|| हृषीकेश शेर्लेकर

कृत्रिम प्रज्ञा किंवा इंग्रजीत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’ हा एव्हाना आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग होऊ  पाहतो आहे .. या कृत्रिम प्रज्ञेची उपयोजने आपल्या हातातल्या स्मार्टफोनमध्येही दिसू लागली आहेत. कृत्रिम म्हणून हिणवण्यात अर्थच उरणार  नाही, एवढय़ा वेगाने ही नवप्रज्ञा आपल्याशी नाते जोडते आहे. अशा वेळी, जिज्ञासू सामान्यजन आणि विशेषत: तरुणवर्ग यांना या नवप्रज्ञेच्या खाचाखोचा माहीत असायला हव्यात आणि ती आपण कशी वापरायची याच्या काही योजनाही तयार हव्यात. आपली बुद्धी आणि नवप्रज्ञा यांची साथसंगत कसकशी असू शकते, याचे नकाशे आपल्याकडेही असायला हवेत. त्यासाठी अर्थातच, नवप्रज्ञेचे तंत्र अवगत असायला हवे.. या हेतूने सुरू होणाऱ्या नव्या लेखमालेचा हा परिचय लेख..

‘अगं मला ऑफिसला निघायला उशीर होतोय आणि गुगल मॅप्सदेखील आज नेहमीपेक्षा २६ मिनिटं जास्त ड्रायव्हिंग टाइम दाखवतोय आणि ऐक आज संध्याकाळी आबांच्या गुडघ्याच्या डॉक्टरांकडे फॉलोअप आहे. तुम्ही ओला, उबर घेऊन डायरेक्ट पोहोचा, मला थोडा उशीर होईल..’ तसेच अ‍ॅमेझॉन, फेसबुक, अ‍ॅलेक्सा, स्मार्ट उपकरणे इत्यादी आज परवलीचे शब्द झाले आहेत तर ड्रायव्हरलेस कार, रोबोटिक्स, ड्रोन्स इत्यादी भविष्यातल्या शक्यतांच्या बाबतीत एक कुतूहलवजा चर्चा रंगताहेत. तरुण आणि प्रौढ तर सोडाच पण आजी-आजोबा आणि लहान मुलेदेखील भ्रमणध्वनी, इंटरनेट, त्यावरील विविध अ‍ॅप्स सहजपणे हाताळताना दिसतात आणि हे सगळं इतक्या झपाटय़ाने घडतंय की दैनंदिन मानवी जीवन पद्धतीदेखील तितक्याच वेगाने बदलते आहे.

या सर्व गोष्टींचा खोलात शिरून विचार केला की, लक्षात येतं की, आपण सर्व नेहमीप्रमाणेच एका भौतिक जगात जरी जगत असलो तरी आपल्याभोवती एक आभासी विश्वदेखील अस्तित्वात आहे.यालाच म्हणतात VIRTUAL DIGITAL WORLD किंवा CYBER-PHYSICAL WORLD.

कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, रोबोटिक्स, सोशल मीडिया, क्लाऊड, थ्रीडी इमेजिंग, १०टी हे विषय आपल्याला थोडेसे भांबावणारे, बऱ्याच शंका निर्माण करणारे परंतु नक्कीच खूप सारं कुतूहल निर्माण करणारे आहेत. पण काहीही झालं तरी हे सर्व नवीन तंत्रज्ञान आणि ज्याचा वापर हे एक ‘वे ऑफ लाइफ’ म्हणजेच फक्त जीवनोपयोगी नसून जीवनावश्यक झाले आहे आणि होणार आहे त्याबाबत कोणाचेच दुमत नसावे.

अनादी काळापासून मानवाला पडत असलेले प्रश्न, मी कोण? हे असे का घडते? यातले गूढ काय असावे? आणि प्रामुख्याने ‘मी आज जे काम करीत आहे तेच काम उद्या वेगळ्या, सोप्या, जास्त कार्यक्षम आणि अधिक गुणवत्ता असलेले, कमी वेळात कसे करता येईल? या जिज्ञासेपोटीच तर जगातले सर्व शोध लागले असावेत. म्हणूनच म्हटले असावे की सर्व प्रगतीचा मार्ग हा प्रथम ज्ञानउपासनेतूनच जातो.

गेल्या ३००-४०० वर्षांच्या इतिहासात डोकावून बघायचे झाल्यास तज्ज्ञांनी या सर्व शोधांची सुंदररीत्या मांडणी केली आहे, ज्याला त्यांनी चार औद्योगिक क्रांतीयुगांमध्ये विभागलंय.

  • औद्योगिक क्रांतीच्या आधीचा काळ- प्रामुख्याने मानवी आणि प्राणी ऊर्जेचा वापर जसे बैलगाडी, घोडा, मानवी शेती इत्यादी
  • पहिली औद्योगिक क्रांती (१८००)- पाणी, कोळसा आणि वाफेपासून ऊर्जानिर्मिती जसे वाफेवरचे इंजिन, यंत्रमाग इत्यादी.
  • दुसरी औद्योगिक क्रांती (१९००)- इलेक्ट्रिकचा शोध आणि मेकॅनिकल विश्वाची इलेक्ट्रोमेकॅनिकल विश्वाकडे वाटचाल आणि फॅक्टरी, कारखाने, इलेक्ट्रिक उपकरणे यांची रेलचेल.
  • तिसरी औद्योगिक क्रांती (२०००)- इलेक्ट्रॉनिक्स, न्यूक्लिअर पॉवर, संगणक इत्यादींचा शोध आणि त्यापासून स्वयंचलित उपकरणे, उत्पादन आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामचा उदय.
  • चौथी औद्योगिक क्रांती (सध्या)- डिजिटल विश्वाची सुरुवात आणि प्रामुख्याने मानवी बुद्धिमत्तेवर रचलेली कृत्रिम बुद्धिमत्ता नामक आज्ञावली.

या लेखमालेचे प्राथमिक उद्दिष्ट आपल्या समग्र मराठी वाचकवर्गाला या नवीन युगाची, त्यातील नवीन साधनांची आणि उपकरणांची ओळख करून देणे, त्यातील ज्ञान सोप्या शब्दात समजावून सांगणे असे ठेवलेले आहे. सर्वाना रुचेल, समजेल अशा शैलीत आणि मुख्य म्हणजे सर्वाना उपयोगी पडेल असे ज्ञान या माध्यमातून आपल्यापर्यंत आणायचा संकल्प आहे, जेणेकरून आपला मराठी माणूस कुठेही मागे आणि कमी पडायला नको. मग ते तरुण किंवा प्रौढ असो, नोकरदार वा गृहिणीवर्ग असो, आजी-आजोबा असो वा शाळेतील मुलं, प्रत्येकासाठी काही तरी उपयुक्त असणार आहे.

वर्षभर चालणाऱ्या या साप्ताहिक लेखमालेत खालील विषय आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत-

  • कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच अ.क.(ए.आय.)
  • अ‍ॅनालिटिक्स आणि डेटा सायन्स
  • रोबोटिक्स
  • सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग
  • इंटरनेट ऑफ थिंग्ज
  • क्लाऊड कॉम्प्युटिंग
  • व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, ऑगमेंटेंड रिअ‍ॅलिटी
  • इंटरनेट ४जी/५जी, फाइबर नेटवर्क्‍स

प्रत्येक विषयात आपण चर्चा करणार आहोत-

  • प्राथमिक आढावा, इतिहास आणि जनक
  • टॉप १० युजकेसेस म्हणजेच उपयुक्तता
  • ग्लोबल डेव्हलपमेंट्स आणि भारतातील घडामोडी
  • रोजगाराच्या आणि नोकरीविषयक संधी, ट्रेनिंग गरजा
  • त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील उपयुक्तता जसे बँकिंग, रिटेल, टेलिकॉम इत्यादी.

DIY म्हणजेच तुम्ही करा पाहून याचा समावेश करण्याचे उद्दिष्ट आपल्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक आणि वापरही जमावे हा आहे. त्याचबरोबर अतिरिक्त संदर्भ यामध्ये विविध विषयांवरची पुस्तके, व्हिडीओज याच्या लिंक्सही असतील.

भेटू या पुढच्या सदरात, पुढच्या सोमवारी. तोपर्यंत एचडीएफसीच्या सदस्यांनी लॉग ऑन करा- https://www.hdfcbank.com आणि तिथे असलेल्या EVA या आयकॉनवर क्लिक करा आणि अनुभव घ्या रोबोटिक चॅटबॉट संवादचा.

 

hrishikesh.sherlekar@gmail.com

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.