मराठवाडय़ातल्या आठही लोकसभा मतदारसंघांत ‘जात’ प्रभावी असेल. निवडणुकीत तर ती गावोगावी दिसेल. पक्ष कोणता का असेना, नेता कोणी का असेना, मी आणि माझी जात, त्याचा उमेदवार अशी संगती बहुतांशी मतदारसंघांत आहे. त्यामुळे मोदी लाटेचा उलट परिणाम मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणासाठी होईल, असा काँग्रेसच्या नेत्यांचा होरा आहे.
लातूरच्या ‘देवघर’ बंगल्यात एक नेते पूर्वी कधीतरी विचारमग्न अवस्थेत निवांतपणे बसलेले अनेकांनी पाहिले असतील. काँग्रेसच्या किचन कॅबिनेटचे ते सदस्य. त्यांना पुढे बढती मिळत गेली, ते लोकसभेचे सभापती झाले. पराभूत झाल्यानंतरही पुढे गृहमंत्री झाले. तेव्हा खासदार असावा तर असा, असे मराठवाडय़ातील माणसाला वाटू लागले. लातूरची जनता त्यांच्याकडे गाऱ्हाणे सांगायची, ‘इथे पाणी येत नाही, त्या गावाला रस्ता नाही,’ तेव्हा त्यांचा नागरिकशास्त्राचा तास ठरलेला असे. खासदारांचे काम काय, घटनात्मकदृष्टय़ा ते कसे महत्त्वाचे, ते समजावून सांगत. तेव्हा भारतीय राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला आपण फारच किरकोळ कारणासाठी त्रास देत आहोत, असे वाटून मतदार आल्या पावली मागे फिरे. पुढे त्यांच्या परिटघडीच्या कपडय़ांना, साचेबद्ध उत्तरांना लोक कंटाळले. बदल होत गेले. लातूरकरांच्या मानसिकतेत मात्र ते फारसे झाले नाहीत.
भाजप-काँग्रेसमध्ये मुंडे-विलासराव असा ‘मत्र करार’ लागू झाला. तसे मतदानाच्या दिवशी फक्त ‘हाता’वर शिक्का मारून परतण्याची मानसिकता बनत गेली. आता या मतदारसंघात काँग्रेसचे चार आमदार आहेत. एक आमदार भाजपचा व एक नव्यानेच राष्ट्रवादीत गेलेला. शिवसेना तशी लेटरहेडपुरती. गळ्यात गमछा घातलेला शिवसनिक  शोधावाच लागतो. निवडून येण्यासाठी शिवराज पाटील चाकुरकर आणि पराभूत होण्यासाठी भाजपचे गोपाळराव पाटील. भाजपकडून अपवाद तेवढारूपाताई पाटील निलंगेकरांचा. तत्पूर्वी पराभूत होताना गोपाळराव थकले नाहीत. हरण्यासाठी दरवेळी सज्ज, अशी नंतर त्यांची भाजपमध्येही ओळख होत गेली. मतदारसंघ आरक्षित झाला अन्यथा आणखी एखाद वेळी ते िरगणात उतरले असते.
बुजगावणे आणि जयवंत आवळे यांच्यात फारसा फरक करण्याची तसदी लातूरच्या मतदारांनी घेतली नाही. विजयाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. त्यांच्याकडून ना विकासाची अपेक्षा होती, ना त्यांनी ती पूर्ण केली. आता प्रायमरीजचा प्रयोग सुरू आहे. पण विलासरावांनंतरची ही निवडणूक असल्याने विजयावर आमदार अमित देशमुख यांचे राजकीय वजन तपासले जाणार असल्याने ते काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांच्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. तुलनेने भाजपमध्ये गडकरी-मुंडे वादातून खदखदणारी नाराजी दूर करण्याचा ‘गांधी मार्ग’ सुनील गायकवाड यांना माहीत असल्याने येथे भाजपचे काम काँग्रेस मार्गाने सुरू असते.
मराठवाडय़ात काँग्रेसचा मजबूत तंबू अशी ओळख नांदेडची. अशोकराव ठरवतील तसेच राजकारण फिरते. तरीही त्यांना ऐन निवडणुकीत वृत्तपत्र पुरवण्यांचे ‘अशोकपर्व’ लागतेच. त्यांच्यामुळेच ‘पेडन्यूज’ संकल्पनेचा उद्धार झाला. देशाच्या निवडणूक धोरणात स्थान मिळावे, एवढा तो फोफावला. विरोध असतानाही मतदारसंघ बांधणीत ‘आदर्श’ वाटावे, असेच त्यांचे काम आहे. हेही मुख्यमंत्री राहिले. त्यामुळे या दोन मतदारसंघांत काँगेस शक्तिशाली. या वेळी अशोकराव चव्हाण विरुद्ध     डी. बी. पाटील अशी लढत होत आहे. मोदींच्या सभेने वातावरण पालटले असल्याचा दावा केला जातो. पण अशोकरावांचा पराभव होईलच होईल, असे सांगण्याचे धारिष्टय़ अजून भाजपमध्येही नाही.
तसा मराठवाडय़ातील ४६पकी १७ जागांवर काँग्रेसचे आमदार. सहयोगी राष्ट्रवादीचे १३ आमदार. आघाडीची स्थिती तशी मजबूत. तरीही लोकसभेत जाताना मात्र काँग्रेसची अवस्था खंगलेल्या म्हाताऱ्यासारखी. गेल्या लोकसभेत मराठवाडय़ात आठपकी ३ जागांवर सेनेचे खासदार, तर भाजपचे २ खासदार, गोपीनाथ मुंडे व रावसाहेब दानवे. भाजपची एकूण ताकदच दोन खासदार, दोन आमदारांची.
परभणीत काँग्रेसची ताकद सेनेतून आलेल्या खासदाराची. माजी खासदार सुरेश जाधव, तुकाराम रेंगे आणि आता गणेश दुधगावकर हे सेनेकडून निवडून आले. यातील दोघांनी काँग्रेसची वाट धरली, तर दुधगावकरांचे राष्ट्रवादी प्रेम सर्वश्रुत आहे. कपडे बदलावेत एवढय़ा सहजतेने निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे खासदार पक्ष बदलतात. त्यांचे हे कौशल्य वगळले तर कामाचा एकूण आनंदच होता. राष्ट्रवादीने विजय भांबळे यांना निवडणुकीत उतरविले आहे, तर आमदार संजय जाधव यांनी दुधगावकरांची जागा घेतली. आघाडीतील रागद्वेष इथेही दिसतोच.
असेच काहीसे चित्र िहगोलीचे. म्हणे सुभाष वानखेडे कधी तरी विश्रामगृहातच भेटतात. तेव्हा त्यांच्यासमवेत फिरणाऱ्यांची पाश्र्वभूमी मतदारांपेक्षा पोलिसांना अधिक माहीत. पण राष्ट्रवादीतील गट-तट, वर्तणुकीतील सरंजामी थाट यामुळे त्यांचा राजकीय लाभ होतो. ते हदगाव मुक्कामी असतात, एवढेच िहगोलीकरांना माहीत. कधी तरी रेल्वे आरक्षणात खासदारांच्या शब्दाला किंमत असते, एवढेच सर्वसामांन्याना माहीत. अलीकडे वर्षांतून दोनदा तिरुपतीला जाऊन येण्याएवढी मध्यमवर्गीयांची ऐपत झाल्याने तेथे निवासाचे आरक्षण व्हावे, एवढी अपेक्षा केली जाते. त्या मजकुराच्या प्रारूपपत्रावर पाच-पंचवीस प्रतींवर सही करून ठेवली की झाले. एवढेच खासदारांचे काम, अशी कार्यशैली शिवसेना नेत्यांची आहे. हट्टाने ही जागा सोडवून घेणाऱ्या राजीव सातव यांना फटका बसेल तो राष्ट्रवादीशी असणाऱ्या त्यांच्या संबंधाचा. माजी मंत्री सूर्यकांता पाटील त्यांना सहकार्य करणार नाहीत, हे गावातील नाक गळणारे पोरही सांगते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या राजीव सातव यांच्या घरातूनच थेट राहुल गांधीच्या अ‍ॅन्टीचेंबरमध्ये जाता येते, हे माहीत असणारे सगळे नेते त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संच आहे.  
औरंगाबाद हा सेनेचा गड, अशी ओळख एव्हाना झालेली. काँग्रेस म्हणजे गट-गटाचे जनरल स्टोअर. तसे काँग्रेसचे ५ आमदार. राष्ट्रवादीचे दोन. आघाडीचे सहयोगी आमदार अशी ओळख असणारे प्रशांत बंब यांच्यासह सत्ता असतानाही औरंगाबादमधून शिवसेना पराभूत होऊ शकली नाही. रामकृष्णबाबा पाटील आणि काझी सलीम यांचा अपवाद वगळता काँग्रेसला १९७७ पासून यश मिळू शकले नाही. कारण सगळ्यांचे राजकारण महापालिकेतील सत्तेभोवती केंद्रित झाले आहे. तेथील ठेकेदारी मिळावी, यासाठी शिवसेना नेत्यांना राजकीय विरोध करण्याचे धाडस फारसे कोणी दाखवीत नाही. तसेच शिवसेनेच्या नेत्यांचे आहे. आपल्याला विरोध होत नाही ना, मग राज्यातील सत्तेच्या सारीपाटात आपण कशाला सोंगटय़ा हलवायचे, असे चित्र दिसून येते.
काँग्रेसला श्रेयही घ्यायचे नाही. अधूनमधून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आम्हीच आणला, असा दावा मुख्यमंत्री करतात. अन्य स्थानिक नेत्यांना मिरवून घ्यायचे असेल तरच ते काही तरी सांगतात. पक्षाचे काही का होईना आपला गट मजबूत आहे ना, याची खात्री करण्यात अग्रेसर असणारे उत्तमसिंह पवार, शहरी भागाचा आणि आपला तसा संबंधच नाही, असे मानून एकला चलो रे भूमिकेत असणारे रामकृष्णबाबा, यातही पुन्हा मराठा तितुका मिळवावा, हा राष्ट्रीय संदेश असल्यागत वागणाऱ्या पुढाऱ्यांमुळे काँग्रेस ना वाढली ना वाढविली. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी दोन वेळा खुलताबादच्या शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. त्यांना चुचकारले. गेल्या लोकसभेत त्यांनी चंद्रकांत खैरे यांना चांगलेच हैराण केले होते. महापालिकेच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवणाऱ्या खैरे यांना रस्त्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत. पण चांगली कामे करणारा कोणता का गट असेना तो माझा, अशी मानसिकता बनविण्यात खैरे यशस्वी ठरतात.
पण एकही काँग्रेस नेत्यामध्ये, खैरेंचा पराभव करण्याची जिद्दच शिल्लक नाही. औरंगाबाद काँग्रसचे वर्णन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मार्मिकपणे ‘भानगडीची काँग्रेस’ असे करतात. औरंगाबादमधून लोकसभेची निवडणूक लढविण्यास प्रत्येक उमेदवार नकार देत होता. आमदार कल्याण काळे, राजेंद्र दर्डा यांनी मला उमेदवारी नको म्हणण्याची शर्यत लावल्यासारखे वातावरण होते. यामध्ये बँक घोटाळ्यातील आरोपी नितीन पाटील यांच्या नावावर कसेबसे शिक्कामोर्तब झाले. ते आता प्रचाराला लागले आहेत. त्यांनीही प्रचारासाठी जात पुढे केली आहे.
बीडची ओळख गरीब ऊसतोड कामगारांशी जोडलेली. एकदा बाजरी लावावी आणि पुन्हा ऊसतोडीला जावे, असे अर्थकारण. उसाच्या धंद्यातील यशाचे गमक जाणून घेतल्यानंतर खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही या वर्गात साखरपेरणी करून ठेवलेली. राजकारण सगळे जातीचे. एकगठ्ठा मतांचा मजूरवर्ग आणि सोबतीला मराठा नेते, असे राजकारण करीत मुंडे जिल्ह्य़ाच्या राजकारणावर पकड मिळवितात. जिल्हा बँकेतील घोटाळ्यानंतर आणि पुतण्या धनंजय दुरावल्यानंतर ही निवडणूक मुंडेंना तशी सोपी नाही, अशीच चर्चा आहे. या मतदारसंघातही पुन्हा प्रचाराचा मुद्दा ‘मराठा तितुका मेळवावा’ अशी व्यूहरचना राष्ट्रवादीने केली आहे. तर त्यांची एकी होऊ नये, असे प्रयत्न मुंडे करीत आहेत. मेटेंचे ‘येणे-जाणे’ त्याचेच द्योतक. राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व स्थापन केले असले, तरी लोकसभेत मुंडेंची जादू कशी होते, याची वर्णनेही सुरू झाली आहेत. मतदारसंघातील प्रश्न मात्र जशास तसे आहेत. फार झाले तर आणखी एखाद्या नेत्याला आपल्या बरोबर घेऊ, असा विचार दोन्ही बाजूने होतो. भ्रष्टाचार वगैरे असे शब्द नीतिमूल्यांचाच भाग असावीत, अशी वर्तणूक सर्वच नेत्यांची. त्यामुळे बीडकर मुंडेंसह सर्वजणांना ‘सब घोडे बारा टक्के’ या म्हणीतच तोलतात; त्यांच्यासाठी गर्दीही करतात. येथील काँग्रेसचे वर्णन करण्यासाठी एकच शब्द वापरता येईल, आनंदीआनंद! रजनीताई पाटील हे एकमेव नाव वगळता बीड काँग्रेसचे अस्तित्व काय, असा प्रश्न आहे.
जसे औरंगाबादमध्ये उमेदवारी नकोचा धोशा काँग्रेसमध्ये होता. तसेच वातावारण बीडमध्ये राष्ट्रवादीत होते. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारीतून सुटका करून घेतल्याने राज्यमंत्री सुरेश धस यांनी कशीबशी उमेदवारी घेतली. ते प्रचाराला लागले आहेत. पण निवडणुकीत प्रचाराचा केंद्रिबदू जात असणार आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीत एवढे दिग्गज पुढारी आहेत की, काँग्रेसच्या माणसाला कोणीच  विचारत नाही. राणे गटाचे एक वळणही बीड काँगेसच्या रस्त्याला आहे. आमदार सुरेश नवले हेदेखील आता काँग्रेसचे म्हणून वावरतात. पण त्यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी वा भाजपला मदत होईल, मतांमध्ये त्यांच्यामुळे परिणाम होईल, ही शक्यता नाहीच. कागदी घोडा पळून किती पळणार, असेच बीड काँग्रेसचे चित्र आहे. त्यामुळे आपचे नंदू माधवही मतदारसंघात भाव खाऊन जात आहेत. मराठवाडय़ात इतरत्र आम आदमी पार्टीचे उमेदवार तेवढे प्रभावी नाहीत.
जालना लोकसभा मतदारसंघावर रावसाहेब दानवे यांचा पगडा. भारतीय जनता पक्षाच्या या मतदारसंघाची बांधणी अजून काँग्रेस व राष्ट्रवादीला विस्कटता आली नाही. राष्ट्रवादीचे अंकुशराव टोपे, पालकमंत्री राजेश टोपे अशी मातब्बर मंडळी असतानाही लोकसभेत भाजपचा उमेदवार निवडून येतो. रावसाहेबांना चकवा म्हटले जाते. ते दाखवतात चित्र एक आणि करतात काम दुसरे, अशी त्यांची कार्यशैली. अनेक वर्षे विजय मिळवूनही पक्षात तसे मोठे पद न मिळालेला खासदार, अशी त्यांची ओळख आहे. या मतदारसंघात औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांचे पुत्र विलास यांना उमेदवारी देण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले, तरीदेखील वडिलांची काँग्रेसनिष्ठा त्यांच्या कामी आली. त्यामुळे तगडा पर्याय नसल्याने रावसाहेबांचा ‘चकवा’ याही वेळी मतदारसंघात चालून जाईल, असे सांगितले जाते. जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार कैलास गोरंटय़ाल. जिल्हा परिषदेत पाच-सहा सदस्य. मागील पाच निवडणुकांत जालना लोकसभा मतदारसंघातून एकदाही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला नाही. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे सेना-भाजप यांचे प्राबल्य असल्याने काँग्रेसची अवस्था चौथ्या क्रमांकाचा पक्ष अशी आहे.   
उस्मानाबादचे वर्णन ‘हवा-पाणी-तुळजाभवानी’ असे केले जाते. मोठा नेता कोण, असे विचारले की डॉ. पद्मसिंह पाटील हे नाव अवतरते. पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर डॉ. पाटील यांचे नाव देशभर गेले. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना अटक झाली. खुनाच्या आरोपात त्यांच्यावर सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले. त्यामुळे या निवडणुकीतही डॉ. पाटील यांना घेरण्यासाठी हाच मुद्दा प्रचारात जिवंत ठेवला जात आहे. ना उद्योगधंदा, ना जगण्याचे साधन. अनेक वर्षे पाटबंधारे मंत्री असतानाही उस्मानाबादची दुष्काळी ओळख तशी पुसता आली नाही. लोकसभा निवडणुकीत डॉ. पाटलांच्या विजयासाठी काँग्रेसच्या मदतीची नितांत गरज असणार आहे. मधुकरराव चव्हाण तसे काँग्रेसमधले जुनेजाणते. अनुभवाने आलेले शहाणपण नव्या रचनेत सांभाळताना राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंहावर कुरघोडी केली की, जग जिंकल्याच्या आनंदात ते असतात. काँग्रेसची संघटना मजबूत नसल्याने प्रशासकीय कारभारात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा शब्द आजही प्रमाण मानला जातो. त्यामुळे त्यांचे संघटन तसे मजबूत आहे. पण जेलची हवा खाऊन आल्यानंतर त्यांची चक्री फिरेल का, हे सांगणे अवघड आहे. उस्मानाबादमध्ये उमेदवारीसाठी शिवसेनेत बरीच साठमारी झाली. आमदार ओम राजेिनबाळकर यांना उमेदवारी हवी होती. ती रवींद्र गायकवाड यांना मिळाल्याने शिवसेनेत मोठी नाराजी आहे.