कायद्याने विवाहयोग्य वय अठरा ठरवलेलं असताना शरीरसंबंधासाठी मुलीचं वय सोळा करण्यात येणार आहे.  सोळा वर्षांची मुलगी ही खरं तर बालिकाच असते. संबंधासाठी परवानगी वा संमती द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, हे तरी या वयाच्या मुलीला उमगतं का..
शरीरसंबंधाचं संमती वय १८ वरून १६ वर्षे करण्याचं विधेयक मंजूर झाल्यातच जमा आहे.  माझ्या मार्गदर्शनाखाली येऊन गेलेल्या कुमारी मातांच्या केसेस माझ्या डोळ्यासमोर आल्या. त्यातल्या दोन प्रातिनिधिक केसेस इथे नमूद कराव्याशा वाटतात.
एक प्रौढा आपल्या १६/१७ वर्षांच्या मुलीला घेऊन माझ्याकडे आली होती, अनियमित मासिक पाळीची तक्रार होती तिची. त्या मुलीची शारीरिक तपासणी करताना मला तिचं ओटीपोट जरा मोठं वाटलं. मुलीच्या आईला बाहेर बसवून मी त्या मुलीची योनीमार्गातून तपासणी केली. त्यात मला असं आढळलं की, तिच्या गर्भाशयात दोन महिन्यांचा गर्भ वाढत होता. मुलगी सुसंस्कृत मध्यमवर्गीय घरातली होती, त्यामुळे माझ्या तपासणीत काही चूक तर होत नाही ना, अशीच शंका मला येऊ लागली.
त्या मुलीला स्पष्टच विचारलं की, तिचं कोणत्या मुलाशी प्रेमप्रकरण चालू आहे का आणि त्या दोघांचे संबंध आले आहेत का? प्रथम ती कबूल होईना, पण नंतर खडसावून विचारल्यावर तिने सांगितलं की, बाहेरगावी खेळायला गेली असताना एका परगावच्या मुलाशी तिची मैत्री झाली आणि तो नंतर पुण्याला येऊन तिला वारंवार भेटू लागला. प्रेमाच्या आणाभाका झाल्या आणि ‘माझ्यावर तुझं खरं प्रेम असेल तर तू मी सांगीन तसं करशील,’ असं म्हणत तिच्याशी एकांतात भेटून लैंगिक संबंध केले.
‘डॉक्टर, आम्ही फक्त प्रेम केलं, लग्न थोडीच केलं आहे? लग्न झाल्यानंतरच दिवस राहतात ना?’ असा उलट सवाल त्या अर्धपरिपक्व षोडशेने मला केला.
सत्य कळल्यावर तिच्या आईला धक्काच बसला. बरं त्या मुलाचा पत्ता वगैरे काहीच माहिती नव्हता. आणि तो आता या षोडशेला भेटायचाच बंद झाला. त्याच्या विरुद्ध काहीच करता येत नव्हतं. गर्भपाताचा मार्ग समोर होता तो स्वीकारावा लागला.
लैंगिक संबंध म्हणजे नक्की काय, हे माहिती नसलेल्या मुलीवर जर प्रेम व्यक्त करण्याच्या आमिषाने संबंध लादला गेला तर त्याला काय नाव द्यायचं? स्वैराचार?
दुसरी एक षोडशा माझ्याकडे स्वत:होऊनच आली होती. ‘डॉक्टर, दोन महिने माझी मासिक पाळी आली नाही. स्त्रीला दिवस राहिले तरच अशी पाळी चुकते ना? मला तर भीतीच वाटायला लागली आहे,’ ती म्हणाला.
‘भीती का वाटते तुला? तुझे कुठल्या मुलाशी लैंगिक संबंध आले आहेत का?’ मी विचारलं.
‘संबंध म्हणजे नक्की काय असतं डॉक्टर? एका मुलाने २-३ वेळा माझा हात हातात घेतला होता, त्यामुळेसुद्धा दिवस राहू शकतात का?’ ती मुलगी विचारत होती.
अशा अर्धवट वयाच्या मुली लैंगिक संबंधांसाठी संमती काय देणार? समाज वा सरकार अशी अपेक्षाच कशी करू शकतो तिच्याकडून?
कायद्याने विवाहयोग्य वय अठरा ठरवलेलं असताना शरीरसंबंधासाठी मुलीचं वय सोळा करण्यापाठीमागे नेमकं काय प्रयोजन आहे हे खरं तर मला उमजलेलंच नाही. सोळा वर्षांची मुलगी ही खरं तर बालिकाच असते. संबंधासाठी परवानगी वा संमती द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, हे तरी या वयाच्या मुलीला उमगतं का?
होईल काय की कागदोपत्री Child Abuse च्या प्रमाणात घट होईल आणि बलात्काराच्या प्रमाणात वाढ होईल. म्हणजेच या वयाच्या फरकामुळे बलात्काराचं प्रमाण कमी होणारच नाही.
संमती वय सोळा केल्यामुळे एक फायदा असा होईल की सोळा वर्षांच्या मुलीला लैंगिक छळ, बलात्कार अशा तक्रारी नोंदवता येतील. पण मोठा तोटा मला असा वाटतो की, अशा बलात्काराच्या केसेसमध्ये आरोपीने जर असं म्हटलं की, मी मुलीचा होकार होता म्हणूनच संबंध ठेवला, तिचा होकार होता की नाही विचारा, आणि मुलीची साक्ष होताना तिने होकार दिल्याची कबुली दिली, तर बलात्काराची केसच निकालात निघेल. आणि त्याचा फायदा त्या बलात्कारी गुन्हेगाराला होईल.
म्हणून माझ्या मते बलात्कारांचं आणि लैंगिक अत्याचारांचं प्रमाण कमी व्हायला हवं असेल तर पुरुष समाजाची मानसिकता बदलायला हवी. अगदी तरुण वयात मुलांच्या हातून मुलींवर लैंगिक बळजबरी होते, पाठलाग केला जातो, स्पर्श केले जातात ते लैंगिक वासनांवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे! घडलेल्या अपराधाची टोचणी जर अशा तरुणांच्या मनाला लागून राहिली तर त्यांची वृत्ती बदलते, त्यांचं वागणं विकृत होत नाही. पण अनेक वेळा बलात्कारी पुरुष हा मुळातच स्वत:तील लैंगिक कमतरतेच्या भावनेनं पीडलेला असतो. स्त्रीचं समाधान आपण करू शकणार नाही, म्हणजेच स्त्रीच्या लैंगिक भुकेपुढे आपण फार दुबळे आहोत हे त्याला जाणवत असतं. तिच्यापुढे तो स्वत:ला लैंगिकदृष्टय़ा अगतिक समजत असतो आणि विकृत विचारांमुळे या अगतिकतेतूनच क्रौर्य जन्माला येतं. मग तो एकटा वा इतर अशा विकृतांसोबत एकटय़ादुकटय़ा स्त्रीवर शरीरबलाच्या जोरावर बलात्कार करून स्वत:चं समाधान करू पाहतो. कारण अशा बलात्कारात स्त्रीचं समाधान करण्याची जबाबदारी त्याच्यावर नसतेच, त्यामुळे तो खूश असतो.
स्त्रीच्या बाबतीत म्हणायचं तर प्रत्यक्ष बलात्कारापेक्षा बलात्कार होणार ही निव्वळ कल्पनाच स्त्रीला भीतीने गर्भगळीत करून टाकते. या भीतीच्या आहारी ती गेली की तिचा प्रतिकारही संपतोच आणि मग बलात्कारी पुरुषाचं काम सोपं होतं.
खरं म्हणजे प्रतिकार चालू ठेवला, मांडय़ा जर एकमेकांजवळ आवळून धरल्या तर शिश्नाचा योनीप्रवेश होणं अशक्यच होतं. पुरुषाचे डोळे, हनुवटी, नाक, बेंबीभोवतालचा भाग वगैरेवर आघात केला तर तो हतबल होऊ शकतो. पुरुषाचं अंडाशय थोडंसं जरी दाबलं तरी त्याला प्रचंड वेदना होतात. प्रतिकारासाठी ही मर्मस्थळं स्त्रियांनी जरूर लक्षात ठेवायला हवीत.
पण दिल्लीतल्या घटनेवरून आपल्या असं लक्षात आलं की, अशा प्रतिकाराचा प्रयत्न केलेल्या स्त्रीला इतर शारीरिक इजांना सामोरं जावं लागतं आणि जिवास मुकण्याचीही वेळ येते. त्यामुळे अनेक स्त्रिया प्रतिकार करू शकत नाहीत आणि अगदी तरुण मुली तर खूपच घाबरून जाऊ शकतात आणि अशी घटना त्यांचं भावविश्व उद्ध्वस्त करून टाकू शकते.
बलात्कारी पुरुषाला अनेक वेळा पशूची उपमा दिली जाते पण ती चुकीची आहे. पशूंमध्ये मादी शारीरिकदृष्टय़ा नरापेक्षा डावी तर नसतेच, उलट जास्त बळकट असू शकते आणि संभोगासाठी नराची निवड करण्याचा अधिकार तिला निसर्गत:च लाभलेला असतो.
मानवी स्त्रीला वर्षांनुवर्षे कमजोर, कनिष्ठ ठरवल्याने ती अशा प्रकारे आपला अधिकार प्रस्थापित करू शकत नाही आणि बलात्कारासारख्या अत्याचाराला बळी पडते आणि बलात्कार झालेली स्त्री स्वत:ला हीन समजू लागते, समाजही तिला उकिरडय़ासारखी वागणूक देऊ लागतो.
म्हणून बलात्कारी आणि इतरही लैंगिक अत्याचारी व्यक्तींना लवकरात लवकर आणि कडक शासन नवीन सुधारित कायद्यानुसार होऊ लागणार असेल तर ते स्वागतार्ह आहे.
पण तरीही मुळात लैंगिकतेचं यथायोग्य ज्ञान स्त्री-पुरुषांना वयात येतानाच करून देणं हा खरं तर योग्य उपाय आहे. त्या दृष्टीने लैंगिक शिक्षणाचे काही पाठ तयार करूनही त्यांची कार्यवाही होऊ शकली नाही ही एक खंत आहे.
आजच्या तरुण-तरुणींना माध्यमांमुळे जे ज्ञान मिळतेय ते फक्त माहिती स्वरूपात आहे, वासना भडकावणारं आहे, ज्यामुळे त्यांच्यातील लैंगिक सुजाणता वाढीस लागू शकत नाही.
म्हणूनच लैंगिक शास्त्राचं शिक्षण ही काळाची खरी गरज आहे आणि हे शिक्षण कसं तर संयम शिकवणारं, जबाबदारीची जाणीव करून देणारं असावं. हे शिक्षण शाळा-कॉलेजमध्येच द्यायला हवं असं नाही, तर योग्य त्या संस्कारांनी आई-वडील आणि घरातील अन्य थोर मंडळी हे शिक्षण सुरू करू शकतात.
पण आज इतक्या वैज्ञानिक जगात आनुवंशिकतेचं शास्त्र मात्र गुप्त ठेवण्याकडेच सर्वसामान्यांचा कल दिसतो. त्यामुळे वैवाहिक जीवनात पदार्पण करताना तरुण-तरुणी डोळसपणा ठेवत नाहीत आणि त्याचा परिणाम नवीन पिढीच्या लैंगिक वाढीवर होताना दिसत आहे आणि यात सुधारणा होणं हे कायद्यातील सुधारणेइतकंच महत्त्वाचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Age of consent for physical relations law and society
First published on: 17-03-2013 at 12:02 IST