बुवाबाजी हा एक संघटित व्यवसायहोऊ पाहत आहे. दरबार, सत्संग, दिव्य दर्शन अशा दैवी अनुभूतीचा आभास निर्माण करणाऱ्या नावाखाली हे धंदे सुरू असल्याने, त्यांना प्रतिष्ठादेखील मिळत गेली आहे. काही प्रतिष्ठित भोंदूंच्या कार्यपद्धतीचा सूक्ष्म अभ्यास करून आणि त्यांच्या बरकतीचे गमक समजावून घेऊन बुवाबाजीचा एक वर्ग नव्याने उदयाला येण्याची धडपड करीत असल्याचे धोके अनेक उदाहरणांमधून सामोरे येऊ लागले आहेत. उघडय़ा मदानात सिनेसंगीताच्या तालावर बेभान नृत्य करून भक्तांना भुरळ घालणाऱ्या सुखिवदर कौर ऊर्फ राधे माँच्या निमित्ताने, बोकाळलेल्या भोंदूगिरीचे आणि बुवाबाजीचे हे वास्तव..

आजपासून बरोबर साडेनऊ महिन्यांपूर्वी, ३१ ऑक्टोबर २०१४- त्या दिवशी शुक्रवार होता- सकाळपासूनच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमकडे लोकांची गर्दी अक्षरश: धावत सुटली होती. ती कोणा विश्वचषकाची स्पर्धा नव्हती आणि स्टेडियमवर कुणा आवडत्या क्रिकेटवीराची तळपणारी बॅट पाहण्याची उत्सुकताही लोकांना नव्हती. त्या दिवशी स्टेडियमलाही काहीसे अवघडल्यासारखेच झाले असावे. दुपारनंतर सारे स्टेडियम खचाखच भरले. घोषणांचा पाऊस सुरू झाला आणि एक नवा सोहळा स्टेडियमने अनुभवला. दहा वर्षांनंतरच्या सत्तापरिवर्तनाच्या अलोट उत्साहात, स्टेडियमवर उभारलेल्या एका शाही मंचावर नव्या राज्याभिषेकाचा आगळा समारंभ सुरू झाला. दुपारचे चार वाजून सव्वीस मिनिटे झाली आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदाची व गोपनीयतेची शपथ घेण्यास सुरुवात केली. एका बाजूला उत्साही समर्थकांच्या घोषणा सुरू असताना, मंचकावरील पहिल्या रांगेत बसलेल्यांचे हात आशीर्वादासाठी उंचावले गेले. मुहूर्तावर फडणवीसांनी शपथ पूर्ण केली आणि मंचावरील त्या रांगेतील एकेका आसनासमोर मस्तक झुकवत आणि विनयपूर्ण आदराने नमस्कार करत ते पुढे सरकू लागले. स्टेडियमवरील गर्दीतील अनेक चेहऱ्यांवर आश्चर्याच्या छटा उमटल्या. राज्यात काही तरी नवा बदल झाला आहे, याची जाणीवही अनेक चेहऱ्यांवर स्पष्ट दिसू लागली. दुसऱ्या दिवशी भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या बातम्यांनी रकाने भरले, तेव्हा त्यामध्ये एक वेगळाच मथळा ठळकपणे राज्याला वाचावयास मिळत होता. ‘मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीस बाबा-बुवांचा आशीर्वाद!’ शपथविधी सोहळ्याच्या मंचावर भगवी वस्त्रे, रुद्राक्षाच्या माळा परिधान केलेले, धर्मदंड आणि संन्यासाची वैभवी चिन्हे मिरविणारे, नव्या जमान्यातील सारे साधुसंत अवतरले होते. विविध धर्माच्या गुरू आणि आचार्यानी या सोहळ्यास हजेरी लावल्याने, फडणवीस सरकारच्या कारकीर्दीत आता भगव्या संन्याशांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले, अशी चर्चाही होऊ लागली. या मांदियाळीतील काही बाबा-बुवा वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्तही होते. त्यांच्या साधुगिरीवर किंवा बुवाबाजीवर अनेकदा प्रश्नचिन्हेही उमटून गेली होती. मात्र, नव्या सत्तासंपादनाच्या सोहळ्यात त्यांना मानाचे पान मिळाल्याने, ही प्रश्नचिन्हे काळाच्या ओघात पुसली जाणार आणि वादग्रस्ततेची वलयेही नाहीशी होणार अशा शंकेने समाजातील एक वर्ग चिंताग्रस्तही झाला.पण फडणवीस सरकारच्या गेल्या साडेनऊ महिन्यांच्या कारकीर्दीत प्रत्यक्षात मात्र, भगव्या कफन्या आणि रुद्राक्षांच्या माळांचे प्रस्थ फारसे जोपासले गेलेच नाही. उलट, राज्यातील जनतेला वर्षांनुवष्रे भुरळ घालून, धर्म आणि कर्मकांडाच्या नावाखाली लुबाडणूक करणाऱ्या अनेक भगव्या भोंदूंच्या कुंडलीतील पीडाग्रह मात्र बलवान झाले आणि अनेकांना तर गजाआडची हवा खाण्याची वेळ आली. या कारवाईने काही काळ समाजमन ढवळून निघाले असले, तरी भगव्याच्या छायेत कारकीर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या भाजप सरकारने मात्र शपथविधी सोहळ्यानंतर अनेकांच्या मनात उमटलेली प्रश्नचिन्हेच पुसण्यास सुरुवात केली. भोंदूगिरी आणि बुवाबाजीची भुरळ पडलेल्यांच्या मनावरील मळभ दूर करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात तरी झाल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. ज्या बाबा-बुवांनी आपले प्रस्थ समाजातच नव्हे, तर सत्ताकारणातही निर्माण केले होते, त्यांच्या चेहऱ्यांवरील आध्यात्मिकतेचे बुरखे टराटरा फाटू लागले आहेत आणि त्यांचे खरे अवतार जगासमोर येऊ लागले आहेत.पुराणकथांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या कथांचे एक वेगळे स्थान आहे. श्रीकृष्णाच्या राजकीय, प्रशासकीय आणि धार्मिक चातुर्यकथांबरोबरच, त्याच्या रासलीलांचे वर्णनही तेवढेच लोकप्रिय आहे. देवस्थान प्राप्त झालेल्या या राज्यकर्त्यांने, साधुत्वाच्या रक्षणासाठी आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा अवतार धारण करण्याची ग्वाही महाभारतकाळात भारताला दिली होती. त्यामुळे आजच्या काळात अनेकांचे फावले. आपण कृष्णावतार आहोत, असे सांगणाऱ्या या नवअवतारांनी आपल्या रासलीला सुरू केल्या आणि कृष्णभक्तीने आंधळेपण आलेल्या भाबडय़ा भक्तांनी आपले सारे काही या नव्या कृष्णावतारांच्या चरणी ओतण्यास सुरुवात केली. संन्याशाची वस्त्रे परिधान करणाऱ्या बुवा-बाबांच्या पायाशी गडगंज संपत्तीचे डोंगर उभे राहू लागले, आलिशान आणि वैभवसंपन्न आश्रमांच्या अंतर्भागात पोलादी िभतींपलीकडे काय चालले आहे, याची जगाला कल्पनादेखील येणार नाही, अशा रासलीला सुरू झाल्या आणि भक्तिभावाने आंधळे झालेल्यांच्या सर्वागीण शोषणाचा एक संघटित उद्योगच या रूपाने उदयाला आला. काही भक्तांनी हे शोषण भगवंताचा प्रसाद म्हणून निमूटपणाने सोसले, तर काहींना ते असहय़ होऊ लागताच, पोलादी िभतींपलीकडच्या कृष्णलीला चव्हाटय़ावर येऊ लागल्या. आसाराम बापू नावाचा एक तथाकथित कृष्णावतार यातूनच गजाआड गेला. पुराणकाळातील श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगाच्या गजाआड झाला होता, नव्या काळातील काही स्वयंघोषित श्रीकृष्णांना आपले जन्म गजाआड घालवावे लागणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत.स्वत:ला दुर्गादेवीचा अवतार समजणाऱ्या राधे माँ नावाच्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुदेवतेलाही नव्या श्रीकृष्णांच्या रांगेत जाऊन बसावे लागणार, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. पुराणकाळात, ‘संभवामि युगे युगे’ अशी ग्वाही श्रीकृष्णाने दिल्याने नव्या युगात त्याचा फायदा घेत श्रीकृष्णावतार जन्माला आले, त्यामुळे त्याच्यासोबत अशा ‘राधांचा’ जन्मदेखील अपरिहार्यच होता. या आधुनिक राधांच्या नकली आणि जाणीवपूर्वक घडविल्या गेलेल्या आध्यात्मिक चेहऱ्यांवरील ‘मेकअप’चे थर उतरण्याची वेळ आता आली आहे. उघडय़ा मदानात सिनेसंगीताच्या तालावर बेभान नृत्य करून भक्तांना भुरळ घालणाऱ्या सुखिवदर कौर नावाच्या या राधे माँच्या निमित्ताने, बोकाळलेल्या भोंदूगिरीचे आणि बुवाबाजीचे बुरखे फाडण्यास सुरुवात झाली आहे. त्या दिवशी मंचावर स्थान मिळाले असले, तरी भगव्या कफनीतील साऱ्या मुखवटय़ांना सरसकट देवत्व नाही, याची जाणीव समाजाला होऊ लागली आहे. म्हणूनच, नाशिकच्या कुंभमेळ्यातही, ‘भोंदू साधूंना थारा नाही’, असा एक नारा कालच घुमला आहे. आता तेथे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण साधूची वस्त्रे मिरविणाऱ्या भोंदूंचे वस्त्रहरण करण्यासाठी भगवी जमातच सरसावली आहे. कुंभमेळ्यास जाण्यासाठी राधे माँ नावाच्या या नवअवतारधारी दुग्रेला मनाई नाही, असे तिच्या भक्तगणांकडून सांगण्यास सुरुवात झाल्याने, तिच्या विरोधासाठी आता भगव्यांचीच एक फौज सरसावली आहे. राधे माँच्या वादाच्या निमित्ताने एक बरे झाले. कुंभमेळ्यात भोंदूंना थारा न देण्यासाठी ही फौज खरोखरीच कामाला लागली, तर अनेक बुरखाधारी साधुसंतांचे खरे चेहरे तरी समाजासमोर येण्यास मदत होईल. मात्र, तसे व्हायला हवे! बुवाबाजीचा हा धंदा नवा नाही. गेल्या कित्येक दशकांपासून या धंद्याला बरकत आलेली आहे. समस्यांनी ग्रासलेल्या आणि त्यातून बाहेर पडण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्या प्रत्येकास काही ना काही आधाराचा हात हवा असतो. अशा वेळी काहींची विचारशक्ती आणि विवेकशक्ती संपते, तर काहींचा स्वत:वरचा, आपल्या कर्तृत्वावरील विश्वास डळमळीत होतो. अशी दुबळी मने मग परमेश्वराच्या मदतीकडे डोळे लावतात आणि नव्या युगातील असे स्वयंघोषित परमेश्वरावतार मदतीला धावून जाण्याचे नाटक करीत भक्तांना आणखी पोखरू लागतात. दूरचित्रवाणीवरील कोणत्या तरी वाहिनीवर, निर्मलबाबा नावाच्या अशाच एक ‘संकटमोचका’च्या दारी लागलेली भक्तांची रीघ ‘याचि डोळा’ पाहावयास मिळते. समस्यांचे पाढे वाचणारे केविलवाणे भक्त आणि सर्वज्ञाचा आव आणत त्यावर तकलादू उपाय सांगणाऱ्या या बाबाचा दरबार म्हणजे खरे तर अंधश्रद्धांच्या आहारी गेलेल्यांचे डोळे उघडणारे झणझणीत अंजनच आहे. चेहऱ्यावरील रेषादेखील न हलविता, ‘बरकती’चे तोकडे, कचकडी उपाय सांगणाऱ्या अशा बाबांचीच खरे तर भोळ्या भक्तांमुळे बरकत सुरू आहे. नित्यानंद नावाच्या एका कोवळ्या चेहऱ्याच्या आध्यात्मिक गुरूने शयनगृहात भक्त महिलांसोबत केलेल्या चाळ्यांची चलतदृश्ये समाजमाध्यमांतून जगजाहीर झाली. अशा बाबांवर अपार भक्तिभावाची अविचारी उधळण करणाऱ्या वर्गाची मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. बाबा-बुवाबाजीच्या नादाला लागून स्वत:ची कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या भक्तांचे डोळे उघडले, तरच नवे कृष्णावतार आणि त्यांच्या कृष्णलीलांना पूर्णविराम मिळेल, हे वास्तव अजूनही समाजातील भक्तवर्गाच्या पचनी पडलेले नाही, हेच बुवाबाजीच्या उदयाचे कारण आहे. आसाराम, निर्मल बाबा, राधे माँ यांसारखे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू खरे तर जागोजागी फोफावले आहेत. पशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका गावठी भोंदूचे प्रताप उघड झाल्यानंतरही तसेच प्रकार अन्यत्र होत असतात. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा झाल्यानंतर, अंधश्रद्धा आणि अघोरी उपायांना कठोर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; पण अजूनही मुंबईच्या उपनगरी रेल्वेगाडय़ांमध्ये बंगाली बाबा, काळी जादू आणि वशीकरणाची हमी देणाऱ्या जाहिरातींना आळा घालणेदेखील शक्य झालेले नाही. उच्चभ्रू समाजावर आपल्या अवताराची मोहिनी घालणाऱ्या ‘हाय प्रोफाइल’ बाबा-बुवांबरोबरच, एखाद्या झोपडपट्टीत अंधाऱ्या खोलीत, कवटय़ा-हाडे, गुलाल-बुक्का, िलबू-मिरच्या आणि धूप-अगरबत्त्यांच्या गराडय़ात घुमत समस्याग्रस्तांच्या असहायतेचा गरफायदा घेणारे ‘बंगाली’ बाबा अजूनही तेजीतच आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यात त्यांचे साम्राज्य पसरलेले आहे, तरीही, जाहिरातींमधून मोबाइल नंबर देऊन ‘खुल्ला चॅलेंज’ देणाऱ्या या धंद्यालाच नव्हे, तर रेल्वेगाडय़ांमधून केल्या जाणाऱ्या त्यांच्या अनधिकृत आणि फुकटय़ा जाहिरातींनादेखील आळा घालण्यात पुरते यश अजूनही येऊ शकलेले नाही.श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील सूक्ष्म सीमारेषा हेच अशा धंद्यांच्या बरकतीचे कारण आहे. यामधील फरक ओळखण्याची क्षमता समाजात निर्माण करणे हे एक आव्हान आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांच्या मानसिकतेची काही लक्षणे स्पष्ट असतात. पहिले म्हणजे, आपण ज्याच्या भजनी लागलो आहोत, तो वादातीत आणि सर्वश्रेष्ठच आहे, ही ठाम समजूत. त्यामुळे त्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्नदेखील तेवढेच प्रभावी असले पाहिजेत. त्या प्रयत्नांची नाडी हाती लागण्याची धडपड अजूनही पुरेशी यशस्वी झालेली नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती ज्याच्या भजनी लागलेली असते, त्याच्यावर तिची अपार निष्ठा आणि श्रद्धा असते. त्याचा शब्द हा अंतिम आहे, अशीच या भक्तांची भावना असते. त्यामुळेच, ‘मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होऊनदेखील समाजाची दु:खे निवारण्यासाठी आपण भूतलावरच राहिलो आणि गेली शेकडो वष्रे आपण हेच काम करीत आहोत’, असे सांगणारा एखादा भोंदू ‘महान गुरुस्थानी’ जाऊन बसतो. ‘भगवान विष्णूपासून शिरडीच्या साईबाबापर्यंत साऱ्यांचा वास आपल्या ठायी आहे’, असे सांगणारा एखादा भोंदू, बलात्कारासारख्या संकटातून वाचण्यासाठी आपल्या नामाचा जप करण्याचे निर्थक सल्ले देऊ लागतो.
केवळ मुंबई-पुण्यातच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक भोंदूंनी आपले बस्तान बसवून भाबडय़ा भक्तीच्या भांडवलावर स्वत:ची बरकत सुरू केलेली दिसते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतून यापकी अनेक बाबांचे बुरखे टराटरा फाटले. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात फोफावलेले बुवाबाजीचे बीज आता कोकणातही रुजू लागले आहे. कुणी फटका देऊन आजार बरे करतो, तर कुणी हृदयाच्या कोणत्याही गंभीर विकारांवरील शस्त्रक्रिया केवळ बोटांच्या साहाय्याने करून  रोगमुक्त करतो. वध्र्याचा एक बाबा स्वत:ला नागाचा अवतार असल्याचे सांगत, ‘विठुलाचा खेळ’ म्हणून महिलांशी लैंगिक चाळे करत असे. मनमाडमध्ये एका डॉक्टरकडे कम्पाऊंडरची चाकरी करताना भोंदू डॉक्टर बनून महिलांवर एकांतात उपचार करणाऱ्या शुकदास बाबा नावाच्या भोंदूची भांडाफोडही या चळवळीने केली होती.
आपल्या अंगी दैवी शक्ती असल्याची प्रसिद्धी करणाऱ्या अनेक भोंदूंचे पहिले सावज महिला हे असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये स्पष्ट झाले आहे. अशा मोहिनीजालात फसलेल्या महिलांचाच वापर करून अनेक भोंदूंनी आपल्या मायाजालाचा विस्तार केल्याचीही अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. जेव्हा त्यांचे खरे रूप उघडकीस येते, तेव्हा त्यामध्ये फसगत झालेल्यांच्या यादीतही महिलांचीच संख्या सर्वाधिक असते, हेही स्पष्ट झाले आहे. आपण ज्याला दैवी प्रसादाचा किंवा आध्यात्मिक परमानंदाचा क्षण मानले, तो आपल्या फसगतीचा क्षण होता, हे लक्षात येईपर्यंत भोंदू बाबा-बुवाने आपली बरकत साधलेली असते, हेही अनेक प्रकरणांत उघड झाले आहे. स्वत:च्या आíथक बरकतीचे साधन म्हणून पुरुष भक्तांच्या श्रद्धेचा गरफायदा घेणे आणि लैंगिक सुखोपभोगासाठी महिला भक्तांचा वापर करणे ही अनेक भोंदूबाबांची कार्यपद्धती असल्याचेही काही प्रकरणांमधून स्पष्ट झाले आहे. अर्थात, हा एकटय़ादुकटय़ाच्या बळावर फोफावलेला व्यवसाय नाही. या धंद्यासाठी एक मोठे जाळे विणावे लागते आणि अनेक जणांना त्यामध्ये ओढावे किंवा घ्यावे लागते. त्यामुळे, बुवाबाजी हा एक संघटित व्यवसाय होऊ पाहत आहे. दरबार, सत्संग, दिव्य दर्शन अशा दैवी अनुभूतीचा आभास निर्माण करणाऱ्या नावाखाली हे धंदे सुरू असल्याने, त्यांना प्रतिष्ठादेखील मिळत गेली आहे. काही प्रतिष्ठित भोंदूंच्या कार्यपद्धतीचा सूक्ष्म अभ्यास करून आणि त्यांच्या बरकतीचे गमक समजावून घेऊन बुवाबाजीचा एक वर्ग नव्याने उदयाला येण्याची धडपड करीत असल्याचे धोके अनेक उदाहरणांमधून सामोरे येऊ लागले आहेत. समस्यामुक्त समाज हे कदाचित आवाक्यापलीकडचे स्वप्न असल्याने, समस्याग्रस्तांना किमान दिलासा देण्यासाठी शासन आणि शासकीय व्यवस्था सक्षम आहेत, एवढा विश्वास देणारे संदेश समाजात गेले, तर कदाचित या वर्गाचा उदय रोखणे शक्य होईल. नाही तर, एक बाबा-बुवा गजाआड गेला, तर त्याची जागा घेणारा दुसरा भोंदू उदयाला येईल आणि भगवान श्रीकृष्णाने दिलेला ‘संभवामि युगे युगे’ या संदेशाचा गरफायदा घेणाऱ्यांचाच काळ पुढे सोकावत राहील.

water supply through tankers
दुष्काळ ; ५,००० गावे टँकरग्रस्त
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
दत्ता जाधव possibility of light rain across maharashtra for four days from 5 april
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज