आपली नजर विरुद्ध दिशेला फिरवली, हे समजायला मार्ग नाही.

१८९७ साली जहाजातून मायदेशी परतताना एडन ते कोलंबो या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात दोन ख्रिस्ती मिशनरी विवेकानंदांचे सहप्रवासी होते. तिघांमध्ये धर्मचर्चा सुरू झाली. तेव्हा विवेकानंदांनी त्या दोघांचे मुद्दे खोडून काढले. ख्रिस्ती धर्म हिंदू धर्माहून श्रेष्ठ आहे, हे पटवून देणे जमत नाही हे स्पष्ट झाल्यावर त्या दोघांनी हिंदू धर्माला शिव्या द्यायला सुरुवात केली. विवेकानंदांना ते काही सहन झाले नाही. ते सरळ आपल्या जागेवरून उठले, एका शिवराळ पाद्र्याजवळ जाऊन विवेकानंदांनी चक्क त्याचा गळा धरला आणि म्हणाले, ‘यापुढे माझ्या धर्माला शिवी देण्यासाठी जरी एक अक्षर उच्चारलेस तर तुला चक्क समुद्रात फेकून देईन!’ ते दोघेही मुकाट्याने गप्प बसले. ही घटना विवेकानंदांनीच पुढे आपल्या शिष्यांना सांगितली आणि विचारले, ‘जर कुणी तुझ्या आईचा अपमान केला, तर तू काय करशील?’ उत्तर आले – ‘त्याची चांगली पिटाई करीन!’  विवेकानंद म्हणाले, ‘योग्यच आहे ते! हीच आत्मीयता तुझ्यात आपल्या समस्त हिंदू भावंडांबद्दलही हवी. ती असती तर तू त्यांचे दिवसाढवळ्या होणारे ख्रिस्तीकरण थांबवायला धावला असतास. कुठे आहे तुझे धर्मप्रेम? कुठे आहे देशभक्ती?’ (संदर्भ : वसंत पोतदार लिखित ‘योद्धा संन्यासी’ हे पुस्तक)

विवेकानंदांच्या या प्रश्नामागची भूमिका त्यांचा धर्म कोणता असल्याचे सूचित करते, असे लेखकास वाटते?  असे असंख्य मुद्दे विवेकानंदांच्या जीवनात, साहित्यात आणि त्यांच्या कायम टिकून राहिलेल्या प्रभावात विखुरलेले आहेत. ते नीट न्याहाळले, तर विवेकानंदांचा धर्म हिंदूच होता व त्याचेच तत्त्वज्ञान त्यांनी धर्म परिषदेत व नंतर इतर देशांतही मांडले.