|| इंद्रजित खांबे

भवतालाकडं डोळे उघडे ठेवून पाहायला लागलं, की त्यातलं सौंदर्य दिसू लागतं. अशात कॅमेरा सोबत असेल, तर तो क्षण आपोआप सापडतो- जिथं कॅमेऱ्याचं बटण दाबावंसं वाटतं! यातली मौज एकदा कळाली की, मग कॅमेरा असला काय आणि नसला काय, काही फरक पडत नाही. कारण आपले डोळेच कॅमेरा बनलेले असतात.. १९ ऑगस्टच्या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्तानं विशेष लेख..

डोरोथीओ लँग नावाची फोटोग्राफीच्या इतिहासातील एक महान फोटोग्राफर आहे. तिचं फोटोग्राफीसंबंधी एक वाक्य आहे : ‘द कॅमेरा इज अ‍ॅन इन्स्ट्रमेंट दॅट टीचेस पीपल हाऊ टु सी विदाऊट अ कॅमेरा.’ फोटोग्राफी सुरू करण्यापूर्वी व फोटोग्राफी सुरू केल्यावर माझ्या आयुष्यात नेमका कोणता बदल झाला, हे डोरोथीओ लँगच्या या उद्धृतामधून कळतं. २०१२ साली मी कॅमेरा घेऊन फोटो काढू लागलो. पुढच्या तीन-चार वर्षांमध्ये जसजशी या कलेची समज बाळसं धरू लागली तसतसं जग बदलू लागलं. फोटोग्राफीचा ध्यास लागण्यापूर्वी हे जग तेच होतं. पण आता ते जग आणि डोळे यांमध्ये कॅमेरा नावाचं यंत्र आलं होतं, ज्यामुळे नेहमीचंच जग पाहण्याची रीत बदलली. मग नंतर कॅमेरा सोबत असण्याची गरज उरली नाही. सभोवतालचे प्रदेश, त्यातले आकृतिबंध, सूर्यप्रकाश या गोष्टींमधील सौंदर्य दिसू लागलं. मला वाटतं, फोटोग्राफर असणं म्हणजे सर्वसामान्यातील असामान्यत्व पाहण्याची शक्ती असणं. मग ते बाहेरचं जग असो किंवा स्वत:चं वैयक्तिक विश्व.

२०१५ साली माझ्या पत्नीच्या दुसऱ्या गरोदरपणात काही अडचणी निर्माण झाल्या. यामुळे तिनं जवळपास एक महिना रुग्णालयात घालवला. आता डिलिव्हरी होईपर्यंत अनिश्चित काळ रुग्णालयात घालवायचाय हे जेव्हा निश्चित झालं, तेव्हा मी या सर्व प्रवासाचं छायाचित्रण करायचं ठरवलं. महिन्याभरात तीन शस्त्रक्रियांनंतर तिनं मुलाला जन्म दिला. नंतर सर्व सुरळीत पारही पडलं. व आज आयुष्यातल्या सर्वात कठीण कालखंडात काढलेली ती छायाचित्रं आमच्या कुटुंबासाठी एक बहुमूल्य ठेवा आहे. आयुष्यातील अडचणींनाही सकारात्मकतेनं पाहायची ही ताकद दिली ती छायाचित्रण कलेने. त्या महिनाभराच्या रुग्णालयातील वास्तव्यात सर्वात चांगली सोबत झाली ती कॅमेऱ्याची.

दोन-तीन वर्षांपूर्वी मराठवाडय़ातील एका निमशहरी भागात फिरत होतो. तिथले काही फोटोग्राफर मित्रही होते. त्या गावात सर्वत्र मोकाट गाढवं फिरत होती. मी फोटोग्राफर मित्राला म्हटलं की, ‘या गाढवांवरती खूप भारी सीरिज होऊ  शकते. त्यांचे आकार, त्यांच्या मानेवरून पाठीवर फिरणारी केसांची रांग व त्यावर पडणारा सूर्यप्रकाश हे फार ‘फॅसिनेटिंग’ आहे.’ माझे मित्र हसले. त्यांना मी गमतीनं बोलतोय असं वाटलं. पण मी पूर्ण गांभीर्यानं हे बोलत होतो. अत्यंत सर्वसामान्य गोष्टीतलं सौंदर्य शोधणं मला फोटोग्राफर म्हणून फार आव्हानात्मक वाटतं. मग कणकवलीला परत आल्यावर मी स्वत: असं काही तरी काम करायचं ठरवलं. आमच्याकडे गाढवं नव्हती, पण मोकाट फिरणाऱ्या गाई, बैल फार होते. मग त्यांच्यामागून फिरू लागलो व वर्षभराच्या कालावधीत एक छायाचित्रमालिका तयार झाली. मोकाट फिरणाऱ्या गाई-बैलांकडे अशा प्रकारे पाहता येऊ  शकतं, ही कल्पना सर्वाना प्रचंड आवडली. पण या सर्व प्रकारात झालं काय की, गाई-बैलांच्या कधी, किती जवळ जावं, हे मला कळायला लागलं. ही सर्व मालिका मी मोबाइल फोन वापरून केलेली असल्यामुळे मला त्यांच्याजवळ जाऊन छायाचित्र घेणं भाग होतं. त्यामुळे जवळ जाण्यापूर्वी त्या प्राण्याचे डोळे व ‘बॉडी लँग्वेज’ यांचा अंदाज घेण्याचा अभ्यासच झाला म्हणा ना. फोटोग्राफी नसती तर या गोष्टींना मी मुकलोच असतो असं वाटतं.

बऱ्याचदा मला प्रश्न विचारला जातो की, जे तुम्हाला दिसतं ते आम्हाला का नाही दिसत? याचं कारण मला असं वाटतं की, एक चांगला फोटोग्राफर हा एक चांगला निरीक्षक असतो. एखादा फोटो काढायला असा कितीसा वेळ लागतो? सेकंदाच्या काही भागामध्ये कॅमेऱ्याच्या शटरची उघडझाप होते आणि छायाचित्र जन्म घेतं. पण त्यापूर्वीची कित्येक मिनिटं, तास हे समोरच्या प्रदेशाचं, घटनेचं, त्या फ्रेममध्ये असलेल्या माणसांचं, जनावरांचं निरीक्षण करण्यात जातात. एखादी घटना तुम्ही पाहात असाल, तर किती वेळा तुम्ही तीच घटना तुमची जागा बदलून पाहिलीय? तुमची उभे राहण्याची जागा बदलली की तुम्हाला दिसणारं जग बदलतं. एखाद्या चांगल्या फोटोग्राफरला ही योग्य जागा हेरता येणं फार महत्त्वाचं असतं. मग एका विशिष्ट कोनातून एखादा बैल किंवा गाढवदेखील अफाट सुंदर वाटून जातो. कारण यापूर्वी आपण ते जनावर त्या कोनातून पाहिलेलं नसतं.

माझ्या मते, फोटोग्राफर असणं म्हणजे एक चांगला बॉक्सर असणं. मोहम्मद अलीला पाहिलंय का कधी बॉक्सिंग खेळताना? बॉक्सिंग रिंगमध्ये तो नुसता बागडत असायचा. समोरच्या प्रतिस्पध्र्याचा अंदाज घेत. त्याचं पूर्ण निरीक्षण करत. आणि मग एक वेळ अशी यायची की, त्याला वाटायचं- हाच तो क्षण आहे पंच मारण्याचा! चांगल्या फोटोग्राफरनं ही बागडण्याची कला शिकायला हवी. आजूबाजूच्या प्रदेशात माणसं, झाडं, जनावरं यांचं निरीक्षण करत फिरायला हवं. आणि असं जेव्हा तुम्ही फिरता, तेव्हा प्रत्येकाला ते सौंदर्य दिसू लागतं. मग जर तुमच्याकडे कॅमेरा असेल, तर तो क्षण तुम्हाला आपोआप सापडतो- जिथं तुम्हाला वाटतं की, कॅमेऱ्याचं बटण दाबायला हवं! फोटोग्राफी हा एक खेळ आहे. त्यातील यशाची व अपयशाची मजा घेता यायला हवी. आणि ही मजा एकदा यायला लागली की मग कॅमेरा असला काय आणि नसला काय, काही फरक पडत नाही. कारण तुमच्या डोळ्यांना तुम्ही कॅमेरा बनवून टाकलेलं असतं. डोरोथीओ लँग म्हणते तसंच!

(लेखक सिंधुदुर्गातील कणकवली या गावात राहून गेली सहा वर्षे छायाचित्रण करत आहेत. त्यांनी आजपर्यंत कुस्ती, दुष्काळ, दशावतार अशा विषयांवर छायाचित्रमालिका केल्या आहेत. अलीकडेच ‘अ‍ॅपल’ या जगप्रसिद्ध कंपनीसाठी त्यांनी होळीच्या रंगनिर्मिती प्रक्रियेवर आधारित छायाचित्रे काढली आहेत.)

indrajitmk804@gmail.com